अखंड कार्यरत हसरे चेहरे

0
303

बालपणात चांगले संस्कार व्हायला हवेत असे नेहमी म्हटले जाते. पण ज्यांना दोन वेळच्या जेवणाची भ्रांत, शिक्षण नाही आणि जे सगळ्या जगापासून लांब, दुर्गम भागात राहत आहेत असे आदिवासी लोक त्यांच्या मुलांना कोणते आणि कसे संस्कार देणार? तशा मुलांना मध्य प्रदेशातील नर्मदालय येथे त्यांच्या नकळत कसे मोलाचे संस्कार मिळत आहेत हे सांगणारा उज्ज्वला बर्वे यांचा लेख.

  • अपर्णा महाजन

अखंड कार्यरत हसरे चेहरे

एका आडगावातली शैक्षणिक संस्था. तेथे एक मोठा कार्यक्रम ठरला. दोन-तीनशे माणसे बाहेरून येणार, संस्थेतली धरून पाचेकशे माणसे जेवणार. सगळ्यात जवळचे मोठे गाव एक-दीड तासाच्या अंतरावर. मंडप उभारायचा, खुर्च्या, सतरंज्या मांडायच्या, माइक-स्पीकर लावायचे, जेवणाची व्यवस्था करायची, कार्यक्रमाला लागणाऱ्या सगळ्या वस्तू तयार ठेवायच्या हे तर कोणताही कार्यक्रम असला की करावेच लागते. पण या संस्थेत त्याच्या जोडीला चकाचक स्वच्छता आणि फुलं-रांगोळ्यांची आरासही असते.

सगळी कामे पूर्ण करायला हातात दोन दिवस आणि हाताशी आठ-दहा शिक्षक, सात-आठ इतर कर्मचारी. त्या आडगावात इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी कोठली यायला? आली तरी अशा गोष्टींवर खर्च करणे संस्थेला मान्य नाही. खरे सांगायचे तर गरजही नाही. सगळे वेळेत आणि उत्कृष्टरीत्या पूर्ण झाले. ते तसे होणारच याचीही सगळ्यांना खात्री होती. कारण… हाताशी होती सव्वाशे मुलांची सेना. वय वर्षे सहा ते पंधरापर्यंतची काटक, उत्साही आणि ‘ऐकणारी’ मुले.

मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील लेपा पुनर्वास या छोट्याशा खेड्यात भारती ठाकूर यांनी उभारलेल्या ‘नर्मदालय’ या संस्थेच्या प्रांगणात असे अनेक कार्यक्रम होत असतात. त्यातला एक कार्यक्रम बघण्याचा सुयोग महिनाभरापूर्वी आला आणि नियोजन व अंमलबजावणी यांच्यातील एकात्मता म्हणजे काय हे पाहायला (आणि अर्थातच त्यातून खूप काही शिकायला) मिळाले.

कार्यक्रमाच्या दोन दिवस आधी सुरुवात झाली साफसफाईपासून. मुले भराभर खिडक्यांवर चढून, खाली वाकून, हात लांबवून, पालथी पडून… जशी आवश्यकता असेल त्याप्रमाणे नजरेला पडणारी प्रत्येक गोष्ट साफ करत होती. एखाद्या मुलाच्या नकळत त्याचे निरीक्षण केले तरी तो करायचे म्हणून काम करत नाहीये, तर त्याला ते करायला आवडते आहे आणि तो त्याचे स्वतःचे म्हणून ते काम करत आहे हे लगेच लक्षात यायचे. त्याचे काम करता करता आपल्याकडे लक्ष गेले तर गोड हसून तो काम पुढे चालू ठेवणार.

मूल लहान आहे म्हणून त्याने काम करू नये असे भारतीताईंना आणि त्या मुलालाही वाटत नाही. त्याच्या शारिरिक क्षमतेनुसार त्याला काम द्या, थोडाच वेळ करू द्या पण त्याला कामाची मजा आणि प्रतिष्ठा- दोन्हीही कळले पाहिजे असा त्यांचा आग्रह असतो. आग्रह म्हणणे चुकीचे आहे म्हणा. त्या कोणतीच गोष्ट आग्रहाने मांडत नाहीत. त्यांना जे मनापासून वाटते ते त्या मृदू शब्दांत व्यक्त करतात. ऐकणाऱ्याला तो विचार पटला की मग त्यासाठी मागे लागावे लागत नाही. आणि विचार योग्य- तार्किक, व्यावहारिक पातळ्यांवर टिकणारा- असल्याने तो पटतोच.

