एक यशोगाथा! (Yasho’s Story)

9
272

यशोदा वाकणकर हिने कमर्शिअल आर्ट या विषयामध्ये शिक्षण घेतले आहे. ती संवेदनाशील आणि कलावंत आहे. तिला शास्त्रीय गायन, हिमालयातील भटकंती, वाचन, लेखन आणि बागकाम यांची आवड आहे. ती डॉ.अनिल आणि डॉ.अनिता अवचट यांची मुलगी. यशोदा वाकणकर ही स्वतःला असलेल्या व्याधीचे दुष्परिणाम सोसल्यावर एपिलेप्सी रुग्णांच्या बाबतीत मोलाचे, विधायक काम करते आहे. तिने अपस्माराच्या आजारातून बरी झाल्यावर 2004 मध्ये पुण्यात ‘संवेदना फाउंडेशन’ हा एपिलेप्सी सपोर्ट ग्रूप सुरु केला. तिचे काम राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोचले आहे. तिच्या कामासाठी तिला अनेक मान्यताप्राप्त पुरस्कारही मिळाले आहेत.

स्वतःला किंवा जवळच्या व्यक्तीला हा आजार असणारे लोक संवेदना एपिलेप्सी मदत गटात जातात. तेथे यशो व तिच्या टीमला भेटतात. त्यांच्या मार्गदर्शनाने आजाराकडे धाडसाने पाहण्यास शिकतात. आनंदी राहण्यासाठी कितीतरी लहान मोठी कारणे असतात. पण कारणाशिवाय आनंदी राहण्याचा एक मोठा धडा स्वानुभवाने सोपा करून सांगत आहे यशोदा वाकणकर ! ‘सद्भावनेचे व्यासपीठ’ या सदरातील लेख वाचण्यासाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करावे.

– अपर्णा महाजन

———————————————————————————————————————–

एक यशोगाथा! (Yasho’s Story)

‘मला लहानपणापासून अपस्माराचे झटके येत होते. अपस्मार म्हणजेच एपिलेप्सी, फेफरे किंवा फिट येणे. मी थोड्या वेळाने पुन्हा पूर्ववत होत असे. त्यावेळी माझे आई-बाबा मला फक्त जवळ घेत. त्यांनी झटका येऊन गेल्यावर, कधीच मला वेगळ्या प्रकारची वागणूक दिली नाही. आमचा दिनक्रम नेहमीप्रमाणे सुरु होई.’

मी तिच्या कामाबद्दल विचारत असता, यशो, यशोदा पराग वाकणकर सांगत होती, “अर्थात यासाठी ते उपाय शोधतच होते. मी या व्याधीबरोबर आयुष्यातील तेवीस वर्षे होते. आई-बाबांना त्यांच्या शोधप्रयत्नांतून त्रिवेंद्रम येथे मेंदूवर शस्त्रक्रिया केली जाते आणि त्यामुळे हा आजार कमी होतो, असे समजले होते. मी ती शस्त्रक्रिया करून 2003 मध्ये घरी आले. एक दिवस गेला, मला चक्कर आली नाही… तसे आठ दिवस गेले, पंधरा दिवस गेले. मी अपस्माराची सवयीने जणू वाट बघत होते. महिना झाला तरी दोन चार वेळा येणारा तो माझ्याकडे फिरकला नाही, तो क्षण मला आठवतो – आपल्याला ‘तसा’ त्रास कधीच होणार नाही ! माझ्या मनात आले, की माझ्या आयुष्यात काही प्रश्नच राहिला नाही. मला अजून काय हवे आहे? मी अतिशय आनंदात होते. मी त्या आनंदात आमच्या घराच्या खिडकीत बसून बाहेरचे आकाश बघत असताना मला आमच्याच सोसायटीतील एक छोटा मुलगा आईचा हात धरून जाताना दिसला. मला आठवले, यालाही माझ्यासारखा त्रास होता. त्यानंतर असा त्रास असणारी कितीतरी नावं, चेहरे डोळ्यापुढे येऊ लागले. मी त्या दुःखातून बाहेर पडले पण यांचे काय? या बीजवाक्यातून, यांच्यासाठी काही करावे असे माझ्या मनात चमकून गेले आणि त्यातूनच नोंदणीकृत ‘संवेदना एपिलेप्सी मदत गट’ ही संस्था सुरु केली.”

