विदुर महाजन हा त्याची सतार आणि त्याचे संगीत याबद्दल बोलतो तेव्हा त्याची स्वभाववैशिष्ट्येही कळत जातात. तो म्हणतो, “मी वयाच्या एकोणिसाव्या वर्षी सतार शिकण्यास सुरुवात केली होती. पण व्यवसाय, गृहस्थाश्रमातील जबाबदाऱ्या यांमुळे सतारवादन ही मनापासूनची आवड जोपासण्यास खूप यातायात करावी लागे. मात्र मी एक ठरवले होते, की रोज सतार वाजवल्याशिवाय घराबाहेर पडायचे नाही आणि संध्याकाळी आल्यावर सतार वाजवल्याशिवाय झोपायचे नाही !” त्याची निष्ठा आणि नियमितता अशी तरुणपणीच प्रकट होऊ लागली.
तो तळेगाव दाभाडे येथे साडेतीनशे वर्षांपासून राहतो असे सांगतो आणि लगेच खुलासा करत म्हणतो, “तुकाराम महाराजांची गाथा लिहिणारे लेखनिक गंगाधरबुवा मवाळ हे आमचे पूर्वज. शिवाजी महाराजांनी महाजनकी दिली म्हणून आम्ही मवाळचे महाजन झालो ! तेव्हापासून आमचे वास्तव्य तळेगावातच आहे.”
तत्त्वज्ञान या विषयामध्ये पुणे विद्यापीठातून 1983 साली प्रथम क्रमांकाने एम ए पास झाला. त्याने आरंभी घरच्या व्यवसायात काम केले. तेव्हाच प्रत्ययास आले, की उद्यमशीलता हा त्याचा गुण विदुर स्वभावतः आहे. सतत उद्योगी आणि कार्यमग्न ! कल्पकता आणि आर्जव हे गुण त्याच्या अंगचेच आहेत. विदुरने त्याचा व्यवसाय पंचवीस वर्षे सक्षम पद्धतीने चालवला, मोठा केला. पण त्याला मनापासून स्वारस्य साहित्य, कला आणि संगीत यांत होते. लग्नाच्या पंचविसाव्या वाढदिवशी, त्याने त्याच्या वयाच्या सत्तेचाळिसाव्या वर्षी या व्यवसायातून बाहेर पडण्याचे ठरवले; तेव्हा, त्याने सारा वेळ सतारवादन आणि रागसंगीताचा अभ्यास यात व्यतीत करण्याचेही ठरवले.
तो व्यवसायात असतानाही शांत नव्हता. त्याचा व्यवसाय होता कोरुगेटेड पुठ्याची खोकी बनवण्याचा आणि त्यासाठी ऑर्डर आणण्याचा. तेव्हाच त्याचे उस्ताद उस्मान खान यांच्याकडे सतार शिक्षणही सुरू होते. त्याने स्वतंत्र सतारवादनाचे कार्यक्रम वयाच्या एकोणतिसाव्या वर्षापासून सुरू केले. घरात संगीतावर प्रेम करणारे, ते प्रेमाने ऐकणारे आईवडील होते, पण त्याला संगीताचा वारसा असा काही नव्हता. मनातील प्रबळ इच्छा, स्वरशक्तीवरील निष्ठा आणि सतारवादनातील आनंद हेच ध्येय असे ठरवून तो साक्षेपी वृत्तीने नव्या आयुष्याला सज्ज झाला !
विदुरने कार्यक्रम आणि संगीताचे शिक्षण या दोन्ही रूढ गोष्टी चोखाळल्याच; त्याचे कार्यक्रम देशविदेशांत झाले, त्याचे अनेक विद्यार्थी सतारवादनात पारंगत झाले, पण त्याखेरीज त्याच्या उद्यमशील विचारांतून त्याने नवनवीन प्रकल्प अनेक केले. ती त्याची कलेतील उद्यमशीलता ही अन्य कलाकारांपेक्षा वेगळी जीवनशैली ठरली आणि तीच मला मोह घालते. त्याने ‘हार्मनी’ नावाची सतारीची शाळा सुरू केली. ती शाळा बुधवार, गुरुवार अशी फक्त दोन दिवस असते; पण ती पूर्ण दिवस – दिवसभर; सकाळी सात वाजल्यापासून रात्री नऊ वाजेपर्यंत ! मधली दोन तासांची सुट्टी सोडून, साधारण चाळीस विद्यार्थी त्यांना दिलेल्या वेळी येतात. पाठ ग्रहण करतात, रियाझ करतात आणि प्रोत्साहित होऊन, कलेचा ठेवा घेऊन चालले जातात.
