अंजनडोह हे एक ऐतिहासिक गाव. ते एकेकाळी सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्याची राजधानी म्हणून ओळखले जात होते. गावामध्ये मोठी बाजारपेठ होती. अंजन आणि डोह अशी दोन गावे होती. त्या दोन्ही गावांमधून ओढा वाहत होता. ओढ्याला पाणी असे. त्यामुळे लोकांना इकडून तिकडे येण्या-जाण्यास अडचण निर्माण होत असे. कालांतराने, दोन्ही गावांतील गावकऱ्यांनी एकत्र येऊन ओढ्याच्या एकाच बाजूस घरे वसवली. ते झाले अंजनडोह. तेथे धर्मराजा नावाचा राजा होऊन गेला. त्याने तेथे किल्ल्याची निर्मिती केली. किल्ल्याची अवस्था दयनीय आहे. तेथील खंदराची पडझड झालेली आहे. त्या किल्ल्यातील धर्माबाईदेवीची स्वयंभू पाषाणमूर्ती, आकर्षक आणि उठावदार आहे. एकाच भल्यामोठ्या पाषाणातून त्या मूर्तीची निर्मिती झालेली आहे. किल्ल्याच्या वर, मध्यभागी देवीच्या मंदिराचे दगडी बांधकाम आहे. किल्ल्याला शत्रूंपासून रक्षण मिळण्यासाठी, गुप्तपणे निरीक्षण करण्यासाठी गावाच्या कडेने एकूण नऊ कोट होते. त्यांपैकी दोन कोट पूर्ण अवस्थेत तर एक पडलेल्या अवस्थेत शिल्लक आहे. तर उर्वरित कोट नाहीसे झालेले आहेत.
गावात शिरण्यापूर्वीच गावाभोवती असलेली प्रचंड आणि प्राचीन तटबंदी लक्ष वेधून घेते. त्या तटबंदीच्या आत जवळ जवळ सर्व आलुतेदार-बलुतेदार पिढ्यान् पिढ्या गावागाडा हाकत आले आहेत. मराठा ही त्या गावातील प्रमुख शेतकरी जात. गावचा वर्तमानकाळ शैक्षणिकदृष्ट्या विकसनशील असला तरी गावावर पांडवांच्या कालाचा प्रचंड प्रभाव असेलला दिसतो.
गावात जुनी घरे पाहण्यास मिळतात. लोकांना किल्ल्यावर जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे गावकऱ्यांनी धर्माबाई आणि तुळाबाई या देवींची स्थापना किल्ल्याच्या पायथ्याशी देवींच्या प्रतिमूर्ती आणून केली आहे. त्या देवींसारखी आरती जगाच्या पाठीवर कोठेही म्हटली जात नाही असा गावकऱ्यांचा दावा! स्वयंरचित आरती ग्रामस्थांकडून नवरात्रीमध्ये नऊ दिवस मोठ्या प्रमाणात जत्रेच्या वेळी म्हटली जाते. धर्माबाईच्या काळातील छबिना, पालखी (लाकडी) ही उत्तम अवस्थेत आहे. त्याच पालखीतून नवरात्रीमध्ये या देवीची मिरवणूक काढली जाते.
पौराणिक संदर्भ –
पांडव वनवासात होते, त्यावेळी त्यांचा मुक्काम या लहानशा खेड्यात काही दिवस होता. त्यावेळी पांडवांनी येथे राहत असताना या खेड्याच्या पश्चिम दिशेस सहा-सात फर्लांगावर जानाई या नावाने ओळखल्या जाणाऱ्या शेताच्या माळावर, पाच दगडांची लगोर ( उतरंड) घातली आहे. त्यांपैकी आज चार दगड सुस्थितीत आहेत व वरचा पाचवा दगड पडला आहे. एकेक दगड पाच माणसांनी हलवण्याचा प्रयत्न केला तरी किंचितसुद्धा हलणार नाही अशी अवजड पाच दगडांची लगोर भीमाने रचली आहे.
पांडवांना पाण्याची टंचाई भासली म्हणून या खेड्यानजिक उत्तर दिशेला, ओढ्याच्या पूर्वेस व खेड्याच्या ईशान्य दिशेस असलेल्या बुरुजाजवळ अर्जुनाने बाण मारून पाणी काढले. त्याची साक्ष म्हणजे आजसुद्धा भयानक दुष्काळ पडला तरी त्या डोहाचे पाणी आटत नाही. त्याच्या पूर्व-पश्चिम बाजूला ओढ्यात कोठेही चार-पाच खोलीचा खड्डा (विहीर) खोदला असता खानदेशच्या काशीच्या गुप्त गंगेसारखे भरपूर पाणी मिळते. अर्जुनाने बाण मारून पाणी काढले आहे म्हणून त्या खेड्याला अर्जुनडोह असे नाव पडले.