मैदान साफ करून त्यावर पाणी मारण्याचे, ते सपाट करण्याचे काम तर मुलांना काम वाटणेच शक्य नाही. ती मस्तपैकी त्याच्यावर नाचून, उड्या मारून पाणी मारण्याचा आनंद घेत होती. मोठी मुले टेबले इकडून तिकडे हलवताना बहुधा विज्ञानातील – वजन, कोन, तोल, शक्ती- या संज्ञांचे प्रात्यक्षिक करत आहेत असे वाटत होते. साउंड सिस्टीमची मुख्य जबाबदारी सरांकडे, पण वायरी इकडून तिकडे नेणे, त्या आवश्यक त्या जागी लावणे, स्पीकर्स योग्य जागी, योग्य कोनात ठेवणे हे काम मुलांकडे. कोणत्याही मुलाला बोलवा तो सूचना समजून घेऊन लगेच त्या अंमलात आणायला सक्षम आणि तत्पर. हे करत असताना कोठेही आरडाओरडा नाही की रागवारागवी नाही. विशेष म्हणजे ज्याला त्या कामासाठी बोलावले आहे तोच ते करणार. उगाचच ‘चल ना माझ्याबरोबर’ म्हणत चार जणांना गोळा करून जाणार नाही किंवा ज्याला कामाला बोलावलेले नाही तो तिथे नसती लुडबुड करणार नाही की काठावर उभा राहून सूचनाही देणार नाही. पण एखादे काम करायला कोणी नाही असे लक्षात आले तर स्वतःहून ते काम पूर्ण करायला तत्परही असणार.

कार्यक्रमात तबला वाजवणारा माणूस एक गाणे संपल्यावर महत्त्वाच्या कामासाठी उठून गेला. त्यानंतर थोड्या वेळाने दुसरे गाणे सुरू होण्याची वेळ झाली तसा आठवीतला एक मुलगा पटकन उठून मंचावर जाऊन तबल्यावर बसला आणि त्याने तेवढ्याच सफाईने तबला वाजवला.

येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याकडे मुलांचे लक्ष होते. संस्था मध्य प्रदेशात असली तरी भारतीताई मूळच्या मराठीभाषक असल्याने मराठी तेथे बरीच वापरली जाते. मुले आलेल्यांना ताई, दादा नाही तर जीजी, दीदी, भय्या म्हणत अदबीने बोलणार. ती आदब त्यांच्या स्वभावात मुरलेली आहे. आसपास भारतीताई किंवा इतर कोणी शिक्षक असले तर आदब आणि त्यांची पाठ वळताक्षणी चढलेला स्वर असे चुकूनही बघायला मिळाले नाही.

सकाळी दहा ते दुपार चार असा कार्यक्रम सभागृहात होता, तर संध्याकाळचा मैदानावर. दोन वाजता सभागृहात जाताना मैदान मैदानासारखेच दिसत होते. तिथे ना स्टेज, ना बाकी काही. पण चार वाजता सभागृहातून सगळे बाहेर पडेपर्यंत मुलांच्या फौजेने सभागृहातले माइक, खुर्च्या भराभर काढून बाहेर नेले, गाडीत चढवले. आम्ही बाहेर पडून मैदानाशी जाईपर्यंत मैदानाचे रूपच पालटलेले होते. चारही बाजूंनी कनाती लागल्या होत्या. स्टेज उभारलेले होते. आवश्यक ती सगळी तयारी वेळेच्या आधी पूर्ण झालेली होती.

