श्रीराम मंदिर जब्रेश्वर मंदिराच्या उत्तरेला आहे. ते मंदिर सगुणाबाई निंबाळकर यांनी शके 1696 (सन 1774) मध्ये बांधले. मुख्य मंदिरापुढील लाकडी मंडपाचे बांधकाम मुधोजीराजे नाईक निंबाळकर यांनी शके 1797 (सन 1875) मध्ये केले. मंदिराची रचना गर्भगृह, अंतराळ व सभामंडप अशी आहे. मुख्य मंदिर एक मीटर उंचीच्या, चौरस अधिष्ठानावर असून त्याचे संपूर्ण बांधकाम घडीव दगडात आहे. गर्भगृहाचे प्रवेशद्वार द्विशाखी आहे. स्तंभ शाखेवर बालसिद्धाची चवरी धारिणी व हनुमानाची मूती आहे. खाली कीर्तिमुख असून ललाटबिंबावर गणेशमूर्ती आहे. उत्तरांगशिळेवर व्याल तसेच, वेलबुट्टीची नक्षी व विविध प्राण्यांच्या प्रतिमा आहेत.
गर्भगृहातील राम, सीता, लक्ष्मण यांच्या मूर्ती उभ्या अवस्थेत असून त्या एक मीटर उंचीच्या अधिष्ठानावर आहेत. त्या मूर्ती गंडका शिलेच्या आहेत. मूर्तीवरील मेघडंबरी चांदीची आहे. प्रभावळीला चांदीच्या पत्र्याचे आवरण असून त्यावर सुंदर नक्षीकाम आहे. पादुकाही चांदीच्या आहेत. गर्भगृहाचे वितान करोटक पद्धतीचे आहे.
अंतराळाचे प्रवेशद्वार लाकडी असून त्यावर चांदीच्या पत्र्याचे आवरण आहे. अंतराळात पश्चिमेला गरुडाची संगमरवरातील मूर्ती आहे. मंडपातील स्तंभ चौकोनी व दंडगोलाकृती आहेत. त्यावर कसलेही शिल्पांकन नाही. मंडपाचे वितान क्षिप्तोक्षिप्त पद्धतीचे आहे. मंडपात जय-विजय यांच्या मूर्ती आहेत. सभामंडपाला रंगशिला असून त्यावर मराठी देवनागरी लिपीतील शिलालेख असून मंदिर कोणी बांधले याविषयी त्यात उल्लेख आहे.
मूळ मंदिराच्या पुढे लाकडी सभामंडपाची उभारणी केली आहे. मंदिरावर दगड विटांचे शिखर आहे. मंदिराच्या पश्चिम व उत्तर बाजूला ओवऱ्या आहेत. संपूर्ण मंदिराला तटबंदी आहे. त्या मंदिराच्या पूर्वेला लागूनच एकमुखी दत्तात्रयाचे मंदिर आहे. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेला रामाचा रथोत्सव असतो. या मंदिराच्या बाजूला निंबाळकर यांचा भव्य राजवाडा आहे.
–संकलन – नितेश शिंदे 9892611767 info@thinkmaharashtra.com
(आधार – सातारा गॅझेटियर)
———————————————————————————————————————————-