तसेच गावाच्या वायव्य दिशेस ओढ्याच्या पलीकडे माळावर लहान किल्ला आहे. त्या किल्ल्यात देवीचे देऊळ आहे व देवळाच्या पाठीमागे सुकनावती देवी आहे. अद्यापी लांबून आपल्या सुखदु:खाची फळे देवीच्या उजव्या-डाव्या फिरत्या गुढीहून ठरवतात आणि त्या किल्ल्याला पूर्व दिशेस एक दरवाजा आहे व त्यातून भुयार आहे. ओढ्याच्या खालून गावात असणाऱ्या मोठ्या दरवाजाच्या वाड्यात येण्यास गुप्त रस्ता आहे. त्या भुयारामार्गे पूर्वी गावातून लोक देवीची पालखी व प्रत्येक पौर्णिमेस देवीला आरती घेऊन जात व दसऱ्याला यात्रा भरवत. परंतु काही काळाने, काही कारणाने गुप्त भुयारी मार्गाने जाण्यायेण्याची प्रथा बंद झाली व या देवीची स्थापना गावाच्या पश्चिम दिशेस एक मंदिर बांधून केली गेली व तेथे सर्व विधी ठरल्याप्रमाणे चालू असतात. देवीची स्थापना धर्मराजाने केली आहे म्हणून देवीला धर्माबाई नाव आहे.
देवीची त्या गावात अद्याप चालू असलेली प्रथा म्हणजे अश्विन शुद्ध प्रतिपदेला होणाऱ्या घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत नवरात्रात दररोज सायंकाळी गावातील लोक तेथे जाऊन देवीची आरती करून येतात व दुसऱ्या दिवशी रात्री होम करून सीम्मोलंघनाच्या सायंकाळी आरती संपवून देवीचा छबिना (पालखी) रानात जाऊन पहाटे गावात येऊन तेल्याच्या ओट्यांवर बसते. सकाळी पूजा झाल्यानंतर पालखी मिरवणूक होऊन ती कल्लोळावर थांबते. नंतर सायंकाळी पाच वाजता मंदिरात जाऊन देवी (धर्माबाई) पलंगावर विश्रांती घेते. देवीला कोजागिरी पौर्णिमेस सकाळी अभिषेक होऊन ती सिंहासनावर बसते. त्या दिवशी सायंकाळी आरती होऊन लोकांना प्रसाद दिला जातो. या यात्रेची रचना अशी आहे, की ती आधुनिक तत्त्वावर घटना बसवून प्रत्येक वेळेचे कार्य घटनेनुसारच चालत आहे. त्यात बदल केला जात नाही व होतही नाही हे या यात्रेचे वैशिष्ट्य आहे.
आरतीचे वेगवेगळे पाच भाग आहेत. आरंभी प्रार्थना, नंतर पहिला अंक-दुसरा अंक, तिसरा व शेवटची विनंती. या प्रत्येक भागाची चाल वेगवेगळी आहे. शेवटी विनंती करताना त्या शब्द वाक्यांची उच्चारणाची पद्धत वेगळी आहे. अशा पद्धतशीर रचना सहसा आढळून येत नाहीत. ती रचना ‘श्री नरहरी’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या संताने केली असल्याची माहिती उपलब्ध आहे.
ती आरती आजही म्हटली जाते. ज्याप्रमाणे काळ बदलला, लोकांमध्ये बदल घडला, तसा आरतीच्या रचनेत व उच्चारांतदेखील बदल झाला. आरतीतील काही शब्दांचा, वाक्यांचा अर्थ कळत नसे. काळाच्या ओघात अशुद्ध शब्द आणि वाक्ये उच्चारली जाऊ लागली. ते ध्यानात घेऊन गावातील अनुभवी लोकांच्या साहाय्याने त्यात दुरुस्तीही झाली आहे. भविष्यकाळात त्यात पुन्हा बदल होऊ नये म्हणून गावक-यांच्या साहाय्याने आरतीची पुस्तके छापली गेली आहेत.
– गणेश पवार, 9175721201
(आम्ही या लेखासाठी फोटो उपलब्ध करण्याचा प्रयत्न करत आहोत. तसे फोटो कुणाकडे असल्यास आम्हाला संपर्क साधावा. 02224183710)