अजिंठा – पिंपरे पितापुत्रीचा ध्यास (Ajintha – Dedicated Efforts by Pimpare Father & Daughter)

3
61

बौद्ध जातककथा अजिंठा लेण्यांमध्ये चित्रांतून मांडल्या गेल्या आहेत. त्यात साधारणत: पाचशेसत्तेचाळीस जातककथा आहेत. त्यांतील पंधरा-वीस चित्रे अजूनही ठळक दिसतात. बाकी चित्रे धूसर होऊन गेली आहेत. एम.आर. (मारुती) पिंपरे यांनी अजिंठ्यातील धूसर रेषा पुन्हा ठळक करण्याचे काम हाती घेतले. ती गोष्ट सुमारे पन्नास वर्षांपूर्वीची. ते तो ध्यास घेऊन तेव्हापासून काम करत राहिले होते. पिंपरे यांचे निधन एप्रिल 2019 मध्ये झाले. त्यांनी धूसर झालेल्या अनेक चित्रांना नवीन झळाळी मिळवून दिली. अनेक आर्टिस्ट अजिंठ्यातील चित्रे जशी आहेत तशी चितारतात. वास्तवात अजिंठ्यातील चित्रेच अर्धवट शिल्लक राहिली आहेत. त्यांतील काहींना हात नाही, पाय नाही अशी ती असतात. त्यामुळे ती चित्रे जशी मूळ होती त्याच्या पस्तीस ते चाळीस टक्केच दिसतात. पिंपरे यांना वाटे, की ज्या गोष्टी त्या चित्रांत दिसत नाहीत त्या पूर्ण कराव्यात. त्यांनी तशी साडेतीनशे चित्रे पूर्ण चित्रांकित केली आहेत.

पिंपरे हे मूळचे उदगीरचे. पिंपरे यांचा जन्म वाशीममध्ये झाला. वाशीमचे जुने नाव वत्सकुंडनगर होते. असे मानले जाते, की अजिंठा लेण्यांचे काम करणारे कारागीर वाशिममधून आले होते. पिंपरे यांना वाटे, की ते पूर्वजन्मी त्या कारागीरांमधील एक होते. त्यामुळेच त्यांचा जीव ती चित्रे ‘रिस्टोअर’ करण्यात गुंतला आहे!

पिंपरे यांची चित्रकला सुंदर होती. योगायोगाने त्यांना कामही आर्किओलॉजी डिपार्टमेंटमध्ये कलाकार म्हणून औरंगाबादमध्येच मिळाले. त्यामुळे त्यांचे अजिंठ्याला जाणे सुरू राहिले. त्यांनी 1994-95 ला व्हीआरएस घेऊन पूर्णवेळ तेच काम केले. ते सांगत, असे काम पूर्ण करण्यासाठी कलाकारामध्ये आध्यात्मिक शक्ती लागते, ती मला मिळाली आणि काम होत गेले.

त्यांनी त्यांच्या कलेतील कलाकार म्हणून सारे काही त्या चित्रांना अर्पण केले आहे. ती चित्रे पुनश्च होती त्याप्रमाणे काढणे हे कष्टाचे काम होते. अजिंठा लेण्यांमधील चित्रांतील तपशील सूक्ष्म व सविस्तर आहेत. राजाचा दरबार जरी असला तरी त्यातील प्रत्येक व्यक्तीची केशरचना निराळी दिसते आणि त्या वैविध्याने अचंबा वाटतो. त्यांच्या अंगावरील वस्त्र-आभूषणे वेगवेगळी आहेत. पिंपरे यांनी त्या प्रत्येक घटकाचा अभ्यास बारकाईने केला. त्यानुसार त्यांनी त्यांचे ब्रशचे आघात ठरवले आणि मगच चित्रे रेखाटली. एम.आर. पिंपरे यांनी त्या ऐतिहासिक ठेव्याचे पुनरुज्जीवनच केले आहे.

