विराज चव्हाण यांनी सध्याच्या वाटूळ या गावाची दिली आहे. त्यासोबत प्राची तावडे यांनी त्यांच्या लहानपणी पाहिलेले गाव, त्या गावच्या रम्य आठवणी असा लेख लिहिला आहे. त्या लेखाची लिंक सोबत जोडली आहे. तुम्हीही तुमच्या गावाची ललित पण वस्तुनिष्ठ माहिती ‘गावगाथा’ दालनाद्वारे जगभर पोचवू शकता. वाटूळ हे नाव वाचताना जरा वेगळे वाटते ना? वाटूळ हे रत्नागिरी जिल्ह्याच्या लांजा तालुक्यातील सुंदर गाव आहे. ते मुचकुंदी नदीच्या काठावर वसलेले आहे. गावाचा आकार भौगोलिक दृष्ट्या गोलाकार आहे, म्हणून ते वाटूळ ! त्या बाबत दंतकथाही आहेच. शिवाजी महाराजांच्या काळात येथे यवनांचे वाटोळे झाले, म्हणून हे वाटूळ ! गाव राष्ट्रीय महामार्गावर वसले आहे. मुचकुंदी नदी माचाळ या थंड हवेच्या गावात उगम पावते. तिच्या जन्माची कथा अशी- नदीचे जन्मदाते मुचकुंद ऋषी हे सम्राट मांधाता यांचे पुत्र होते. त्यांचा इक्ष्वाकू वंशातील महापराक्रमी राजा असा लौकिक होता. ते देवदानव युद्धात बराच काळ लढल्याने त्यांना विरक्ती आली. ते तपश्चर्येसाठी सह्य पर्वतावरील एका गुहेत जाऊन राहिले. तेथे त्यांनी नदी निर्माण केली. तीच मुचकुंदी नदी होय. ऋषींसंबंधी आणखीही एक कथा आहे. त्यांना वरदान असे होते, की जो कोणी त्यांचा तपोभंग करेल तो भस्म होऊन जाईल. हे कृष्णाला माहीत होते. म्हणून जेव्हा कालयवन राक्षस कृष्णाच्या मागे लागला तेव्हा कृष्ण मुचकुंद ऋषींच्या गुहेत जाऊन लपला. त्याने स्वतःचा शेला ऋषींच्या अंगावर पांघरला. त्यामुळे कालयवन फसला. तो ऋषींनाच कृष्ण समजला. त्याने ऋषींना धक्का दिला. त्याबरोबर ऋषींनी डोळे उघडले आणि कालयवन भस्मसात झाला ! मुचकुंदी नदी माचाळ, खोरनिनको, प्रभानवल्ली, भांबेड, कोर्ले, वेरवली, वाघणगाव, विलवडे, वाटूळ, वाकेड, बोरथडे, इंदवटी, गोळवशी, साटवली, बेनी, डोर्ले, वडदहसोळ यांसारख्या गावांना स्पर्श करत पुढे पूर्णगड येथे अरबी समुद्राला मिळते. वाटूळला मुबलक पाणी व नयनरम्य निसर्गसंपदा लाभली आहे. गावातील महादेव वाडी व गवळवाडी यांच्यामध्ये धरण आहे. धरणाच्या आजुबाजूला पसरलेला हिरवागार परिसर मन वेधून घेतोच, पण पावसाळ्यात सांडव्यावरून कोसळणारे पाणी मन आनंदित करते.
गावाला वारकरी संप्रदायाची एकशेपंचवीस ते एकशेतीस वर्षांची जुनी परंपरा आहे. गावाने प्रसिद्ध कीर्तनकार दिले आहेत, की ज्यांनी पंढरपुरात एकादशीला मानाची कीर्तने केली. हरिभाऊ रा. चव्हाण, विष्णू म. चव्हाण, वसंत कृ. चव्हाण, मुरारी म. चव्हाण, मुकुंद म. चव्हाण ही हरिभक्त परायण मंडळी त्यांच्यापैकीच होत. मी हरिभक्त परायण बाळकृष्ण बुवा (बावा) चव्हाण यांच्या घरी गेलो. त्यांच्या अंगणात उभारलेल्या संत समाधी आणि घराच्या ओटीवर संतांच्या छायाचित्रांतून केलेली आरास पाहून एखाद्या तीर्थस्थळालाच आपण भेट देतो आहोत असे वाटून गेले. संगीत भजनी बुवा शंकरराव चव्हाण व त्यांचे पुत्र श्रीधर चव्हाण हे रत्नागिरी जिल्ह्यात प्रसिद्ध होते. शिरीबुवा आणि प्रभानवल्ली गावचे लालुबुवा यांच्या डबलबारी संगीत भजनांचे सामने रंगत. त्या काळात करमणुकीची अन्य साधने नसल्यामुळे त्या रात्रभर चालणाऱ्या भजनांना तुफान गर्दी लोक बैलगाड्या लॉऱ्या भरून दूर दूर पर्यंत डबलबारी ऐकायला जायचे. कोणत्या बुवांना कोणत्या अभंगावर बारी जिंकली याची चर्चा पुढे बरेच दिवस चालायची.या साऱ्या गोष्टी नव्वदीच्या दशकातील होत.

