वीणा खोत – शेतीला ग्लॅमर (Veena Khot – Young Agricultural Graduate goes Back to Farming)

0
242

दापोली तालुक्यातील देरदे या छोट्याशा गावातील युवा कृषी पदवीधर वीणा गजानन खोत तिच्या कुटुंबासमवेत फळपिकांचा व्याप सांभाळते. विशेष म्हणजे ती फळपिकांबरोबर शेत शिवारातील जैवविविधता जपण्याचाही जाणीवपूर्वक प्रयत्न करते.

खोतांची पंचवीस एकर वडिलोपार्जित बागायती शेती देरदे गावात आहे. त्यांची मुलगी वीणा दापोली कोकण कृषी विद्यापीठातून 2018 साली कृषी पदवीधर झाली. ती घरच्या फळबागायतीकडे लक्ष देऊ लागली. ती लहानपणापासून शेती-बागायतीची कामेही बघत होती. ती वडिलांच्या बरोबरीने दैनंदिन शेती व्यवस्थापन पाहते. फळबागेमध्ये दोन कायमस्वरूपी मजूर आहेत. मशागतीसाठी छोटा पॉवर विडर आणि फवारणीसाठी आधुनिक पंप आहे.

वीणा पीक व्यवस्थापनात कृषी विद्यापीठात शिकलेल्या तंत्रज्ञानाचा वापर करते. तिने त्या पद्धतीने आंबा, काजू, नारळ, सुपारी, कोकम, फणस यांचे; तसेच, काही मसाला पिकांचे उत्पादन घेतले. रायवळ आंब्याच्या पंधरा जाती तिच्या वडिलांनी लावल्या आहेत. त्यात गोडांबा, लिटी, साखरांबा असे प्रकार आहेत. ती बाग वीणा सांभाळते. त्या बापलेकींच्या लक्षात आले आहे, की बदलत्या जमान्यात हापूसपेक्षा रायवळला मागणी जास्त आहे, रायवळ गावातच संपतो. सुपारीची स्थानिक जात तिच्या आजोबांपासून बागेत आहे. ती म्हणाली, की “रोठ्या’ला जागेवर मागणी आहे, आम्ही चढा दर घेतो.” त्यांच्या शेती बांधावर जामफळाचे चार प्रकार; तसेच, गावठी कोकम, फणस लगडलेले असतात. तिने पीक उत्पादनासाठी खत व्यवस्थापन व कीड/रोगनियंत्रण पद्धत यांचा अवलंब केला आहे. डोंगरउतारावर गावठी काजूच्या पाचशेपन्नास रोपांची लागवड केली आहे.

सुपारीची बागायतदेखील तीन एकरांवर आहे. त्या बागेतून दोन हजार किलो सुक्या सुपारीचे उत्पन्न घेतले जाते. स्थानिक जातींच्या लागवडीचा एक फायदा असा आहे, की त्या जाती तेथील वातावरणाशी जुळलेल्या असतात. त्यामुळे कीड/रोगांचा प्रादुर्भाव कमी आढळतो. त्या जातीच्या रोठ्याचा आकार मोठा असून चवीला तुरट-गोड आहे. त्यात सफेद गराचे प्रमाण जास्त आहे. ओली सुपारी अडीचशे ते तीनशे रुपये शेकडा, सुकी सुपारी दोनशेसाठ ते दोनशेसत्तर रुपये किलो, तर रोठा सहाशे रुपये प्रती किलो दराने विक्री केला जातो. ते लोक चांगले उत्पादन देणार्‍या मातृवृक्षांपासून रोपांची निर्मिती करून त्यांची लागवडदेखील दर वर्षी करतात.

फळबागेच्या पाणी व्यवस्थापनासाठी पूर्वापार चालत आलेली आणि कोकणात प्रचलित असलेली पाटाच्या पाण्याची व्यवस्था; तसेच, स्वतंत्र विहीरदेखील आहे. गावाच्या डोंगरावर वाहणार्‍या झर्‍यावर बंधारा घालून ते पाणी पाइपलाइनने बागेपर्यंत आणले आहे. सुपारी बागेसाठी तुषार सिंचनाची व्यवस्था केली आहे. पाणी डोंगरावरून उताराने वाहत येत असल्याने मोटर पंपाची आवश्यकता लागत नाही. त्या बंधार्‍याची स्वच्छता व दुरुस्ती दर वर्षी केली जाते. पावसाळ्यापूर्वी बागेला पालापाचोळ्याचे आच्छादन केल्यामुळे तण नियंत्रित राहण्यास मदत होते. जुलै-ऑगस्टमध्ये बागेत गिरिपुष्पाचे आच्छादन केले जाते. पावसाळ्यात पालापाचोळा व गिरिपुष्पाची पाने कुजल्यामुळे तण नष्ट होते. त्यामुळे जमिनीतील गांडुळांची संख्यादेखील वाढली आहे. त्यांचा माती भुसभुशीत होऊन सुपीकता टिकवून ठेवण्यासाठी उपयोग होतो.

