कुंभवे – शुद्ध पर्यावरण, शांत सहजीवन (Kumbhave – Pure environment, peaceful symbiosis)

1
256

प्रत्येकाला त्याचे गाव प्रिय असते. माझ्या गावाचे नाव ‘कुंभवे’ आहे. ते रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यात येते. कुंभवे हे दापोलीपासून दहा किलोमीटर अंतरावर आणि रत्नागिरीपासून पंधरा किलोमीटरवर आहे. गावाचे एकूण भौगोलिक क्षेत्र चारशेसाठ हेक्‍टर म्हणजेच अकराशे एकर आहे. गावची लोकसंख्या एक हजार तीनशेबावन्न आहे.

माझेही एक छानसे गाव आहे, मनात लपलेला तो एक भाव आहे,
समजेल ना कधी तो कोणाला, असा फुलांनी केलेला तो घाव आहे

माझे गाव भारताचा एक महत्त्वाचा घटक आहे, त्याचा मला अभिमान आहे. ती गोष्ट लक्षात येताच हिरवळ, झाडे, पक्ष्यांचा गोड-मंजुळ असा आवाज, निसर्गरम्य वातावरण अशी गावाची चित्रे मनात उमटू लागतात. तेथे स्वच्छतेची विशेष काळजी घेतली जाते, कारण गाव हा आम्हा गावकऱ्यांच्या जीवनाचा आधार आहे- सर्वात मोठी गोष्ट म्हणजे माझे गाव धुळमुक्त आहे ! आमच्या गावातील प्रत्येक जण शिक्षित आहे ! गावाचे सौंदर्य इतके वैशिष्ट्यपूर्ण आणि नयनमनोहर आहे, की ते विसरणे कठीण आहे !

कुंभवे गावच्या पाटीलवाडी येथील हनुमान मंदिर

कुंभवे गावात विविध धर्म व जाती यांचे लोक राहतात. परंतु धर्म-जातींत भेदभाव नाही. गावात एकजूट दिसून येते. माझे गाव हे शहरी पर्यावरणापासून दूर असे निसर्गरम्य ठिकाण आहे. असे म्हटले जाते, की गावातून रस्ता गेला, की गाव प्रगतीच्या दिशेने वाटचाल करते. तसेच, कुंभवे गावामधून दापोली ते खेड असा मार्ग झाला असल्याने गावाबाहेरून येणाऱ्या लोकांची सोय झाली आहे. कुंभवेसभोवताली गावे इनाम पांगारी- तीन किलोमीटर, वाकवली- दोन किलामीटर, सडवे- दोन किलोमीटर, पिसई– चार किलोमीटर आणि पोयनार- चार किलोमीटर अशी आहेत.

गावात किराणा मालापासून इतर सर्व वस्तूंची दुकाने आहेत. गावातील लोकांसाठी दवाखाना, प्राथमिक शाळा आणि पंचायतघर आहे. प्राथमिक शाळा लहान आहे. कुंभवे गावाला लाभलेल्या शाळेमुळे मुलांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण होते. गावाचा साक्षरता दर शहात्तर टक्के आहे. तेथील लोकांमध्ये शांतता, सौहार्द हे सामाजिक भाव सुदृढ आहेत. निसर्ग आणि शुद्ध पर्यावरण यांचे महत्त्व समजणारी माणसे गावात आहेत. ती स्वतःची सुखदु:खे एकमेकांची मानतात.