हरिभक्त परायण महादेव काशिबा दळवी हे तर हरीनामाने जणू वेडेच झाले होते. ते वेगळेच व्यक्तिमत्त्व होते. ते मूळ वाटूळ गावापासून पाच-सहा किलोमीटर अंतरावरील तिवरे गावचे. परंतु त्यांची सासुरवाडी वाटूळ गावातील तांबडवाडीतील चाकरमानी ह्या घरात होती. नाते असल्यामुळे, महादेव दळवी यांचे तेथे येणे-जाणे असायचे. त्यांना भगवंताचे भजन-नामस्मरण व कीर्तन यांची खूपच आवड होती. ते जेथे भजन-कीर्तन असे तेथे जात व दोन-दोन दिवस घरीच परतत नसत ! कधी-कधी, रानात एकटेच बसून नामचिंतन करत. कधी, वाटूळमधील महादेव मंदिरात ‘ॐ नम: शिवाय:’ असा जप करत एकटेच बसत.

वाटूळ गाव बारा वाड्यांचा असा मोठा आहे. महादेववाडी, तांबळवाडी, कडेकरवाडी, गवळवाडी, बौद्धवाडी, सोनारवाडी, कुंभारवाडी, बेलाचे कोंड, मानाचे कोंड, कातळवाडी, डोंगरवाडी, घाटकरवाडी, धनगरवाडी, चौकडी अशा त्या वाड्या. गावची ग्रामदेवता अदिष्टी देवी, त्याखेरीज रवळनाथ, जाकादेवी, गांगोदेव, विठ्ठल रुक्मिणी, गगनगिरी महाराजांचा मठ, जांगलदेव, महापुरुष आणि स्वयंभू महादेव अशी मंदिरे गावात आहेत. ती तीन-चारशे वर्षे जुनी असावीत. मात्र ती कोणत्या काळात बांधली गेली त्याचा पुरावा उपलब्ध नाही, महादेवाच्या पालखीच्या मुखवट्यावर तो दोनशे वर्षांपूर्वी तयार केल्याची तारीख आहे. महादेव मंदिरात महाशिवरात्र, त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली जाते. श्रावण महिन्यात सोमवारी गावातील लोक महादेवाला अभिषेक करतात. देवळात भजन-कीर्तन केले जाते. तिसऱ्या सोमवारी सप्ताह असतो. गोकुळाष्टमीला जांगलदेवाच्या मंदिरात दहीहंडीचा उत्सव असतो. गावात शिमगोत्सव भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा केला जातो. अदिष्टीदेवी, जाकादेवी व रवळनाथ; तसेच, गांगोदेव यांच्या पालख्या गावातील घरोघरी जातात. पुण्या-मुंबईत असलेले लोक त्यावेळी आवर्जून उपस्थित असतात. गावात नवरात्रोत्सवही साजरा केला जातो.

