रा.गो. भांडारकर – क्रियाशील सुधारक (Great Scholar R.G. Bhandarkar)

0
409

 

रामकृष्ण गोपाळ भांडारकर हे संस्कृतचे प्रकांड पंडित, भाषाशास्त्रज्ञ, प्राचीन इतिहासाचे संशोधक आणि कर्ते धर्म व समाजसुधारक होते. त्यांचे मूळ आडनाव पत्की होते. त्यांचे पूर्वज खजिन्यावर अधिकारी होते. म्हणून त्यांना भांडारकरहे नाव पडले. त्यांचे आजोबा लाडो विठ्ठल हे शिरस्तेदार म्हणून इंग्रजीत पुढे आले. त्यांचे वडील महसूल खात्यात होते. त्यांच्या मातोश्रींचे नाव रमाबाई. त्यांचे चुलते विनायक भांडारकर हे पुनर्विवाहाचे पुरस्कर्ते व क्रियाशील सुधारक होते. भांडारकर घराणे हे मूळ वेंगुर्ल्याचे. तेथील त्यांच्या वास्तूत रमा-गोपाळ कन्याशाळा आहे.
भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था ही पुणे शहरातील ऐतिहासिक महत्त्वाची संशोधन संस्था आहे. ती पुण्यातील भांडारकर रस्त्यावर (विधी महाविद्यालय रस्ता) आहे. संस्थेची स्थापना रामकृष्ण गोपाळ भांडारकर ह्यांच्या जीवनकार्याचा गौरव म्हणून त्यांच्या नावाने 6 जुलै 1917 रोजी करण्यात आली. ती संस्था भारतातील प्रमुख प्राच्यविद्या संस्था असून आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्त्वाची संशोधन संस्था गणली जाते. त्या संस्थेत अंदाजे सव्वा लाख प्राचीन दुर्मीळ ग्रंथ; तसेच, तीस हजार हस्तलिखिते जतन करून ठेवण्यात आली आहेत.
भांडारकर यांचा जन्म मालवणमध्ये 6 जुलै 1837 रोजी झाला. त्यांचे आरंभीचे काही शिक्षण मालवण, राजापूर व रत्नागिरी येथे झाले. त्यानंतर ते मुंबईच्या एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमधून शिकले. ते हायस्कूलची परीक्षा 1854 साली उत्तीर्ण झाले. नंतर त्यांनी त्या इन्स्टिट्यूट कॉलेजचा अभ्यासक्रमही 1858 साली पूर्ण केला. पुढे, ते मुंबई विद्यापीठातून बी ए (1862) व एम ए (1863) या परीक्षांत उत्तीर्ण झाले. ते संस्कृतचे प्राध्यापक म्हणून मुंबईच्या एलफिन्स्टन कॉलेजमध्ये 1879 पर्यंत होते. त्यांनी मुंबई विद्यापीठाचे अधिछात्र व सिंडिकेटचे सदस्य म्हणून कामगिरी बजावली. ते नंतर कुलगुरु झाले. त्यांनी हायस्कूलचे मुख्याध्यापक म्हणून उत्कृष्ट कार्य हैदराबाद (सिंध) व रत्नागिरी येथे केले आहे. त्याच ओघातील त्यांचे वेगळे कार्य म्हणजे त्यांनी संस्कृतची दोन शालेय पाठ्यपुस्तके तयार केली. त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना संस्कृत शिकता आले. त्यांनी पुण्याच्या डेक्कन कॉलेजमध्ये संस्कृतचे प्राध्यापक म्हणूनही नोकरी केली. ते सेवानिवृत्त 1893 मध्ये झाले.
