विष्णुशास्त्री चिपळूणकर यांची ‘निबंधमाला’(Vishnushastri Chiplunkar’s Nibandhamala)

0
455

विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या ‘निबंधमाले’स महत्त्वाचे स्थान मराठी वाङ्मय व साहित्य यांच्या इतिहासात आणि एकोणिसाव्या शतकातील महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय विचारांच्या क्षेत्रात आहे. त्या ‘निबंधमाले’ने महाराष्ट्रातील विचारांना नवी दिशा व वळण दिले. ‘निबंधमाला’ नावाचे नियतकालिक होते. नियतकालिकांचा उदय ही त्या काळातील क्रांतिकारक घटना होय. त्यांनी लोकशिक्षणाच्या कार्यात महत्त्वाचा वाटा उचलला. त्यांतील लिखाण व चर्चा प्रामुख्याने ज्ञानप्रसार, समाजसुधारणा, धर्मनिष्ठा, दृढीकरण, प्राचीन वाङ्मयाचे प्रकाशन, वैज्ञानिक माहिती, जातिभेद, रूढीग्रस्त समाजजीवन, मिशनऱ्यांच्या कारवाया अशा विषयांवर असे. ‘निबंधमाला’ आठ वर्षे चालली. ‘निबंधमाले’चे एकूण चौऱ्याऐंशी अंक प्रसिद्ध झाले. पहिला अंक 25 जानेवारी 1874 मध्ये ज्ञानप्रकाश छापखाना (पुणे) येथे छापण्यात आला. तेथे साठ अंक छापले गेले. त्यापुढील त्याचे अंक 61 ते 68 हे श्री शिवाजी छापखाना, 69 ते 84 हे आर्य भूषण छापखाना येथे छापण्यात आले. अंकांची पृष्ठे 20 ते 32 असत. प्रतींची संख्या मार्च 1878 म्हणजे सत्तेचाळिसाव्या अंकापर्यंत साडेसहाशे होती. पुढे, ती एक हजार इतकी झाली. शेवटचा, म्हणजे चौऱ्याऐंशीवा अंक डिसेंबर 1881चा होता.

‘निबंधमाले’चे मनोरंजन हे ध्येय नव्हते. ‘निबंधमाला’ची उद्दिष्टये लोकांमध्ये जागृती, विचारक्रांती व्हावी, मराठी भाषेच्या अभिव्यक्तीचे दर्शन घडावे, स्वदेश-स्वधर्म-स्वभाषा यांचा अभिमान जागृत करावा व स्वभाषेची अवहेलना थांबवावी ही होती. ती राष्ट्रवादी जहाल पक्षाचा जाहीरनामा म्हणून प्रसिद्ध व्हावी आणि ‘निबंधमाले’चे उदात्त ध्येय वाङ्मयप्रेमी लोकांना ‘निबंधमाला’ हा वाङ्मयाचा ज्ञानकोश वाटावा असे ठेवले होते. ‘निबंधमाले’मधील लेखांचे विषय व स्वरूप पुढीलप्रमाणे:

  1. राजकीय विषय – इतिहास आणि आमच्या देशाची स्थिती
  2. सामाजिक विषय – संपत्तीचा उपयोग, उपभोग, लोकभ्रम
  3. वाङ्मयीन विषयांवर निबंध- वक्तृत्व, वाचन
  4. व्यक्ती परीक्षणात्मक- लोकहितवादी
  5. चरित्रात्मक – डॉ. जॉन्सन
  6. समीक्षात्मक – मोरोपंतांची कविता
  7. साहित्य व त्यावरील चर्चा – विद्वत्ता व कवित्व
  8. भाषाशास्त्रीय – भाषा, दूषण, लेखन, शुद्धी इत्यादी.

याशिवाय अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास, भाषा या विविध विषयांचा समावेश ‘निबंधमाले’तील लेखनात होता. ते सर्व लेख वैचारिक होते. ते निबंध स्वरूपात लिहिले असल्याने ती ‘निबंधमाला’ होय !

