रंभाजीराव बंडखोर वृत्तीचे होते. त्यांनी उत्तर आयुष्यात हातातील समशेर खाली ठेवली व लेखणी हातात घेतली. त्यांनी आदिशक्तीचे कलापूर्ण मंदिर करमाळा येथे बांधले. कमलादेवीच्या उत्सवाचा मुख्य दिवस कार्तिक वद्य चतुर्थीस असतो. त्या पूर्वी चार दिवस म्हणजे कार्तिकी पौर्णिमेपासून यात्रेची सुरुवात होते …
हैदराबादच्या निजामाने त्याचा पराक्रमी सरदार रंभाजीराव निंबाळकर यांना ‘रावरंभा’ हा किताब दिला. रंभाजीराव हा क्षात्रतेजस्विनी तुळजाभवानीचे परमभक्त होते. रंभाजीराव आई जगदंबेच्या दर्शनासाठी दर पौर्णिमेला तुळजापूरला जात असत. त्यांचे शरीर थकले तेव्हा देवीने राजांना दृष्टांत दिला. तो असा, की ‘लेकरा, मी तुझ्या मागुती तुझ्या गावापर्यंत चालत येईन. मात्र तू मागे वळून पाहायचे नाही आणि पाहिलेस तर मी तेथेच थांबेन.’ रंभाजी यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. ते आई जगदंबेला कबुली देऊन चालू लागले. रंभाजीराव पुढे आणि जगन्माता त्यांच्या मागे असा प्रवास सुरू झाला. राजांनी शहराच्या जवळ आल्यावर मानवी स्वभावातील साशंक वृत्तीने मागे वळून आई येते किंवा नाही ते पाहिले. झाले, आईसाहेब तेथेच थांबल्या ! तो करमाळा शहराच्या पूर्वेला दूर एक माळ होता. रंभाजीरावांनी आदिशक्तीचे कलापूर्ण मंदिर तेथेच उभे केले !
रंभाजीराव बंडखोर वृत्तीचे होते; तसेच ते आयुष्यभर वागले. मात्र त्यांनी उत्तर आयुष्यात हातातील समशेर खाली ठेवली, लेखणी हातात घेतली आणि देवीची आरती रचली ! ते काही कवी नव्हते, परंतु तो त्यांच्या उत्कट भक्तीमधून साकारलेला आविष्कार होता. रावरंभारचित त्या आरतीमध्ये देवीला उद्देशून अनेक नावे व विशेषणे आलेली आहेत. रावरंभा आनंदी, काली कमला अशी नावे देवीला देतात. रावरंभा यांना ती देवी सुंदरता, संपन्नता आणि शक्ती यांचे प्रतीक भासते. रावरंभा हे स्वत: सौंदर्याचे पूजक व शक्तीचे उपासक होते. ते ती कमला आहे, ती कमलालयवासी आहे असे म्हणतात. म्हणून त्या देवीला कमलादेवी असेच नाव पडून गेले आहे.
कमलादेवीचे मुख्य मंदिर शहाण्णव खांबांच्या आधारावर उभे आहे. ते बांधण्यास साडेसतरा लाख रुपये खर्च झाला. मंदिरात देवीचे पंचायतन आहे. तसे सहसा आढळत नाही. मंदिर प्रदक्षिणेला निघाले असता प्रथम शिवमंदिर लागते. त्याच्या दारावर बंदिस्त अवस्थेत षडानन आहे. प्रदक्षिणेत पुढे गजाननाचे मंदिर लागते. त्यानंतर सातमुखी अश्वाच्या रथात बसलेल्या सूर्यनारायणाचे मंदिर आहे. त्यापुढे शेवटी, गरुडारूढ अशा लक्ष्मीपती श्रीविष्णूचे मंदिर आहे. या प्रत्येक मंदिरात त्या देवतेच्या, मुख्य मूर्तीबरोबर सुबक अशी छोटी पितळी उत्सवमूर्ती आहे. कार्तिकी यात्रेत कमलादेवीच्या मुख्य छबिन्याबरोबर त्या सर्व देवतांचाही छबिना निघतो, त्यावेळी या उत्सवमूर्ती उपयोगात आणल्या जातात. उत्सवमूर्तींची धाटणी दाक्षिणात्य पद्धतीची आहे. याचे कारण म्हणजे रावरंभा यांचा मुलगा जानोजी यांचा बराचसा काळ दक्षिण भारतात स्वाऱ्या करण्यात गेला, जानोजी हे रसिक असल्याने तिकडच्या बऱ्याच गोष्टी त्यांनी त्यांच्या जहागिरीत आणल्या. त्यांनी मंदिराला दाक्षिणात्य पद्धतीची गोपुरे बांधून ते सुशोभित केले. ही शिल्पशैली महाराष्ट्रात आणण्याचा मान त्यांनाच जातो. कमलादेवीचा छबिना, त्यामधील देवीची वाहने, त्या उत्सवमूर्ती ही त्यांचीच कल्पकता, त्यामुळे हे सारे आगळेवेगळे आहे. देवीचा छबिना फाल्गुन पौर्णिमा व चंद्रग्रहणाची पौर्णिमा वगळता वर्षभर सर्व पौर्णिमांना काढण्यात येतो. त्यासाठीची वाहने ही लाकडापासून तयार केलेली आहेत. ती कलापूर्ण आहेत. त्यामध्ये सप्तमुखी घोडा, सिंह, गरुड, काळवीट, घोडा, मोर, दोन नंदी व दोन हत्ती यांचा समावेश आहे. ती सर्व वाहने खांद्यावरून वाहून नेली जातात. या खांदेकऱ्यांना वाहनवाले असे म्हणतात. त्यांची संख्या सोळा आहे.