त्यांनी संस्कृतचा व्यासंग पुढे चालूच ठेवला. त्यांनी मुंबई व पुणे येथील जुन्या विद्वान शास्त्रीपंडितांजवळ न्याय, व्याकरण, वेदांत इत्यादींचा चांगला अभ्यास केला. भांडारकर यांनी संस्कृतच्या अभ्यासाला चिकित्सक व निःपक्षपाती संशोधनाचे स्वरूप दिले. त्यांचा निबंध लंडन येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय प्राच्यविद्या परिषदेत 1874 साली वाचला गेला. तो नासिकच्या शिलालेखांसंबंधी होता. जर्मनीतील गटिंगन विद्यापीठाने त्यांना पी एचडी 1885 मध्ये दिली. व्हिएन्ना येथे काँग्रेस ऑफ ओरिएंटॅलिस्टस1886 साली भरली होती. भांडारकर तिला भारतीय प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले. त्यांना एल एल डी ही पदवी 1904 मध्ये मिळाली. जगप्रसिद्ध संस्थांनी भांडारकर यांना सदस्यत्व दिले होते. त्यामध्ये रॉयल एशियाटिक सोसायटी’, लंडन व मुंबई, ‘जर्मन ओरिएंटल सोसायटी’, ‘अमेरिकन ओरिएंटल सोसायटीइटली येथील एशियाटिक सोसायटी’, सेंट पीटर्सबर्ग येथील इंपिरियल अॅकॅडमी ऑफ सायन्सअशांचा समावेश आहे. त्यांनी संस्कृत हस्तलिखितांसंबंधी संशोधनात्मक लेख लिहिले व प्राचीन भारतीय ज्ञानभांडाराला जागतिक प्रसिद्धी व प्रतिष्ठा मिळवून दिली. त्यांनी प्राचीन गृह्यसूत्रादी संस्कारमंत्रांतील जरूर तेवढाच भाग घेऊन उपनयन, लग्नादि गृह्यसंस्कारसमयी उपयोगी पडणारा संस्कारविधीतयार केला; भक्तिपर कविता आणि पदे रचली.
धर्म हा भांडारकर यांच्या आस्थेचा व चिंतनाचा विषय होता. त्यांनी सामाजिक सुधारणांना धर्माचा व नीतीचा आधार दिला. त्यांनी परमहंस सभा आणि प्रार्थना समाज या संस्थांमार्फत अनेक वादग्रस्त विषयांवरील चर्चेत यशस्वी हस्तक्षेप केलेला दिसतो. प्रार्थना समाजाच्या सामुदायिक प्रार्थना आणि सामाजिक सुधारणेचा कार्यक्रम यांवर पुणे येथील ‘केसरी पत्रात चौफेर हल्ला करण्यात आला. त्यावर भांडारकर यांनी त्यांच्या धर्मपर लेखांत समर्पक अशी उत्तरे दिली. केसरीकारांचा आक्षेप प्रार्थना समाज हे ख्रिश्चन धर्माचे अनुकरण आहे असा होता. प्रार्थनेस प्रार्थना समाजाच्या पुरुषांबरोबर महिलाही सुरेख वेशभूषा करून उपस्थित राहतात. केसरीने अशी टिंगल केली होती. भांडारकर यांनी त्या आक्षेपास चोख प्रत्युत्तर दिले. त्यांनी सामुदायिक भजनपूजन आणि स्त्रीपुरुष यांचा एकत्र मेळावा या गोष्टी हिंदू धर्मालाही मान्य व हिंदू धर्मात प्रचलित आहेत असे सांगून अनुकरणाचा आरोप खोडून काढला.
ते व्हाइसरॉयच्या लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचे सदस्य 1903 मध्ये होते. ते प्रांतिक लेजिस्लेटिव्ह कौन्सिलमध्येही 1904-08 या कालखंडात होते. त्यांना दिल्ली येथे भरलेल्या दरबारप्रसंगी सरहा किताब 1911 मध्ये देण्यात आला. त्यांची वृत्ती नेमस्त होती. त्यांनी न्यायमूर्ती रानडे यांच्या कार्याला सर्वांगीण साथ दिली व रानडे यांच्या मृत्यूनंतरही प्रार्थना समाज वगैरे संस्थांची धुरा वाहिली. त्यांनी उक्ती व कृती यांचा मेळ घालण्याचा जीवनात अविरत प्रयत्न केला.