ती मला एपिलेप्सीबद्दल साक्षेपी भावाने सांगत होती, ‘ही मेंदूची एक व्याधी आहे. अनेकांना याचा न्यूनगंड असतो. आश्चर्य म्हणजे या व्याधीने ग्रस्त असलेल्या लोकांच्या मनात नाही, तर त्यांच्या जवळच्याच लोकांच्या मनात त्यांच्या व्याधीबद्दल कमीपणा वाटत असतो. पण यात कमीपणा वाटण्यासारखे काय आहे? या आजारात मनाची काळजी महत्त्वाची. आपल्याकडे कोणी वेगळ्या नजरेने बघतो आहे का? असे वाटून व्याधीग्रस्त व्यक्तीच्या मनात ताण येतो. त्यांना अपस्माराचा झटका येण्यापूर्वी काही क्षण आधी आता चक्कर येणार आहे याची हलकीशी जाणीव होते. घशात मुंग्या येतात, शुद्ध असते, अर्धवट भान असते पण स्वतःवर नियंत्रण नसते. फिट आली, की लोक हाहाकार माजवतात. चप्पल हुंगवणे, कांदा हुंगवणे, कोठल्यातरी नसा करकचून दाबणे असे विविध प्रयोग सुरु करतात. ती व्यक्ती अर्धवट शुद्धीत असते. ती या सगळ्यामुळे घाबरते. ‘आता मला ही माणसे आणखी काय करतील?’ असे विचार त्यांच्या मनात येत असतात पण ते बोलू शकत नाहीत. त्या ताणामुळे दुसरी फिट येते. तशा वेळी, कोणीतरी या प्रसंगात काळजी घ्यायला आहे, या भावनेने दिलासा वाटू शकतो. हे खूप महत्वाचे आहे.’

यशो सांगत होती, तिच्या आजारातील दिवसांत बाहेर कोठे गेले असता, जेव्हा फिट यायची, तेव्हा पराग तिला प्रेमाने घट्ट मिठीत घ्यायचा आणि तिला ऐकू यायचे, ‘मी आहे ना, यशो!’ ती एकदा इगतपुरीला विपश्यना करण्यास गेली होती. एके दिवशी ध्यान करताना तिच्या घशात मुंग्या येऊ लागल्या. तिला त्या परिस्थितीत गोयंका गुरुजींचे शब्द आठवले, ‘स्वतःकडे अलिप्त, तटस्थ भावनेने पहा.’ आणि तिची फिट थांबली. मला यशोचे हे मनोगत ऐकताना जाणवले, की प्रत्येक माणसाने त्याच्या दुःखाकडे, अडचणीकडे असे पहिले पाहिजे. नाही का?

यशोच्या संस्थेचे कार्यालय पुण्यातील ‘निवारा’ या संस्थेमध्ये आहे. ती, तिच्याकडे येणाऱ्या व्याधीग्रस्त लोकांना तेथे भेटते. तिच्यासमवेत सहाजण तिला मदत करतात. त्यांच्यापैकी त्यांना किंवा त्यांच्या मुलांना ही व्याधी असल्यामुळे ते तेथे येणाऱ्या रोगग्रस्त लोकांशी माणुसकीने वागतात. ती दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये व्यावसयिक सल्लागार म्हणून 2016 पासून काम करते. ती तिच्याकडे आलेल्या लोकांना या आजाराबद्दल समजावून सांगते. आजारी लोकांशी वागण्याच्या पद्धती सांगते. ती तिच्या आयुष्यात आलेल्या प्रसंगांमुळे समानानुभूतीने इतरांचे प्रश्न समजून घेते. तिने तिचा सोपा मंत्र तयार केला आहे, तो सांगते. ‘हे आजारा, तू अस किंवा असू नको, मी माझ्या मनासारखे जगणार आहे. मी तुला मनातून काढून टाकले आहे.’

यशोच्या सांगण्याला वजन असते. ते समोरच्या व्यक्तीला पटते. निदान ते पटवून घेण्याची मानसिकता तयार होते. तिची टीम अशा लोकांच्या मनातील न्यूनगंड दूर करण्याचा प्रयत्न करतात. छोट्याछोट्या गोष्टीतील आनंद उपभोगण्यास शिकवले जाते. त्यांच्यासाठी ओरिगामी, विपश्यना, समुपदेशन, व्याख्याने असे उपक्रम आयोजित करतात. त्यांनी एपिलेप्सी वधू-वर मंडळही स्थापन केले आहे. ते विवाहेच्छुक मुला-मुलींशी वैयक्तिक बोलतात. जबाबदारी समजावून देतात. त्या वेळी त्यांना खोटे सांगून लग्न उरकणारे लोकही भेटतात. अशा परिस्थितीत शहानिशा केल्याशिवाय यशो पुढे जात नाही. ती भेटी, गाठी, चर्चा झाल्यावर त्यांना स्पष्टपणे सांगते, ‘विवाहामुळे, या व्याधीचे वाहक एकत्र येणार असतात. खोटी स्वप्ने आणि आशा न ठेवता जेवढा वस्तुनिष्ठपणे निर्णय घ्याल तेवढे तुमचे पुढचे आयुष्य कमी गुंतागुंतीचे होईल. त्यामुळे निर्णय शेवटी तुम्ही घ्यायचा असतो.’