गावातील बहुतेक लोक त्यांच्या पारंपरिक कामांशी निगडित अशा व्यवसायांत आहेत. काही लोक घरच्या घरी लघुउद्योग करत आहेत. लोक बहुविध कौशल्यांवर अवलंबून आहेत. उदाहरणार्थ सुतार व कुंभार. गावात त्यांचे स्वत:चे व्यवसाय, भले ते छोटे असतील, पण ते आहेत. गावात लाकूड कारखाने, फर्निचर व्यवसाय आहे. त्यामुळे गावातील व गावाबाहेरील लोकांना रोजगाराची संधी उपलब्ध होते. गावापासून दापोली जवळ असल्यामुळे त्या ठिकाणी प्रवास सोयीचा होतो. गावात एस टी ची सोय व इतर वाहनांची उपलब्धता आहे. गावातील लोक दापोलीत व्यवसाय व नोकरी यांसाठी नियमित जातात. दापोली हे सर्व आर्थिक क्रियाकलापांसाठी कुंभवेपासून जवळचे शहर आहे.

कुंभवे हे गाव कोकणपट्ट्यात असल्याने हवामान समशीतोष्ण राहते. पावसाळ्यात पाऊस मोठ्या प्रमाणावर पडतो. हवामान हिवाळ्यात थंड असते. पहाटे धुके पडते ! उन्हाळ्यात हवामान उष्ण असते. तेथे पावसाचे प्रमाण अधिक असल्याने भातशेती नांगरीशेती केली जाते आणि त्यासोबतच पशुपालन केले जाते. पावसाचे प्रमाण जास्त असल्याने गावातील घरे कौलारू आणि उतरत्या छपरांची आहेत.

कुंभवे गाव शहराच्या गजबजाटापासून दूर, हिरव्यागार शेतांमध्ये वसलेले आहे. त्यामुळे ते सहसा शांत असते. स्वच्छता ही गावातील लोकांची पहिली प्राथमिकता आहे. प्रत्येक घरात पक्के शौचालय बांधले आहे. गावात विहिरीचे पाणी आहे, पण ते नळांद्वारे घरोघरी येते. गावात लाईटची सोय आहे. तेथे वीज दर दिवशी पंधरा तासांहून अधिक काळ उपलब्ध असते.

गावात गिमवशी आणि वाकनातील या नद्या आहेत. ती नावे गावातील स्थानिक लोक त्यांच्या बोलीभाषेत बोलतात. शहरी जीवनाशिवाय सुखी आणि शांत जीवनाची अनुभूती फक्त गावात पाहण्यास मिळते. तसेच, गावाच्या आजूबाजूला असलेली झाडे आणि वनस्पती यांमधून हिरवळ आणि स्वच्छ हवा आहे. जणू असे वाटते, की निसर्गाने समाधानी लोकांच्या जीवनासाठी हे गाव बनवले असावे. गावात सामान्य माणसाच्या सर्व सुविधा सहज उपलब्ध आहेत. माझ्या गावातील लोक एकत्र कुटुंबाप्रमाणे राहतात.

गावात ग्रामसभा आहे. गावाचा कारभार सरपंचाद्वारे चालवला जातो. तो गावाचा प्रतिनिधी म्हणून स्थानिक निवडणुकांद्वारे निवडला जातो. कुंभवे गाव दापोली विधानसभा मतदारसंघात येते. गावातील छोटेमोठे प्रश्न आपापसांत चर्चेतून सोडवले जातात. तेथील न्यायव्यवस्थेचे काम सरपंच व पोलिसपाटील करतात. गावात गुन्हेगारी प्रवृत्तीचे वातावरण नाही. गाव दारू वगैरे व्यसनांपासून वाचले आहे. गावात असलेला सामुदायिक दवाखाना सर्वसामान्य उपचारांसाठी खुला असतो.