त्यांची अर्ली हिस्टरी ऑफ डेक्कन (1884), ‘वैष्णविझम’, ‘शैविझम अँड अदर मायनर रिलिजन्स (1913), ‘ए पीप इन टु द अर्ली हिस्टरी ऑफ इंडिया (1920), ‘कलेक्टेड वर्क्स ऑफ आर. जी. भांडारकर (1933) इत्यादी विपुल ग्रंथसंपदा त्यांच्या विद्वत्तेची साक्ष देतात. एवढेच नव्हे, तर प्राचीन भारताचा इतिहास सुसंगत पुराव्यांच्या आधारे शोधून कसा काढावा, ऐतिहासिक घटनांचा अर्थ प्रमाणशुद्ध कसा लावावा याचा उत्कृष्ट नमुना त्यांच्या ऐतिहासिक लेखनात सापडतो. त्यामुळे त्यांचे ग्रंथ हे भारताच्या प्राचीन इतिहासाचे आधारभूत ग्रंथ म्हणून स्वीकारले जातात. त्यांनी मालती-माधव या संस्कृत ग्रंथाचे संपादन केले.
त्यांनी हिंदू धर्म वेळोवेळी कसा बदलत गेला आहे, वैदिक धर्माबरोबरच वेदिकेतर शैव, वैष्णव इत्यादी धार्मिक संप्रदाय कसे निर्माण झाले याचे विवरण केले. धर्म हा मानवांच्या हृदयांतून वेळोवेळी प्रकट होतो, त्याला शब्दप्रामाण्याची गरज नसते, मनुष्याच्या शुद्ध हृदयाला शब्दप्रामाण्यावाचून धार्मिक अनुभव प्राप्त होत असतो, हा विचार ब्राह्मो समाजामध्ये प्रथम मांडला गेला. त्याचे सविस्तर तात्त्विक समर्थन भांडारकर यांनी त्यांच्या लेखांद्वारे केले आहे. त्याला त्यांनी संस्कृतमधील आणि मराठीमधील धार्मिक साहित्याची बैठक प्राप्त करून दिली आहे. भांडारकर कीर्तनेही करत. त्यांचा पुराणांचा अभ्यास गाढा होता. पुराणांतही ग्राह्यांश पुष्कळ आहे हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले आहे. त्यांचा पाली, अर्धमागधी भाषांचा अभ्यासही उत्तम होता. त्यांनी बौद्ध धर्मावर स्वतंत्र व चिकित्सक प्रकाश टाकलेला आहे.
भांडारकर यांनी त्यांचे ग्रंथ व संशोधन पत्रिका हे अनमोल साहित्य प्राच्यविद्या संशोधन मंदिरास देणगी दिल्यामुळे, ती महत्त्वाची संस्था उभी राहिली. पुण्या-मुंबईच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटी’, ‘शिक्षणप्रसारक मंडळ’, ‘फीमेल एज्युकेशन सोसायटी’, ‘सेवासदन इत्यादी शैक्षणिक संस्थांना त्यांच्या ज्ञानाचा व दातृत्वाचा लाभ झाला. त्यांचे निधन 24 ऑगस्ट 1925 रोजीवयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी पुणे येथे झाले. ते व त्यांच्या पत्नी अन्नपूर्णा यांना एकूण तीन मुलगे व दोन कन्या अशी अपत्ये होती. द्वितीय पुत्र डॉ. देवदत्त हेही विद्वान आणि संशोधक म्हणून मान्यता पावले. रामकृष्ण भांडारकर यांच्या अस्थी पुणे प्रार्थना समाजाच्या प्रांगणात एका स्तूपाखाली ठेवण्यात आल्या आहेत.
(संकलित – मुख्य स्रोत – विश्वकोश)
————————————————————————————————————————————-

 

——————————————————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here