कार्यक्रम संपताक्षणी दुसऱ्या मांडवात जेवणाची ताटे लावलेली होती. तीनशे लोकांना कोणताही गडबड-गोंधळ न होता जेवण वाढले गेले. त्याच वेळी दुसरीकडे छोटी मुले जेवायला बसली. तासा-दीड तासात सगळे साफ करून झाल्यावर मोठ्या मुलांची जेवणे झाली. रात्री दहाच्या आत स्टेज खाली आले, मैदान रिकामे झाले, जागोजागी मांडलेली पाण्याची पिंपे, त्यासाठीची टेबले जागेवर गेली. कोठेही एक कागदाचा कपटासुद्धा शिल्लक राहिला नाही. रोजच्यासारखी मुले दहा वाजता झोपली आणि दुसऱ्या दिवशी पाच वाजता उठून नेहमीप्रमाणे प्रार्थना, साफसफाई, अभ्यास सगळ्याला सुरुवात झाली.

ज्यांना इतके चांगले जीवनशिक्षण मिळते त्यांचे भविष्य उज्ज्वल असणार यात शंका नाही. आपल्याला तर ती शंका वाटतच नाही, पण त्या मुलांनाही वाटत नसणार. कारण ते ज्या शिक्षकांकडे, कर्मचाऱ्यांकडे बघत मोठे होत आहेत, ज्यांचे बोट धरून काम करत आहेत ते सगळे नर्मदालयाच्या तालमीतच तयार झाले आहेत.

पाचशे जणांचा रूचकर स्वयंपाक गोलूच्या हातून आणि त्याच्या देखरेखीखाली झाला. तो नर्मदालयाच्या पहिल्या चार विद्यार्थ्यांमधला एक विद्यार्थी. सगळी तांत्रिक व्यवस्था शंकरकडे. तोही पहिल्या चारांतलाच. मोठमोठाल्या वजनी वस्तू सहज इकडून तिकडे घेऊन जाणारे, सतत सगळ्या तयारीकडे जातीने लक्ष देणारे हेमंत या मुलांचे शिक्षक. उत्तम रांगोळी, फुलांची आरास, समयांची कलात्मक मांडणी स्वतःच्या हाताने करताना, दुसरीकडे मुलांना ताठ बसा, हात पाठीशी बांधून रांगेतून बाहेर जा हे नजरेने सांगणारी आणि मुख्य म्हणजे हातात काम नसेल तर अस्वस्थ होणारी संध्या त्यांची शिक्षिका. ही फक्त दोनचार नावे. नाव कोणतेही असले तरी वृत्ती तीच. कर्मयोग्याची. प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करणाऱ्या भारतीताई आणि त्यांचा उजवा हात दिग्विजय. त्यांनी घडवलेले हे कर्मयोगी. या सगळ्यांकडे पाहात मोठ्या होणाऱ्या कोणत्याही मुलाचे मन आणि बुद्धी चुकीच्या गोष्टी स्विकारायला रिकामे राहूच शकत नाही इतके धडे त्यांना इथे सतत मिळत असतात.

कार्यक्रम संपला. जवळपास सगळे आवरून झाले. फक्त स्टेजवरच्या काही तसबिरी काढायच्या होत्या. त्या त्यांच्यामागच्या लोखंडी चौकटीला दोऱ्याने बांधलेल्या होत्या. ते काम संध्याने अंगावर घेतले. सगळ्या दोऱ्यांच्या घट्ट गाठी बांधल्या होत्या. (कारण त्या संध्याने बांधल्या नव्हत्या). गाठी सोडवायला वेळ लागत होता. संध्याला कोणीतरी सुचवले, कात्रीने काप ना दोरा. तर म्हणाली, थोडा प्रयत्न केला तर सुटतील गाठी. म्हणजे ते दोरे वाया जाणार नाहीत. पुन्हा वापरता येतील.

हेच तेथील कामाचे सूत्र आहे. नर्मदालयाच्या एवढ्या पसाऱ्यात गाठी अजिबात बसतच नसतील असे नाही, पण त्या सहनशीलतेने, हलक्या हाताने सोडवण्याची सवय भारतीताई यांनी सगळ्यांना लावली आहे. त्यामुळे सुविचारी, सद्वर्तनी तरूणांची अखंड आणि सलग साखळी बनत आहे, बनत राहणार आहे. संस्थेच्या अधिक माहितीसाठी- www.narmadalaya.org

-उज्ज्वला बर्वे 9881464677 ujjwalabarve@gmail.com

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here