रामानंद तीर्थ आता संकेतस्थळावर ! (Website for Ramanand Tirth’s Birth Centenary)

0
261

स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जन्मदिवशी, 3 ऑक्टोबर 2024 ला व्हिजन महाराष्ट्र फाऊंडेशनने तयार केलेल्या स्वामीजींवरील संकेतस्थळाचे प्रकाशन अंबाजोगाई येथे होत आहे. सोहळा ‘स्वामी रामानंद तीर्थ व हैदराबाद मुक्ती संग्राम स्मृती स्थळ’ येथे होणार आहे. हा कार्यक्रम शिक्षणतज्ज्ञ आणि स्वामीजींच्या चरित्राचे अभ्यासक प्राध्यापक डॉ. सुरेश खुरसाळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे. संकेतस्थळ गिरीश घाटे यांनी तयार केले आहे. ते हैदराबाद स्वातंत्र्यलढ्याचे अभ्यासक आहेत.

हैदराबाद संस्थान निजामाच्या सरंजामशाही राजवटीतून 17 सप्टेंबर 1948 रोजी स्वतंत्र झाले. त्यानंतर राज्याचे त्रिभाजन होऊन मराठी भाषिक मराठवाडा महाराष्ट्रात विलीन करण्यात आला. हैदराबादच्या स्वातंत्र्यलढ्याचे अग्रगण्य नेते म्हणून रामानंद तीर्थ यांच्या नावाची महती वेगळीच आहे.

रामानंद तीर्थ यांच्यावरील संकेत स्थळाची निर्मिती हा व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशनच्या ‘महाभूषण’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा एक भाग आहे. किबहुना, त्या प्रकल्पाचा प्रारंभही या संकेतस्थळाने होत आहे. विविधतेने नटलेल्या महाराष्ट्राला एकजीव करण्याचे काम विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात झाले. 1900 ते 1930 या तीस वर्षांत जन्माला आलेल्या अनेक लोकोत्तर नेत्यांचा आणि व्यक्तींचा हा कार्यकाळ. हा कार्यकाळ अशाच मान्यवरांची जन्मशताब्दी वर्षे या शतकाच्या आरंभापासून (2001) साजरी करत आलो आहोत. त्यांनीच आजच्या महाराष्ट्राचे सांस्कृतिक चित्र तयार केले. राजकारण, समाजकारण, कला, साहित्य, क्रीडा अशा अनेक विषयांत त्या व्यक्तींनी मोलाची कामगिरी बजावली. इंटरनेटच्या या बदलत्या युगात त्या असामान्य जन्मशताब्दी-वीरांच्या जीवनावर आणि त्यांच्या कार्यावर प्रकाश पडणारी सविस्तर संकेतस्थळे तयार करण्याचा प्रकल्प फाउंडेशनने हाती घेतला आहे. फाउंडेशनने तीनशेहून अधिक अशा असामान्य व्यक्तींची यादी केली आहे. डिसेंबरपर्यंत आणखी तीन संकेतस्थळे तयार करण्याचा बेत आहे. महाभूषण प्रकल्पाचे प्रमुख सूत्रधार गिरीश घाटे हेच आहेत.

स्वामी रामानंद तीर्थ यांचे पूर्वाश्रमीचे नाव व्यंकटेश भवानराव खेडगीकर. त्यांचा जन्म 3 ऑक्टोबर 1903 रोजी कर्नाटकातील सिंदगी येथे झाला. त्यांनी सोलापुरात शालेय शिक्षण तर अमळनेर व पुणे येथे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. त्यांना प्रेरणा लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांच्याकडून मिळाली. त्यांनी लहानपणीच आजन्म संन्यासी राहून देशसेवेला वाहून घेण्याची प्रतिज्ञा केली. त्यांनी आरंभी कामगार नेते एन.एम. जोशी यांच्याकडे आणि हिप्परगा येथील राष्ट्रीय शाळेत काम केले. हैदराबाद संस्थानात राष्ट्रीय शिक्षणाचा प्रसार व्हावा आणि जनमानसात जागृती निर्माण व्हावी या उद्देशाने त्यांनी मोमिनाबाद (अंबाजोगाई) येथे श्री योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विभागाची स्थापना केली.