गावात चार मंदिरे आहेत. विश्वकर्मा मंदिर सुतारवाडी येथे आहे. राम मंदिर शिगवणवाडी येथे आहे. दत्तमंदिर मथेवाडी येथे आहे. कुंभवे गावाचे ग्रामदैवते खेमेश्वर व काळकाई ही आहेत. गावातील दत्तमंदिर प्रसिद्ध आहे. त्या मंदिरात विशेष प्रसंगी दूरदूरून लोक येतात. गावातील महत्त्वाचा उत्सव म्हणजे ‘छबिना’. तीन वर्षांतून तो छबिना साजरा केला जातो. त्यामध्ये देवाच्या पालखीची सुंदर अशी सजावट केली जाते. त्यात गावकरी आनंदाने सहभागी होतात. तो कार्यक्रम रात्री 10:00  ते सकाळी 6:30 वाजेपर्यंत साजरा केला जातो. त्यामध्ये सर्व कार्यक्रम देवाची पालखी जमिनीला न टेकता, खांद्यावरून न उतरवता साजरे केले जातात. शिमगा सुरू झाला, की पंचक्रोशीतील गावांत कळते, की ढोल आणि सनई यांचा आवाज कोठला तर कुंभवे गावाच्या ‘खेमेश्वर काळकाई’ उत्सवाचा आहे. शेवटी होळीला भाक बोलूनही लावली जाते. अशा रीतीने शिमगा व छबिना मोठ्या उत्साहाने व एकजुटीने साजरे होतात.

गावात आणखी एक देवस्थान आहे. त्याचे नाव ‘भेलोभा’ असे आहे. भेलोभाने म्हणे एका व्यक्तीच्या स्वप्नात येऊन सांगितले, की भेलाच्या झाडाखाली त्याचे अस्तित्व आहे. जो कोणी ‘निगडी’चे मंदिर एका रात्रीत बांधून देईल त्यास तो प्रसन्न होईन. निगडीचे मंदिर काही एका रात्रीत बांधणे शक्य झाले नाही. भेलोभाची ती इच्छा अपूर्ण राहिली, तरीही त्या देवस्थानाला ‘भेलोभा’ असे म्हणतात. भेलोभा हा शंकराचा अवतार आहे. तो साक्षात्कार भेलाच्या वृक्षाशी झाल्यामुळे त्या ठिकाणास ‘भेलोभा’ नाव पडले.

भारतीय संस्कृती ग्रामीण जीवनावर आधारित आहे, पण त्या जीवनाचेच तर शहरीकरण होत आहे. गावात पक्की घरे आहेत, पण त्यांची संख्या अधिक वाढत आहे. आता गावांमध्ये लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे, सुविधाही वाढत आहेत. माझे गावही आधुनिक आणि आदर्श गावाच्या दिशेने वाटचाल करू लागले आहे.

समता संतोष पिंपळकर 9307107713 Samata123@gmail.com

—————————————————————————————————————————

About Post Author

1 COMMENT

  1. मी मूळचा दापोली तालुक्यातील देगाव या गावचा. दापोलीला जाण्यासाठी देगाव येथून वाकवली, कुंभवे, टाळसुरे या गावांतूनच अनेक वेळा गेलो आहे मी.
    कुंभवे येथून दापोलीकडे जाताना, कुंभवे माळावरून पुढे गेल्यावर रस्त्यात एक धोकादायक अवघड वळण आहे. त्या ठिकाणी कुंभवे माळावरून थोडे खाली उतरून, उजवे वळण घेऊन रस्ता कोटजई नदीवरील पुलावर येतो. पूल ओलांडला कि लगेचच नव्वद अंशापेक्षा जास्त डावीकडे वळतो रस्ता व त्या ठिकाणी उंच चढ आहे. एकदम शार्प कर्व्ह आहे त्या ठिकाणी. सावध राहून गाडी चालवावी लगते.
    वाहनांसाठी हे ठिकाण अपघात प्रवण ठिकाण आहे. परंतु, गर्द हिरवाईने भरलेल्या चिंचोळ्या घळीतील कोटजाई नदी हे एक निसर्ग सौंदर्याने नटलेले ठिकाण आहे.
    कोटजाई नदीच्या काठी मे महिन्यात तामण फुलते. त्यामुळे कुंभवे घाटीतील निसर्ग सौंदर्य अधिकच बहरते.
    मुकुंद गोंधळेकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here