उत्सवाचा मुख्य दिवस कार्तिक वद्य चतुर्थीस असतो. त्या पूर्वी चार दिवस अगोदर म्हणजे कार्तिकी पौर्णिमेपासून यात्रेची सुरुवात होते. देवीचा छबिना रोज सायंकाळी व रात्री वेगवेगळ्या वाहनांवर काढला जातो. मुख्य छबिना चतुर्थीला रात्री निघतो. त्यात कमलादेवीच्या पंचायतनाचाही छबिना असतो. मध्यभागी थोरल्या हत्तीवर अंबारीत कमलादेवी, उजवीकडे नंदीवर महादेव व मोरावर गणपती तर डावीकडे गरुडावर विष्णू व काळवीटावर सूर्यनारायण यांच्या मूर्ती सजवलेल्या असतात. थोरल्या लाकडी हत्तीवर चांदीची अंबारी मध्यरात्रीपूर्वी कसली जाते. त्यानंतर वेळ येते ती देवीची उत्सवमूर्ती बाहेर आणण्याची. रुपेरी गुर्झब हातात धरून चोपदार पुढे चालू लागतात आणि पुजारी देवीची उत्सवमूर्ती ‘बडीजे मेहरबान’, ‘बडी सवारी आ रही है’ अशा ललकाऱ्यात गर्भागारातून बाहेर आणतात. त्यावेळी मोर्चेले, चवऱ्या ढाळल्या जातात. दुतर्फा उभे राहून देवीचा स्पर्श दर्शन घेण्यासाठी भक्तांची एकच धांदल उडते. देवीची उत्सवमूर्ती अंबारीत स्थानापन्न झाल्यावर अंबारीसहित हत्तीला पुष्पमालांनी शृंगारले जाते. त्या हारांची संख्या एवढी प्रचंड असते, की देवीचे वाहन असलेला तो हत्ती म्हणजे फुलांचा प्रचंड ढीग वाटतो ! ते सगळे हार भक्त मंडळींकडून नवसाचे म्हणून आलेले असतात. त्यांची गुंफणदेखील कलात्मक असते. अशा प्रचंड ओझ्याच्या हत्तीला खांद्यावरून वाहून नेणे हे शक्ती व कसब यांचे काम असते. कमलादेवीच्या छबिन्यासमोर सेवेकरी मंडळी असतात. देवीवर छत्र, अबदागिरी व समोर निशाणकाठी धरलेली असते. कलावंतीण शालू पांघरून छबिन्यासमोर उभी असते. पलित्यांचे पंजे परंपरेनुसार छबिन्यासोबत उजेडासाठी पेटवले जातात, हत्ती पुष्पमालांनी शृंगारला जातो. ताशातराफ्यांचा आवाज टिपेला पोचतो. सोळा वाहनवाले मध्यरात्रीला काही पळे बाकी असताना ‘आई राजा उदे’च्या घोषात हत्तीचे वाहन उचलून खांद्यावर घेतात आणि छबिना निघतो. तो प्रवास सूर्योदयापर्यंत चालणार असतो. पुष्पमालांनी लगडलेल्या हत्तीचा तोल सांभाळणे हे कष्टाचे काम असते. आधारासाठी कुबड्या पुढे व मागे घेतलेल्या असतात. वाहनवाले वाहन तोलण्याचे काम अंबारीच्या घुंगरांचा जाणूनबुजून, वाहन कुबड्यावर आदळून केलेला आवाज आणि काही परवलीचे शब्द यांच्या आधारावर यात्रेतील लोकांच्या गदारोळातही शिस्तबद्धतेने करत असतात. छबिना मंदिराच्या आवारात थांबे घेत घेत दीपमाळेखाली येतो. त्यावेळी दीपमाळा पाजळल्या जातात. पाजळलेल्या दीपमाळांची ज्योत निंबाळकरांच्या सर्व जहागिरीतून दिसते असे म्हणतात.