अदिष्टी व रवळनाथ यांच्याविषयी आख्यायिका आहे. ती म्हणजे अदिष्टी ही रवळनाथाची अर्धांगिनी, पण देवाने त्याच्या मेव्हणीसोबत म्हणजेच पावणादेवीसोबत लग्न केले, म्हणून अदिष्टीने रागावून दुसरीकडे स्थान निर्माण केले. देवावर राग म्हणून रवळनाथाचा गुरवसुद्धा त्या देवीला पूजेला चालत नाही. ही गोष्ट आजच्या काळातही पाळली जाते. पहिली पूजा अदिष्टीची केली जाते – तिला पहिला मान दिला जातो. अदिष्टीला नवरात्रात सजवले जाते. तसेच जाकादेवी, रवळनाथ, पावणादेवी, विठलादेवी या देवतांनाही सजवतात. जाकादेवीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दत्तजयंती गगनगिरी महाराजांच्या मठात साजरी होते. तांबळवाडीत तुकाराम बीजही भक्तिभावाने व मोठ्या उत्साहात साजरी करतात. गावातील लोक येतातच, पण पंचक्रोशीतील लोकही बीजेसाठी तांबळवाडीत येतात.
कोकणातील घराघरात साजरा होणारा गणेशोत्सव वाटूळमध्येही जल्लोषात साजरा केला जातो. इतर वेळी बंद असलेली घरे गणेशोत्सवाच्या निमित्ताने उघडी दिसतात. चाकरमानी गणपतीसाठी गावी येतो. आरत्या-भजनांचे सूर आळवले जातात. एकमेकांच्या भेटीगाठी गणपती सणाच्या निमित्ताने होतात. शिवजयंती, बौद्धजयंती, आंबेडकर जयंती हे आधुनिक काळातील समारंभ योग्य त्या थाटामाटात साजरे होतात. गावात बौद्धविहार आहे.

गावात तीन प्राथमिक मराठी शाळा व आदर्श विद्यामंदिर नावाचे हायस्कूल आहेत. तसेच, ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स आहे. वाटूळ हायस्कूलचा निकाल दरवर्षी उत्तम असतो. विद्या विकास मंडळ (मुंबई) या संस्थेच्या वतीने 1972 साली अनुदान तत्त्वावर माध्यमिक शाळेची सुरुवात करण्यात आली. ते अनुदान मिळवण्यासाठी त्यावेळचे मुंबई विद्यापीठाचे रजिस्ट्रार भाऊसाहेब सावंत व तत्कालीन सरपंच विठ्ठल रा. चव्हाण यांनी ग्रामपंचायतीतर्फे सहकार्य केले. त्या कामासाठी रक्कम बाजीराव ग. चव्हाण यांनी उभी केली व कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी श्रीधर शं. चव्हाण यांनी योगदान दिले. शाळेसाठी लागणारी जमीन प्रामुख्याने तांबळवाडीतील चव्हाण बंधू, कातळवाडीतील उंबरकर बंधू, महादेववाडीतील बांबरकरी बंधू यांच्या देणग्यांतून लाभली. हायस्कूलमधील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला आहे. शाळेच्या माजी विद्यार्थी संघातर्फे निधी उभा करून 2019 साली शाळेसाठी चार वर्गखोल्या बांधण्याचे काम करण्यात आले आहे. शाळेमुळे वाटूळच्या सीमेलगत असणाऱ्या वाकेड, बोरथडे, विलवडे, शिरवली, तिवरे, ओणी, मंदरुळ, चुनाकोळवण यांसारख्या गावांतील विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ घेता आला आहे. हायस्कूलमधील विद्यार्थी खेळांतही राज्यस्तरावर चमकतात.

वाटूळ तिठा हे गावाचे मध्यवर्ती ठिकाण. वाटूळची आर्थिक उलाढाल बऱ्याच प्रमाणात त्या तिठ्यावर होते. तिठ्यावरून प्रत्येक वाडीत जाण्यासाठी जवळजवळ सारखा वेळ लागतो. तेथे रविवारचा बाजार भरतो. बऱ्याच काळपर्यंत गावाकडचे लोक पाचल किंवा भांबेडच्या बाजारात जात असत. वाटूळचा बाजार हा फार उशिरा सुरू होई आणि तो मासळीपुरता मर्यादित होता.

