Home वैभव ‘तेर’चे त्रिविक्रम मंदिर (Trivikram Temple of Ter)

‘तेर’चे त्रिविक्रम मंदिर (Trivikram Temple of Ter)

तेर गावातील त्रिविक्रम मंदिराची वास्तू विटांनी बांधलेली आहे. ती गावाच्या मध्यभागी आहे. ती वास्तू म्हणजे बौद्धधर्मीयांचा चैत्य असावा असे एक मत आहे. विटांनी बांधलेल्या चैत्याच्या ज्या दोन वास्तू ज्ञात आहेत त्यांपैकी एक तेरची मानली जाते. आणि दुसरी आंध्रप्रदेशातील चेझार्ला येथे आहे. त्रिविक्रम मंदिराच्या विटांच्या बांधकामावर नंतरच्या काळात चुन्याचा थर दिलेला आहे. ती दोन्ही चैत्यगृहे समान मोजमापाची आहेत. त्यांच्या बांधणीत वापरलेल्या विटाही सारख्याच आकाराच्या आहेत. या वास्तूचा काळ स्थापत्यवैशिष्ट्यांनुसार, पर्सी ब्राऊन यांच्या मते इसवी सनाचे पाचवे शतक, कझीन्सच्या मते चौथ्या शतकापूर्वीचा, तर डॉ.म.श्री.माटे यांच्या मते सातवे शतक आहे. माटे म्हणतात, की त्रिविक्रमाचे हे मंदिर पल्लव शैलीतील आहे. त्यांना ते मूळ बौद्ध असावे हे पटत नाही. ते ती वास्तू म्हणजे हिंदू मंदिरच आहे असे ठासून सांगतात.
त्रिविक्रमाचे मंदिर पूर्वाभिमुख असून, गर्भगृह व मंडप ही त्याची दोन प्रमुख अंगे आहेत. त्यांतील गर्भगृह हे बौद्ध चैत्यासारखे आहे- सुमारे आठ मीटर लांब व चार मीटर रुंद. गर्भगृहाचा पृष्ठभाग अर्धवर्तुळाकृती असून, त्यावरील छप्पर हे गजपृष्ठाकृती म्हणजे हत्तीच्या पाठीच्या आकाराचे आहे. गजपृष्ठाकृती छपराची बांधणी ही विटांची बैठक प्रत्येक थरात आत सरकणारी करून, कमान निर्माण होईल अशी केलेली आहे. गर्भगृहाच्या समोर मंडप आहे, पण तो नंतर बांधला गेला असावा. दर्शनी भाग बौद्ध लेण्यासारखा म्हणजे चैत्यगवाक्षासारखा आहे. गवाक्ष करण्यासाठी उपयोगात आणल्या गेलेल्या लाकडी कमानीची प्रतिकृती कौशल्याने निर्माण केलेली आहे. दर्शनी भागाचे स्वरूप असे आहे, की ते पाहताच वेरुळच्या विश्वकर्मा लेण्याची आठवण येते.
कालभैरवाची मूर्ती गर्भगृहात आहे. त्या मूर्तीच्या मागे विटांची भिंत आहे. त्या भिंतीच्या एका बाजूला आत जाण्यासाठी दरवाजा आहे. त्या दरवाज्यातून आत गेल्यावर त्रिविक्रमाची मूर्ती दिसते. त्या भव्य मूर्तीच्या पुढे विष्णूची मूर्ती असून, दोन्ही मूर्ती काळ्या दगडाच्या आहेत. सिंहासनाच्या दर्शनी पट्टीवर कानडी भाषेतील लेख आहे. तो सुमारे इसवी सन 1000 या काळातील आहे. त्यात कलचुरी घराण्यातील महामंडळेश्वर जोगमरस यांचा उल्लेख आहे. त्रिविक्रमाच्या मूर्तीचा वरचा भाग शाबूत आहे. तिचे चेहरा, नाक, डोळे आणि ओठ हे अवयव प्रमाणबद्ध असून डोक्यावर मोत्यांच्या झुपक्यांनी खचलेला मुकुट आहे. कानात मोठे कर्णालंकार, गळ्यात तीन वेगवेगळ्या प्रकारचे हार, बाहूंवर बाजूबंद आणि मनगटांवर रुंद नक्षीदार कंकणे आहेत. त्रिविक्रमाचा उजवा पाय खाली सोडलेला आहे- डावा बैठकीच्या कडेने उंचावलेला आहे. उंचावलेल्या पायाखाली बली, बलीपत्नी इत्यादी मूर्ती आहेत. त्रिविक्रम हा विष्णूचा अवतार मानला जातो. बौद्ध चैत्यगृहाचे नंतरच्या काळात वैष्णवीकरण झाल्याचे ते एक उदाहरण सांगितले जाते.
त्रिविक्रम मंदिराच्या गर्भगृहासमोर मंडप आहे. तो चैत्यगृहाच्या नंतरच्या काळातील असावा. मंडप आणि चैत्यगृह यांच्या या दोन्ही भागांची वैशिष्ट्ये लक्षात घेतली तर ते दोन्ही भाग एकाच वेळी सलग बांधले गेलेले नाहीत हे समजून येते. कदाचित त्रिविक्रम मंदिर म्हणून हिंदूंनी वापर केल्याने ती वास्तू उद्ध्वस्त न होता बरीचशी सुस्थितीत राहिलेली असावी.
भारत गजेंद्रगडकर 9404676461
(‘बालाघाटची साद’ पुस्तकावरून उद्धृत, संपादित-संस्कारित)
——————————————————————————————————————————————————

 

 

 

——————————————————————————————–———–

About Post Author

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version