श्री द्वादशहस्त गणेश, सातारा, औरंगाबाद (Twelve Handed Unique Ganesh Idol, Satara, Aurangabad)

 

द्वादशहस्त (बारा हात) गणेशाच्या मूर्ती अत्यंत दुर्मीळ आहेत. तशीच एक मूर्ती औरंगाबादजवळच्या सातारा गावात दांडेकर वाडा येथे आहे. ती मूर्ती पहिले बाजीराव बाळाजी पेशवे यांनी तयार करून घेतली होती. त्यांनी गणेशास एक कोटी दुर्वा वाहण्याचा संकल्प केला होता. त्यांपैकी छत्तीस लक्ष दुर्वा वाहिल्यानंतर ती मूर्ती त्यांनी त्यांचे गुरू श्री नारायण महाराज दीक्षित (पाटणकर) यांना राहिलेल्या दुर्वा वाहण्याकरता दिली.          
दीक्षित यांनी तो संकल्प पूर्णत्वास नेला. तेव्हापासून ती मूर्ती साताऱ्यात आहे. दीक्षित कुटुंबीय कालपरत्वे साताऱ्याबाहेर पडले, पण त्यांनी ती मूर्ती दांडेकर परिवाराकडे सोपवली. ती मूर्ती सुमारे चारशे वर्षें जुनी आहे. ती दिलीप दांडेकर यांच्याकडे तीन पिढ्यांपासून आहे. श्रींची प्रतिष्ठापना दांडेकर वाड्यातील देव्हाऱ्यात केली आहे. देव्हारा खूप जुना आणि अस्सल शिसवी लाकडाचा आहे. त्यावरील कोरीव काम म्हणजे कलाकुसरीचा उत्तम नमुना आहे. मूर्ती अंदाजे अर्धा फूट उंचीची, पंचधातूतील आहे. बैठ्या मूर्तीच्या मस्तकावर चतुर्थीचा अर्धचंद्र आहे. मूर्तीला बारा हात असून, ती मूर्ती उजव्या सोंडेची आहे. ती बारा हात असलेली मराठवाड्यातील एकमेव गणेश मूर्ती आहे. मूर्तीच्या उजवीकडे काशीविश्वेश्वर व अन्नपूर्णा देवी यांची मूर्ती आहे. तेथे गणेशास अभिषेक दररोज केला जातो; तसेच, अथर्वशीर्षाचे अवर्तन होते. माघ महिन्यातील चतुर्थीस मोठा उत्सव होतो. त्यानिमित्त भंडारा असतो.
दांडेकर वाड्याच्या बाजूला खंडोबाचे प्राचीन व प्रसिद्ध असे मंदिर आहे. खंडोबाचा उत्सव वाड्यातच चंपाषष्ठीला होतो. त्या वेळेस खंडोबाची पालखी तेथे मुक्कामास येते. तो सोहळा वर्षातून एकदा असतो.    
लोकमान्य टिळक औरंगाबाद शहरात 1910 साली ताई महाराजांच्या खटल्यानिमित्ताने आले होते. त्यावेळी त्यांनी द्वादशहस्त गणेशाचे दर्शन घेतले होते. तेथे पारनेरकर महाराजही दर्शनाला येऊन गेले आहेत. औरंगाबाद ते सातारा हे अंतर कमी आहे. परंतु पुरेशा प्रमाणात एसटी बसेस किंवा शहर बस उपलब्ध नाहीत. तेथे जाण्यास खर्चिक अशा रिक्षा आहेत. त्याशिवाय पर्याय नाही.     
– चिन्मय शेवडीकर 9890119605
chinmayshewdikar@gmail.com
————————————————————————————————————————

About Post Author

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here