लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांनी त्यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात काही मूल्ये रुजवण्याचा प्रयत्न केला आणि तो त्यांचा वारसा महत्त्वाचा आहे. लोकमान्यांनी स्वतंत्र देशात जगण्याचा लोकांना अधिकार आहे, हे लोकांच्या मनावर बिंबवून देशाचे स्वातंत्र्य हे महत्त्वाचे मूल्य प्रस्थापित केले. सरकारवर टीका करण्याचा त्यांना अधिकार आहे, हे सांगून तो प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी स्वतः देहदंड स्वीकारला. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा त्यांचा आग्रह हा देशाच्या भावी घटनात्मक व्यवस्थेतील महत्त्वाचा भाग ठरला.
गांधीजींनी राजकीय स्वातंत्र्याबरोबरच आर्थिक स्वातंत्र्य आणि त्यासाठी स्वावलंबन यांचा पुरस्कार केला. त्यांनी आर्थिक स्वावलंबन हेच माणसाला जगण्याचा अधिकार उपभोगण्याची परिस्थिती निर्माण करते हे सांगितले. गांधीजींचा दुसरा मूल्यसंस्कार हा समतेचा आहे. गांधीजींचा आग्रह धर्म हा लोकांनी त्यांच्या राजकीय आणि सामाजिक व्यवहारातून बाजूला ठेवावा हा होता. गांधीजींची व्यक्तिजीवनात धर्मनिष्ठा खोलवर होती, पण ते राजकीय आणि सामाजिक जीवनात धर्मातीत (सेक्युलर) होते. मार्क्सवादी इतिहासकार बिपिन चंद्र यांनी, टिळक आणि गांधीजी या दोघांचा एक विशेष म्हणजे त्यांना वसाहतवादाचे स्वरूप लक्षात आले होते असा नोंदवला आहे. दादाभाई नवरोजी यांच्यापासून गांधीजी यांच्यापर्यंत अनेकांनी साम्राज्याच्या आधिपत्याखालील वसाहतीत होणाऱ्या आर्थिक-सांस्कृतिक शोषणाचे दुष्परिणाम सांगितले आहेत. ज्या राष्ट्रनेत्यांच्या दूरदृष्टीमुळे देशाच्या घटनात्मक मूल्यांची चौकट निर्माण झाली, त्यात टिळक आणि गांधी या दोघांचाही समावेश प्रामुख्याने केला पाहिजे.
भारताने राज्यघटनेत संसदीय लोकशाही स्वीकारली आहे. प्रारंभीच्या काळात, सत्ताधारी आणि विरोधी पक्षांतील काही नेत्यांनी, ज्या संकेतांच्या आधारे संसदीय लोकशाही काम करू शकते त्यांचा मोठा आदर केला. पुढील काळात, ती परिस्थिती राहिली नाही. लोकशाही राजकीय पक्षांतच शिल्लक राहिलेली नाही तर ती संसदीय व्यवस्थेत येणार कोठून? पक्षांचे जाहीरनामे हे केवळ उपचार म्हणून उरले आहेत. निवडणुका इतक्या खर्चिक झाल्या आहेत, की त्यासाठी कोणत्याही मार्गाने पैसा गोळा करणे आणि त्यासाठी भ्रष्टाचारात सहभागी होणे, निदान त्याकडे डोळेझाक करणे राजकीय पक्षांना भाग पडत आहे. लोकप्रतिनिधींचा या पक्षातून त्या पक्षात आणि त्या पक्षातून पुन्हा या पक्षात होणारा दोरीच्या उड्यांसारखा खेळ सामान्य माणसाच्या मनातील विधिमंडळांबद्दलचा आदर नष्ट करणारा आहे. शिवाय, असल्या कृतींचे जे समर्थन लोकप्रतिनिधींकडून केले जाते, ते तर न ऐकवणारे असते ! संसदीय लोकशाहीचा आधार सहिष्णुता आणि परस्परांबद्दलचा आदर ही मूल्ये असतात. सामान्य माणसांच्या मनात त्यांनी प्रत्यक्ष शारीरिक मारामाऱ्यांमध्ये भाग घेणारे किंवा त्या करवणारे लोकप्रतिनिधी कशाकरता निवडून दिले, असा प्रश्न उपस्थित होणे साहजिक आहे.
लोकमान्यांनी त्यांच्या आयुष्यात उत्तरकाळात धर्म आणि जात यांच्यात होणारी समाजाची विभागणी कशी सांधता येईल, याचा विचार केला. गांधीजींनी तर त्यांचे प्राणच त्यासाठी दिले. राजकारण्यांनी दोन धर्म आणि दोन जाती यांच्यामध्ये द्वेष निर्माण केला, की त्याचा राजकीय फायदा त्यांना होतो हा साधा धडा उत्तम गिरवला आहे. त्यांपैकी कोणालाही, येणाऱ्या पिढ्यांसाठी ते विषमय वातावरण निर्माण करत आहेत याची खंत वाटत नाही. ते महापुरुष त्यांच्या व्यक्तिगत स्वार्थाचा विचारसुद्धा मनात न आणता देशासाठी झिजले त्यांचा उपयोग फक्त राजकारणासाठी उरलेला दिसतो.
जनतेच्या स्वातंत्र्याचा संकोच प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रीतीने करता येतो, हे देशाने आणीबाणीच्या काळात पाहिले. त्यावेळी निदान त्या आक्रमणाच्या विरूद्ध, काहींनी काही का होईना आवाज उठवला. स्वातंत्र्याची किंमत सततची जागरूकता ही असते, हे लोक ऐकत आले. ती जागरूकता हळूहळू नष्ट होताना दिसत आहे. लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांनी शिकवलेली निर्भयता दुबळी होत चाललेली दिसत आहे.
– नरेंद्र चपळगावकर nanajudgenpc@gmail.com
(अनुभव, ऑक्टोबर 2019 वरून उद्धृत)
————————————————————————————————————————-