पिंपरे यांना अजिंठ्याचा ध्यास कसा लागला तेही मौजेचे आहे. ते शाळेच्या ट्रिपमध्ये अजिंठा लेण्यांत गेले

होते. तेथे ते त्या लेण्यांकडे आकर्षित झाले. मग पिंपरे अजिंठ्याला वारंवार जात राहिले. एकदा तेथे पिंपरे यांना दलाई लामा भेटले. पिंपरे यांनी त्यांचे छायाचित्र काढले आणि त्यांचा आशीर्वाद घेतला. दलाई लामा लेण्यांना वारंवार भेट देत असत. तेव्हापासून पिंपरे बौद्धधर्माकडे झुकले. त्यांची राहणी साधी होत गेली. ते खूप नम्र आणि इतरांना मदत करणारे झाले. त्यांचे अध्यात्माप्रती प्रेम निर्माण झाले. ते ध्यानसाधनेच्या मार्गाचा अवलंब करत. ते मुलांना कला आणि इतिहास याबद्दल शिकवण्यास उत्साही असत. त्यांना ऐतिहासिक गोष्टींमध्ये रस होता. त्यांना प्रवास करण्याची आवड होती. त्यांच्या कुटुंबात त्यांच्या पत्नी वत्सला आणि मुलगी मयुरा आहेत.

मयुरा यांनी त्या वडिलांसोबत पाच-सहा वर्षांपासून काम करत असल्यामुळे तोच छंद जोपासला आहे. वडिलांचे थेसिस, आऊटलाईन, रिसर्च असे साहित्य त्यांच्याकडे आहे. ते वापरून आणखी शंभर-दोनशे पेंटिंग्ज तयार करता येऊ शकतील असे त्या म्हणाल्या. मयुरा यांचा तसा प्रयत्न आहे. मयुरी यांचे पती गौरव कश्यप बिझनेसमन आहेत. त्यांनाही या कामात आस्था आहे. ते राहतातही औरंगाबादला. त्यामुळे त्यांची मदत मयुरा यांना हरकामी होत असते.

पिंपरे यांची इच्छा त्यांच्या साडेतीनशे चित्रांचे संग्रहालय व्हावे अशी होती. ते अजिंठा येथेच डोंगरपायथ्याशी पर्यटन केंद्रात मांडले जावे असेही त्यांना वाटे. त्यामुळे तेथे येणाऱ्या परदेशी नागरिकांना किंवा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना पूर्वीची चित्रे आणि आता दिसत असलेली चित्रे यांतील फरक समजून घेण्यास मदत होईल अशी त्यांची भावना होती.

मयुरा पिंपरे म्हणतात, “मी माझ्या लहानपणापासूनच माझ्या वडिलांना जागतिक महत्त्वाचा वारसा जपण्यासाठी आणि त्याचे रक्षण करण्यासाठी कठोर परिश्रम घेताना पाहिले आहे; तसेच, त्यांच्याकडून अजिंठ्यातील चित्रकलेच्या जातककथा ऐकत आले आहे. तेच काम माझ्याही आयुष्याचा एक भाग बनले आहे. मीही वडिलांच्या पायावर पाय ठेवून तेच कार्य करत आहे. माझे जीवन त्याचाच प्रचार करण्यासाठी आणि विकासासाठी समर्पित केले आहे. वडिलांचे एकमेव स्वप्न त्यांची सर्व चित्रे ठेवण्यासाठी कलासंग्रहालय तयार करावे असे होते. तोच माझा ध्यास बनला आहे.

पिंपरे यांच्या ऐंशी फूट लांबीच्या एका चित्राची नोंद ‘लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये झाली आहे. त्यांना ती नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये व्हावी असे वाटत होते तसा त्यांचा प्रयत्न होता. ती गोष्ट साधण्याचाही प्रयत्न मयुरा आणि गौरव करत आहेत.
मयुरा पिंपरे
72768 76884 mmpimpare@gmail.com

 – नितेश शिंदे 9323343406
niteshshinde4u@gmail.com

—————————————————————————————————————-

 

 

 

———————————————————————————————-———————————–

About Post Author

3 COMMENTS

  1. पिपरे पिता पुत्रीचं हे अतुलनीय असच कार्य म्हणावं लागेल आज आपल्या संस्कृतीचा वारसा अशाच महान तपस्वींमुळे टीकून राहतो धन्यवाद .. वाशीम चे तेव्हाचं नाव या लेखासंबंधाने माहित झाले ..खूप खूप धन्यवाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here