वडखळचा थांबा ! ज्यांनी म्हणून मुंबईतून कोकणात किंवा अलिबागला प्रवास केला आहे, त्यांचा त्या गावाशी नक्की परिचय असेल. पेण या महत्त्वाच्या एसटी स्टँडपासून सात-आठ किलोमीटरवर असलेले ते गाव एरवी दुर्लक्षित राहिले असते, पण मुंबई-गोवा महामार्गाने त्या गावाला ओळख दिली. कोकणात जाणारी गाडी मुंबईतील वाहतूक कोंडी फोडून पनवेल ओलांडते, पळस्प्याला लागते आणि मग जरा एका लयीत येते. वाहतूक कोंडीत गचके खाणारे प्रवासी गार हवा आल्याने सुस्तावतात, ते पेणचा स्टँड येईपर्यंत. प्रवासी मंडळी तेथे जरा फ्रेश होतात, साखरी पेढे खाऊ म्हणून घेतात, पेणच्या पापडांची चौकशी करतात, गाडीत पुन्हा बसतात. गाडी पुन्हा थोडी लयीत येते आणि अचानक समोर वाहनांचा भलामोठा गोतावळा दिसतो. बसमधील कोणीतरी बोलतो, ‘च्यायला, या वडखळला ट्रॅफिक आहे वाटतं,’ वडखळ गावाचा परिचय होई, तो असा!
पण तरी वाहतुकीच्या त्या वर्दळीत वडखळला स्वत:चे असे एक व्यक्तिमत्त्व गेल्या पन्नास वर्षांत लाभले. त्या परिसरात ‘जिंदाल स्टील वर्क्स’ गेल्या तीन दशकांत आले. त्या कंपनीचे शेकडो मजूर तेथे वावरताना दिसतात. त्यांच्या चेहर्यावर धुळीचा राप असतो, नजर खोल गेलेली असते. ते हाती येतील ते कपडे घालून धुळीने भरलेले हेल्मेट आणि तसेच गमबूट घालून मुकाट्याने, खाली मान घालून कामाच्या ठिकाणी जात असतात. वडखळ हे त्या मजुरांसारखेच आहे. फार तर डोक्यावर मळलेली गांधी टोपी, गुडघ्यापर्यंत वर आलेले धोतर किंवा पंचा, मळलेला धुळकट सदरा, दाढीचे खुंट आलेला माणूस हे वडखळचे स्थानिक व्यक्तिमत्त्व. पण त्या पलीकडे वडखळ नाक्यावर मुंबई-गोवा पट्ट्यांतील शेकडो नमुने दिसत. त्यांचे संमिश्र चित्र कॉस्मॉपॉलिटन असेच, पण त्याला अस्सल मराठी वास असे.
मात्र धूळ, तेल आणि पावसाळ्याच्या दिवसांमध्ये चिखल एवढीच वडखळची भौगोलिक ओळख नाही. एसटी पूर्वी वडखळच्या त्या छोटेखानी एसटी थांब्याच्या आत शिरत असे. जेमतेम दोन मिनिटे थांबे आणि मग पुढे मार्गस्थ होई. पण त्या दोन मिनिटांमध्येही उसाचा रस, आलेपाकाच्या वड्या, गरमागरम वडे, चहा, वेफर्सची पाकिटे वगैरे विकणार्यांची झुंबड उडे. वडखळचा विलोभनीय गडबडीचा चेहरा तेव्हा दिसे. स्वत:ची गाडी असणारे लोक तर पेण वगैरे भानगडीत न पडता वडखळला हमखास थांबा घेत. मुंबई-पनवेलच्या कचाट्यातून सुटून पुढे तीस-चाळीस किलोमीटर आले, की मुख्य कोकण रस्त्याला लागण्याआधीचा तो थांबा ! वडखळच्या त्या छोटेखानी स्टँडसमोर एक पेट्रोल पंप आहे. बाजूला आमंत्रण नावाचे रूचकर पदार्थ खाऊ घालणारे हॉटेल आहे. स्टँडच्या एका बाजूला मुंबईच्या दिशेने बाजार लागतो. अलिबाग पट्ट्यातील प्रसिद्ध पांढर्या कांद्यांच्या माळा, चिक्की, पेणचे पापड, सुकट मासळी असे पदार्थ तेथे विकण्यास ठेवलेले असतात. स्टँडच्या दुसर्या बाजूला दोन-तीन बर्यापैकी हॉटेले होती. तेथील मधुकर नावाच्या हॉटेलमध्ये खाल्लेल्या वड्याची चव जिभेवर रेंगाळत आहे. त्या हॉटेलांनी वडा, भजी, चहा आणि मिसळ या चतु:सूत्रीवर वडखळच्या व्यक्तिमत्त्वात रंग भरले होते. तेथे चहा प्यायला, की कोकणच्या पुढील प्रवासाला मंडळी सज्ज होत. तीच गत कोकणातून मुंबईकडे परतणार्यांची ! मुंबईच्या गर्दीत हरवून जाण्याआधी गावच्या वातावरणाच्या शेवटच्या काही आठवणींमध्ये रेंगाळण्याचे ठिकाण…
वडखळ नाक्यावरील रस्ता कधीच चकाचक किंवा विनाखड्डे दिसलेला नाही. आयुष्यभर काबाडकष्ट करणार्या माणसाच्या हाताला जसे घट्टे असतात, तसेच खड्डे वडखळ नाक्यावरील त्या रस्त्याच्या भाळी कोरलेले आहेत. त्यामुळे वडखळ नाका कोकणात जाताना किंवा येताना सतत, ‘हळू चालवा, रे बाबांनो’ असे सांगतो असेच वाटते.