गावातील ग्रामपंचायत, वाचनालय, तलाठी कार्यालय, रेशन दुकान, आरोग्य केंद्र, किराणा दुकान, हॉटेल या महत्त्वाच्या वास्तू तिठ्यावरच आहेत. वेगवेगळ्या वाड्यांतील लोक बाजाराच्या निमित्ताने एकमेकांना भेटतात. शेती हा गावातील मुख्य व्यवसाय असून भाजीपाला तसेच, दुधाचा व्यवसायही उदरनिर्वाहासाठी केला जातो. आंबा, काजू, नारळ यांचे बागायतदार गावात आहेत.
गावाने उच्चपदस्थ व्यक्ती दिल्या आहेत. प्रवचनकार सु.ग. शेवडे आणि ‘मोरूची मावशी’फेम अभिनेते विजय चव्हाण हे त्यांपैकी सर्वांत जास्त माहीत असलेले. ते दोघे याच गावचे आहेत. शेवडे यांनी सांगितले, की त्यांचे पूर्वज चारशे वर्षांपूर्वी या गावच्या महादेवाची पूजा करण्यासाठी म्हणून आले व तेथेच स्थिरावले. शेवडे यांचे आजोबा पुढे बडोद्याला गेले. तरी शेवड्यांचे संबंध वाटूळशी घट्ट राहिले. वाटूळ गावचे जमीनदार चव्हाण हे होत. त्यांचेच महादेव मंदिर आहे. गावात चव्हाण आडनावाचे चाळीस टक्क्यांहून जास्त लोक आहेत. राजापूर-लांजा तालुका नागरिक संघाचे पहिले अध्यक्षपद वाटूळच्या गो.ना. चव्हाण यांनी भूषवल्यामुळे रिंगणे आणि वाटूळ ही दोन गावे संघासाठी नेहमीच अभिमानास्पद वाटत आली आहेत.

गावचा कारभार चालवण्यासाठी आठ सदस्य असलेली ग्रामपंचायत आहे. तिचे स्वतंत्र कार्यालय आहे. ग्रामपंचायतीची स्थापना 1956 साली झाली. पहिले सरपंच लक्ष्मण बा. माने हे होते. ग्रामपंचायतीला निर्मल ग्राम पुरस्कार मिळाला आहे. त्याचबरोबर पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम पुरस्कारही प्राप्त झाला आहे. गावाला तंटामुक्त गाव पुरस्कारही अध्यक्ष सुरेश वि. चव्हाण यांच्या कारकिर्दीत मिळाला आहे. सरपंच आणि पोलिस पाटील म्हणून अनुक्रमे राजश्री रमेश चव्हाण व संपदा संजय चव्हाण या दोन महिलांनी पदभार सांभाळला होता. स्त्री-पुरूष समानतेला गावात महत्त्व दिले जाते.

गावात गेल्या पन्नास वर्षांत अनेक बदल झाले. गावात विकासाची अनेक कामे मागील काही वर्षांत मार्गी लावण्यात यश मिळाले आहे. त्या मार्गे लोकांचे मूलभूत प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केले गेले. वीज, पाणी, रस्ते; तसेच शिक्षण यांसारख्या विषयांवर काम करण्यात आले. गावात हायस्कूल, कॉलेज झाले. बाजूच्या राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झाले. कोल्हापूरला जाणारा मार्ग राष्ट्रीय महामार्गाला जोडून वाटूळमधून तयार करण्यात आला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गावात धरण झाले. गावाला पिण्याच्या पाण्यासाठी; तसेच, शेतीसाठी फायदा व्हावा या उद्देशाने वाहत्या पाण्याचा साठा करून धरण बांधण्यात आले. त्या पूर्वी त्या ठिकाणाला गवरकोंड म्हटले जाई. गवरकोंड म्हणजे गणपती विसर्जनाची जागा. धरण झाल्यापासून आजुबाजूच्या वाड्यांमधील तळी-विहिरींमध्ये बारमाही पाणी राहू लागले. चांगले बदल आत्मसात करत पुढील काळातही गावाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी गावकरी कटिबद्ध आहेत.
वाटूळ गावातील प्रत्येक व्यक्तीसाठी त्याचा गाव प्रिय आहे. गावावर मी लिहिलेल्या कवितेच्या काही ओळींमध्ये सांगायचे झाले तर,
लाल मातीत दरवळे
आमचे वाटूळ सुंदर
वाटे अभिमान मजला
मी एक वाटूळकर…
– विराज वि. चव्हाण 9987954937 viruchavan13@gmail.com