विदुरचा आगळावेगळा पहिला प्रकल्प म्हणजे ‘संघबांधणीचे टकमनचे मॉडेल आणि सतारीवरील राग मांडणीची पद्धत यांतील साम्य स्थळांचा शोध’. संघबांधणीसाठी गरजेची तत्त्वे आणि मूल्ये यांसंबंधी कॉर्पोरेट जगात आवश्यक असे मार्गदर्शन व प्रबोधन करणे असे त्यामागील उद्दिष्ट आहे. संगीत स्वरांमधील नात्यांमधून निर्माण होते, तशी संघभावना माणसामाणसांतील नात्यांमधून कशी घडते याचे सतारीवर प्रत्यक्ष सादरीकरण हे त्या प्रकल्पाचे लक्ष्य. विदुरने तशा परिणामकारक कार्यक्रमाची निर्मिती केली. त्याला त्या कार्यक्रमासाठी अमेरिकेतदेखील काही ठिकाणी सादरीकरणाची संधी मिळाली. इतके औत्सुक्य कलेच्या आणि उद्योगव्यवसायाच्या क्षेत्रांत दिसून आले.
‘सतारीतून ध्यानधारणा’ हा त्याचा दुसरा प्रकल्प लोणावळ्याच्या कैवल्यधाम या जगविख्यात योग संस्थेच्या सहकार्याने गेली तेरा-चौदा वर्षे सातत्याने चालू आहे. तेथे भारतातून, भारताबाहेरून लोक दर आठवड्याला येतात. विदुर एका विशिष्ट हेतूने आणि पद्धतीने त्यांच्यासाठी सतार वाजवतो. लोक ध्यानाच्या स्थितीत डोळे बंद करून शांत चित्ताने सतार श्रवण करतात आणि नंतर गदगदलेल्या आवाजात त्यांच्यावर झालेल्या वादनाच्या परिणामाबद्दल सांगतात.
पुण्यातील ‘मुक्तांगण’ नावाचे व्यसनमुक्ती केंद्र प्रसिद्ध आहे. तेथे विदुर ‘व्यसनातून व्यासंगाकडे’ या आशयाचा कार्यक्रम करतो. व्यसनमुक्तीसाठीची आस असलेले विविध स्तरांतील दीडएकशे लोक पांढऱ्याशुभ्र पोशाखात बसलेले असतात. डोळ्यांत काहीसे तरल प्रामाणिक भाव- त्यासोबत व्यसनी असण्याचा थोडासा गंडभावही असतो. विदुर त्यांच्याशी शाब्दिक आणि सतारीतून संवाद करतो. तो व्यसन हा शब्द एकदाही न उच्चारता, व्यासंग जोपासल्यावर मानसिकता कशी होते हे सांगतो आणि त्यांच्यातील चांगुलपणाला हळुवारपणे आवाहन करतो. त्यांच्या मनात व्यसनापासून लांब राहण्याची आंतरिक इच्छा त्या कार्यक्रमातून निर्माण होऊ शकते. ते भारावलेले सगळे लोक खिळल्यासारखे बसून ऐकतात आणि कार्यक्रमानंतर डोळ्यांतील अश्रूंतून खूप काही बोलून जातात.
विदुरचा ‘भारतीय रागसंगीताचा खेडोपाडी प्रचार’ हा उपक्रम गेली दहा वर्षे चालू आहे. तो शास्त्रीय संगीताबद्दल वाटणारे समाजातील अवघडलेपण जावे आणि ते संगीत सर्वदूर पोचावे या आणि केवळ या हेतूने, अत्यंत खडतर प्रवास करून, मानधनाची अपेक्षा न करता गावोगावी जातो. त्याने तेरा जिल्ह्यांचा प्रवास केला आहे आणि एक लाखाहून अधिक विद्यार्थी व पंचवीस हजारांपेक्षा जास्त ग्रामस्थ यांच्यापर्यंत सतार हे वाद्य आणि रागसंगीत यांसारखा खास विषय सोप्या भाषेत पोचवला आहे. रागसंगीताबद्दल लोकांना वाटणारी अनाकलनीय अद्भुतता नाहीशी करण्याचा त्याचा प्रामाणिक हेतू बघून, त्याचे गांभीर्य ओळखून काही दानशूर व्यक्तींनी तो उपक्रम अधिक दूरवर पोचावा यासाठी आर्थिक मदतही दिलेली आहे.
विदुर लेखनही करतो. त्याची ‘मैत्र जीवाचे’, ‘शोधयात्रा’, ‘आनंदयात्रा’ ही गद्य पुस्तके व ‘ग्रीष्म’, ‘गांधार पंचम’ ‘आणि र (‘स्व’च्या शोधात)’ हे कवितासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. ते लोकांच्या पसंतीसही पडले आहेत. त्याच्या पुस्तकांना राज्य शासनाचा आणि इतर राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.
विदुरने सुरुवातीला तत्त्वज्ञानाचा अभ्यास, नंतर खोकी बनवण्याचा कारखाना-त्यातील मार्केटिंग आणि उत्पादन अशा वळणावळणांचा प्रवास करून सुस्वर संगीतातून स्वतःची वाट निर्माण केली आहे !
– अपर्णा महाजन 9822059678 aparnavm@gmail.com
—————————————————————————————————————————————