यशो लोकांना स्वानुभवावर आधारित विचार सांगते, काही तंत्र शिकवते. उदाहरणार्थ, मला महिन्यातून एक दिवस फिट येते, पण उरलेले एकोणतीस दिवस चांगले आहेत आणि ते मी चांगले जगणार आहे. त्या एका दिवसातला एक तास फिटचा त्रास होतो, तो एक तास वगळू, बाकी तेवीस तास तर आपले आहेत? आपली जीवनशैली गुंतागुंतीची न करता सहज साधी ठेवावी. व्यायाम, आहार, योगासने आणि औषधे या चार सूत्रांवर ठाम राहिले तर या आजाराशी मुकाबला करणे अवघड नाही. प्रसंगी, आवश्यकता असेल तर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घ्यायचा असेल, तर तेथे तज्ज्ञ डॉक्टरांची मदत आणि सल्ला घेतला जातो.

आजाराकडे लक्ष केंद्रित केले तर नकारात्मकता निर्माण होते, उलट आजार बरा होण्याऐवजी वाढू लागतो, त्यासाठी डोक्याने सतत आपल्या कामात, छंदात आणि आवडींमध्ये व्यग्र असायला हवे. तरच डोक्यातील चक्र नीट फिरते. एकदा ते उलटे फिरू लागले की स्वतःच स्वतःशी अन्यायकारक वागू लागतो. ती असेही सांगते, की ‘मला फिट येते’ असे सांगायला संकोच करू नका. ते स्पष्ट आणि व्यवस्थित रीत्या सांगितले तर नीट समजते. घाबरत, बिचकत सांगितले तर बघणाऱ्याची नजरही बदलते. हे अनुभव एकमेकांबरोबर बोलले पाहिजेत. काही व्यक्तींना वर्षातून एकदा फिट आली, पाच वर्षातून एकदा आली, तर तिचा त्याचा बाऊ केल्याने तो ‘पेशंट’ बनतो. मात्र मोकळे बोलणारे, गंड न बाळगणारे काहीजण रोज फिट येऊन देखील छान जगतात.

पैशाने गरीब आणि व्याधी असणार्‍या लोकांना औषधे घेण्याची क्षमता नसते. एका आजारी माणसाला, वर्षाला बारा हजार रुपये खर्च येतो. तशा लोकांसाठी संस्थेतर्फे औषध मदत योजना सुरु केली आहे. यशो सांगते, की तिने फेसबुकवर 2016 मध्ये एक संदेश पाठवला. अनेकांनी मदतीचा हात पुढे केला. काहींनी शंभर रुपयेही देऊ केले. बजाजमधून फोन आला आणि त्यांनी, त्यांच्या सीएसआर निधीतून एकशे ऐंशी लोकांची औषधाची आणि एका माणसाची मेंदूच्या शस्त्रक्रियेची जबाबदारी उचलली.

यशो म्हणते, ‘हे काम करताना सगळ्यात मोठा आनंद म्हणजे दिवसाअंती वाटणारे समाधान! त्यामुळे आम्ही सुखाने झोपू शकतो. माणूस म्हणून जगल्यासारखे वाटते. या संस्थेमुळे मला गरिबी, दुःख आणि आपला देश नीट कळू लागला.’ यशोसारखी आनंदी, कलेवर, माणसांवर, प्रेम करणारी, प्रत्यक्ष जीवन जगणारी, अडचणींना सामोरी जाणारी, अभिनिवेश नसलेली, तिच्या चित्रांत, गाण्यांत जितकी रमते, तितकीच अपस्माराच्या आजाराने त्रस्त असलेल्या लोकांमध्येही.

यशोदा वाकणकर 9822008035 yashoda.wakankar@gmail.com

अपर्णा महाजन 9822059678 aparnavm@gmail.com

——————————————————————————————————–

About Post Author

9 COMMENTS

  1. यशोची माहिती होती पण या लेखाने ती पूर्ण कळली.
    या उपक्रमातून वेगवेगळ्या अडचणींवर मात करणाऱ्या लोकांची ओळख होते. अपर्णा तू लिहितेस पण छान. ओघवती भाषा असल्याने वाचताना छान वाटते. उपक्रमास शुभेच्छा .
    नीलिमा म्हैसूर.

  2. हुरूप वाढवणाऱ्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून धन्यवाद!

  3. आपल्या एखाद्या व्याधीने खचून न जाता जिद्दीनं या आजारात इतरांना येणाऱ्या अडचणी सोडविण्याची उमेद बाळगणाऱ्या यशोदा वाकणकरचं खूप कौतुक वाटलं .असं स्वतः कडं साक्षी भावानं बघता यायला हवं असं वाटलं .
    तिचा हा प्रवास कुठलंही भावनिक प्रदर्शन न करता आपर्णा महाजन यांनी ही छान लिहिला आहे .अशा प्रेरणादायी , दिशादर्शक विषयांची वाचकाला गरज आहे . ती भागवल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार.

  4. फार महत्त्वाचे काम करतात यशोदा वाकणकर. लेखातून माहिती झाली, धन्यवाद.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here