विषय कोणताही असो तो वर्तमानाशी जोडण्याची कला विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्याकडे होती. श्री.के. क्षीरसागर, वि.स. खांडेकर, श्री.ना. बनहट्टी यांनी ‘निबंधमाले’विषयी विशेष अभ्यासात्मक लिहिले आहे. बनहट्टी यांनी, “विष्णुशास्त्रींचे व्यक्तिमत्त्व वादळी होते, त्यांचे सिद्धांत वादग्रस्त होते, त्यांचे लेखन प्रतिक्रियेच्या स्वरूपाचे व मूलभूत आहे. ते दैववादी नव्हते तर जबरदस्त प्रयत्नवादी होते.” सरोजिनी शेंडे यांच्या मते, “विष्णुशास्त्री यांनी सतत प्रयत्नशील राहून त्यांच्या देशबांधवांचा न्यूनगंड दूर करण्याचा प्रयत्न केला; अस्मिता जागृत केली; इतिहासातील उज्वल काळाचे स्मरण करून, ‘पूर्व दिव्य ज्यांचे त्यांना रम्य भावी काल’ असे आशावादी विचार मांडले. ‘निबंधमाले’चे ऐतिहासिक महत्त्व मोलाचे आहे. विष्णुशास्त्री यांच्या भाषेत अर्थवाहकता, भारदस्तपणा व शब्दांचा मार्मिक उपयोग आढळतो.” अ.ना. देशपांडे यांच्या मते, “आधुनिक मराठीतील चरित्रकार ‘निबंधमाले’तून स्फूर्ती घेतात. त्यामुळे महाराष्ट्रात ध्येयवादी वाङ्मयीन कार्यकर्त्यांची एक थोर, उज्वल परंपरा निर्माण झाली, चिपळूणकर हे त्या परंपरेतील लेखकांचे प्रमुख प्रेरक स्थान होते.”

विष्णुशास्त्री यांनी स्वतःला, ‘मराठी भाषेचा शिवाजी’ ही पदवी घेतली. इतिहास हा चिपळूणकर यांचा आवडता विषय. ते म्हणत, इतिहास म्हणजे प्रत्यक्ष उदाहरणे दाखवून केलेला बोध होय. त्यांनी देशाला प्रथम स्वातंत्र्य मिळावे, त्या कार्यास गती आणावी हा विचार दिला. शिथिल झालेल्या, उत्साह नसलेल्या हताश व निराश झालेल्या महाराष्ट्रातील लोकांच्या मनात ब्रिटिशविरोधी क्रोध निर्माण केला. लोकशक्ती, लोककृती आणि लोकशिक्षण यांचे धडे ‘निबंधमाले’तून दिले. ब्रिटिश करत असलेल्या शोषणाकडे अधिक लक्ष द्यावे, रावसाहेब, रावबहादूर या पदव्या, लठ्ठ पगार यांपेक्षा स्वार्थत्याग, ज्ञानोपासना, सदाचार, चारित्र्य, तत्त्वनिष्ठा यांवर लक्ष केंद्रित करावे असा तरुणांना सल्ला दिला. साम्राज्यविरोधी चळवळ सुरू केली. चिपळूणकर यांनी इंग्रजी भाषेला ‘वाघिणीचे दूध’ म्हटले. त्याच वाघाच्या ‘निबंधमाले’ने लढाऊ राष्ट्रवादाची गर्जना केली. चिपळूणकर यांनी गुलामगिरीतून देशाच्या मुक्तीला प्राधान्य दिले, स्वातंत्र्याची उपयोगिता व चळवळीला वेग यांसाठी आक्रमकता आणून सनदशीर राजकारणाकडून जहाल राजकारणाकडे असा बदल केला. त्यांनी असे ठामपणे म्हटले, की ब्रिटिशांच्या शासनाला दैवी मानणे चूक आहे. पारतंत्र्यामुळे आपण ब्रिटिशांचे शारीरिक, मानसिक व बौद्धिक गुलाम झालो आहोत. ते राज्यघटनेनुसार कारभार करत नाहीत तर नोकरशाहीच्या लहरीप्रमाणे करतात, पण निराश न होता कार्य करावे लागेल. कारण पारतंत्र्याची स्थिती शाश्वत नाही, नैमित्तिक आहे. परकीय अंमल गेला, की पुन्हा पूर्वीचे वैभवसंपन्न दिवस येतील. त्यांना ‘आधुनिक गद्याचा जनक’ असेही म्हटले जाते. आगरकर त्यांना, ‘महाराष्ट्रवाणीचा पती’ व ‘व्हॉल्टेअर’ अशा उपमा देतात. त्यांची परंपरा पुढे नेणारे काही लेखक उदयास आले. डॉ. राजा दीक्षित यांनी, “इंग्रजी भाषेला वाघिणीचे दूध संबोधणारे, मी मराठी भाषेचा शिवाजी आहे अशी प्रौढी इंग्रजीतून मिरवणारे आणि ‘लोकभ्रम’सारखे लेख लिहून आंधळेपणावर टीकास्त्र सोडणारे विष्णुशास्त्री मुळात सनातनी मानले जात असले तरी ते खऱ्या अर्थाने सुधारक होते” असे मत मांडले आहे. ते विचारांचा शस्त्र म्हणून वापर करणारे, ध्येयवादी पिढी घडवणारे म्हणून महान ठरतात.

श्रुती भातखंडे 9273386230 shruti.bhatkhande@gmail.com

———————————————————————————————————————-

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here