हैदराबाद संस्थानावर निजामाची सातवी पिढी राज्य करत होती. हैदराबाद संस्थानात पंच्याऐंशी टक्के जनता हिंदू होती. मात्र त्यांना सर्वसामान्य नागरी हक्कदेखील नव्हते. स्वामीजी पुढे पूर्णवेळ राजकारणात उतरले. त्यांनी “मी हैदराबाद राज्यातील जनतेच्या स्वातंत्र्यासाठी लढेन आणि त्यासाठी माझे सर्वस्व पणाला लावेन.” अशी प्रतिज्ञा घेतली. हैदराबाद संस्थानात फार मोठ्या राजकीय घडामोडी 1938 ते 1948 या दशकात घडल्या. स्वामीजींनी त्या चळवळीचे समर्थ नेतृत्व केले. त्यांनी गांधीजींच्या मार्गदर्शनानुसार तेलगू, कानडी आणि मराठी भाषिक कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन निजामाविरुद्ध राज्यव्यापी लढा उभा केला. त्यांनी स्वतः प्रत्यक्ष लढ्यात भाग घेऊन अनेक वेळा तुरुंगवास भोगला.

निजामाने भारतात विलीन न होता स्वतंत्र राज्य राखण्याचा निर्णय घेतला, तेव्हा स्वामीजींच्या नेतृत्वात हैदराबाद स्टेट काँग्रेसने बंड पुकारले. स्वामीजींनी निजामाने स्वतंत्र भारतात बिनशर्त विलीन व्हावे अशी निर्वाणीची घोषणा केली. स्वामीजींना अटक झाली. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या सहकाऱ्यांनी लढा पुढे नेला. निजाम पुरस्कृत रझाकार संघटनेचे अत्याचार राज्यात शिगेला पोचले ! स्टेट काँग्रेसने सत्याग्रह, बॉर्डर कॅम्पस इत्यादी मार्गांनी रझाकार व निजाम सरकार यांच्याशी निकराचा संघर्ष केला. अखेर रझाकारांचे अत्याचार थांबवण्यासाठी आणि राज्यात अंतर्गत सुव्यवस्था आणण्यासाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन पोलो’ अंतर्गत पोलिस कारवाई केली. भारतीय सैन्य अवघ्या पाच दिवसांत हैदराबाद शहरापर्यंत पोचले. निजामाने शरणागती 17 सप्टेंबर 1948 रोजी पत्करली आणि हैदराबाद राज्य स्वतंत्र भारतात विलीन झाले ! पोलिस कारवाईनंतर राज्यात शांतता प्रस्थापित राहवी यासाठीही स्वामीजींनी मोलाची कामगिरी बजावली.

स्वामीजी लोकसभेचे सभासद म्हणून 1952 ते 1962 निवडून आले. स्वामीजींनी हैदराबाद राज्याचे त्रिभाजन करून मराठी भाषिक मराठवाडा महाराष्ट्रात विलीन करावा असा आग्रह धरला. स्वामीजींनी मुंबईसह अखंड महाराष्ट्राच्या निर्मितीला पाठिंबा दिला. स्वामीजींनी 1962 मध्ये, लोकसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर राजकारणातून संन्यास घेतला. त्यांचा उत्तरकाळ पिठापुरम येथील रामतीर्थांच्या शांती-आश्रमात व्यतीत झाला. त्यांनी 22 जानेवारी 1972 रोजी अखेरचा श्वास सोडला.

– गिरीश घाटे 9820146432 ghategp@gmail.com

वेबसाइटची लिंक – स्वामी रामानंद तीर्थ वेबसाइटची लिंक 

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here