अकोला – पेरूंचे गाव

0
27

सोलापूर जिल्ह्याच्या सांगोला तालुक्यातील अकोला हे गाव प्रसिद्ध आहे ते पेरूंसाठी. वैशिष्ट्यपूर्ण चवीच्या पेरूने गावाला ओळख व वैभव मिळवून दिले आहे.

पेरूची ती जात ‘लखनौ ४९’ या नावाने ओळखली जाते. त्या पेरूमध्ये बियांचे प्रमाण अल्प असते. बाजारात फळ दोन दिवस उत्तम स्थितीत टिकाव धरते. फळाचे सरासरी वजन चारशे ग्रॅम भरते. फळ गोडीला अधिक असून त्यात साखरेचे प्रमाण जास्त आढळते. त्याच्या झाडाला साधारण आठ दिवसांतून एकदा पाणी द्यावे लागते किंवा ठिबक सिंचन पद्धतीचाही वापर करता येतो. त्यामुळे पाण्याची कमतरता असूनही पेरूबागायत करता येते. ‘लखनौ ४९’ जातीच्या पेरूच्या लागवडीपासून साधारणपणे पाच वर्षे झाल्यावर हेक्टरी एक लाख रुपये उत्पन्न मिळते. झाड लागवडीनंतर अडीच-तीन वर्षांनी फळे देऊ लागते. झाडाचे सरासरी आयुष्य वीस वर्षे असते. पीक घेण्यासाठी पाण्याव्यतिरीक्त हेक्टरी पंचवीस हजार रुपये खर्च येतो.

ती जात मोहोळ तालुक्यातून सरकारी नर्सरीतून पंधरा वर्षापूर्वी आणण्यात आली. तेथील वातावरण व जमीन यामुळे पेरूची वैशिष्ट्यपूर्णता टिकून राहिली. औषधांचा वापर क्वचित व अत्यल्प प्रमाणात केला जातो. सेंद्रीय खतांच्या वापरावर भर दिला जातो. पण एकूणच खते व औषधे नाममात्र उपयोगात आणली जातात. खतांचे प्रमाण जास्त झाल्यास फळ नासून वाया जाते. वातावरणामुळे फळात कीड निर्माण होते. क्वचित ‘तेल्या’ रोग येतो. वर्षातून दोन वेळा अंतरमशागत करावी लागते.

गावामध्ये सध्या भारत हिरालाल शिंदे या शेतकऱ्याने या जातीच्या पेरूची लागवड केलेली आहे. त्यांची पावणेतीनशे झाडे असून त्यांपैकी एकशेदहा झाडे सध्या फळे देत आहेत. वर्षात एका झाडाला साधारणपणे नऊशे ते एक हजार फळे लागतात .

त्याच गावातील शेतकरी ‘भागवत शामराव नखाते’ यांनी सांगोला हा अत्यंत दुष्काळी तालुका असूनही डाळींब, पेरू व अॅपल बोर या पिकांनी तालुक्यातील शेतकऱ्याला तारले असल्याचे सांगितले. ते स्वत: हाडाचे शेतकरी असून उत्तम कबड्डी प्रशिक्षक आहेत. तसेच, त्यांना भोवतीच्या भौगोलिक, सामाजिक, राजकीय परिस्थितीची उत्तम जाण आहे.

– अनुराधा काळे

About Post Author