‘रणांगण’ या एकमेव कादंबरीचे लेखक विश्राम बेडेकर कोल्हापूरला आले होते. ‘आम्ही रसिक’ने त्यांच्याशी गप्पागोष्टींचा कार्यक्रम आयोजित केला होता. ती घटना 6 नोव्हेंबर 1982 रोजीची. त्यांना विचारलेला एक प्रश्न आणि त्याचे त्यांनी दिलेले उत्तर माझ्या कायम स्मरणात आठवणीच्या रूपाने राहिले आहे. प्रश्न होता, की ‘बेडेकर यांनी ‘रणांगण’नंतर पुढे लेखन का केले नाही?’ त्यांचे उत्तर त्यांच्याच शब्दांत – ‘मी विनोबाजींच्या पदयात्रेत होतो. कोल्हापूरहून सांगलीपर्यंत रोज दहा-पंधरा मैल चालायचो. मला चालण्याची सवय नसल्याने मी जेवण झाले, की गाढ झोपून जात असे. असा आमच्या पदयात्रेचा प्रवास जयसिंगपूरपर्यंत झाला. त्याच वर्षी (1964), मडगाव (गोवा) येथे साहित्य संमेलन भरले होते. अध्यक्ष होते कुसुमाग्रज. महाराष्ट्रातील अनेक मोठमोठे साहित्यिक गोव्याहून मुंबईस जाताना विनोबाजींना भेटण्यासाठी जयसिंगपूरला मुद्दाम आले. विनोबाजींनी ती नामी संधी साधून जयसिंगपूर येथे छोटेसे साहित्य संमेलनच भरवले ! संमेलनास दुपारी दोन-अडीच वाजता सुरुवात झाली. कोणीतरी विनोबांना सांगितले, की “आपल्या या पदयात्रेतही बेडेकर नावाचे कोणी गृहस्थ आहेत आणि ते सुद्धा कधी कधी लिहीत असतात.” विनोबांनी ताबडतोब मला बोलावले. मी गेलो. विनोबाजी आरंभी माझ्यावर थोडे रागावले. म्हणाले, “इतके मोठमोठे साहित्यिक येथे आलेत. त्या निमित्ताने संमेलन भरले आहे आणि तुम्ही खुशाल झोपता? तुम्ही का आला नाहीत?” मी म्हटले, “विनोबाजी मी काही लेखक नाही. मी एक पुस्तक पंचवीस-तीस वर्षापूर्वी लिहिले. त्यानंतर मी काहीच लिहिले नाही.” त्यावर विनोबाजी म्हणाले, “त्यानंतर, तुम्ही काहीच लिहिले नाहीत?” विनोबाजी हसले आणि म्हणाले, “अहो, मग तुम्ही सगळ्यात मोठे लेखक. तुम्हाला कुठे थांबावे ते कळले. अनेकांना ते कळत नाही. तुम्ही एवढे मोठे लेखक आहात तेव्हा ही मानाची जागा मला तुम्हालाच द्यावी लागेल. माझ्या उजव्या हाताला तुम्ही बसा.” कारण विनोबाजी क्षणभर थांबले आणि हळूच म्हणाले, “मला उजव्या कानाने ऐकू येत नाही?”
त्या उत्तराने प्रश्नकर्त्याचे समाधान तर झालेच, पण श्रोत्यांनीही टाळ्यांचा कडकडाट केला.
– राम देशपांडे 8600145353
——————————————————————————————