बागेत आंतरपीक म्हणून केळी, काळी मिरी, लवंग, जायफळ, दालचिनी, अननस इत्यादी पिकांचे उत्पादन घेतात. केळीच्या जातींमध्ये वेलची आणि लाल केळी या जातींची लागवड आहे. तेथे 1970 पासून लाल केळीच्या जातीचे संवर्धन केले आहे. त्या केळीच्या खोडाचा रंगही लालसर असल्याने रोपे सहज ओळखता येतात. त्यांची उंची सहा मीटरपर्यंत वाढते. एका घडात साधारण पाच ते सहा डझन केळी असतात. लाल रंगाच्या सालीमुळे त्याची किंमत जास्त आहे.

अनेक प्रकारचे वृक्ष, औषधी वनस्पती, विविधरंगी फुलपाखरे, वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडे तेथील शेतीतील जैवविविधता समृद्ध करतात.

तिच्या बागेत रोज पन्नास पक्षी दिसतात. वीणाने विविध पक्षी-फुलपाखरे यांची नोंद केली आहे. त्यात धनेश, नवरंग, परीट, हळद्या, तांबट, भारद्वाज, घार, कोतवाल, बुलबुल, दयाळ, स्वर्गीय नर्तक, सनबर्ड यांसारखे असंख्य पक्षी; त्याचबरोबर ब्लू मॉरमॉन, रेड पियरो, कॉमन ग्रास यलो अशी पंधरा जातींची फुलपाखरे आणि तीस प्रकारच्या वाइल्ड मश्रूम प्रजाती यांचा समावेश आहे. त्या बाबतीतही तिचे संशोधन अभ्यास चालू आहे. खोतांनी शंभर वर्षे जुनी वृक्षसंपदाही जतन व संवर्धन केली आहे. तेथील वनवृक्ष आणि औषधी वनस्पती यांमध्ये सीताअशोक, सप्तपर्णी, काळा कुडा, हरडा, बेहडा, आवळा, रिठा, समुद्रफळ, सांद्रुक, नोनी, सुरंगी, नागचाफा, बकुळ, सर्पगंधा, अडुळसा, गुळवेल, चित्रक, पिंपळी अशा जवळजवळ पन्नासहून अधिक वनस्पतींचा समावेश आहे. जैवविविधता विपुल प्रमाणात असल्याने बागेतील मधमाश्यांची संख्यादेखील वाढली आहे.

वीणा त्याच परिसरात वाढली व शिकली असल्याने तिची निरीक्षणे अस्सल आहेत, मते स्पष्ट आहेत. समुद्रकिनारा, डोंगर- त्यातून लाभलेला समृद्ध जैवविविधतेचा वारसा हे कोकणचे वैभव आहे. कोकणातील गावोगावची वैशिष्ट्ये वेगवेगळी आहेत. घनदाट जंगल, वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी-प्राणी, आंबा-नारळ-सुपारीच्या बागा, हिरवीगार वनराई, नद्या या सगळ्यांमुळे कोकण समृद्ध आहे. तरी वीणा बजावते, की कोकणातील रस्त्यांची दुर्दशा, रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्याने तरुण पिढीचे शहरांकडे होणारे स्थलांतर, हवामान बदल, मजूर टंचाई, वन्य प्राण्यांचा शेतीला होणारा त्रास अशा अनेक समस्यांवर उपाययोजना कराव्या लागत आहेत. ती म्हणते, पारंपरिकतेकडून आधुनिकतेकडे वळत असताना, कृषी क्षेत्राला ’ग्लॅमर’ मिळवून देण्याची जबाबदारी आम्हा युवावर्गावर आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, सुयोग्य पीक व्यवस्थापन, जलसंधारणाच्या विविध पद्धती, शेतीपूरक व्यवसाय, शासकीय योजना या सगळ्यामुळे शेती नक्कीच फायदेशीर ठरू शकते.

वीणा गजानन खोत, 7798840712

अमित गद्रे 9881098201

(‘अॅग्रोवन’वरून उद्धृत, संस्कारित-संपादित)

——————————————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here