वसिष्ठ ऋषींची पत्नी अरुंधती ही पातिव्रत्याचा आदर्श समजली जाते. विवाहप्रसंगी वर वधूला ‘अरुंधती सारखी हो’ असे सांगतो. आकाशातील सप्तर्षींच्या ताऱ्यांबरोबर अरुंधतीलाही स्थान देण्यात आले आहे त्याचे कारण हेच.
आकाशदर्शनात, एक मोठा चौकोन आणि त्याला तीन ताऱ्यांची शेपटी, अशा पतंगासारख्या दिसणाऱ्या, सात ठळक ताऱ्यांनी बनलेल्या सप्तर्षीची आकृती सहज ओळखता येते. भारतीयांनी सात ताऱ्यांना सात ऋषी मानले आहे. क्रतू, पुलह, अगस्त्य, अत्री, अंगिरा, वसिष्ठ आणि मरीची हे ते सात ऋषी. शेपटीच्या तीन ताऱ्यांमधील मधला तारा वसिष्ठाचा. वसिष्ठाकडे नजर रोखून पाहिल्यास एक छोटीशी तारका त्याच्याजवळच लुकलुकताना दिसते. तीच वसिष्ठपत्नी अरुंधती!
अशा तऱ्हेने अरुंधतीचा छोटा अस्पष्ट तारा शोधण्यासाठी प्रथम जवळचा वसिष्ठ हा ठळक तारा दाखवावा लागतो. त्यावरून ‘अरुंधतीदर्शन न्याय’ तयार झाला. ‘अरुंधतीदर्शन न्याय’ म्हणजे प्रथम स्थूल वस्तू दाखवून त्याच्या अनुषंगाने सूक्ष्म वस्तू दाखवणे.
पक्षिनिरीक्षण करताना बरोबरच्या नवख्या पक्षिनिरीक्षकाला फुलटोचा, शिंजीर, सुभग, टिट यांसारखा छोटा पक्षी किंवा रंगगोपनामुळे चटकन दिसू न शकणारा पक्षी दाखवण्यासाठी प्रथम तो पक्षी ज्या झाडावर बसलाय ते झाड दाखवून नंतर त्या झाडाच्या ज्या फांदीवर पक्षी बसला ती फांदी असे करत करत तो पक्षी दाखवावा लागतो. हाच तो ‘अरुंधती दर्शन न्याय!’
आठवणीतील कवितेमध्येही अरुंधतीला स्थान आहे. ‘सप्तऋषींमध्ये सती बैसलीसे अरुंधती – लाडक्या या आजीसंगे झिम्मा खेळू ये’ ह्या त्या कवितेच्या ओळी. ‘ही ओळ पाठ झाल्यावर अरुंधती स्वतःच्यासमोर लहानशी बुरडीबट्टी घेऊन कापूस पिंजण्याच्या धनुकलीने वातीसाठी कापूस पिंजत असावी, हे एकमेव दृश्य कित्येक वर्षे मी डोळ्यांपुढे बाळगून होतो.’ असे पुलंनी त्यांच्या मिश्कील शैलीत म्हटले आहे.
– डॉ.उमेश करंबेळकर