वाहनवाल्यांची खरी परीक्षा असते ती मंदिराबाहेर पडताना नगारखान्याच्या खाली असलेल्या वेशीमध्ये. कारण खांद्यावर पेलून धरलेल्या हत्तीच्या वाहनाची अंबारीसह असणारी उंची वेशीच्या उंचीपेक्षा जास्त असते. त्यावेळी इतर चार वाहने मागे थोड्या अंतरावर उभी राहतात आणि देवीचा हत्ती पुढे काढला जातो. वाहनवाले त्यांच्या खांद्यावरील वाहनाच्या दांड्या वेशीत प्रवेश करतानाच ‘सदा आनंदीचा उदे’ या घोषात एकसमयावच्छेदे करून तळहातावर घेत चक्क खाली बसतात आणि बसूनच पुढे सरकू लागतात. वेस पार केली की परवलीच्या शब्दासरशी पुन्हा उभे राहत वाहन खांद्यावर घेऊन स्थिर करतात. डोळ्याचे पाते लवते न लवते तोवर खांद्यावरचे ओझे तळहातावर घ्यायचे व तळहातावरचे पुन्हा खांद्यावर घ्यायचे… ती घटका पाहणाऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकवते. छबिना वेशीपार झाला की रेवड्या आणि फुले यांची मुक्त उधळण होते. हा रोमांचकारी प्रसंग यात्रेच्या वेळी मध्यरात्री वेशीबाहेर जाताना व पहाटे वेशीच्या आत येताना, अशा दोन वेळा पाहण्यास मिळतो.
श्री खंडोबाचे एक मंदिर कमलालयाच्या दक्षिणेस आहे. देवीचा छबिना पंचायतनासह खंडोबाच्या भेटीस यात्रेदिवशी रात्री जातो. त्यावेळी खंडोबा देवस्थानाकडून कमलादेवीस लुगडे-चोळीचा अहेर होतो, तर चंपाषष्ठीस खंडोबाची पालखी कमला मंदिराकडे येते व खंडोबास कमलादेवीकडून शेलापागोट्याचा अहेर होतो. देवी खंडोबाची भेट घेतल्यानंतर परत फिरते. देवीचा छबिना पहाटेच्या पहिल्या किरणाबरोबर खाली टेकवला जातो.
उत्सवाचा अखेरचा दिवस सुरू होतो. त्या दिवसाचे आकर्षण असते ते कुस्त्यांच्या फडाचे. गावोगावचे नामचंद मल्ल त्या फडावर येतात आणि त्यांचे कसब अजमावतात. रावरंभा निंबाळकर यांना मल्लविद्येची मोठी आवड होती. त्यांनी ‘किशन गवळी’ नावाचा एक पैलवान पदरी बाळगला होता. कमलादेवीच्या वैभवशाली कार्तिकोत्सवाला तीन शतकांची परंपरा आहे. छबिन्याचा उल्लेख लोकगीतात ‘काई वाजत जाई’ असा आलेला आहे.
उत्सवाचे रूप नव्या काळात पालटत आहे. इव्हेंट, फंक्शन असे स्वरूप सर्वच गोष्टींना येत आहे. राजकारणाचा, गटातटाचा पदर टाळता न येण्याजोगा झालेला आहे. राजा रावरंभा यांनी तिचे वर्णन कमलादेवी ही देवी आदिमाया आहे. ती योगी, ज्ञानी आणि मायाविरक्त आहे. तिचा थांग साधकांनाही लागत नाही. अशी ती अनादी अनंत आहे असे केलेले आहे. रावरंभा यांची श्रद्धा ती जगाचा उद्धार करण्यासाठी आलेली आहे अशी होती. भक्त त्याच श्रद्धेने तिच्या दर्शनाला येतात. तिच्या तेजाने धन्य होतात. ‘सदाआनंदीचा उदे’ या उदोकाराने अवघ्या देहाचे राऊळ साजिवंत होते. उदयोस्तु अंबे उदयोस्तु !
गुर्झब – हा फारसी शब्द आहे. गुर्झब म्हणजे चांदीचा दंड. तो धरणारा गुर्झबदार. राजा निघाल्यावर त्याच्या पुढे दोन गुर्झबदार चालत. त्यांचे काम राजा पुढील रस्ता निर्धोक करणे व राजबिरुदे पुकारणे हे असते.
मोर्चेल – हा संस्कृत शब्द आहे. मोर्चेल म्हणजे मोराच्या पिसाची चरवी. ज्याने वारा घातला जातो.
– अनिरुद्ध बिडवे 9423333912 bidweanirudha@gmail.com
———————————————————————————————————————————–
लेख वाचत असताना प्रत्यक्षात छबिनाच डोळ्यापुढे उभा राहिला. खूपच सुंदर शब्दांकन.
साहेब , खूपच छान व विस्तृत माहिती दिली आहे.कमलाभवानी याञेचे वर्णन असे कि प्रत्यक्ष नजरेसमोरच उभे रहाते. यामुळे करमाळयाची कमलाभवानी याञेची महती जगभर पसरेल. खूपच अभ्यासपूर्ण लेखन. धन्यवाद