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम जाहीर झाले तेव्हा पहिला प्रश्न मनात आला, की वडखळला चौपदरी रस्ता कसा काय बनवणार? ते काम बहुतांश झाले आहे. काही दिवसांपूर्वी त्या मार्गावरून गेलो तर कर्नाळा वगैरे मागे कधी गेले ते कळलेदेखील नाही. वडखळला चहा घेण्यास थांबू – असा होरा होता. पण कसचे काय! वडखळ आले कधी आणि गेले कधी, काहीच पत्ता लागला नाही ! कारण वडखळ थांबा मुंबई-गोवा रस्त्यावर लागलाच नाही. गाडी वडखळला बायपास करून बऱ्याच लांबून गेली ! एकदम चुकचुकल्यासारखे झाले. एक मन म्हणत होते, की बरे झाले, वडखळच्या वाहतूक कोंडीतून सुटका झाली, पण दुसर्या मनाला तेथील त्या गरमागरम वड्यांचा गंध खुणावत होता, पांढर्या कांद्यांच्या माळांचा थंडावा सुखावत होता.
परत मुंबईला येताना वडखळ लागेल अशा हिशोबाने मुद्दामहून आलो. वडखळची रयाच गेल्यासारखी झाली आहे. वडखळचे एके काळच्या दिमाखदार हवेलीच्या भिंतीचे पोपडे उडावेत आणि तुळयांना वाळवी लागून ती वास्तूच उद्ध्वस्त व्हावी तसे काहीसे झाले आहे. खरे तर, ना वडखळला कधी रया होती, ना ती हवेली होती, सारे मनाचे खेळ. ते ज्या आधारे खेळले जात त्या चहावाल्याने त्याचा ठेला गुंडाळला आहे, गरमागरम वडे देणारे ते हॉटेल बंद झाले आहे. कांद्यांच्या माळा दीनवाण्या होऊन नुसत्याच लटकत आहेत. अलिबागचे वकील लेखक विलास नाईक यांच्या ‘गाव तसं चांगलं’ कादंबरीत वडखळचे महात्म्य मीठाच्या अंगाने येते. वडखळ ही एके काळी मिठाची बाजारपेठ होती. मिठागरे तेथे आहेत. त्या मिठागरांच्या ठेकेदारांना शिलोत्री संबोधत किंवा भाडोत्री याला शिलोत्री असे म्हटले जाई. ते शिलोत्री स्थानिक आगरी मजुरांना, कष्टकऱ्यांना खारे पाणी खाडीकिनारी भरतीच्या वेळी ‘साल्ट प्यान’ आत घेऊन खास पद्धतीने मीठ तयार करायचे. ते मीठ खारे पाणी उघड्यावर उष्णतेने आटून जाऊन तयार होई. आतील बाजूच्या खलाटीमध्ये भातशेती होई. तेच जाडे मीठ ‘बार्टर पद्धती’ने बैलगाडीतून पायलीच्या मापाने आदानप्रदान होई. ते बलुतेदार यांच्याकडून सुकी मच्छी, चिंच, पोहे, भात, नारळ, सुपारी, भांडी पितळी किंवा लाकडी घेऊन, त्यांना मीठ पायलीने वाटले जाई.
नव्या महामार्गावरून प्रवास वेगवान झाला, यात काही वादच नाही. पण जुना एक थांबा कायमचा हरवला, याची चुटपूट लागून राहिली. ती अर्थात जुन्या लोकांना. वडखळची मौज नव्यांना माहीत नाही. त्यामुळे त्यांना काही हरवल्याची चुटपूट नाही.
(‘व्हॉट्स अॅप’वर पोस्ट मिळाली. ती अधिक माहितीने थोडी विस्तारली)
———————————————————————————————