अचलपूर येथील गाढवपोळा

    0
    221

    पोळा हा सण बैलांचाच, परंतु अचलपूर येथे भोई समाजात गाढवांचा पोळा आयोजित केला जातो. गाढवांप्रती कृतज्ञता दाखवण्याचा दिवस म्हणजे गाढव पोळा होय. ही प्रथा मागील पन्नास-साठ वर्षांपासून परतवाडा शहरातील दयाल घाट येथे जपली जात आहे…

    अचलपूर नगरीत काही वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहेत. श्रावणात येणारा पोळा हा सण बैलांचा सण म्हणून साजरा केला जातो. बैलांना त्या दिवशी कामाला जुंपत नाहीत. त्यांना पूर्ण आराम असतो. तितकेच नव्हे, तर त्यांना पोळ्याच्या दिवशी सजवतात; ज्वारीचा ठोंबरा, पुरणाची पोळी खाऊ घालतात. ज्वारी हे विदर्भातील प्रमुख पीक आहे. ती ज्वारी ओलावून, नंतर कांडून बारीक करतात. त्यात ताक आणि मीठ टाकले की भातासारखे शिजवून घेतात, त्यालाच ‘ज्वारीचा ठोंबरा’ असे म्हणतात.

    पोळा हा सण सर्वत्र बैलांचाच असतो, परंतु अचलपूर येथे त्याबरोबर अचलपूरच्या भोई समाजात गाढवांचाही पोळा आयोजित केला जातो. शेतकऱ्यांकरता बैल हा शेतीच्या कामासाठी उपयुक्त असतो. गाढवांचा उपयोग दगड, गिट्टी, रेती या मालाची वाहतूक करण्याकरता वाहक म्हणून केला जातो. भोई लोकांसाठी गाढव हेच उदरनिर्वाहाचे साधन आहे. भोई लोक पोळ्याच्या दिवशी गाढवांची रंगरंगोटी करून त्यांना सजवतात, त्यांना त्या दिवशी आराम दिला जातो. तितकेच नव्हे तर त्यांनाही बैलांप्रमाणे ज्वारीचा ठोंबरा व पुरणाची पोळी खाऊ घातली जाते. शेतकरी बैलांप्रती पोळ्याच्या दिवशी ज्याप्रमाणे कृतज्ञता व्यक्त करतात, त्याचप्रमाणे गाढवांप्रती कृतज्ञता दाखवण्याचादेखील दिवस म्हणजे गाढव पोळा होय! ही प्रथा मागील पन्नास-साठ वर्षांपासून परतवाडा शहरातील दयाल घाट येथे जपली जात आहे. पूर्वी हजारो गाढवे पोळ्याच्या तोरणाखाली असायची. आता, गाढवांची संख्या कमी झाली आहे.

    भोई समाजाची उत्पत्ती ही त्रेतायुगापासून दिसून येते. श्रीरामचंद्र जेव्हा वनवासाला निघाले, तेव्हा शरयू नदी पार करणारा भोई होता. त्यांना ‘केवट’ असे उत्तरप्रदेशमध्ये म्हणतात. कलियुगात राजे लोकांच्या दरबारी पालखी, मेणे, डोली वाहून नेणारे म्हणून भोई समाजाची नोंद आहे. भोई लोक दैनंदिन उपजिविकेचे साधन म्हणून मासेमारी करतानाही दिसतात. पुढील काळात अनेक सत्तांतरे झाली. त्यात राजेशाही, मोगलशाही, शिवशाही या काळांतदेखील भोई पालखी, मेणे वाहून नेण्याचे काम करत असत. इंग्रजांच्या काळात मात्र अनेक छोटी राज्ये, संस्थाने खालसा झाली. त्यामुळे त्यांच्या उपजिविकेचे साधन संपले. स्वातंत्र्यानंतर राजाश्रयदेखील संपला. मूळ ओरिसा प्रांतातील हा समाज हळुहळू जैविक गरजा भागवण्याकरता परप्रांतांमध्ये विखुरला. महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात, कर्नाटक यांसारख्या अनेक प्रांतांत भोई समाज विविध व्यवसाय करू लागला. त्या व्यवसायांवरून त्यांच्यात पोटजातीही पडल्या. मासेमारी करणारे ते झिंगा भोई, गाढवांच्या साह्याने मालाची ने-आण करणारे ते गाढव भोई. असे हे गाढव भोई महाराष्ट्रातील विदर्भात येऊन पोचले.

    अकोला जिल्ह्यातील अकोट या तालुक्याच्या ठिकाणीसुद्धा गाढवांचा पोळा भरतो. भारतीय संस्कृतीत प्राणिमात्रांविषयी, विशेषतः उदरनिर्वाहाचे साधन असलेल्या प्राण्यांविषयी सद्भाव हा विविध सण व उत्सव यांद्वारे पाहण्यास मिळतो. त्याचेच  उदाहरण म्हणजे अचलपूर येथील गाढवांचा पोळा!

    – अनुपमा खवसे 9420235506 anukhawase29@gmail.com

    ——————————————————————————————————–

    About Post Author

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here