कामातून मुक्त झाल्यावर स्वतःबद्दल एक प्रतिमा मनात असते. त्या प्रतिमेच्या जवळ जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, तर स्वप्न आणि सत्य यांत समतोल साधला जातो. ठाण्याचा ‘कट्टा’ हे एक तसे प्रतीक आहे. लोक कट्ट्यावर गप्पा मारण्यास, वेळ घालवण्यास, चर्चा करण्यास, कधी कुचाळक्या करण्यासदेखील… अशा अनेक कारणांनी जमत असतात. त्यानुसार त्या कट्ट्याचा स्वभाव बनतो.
संपदा वागळे आणि त्यांच्या मैत्रिणी यांनी एकत्र येऊन ठाण्यात ‘आचार्य अत्रे कट्टा’ सुरू केला. त्यांनाही त्यांच्यातील अनभिज्ञ असलेल्या विचारांची, क्षमतेची ओळख त्या कट्ट्याने करून दिली. त्या कट्ट्याने त्यांना नवे विचार दिले, माणसे दिली, मैत्र दिले, अनुभव दिले आणि प्रसिद्धीही दिली. अशा त्या सुसंस्कृत कट्ट्याची ओळख लेखाद्वारे करून घेणार आहोत. ‘सद्भावनेचे व्यासपीठ’ या सदरातील सर्व लेख वाचण्यासाठी सोबतच्या लिंकवर क्लिक करावे.
– अपर्णा महाजन
——————————————————————————————
ठाणे कट्ट्याचे इवलेसे रोप…
गीतेच्या अठराव्या अध्यायात भगवंत सांगतात… ‘अधिष्ठानं तथा कर्ता करणंच पृथग्विधम् । विविधाश्च पृथक्चेष्टा दैवं चैवात्र पच्चमम् ।’ अर्थात, कोणतेही कार्य सिद्धीस जाण्यासाठी इच्छाशक्ती, कर्ता, निरनिराळी साधने, विविध क्रिया आणि दैव या पाच गोष्टी आवश्यक आहेत. हे पाच घटक अनुकूल ठरल्यामुळे आमचा ‘आचार्य अत्रे कट्टा’ ठाण्याच्या भूमीत रुजला, बहरला आणि फोफावला.
खरे तर, ‘स्वेच्छानिवृत्तीला पर्याय’ हे ठाण्यातील कट्ट्याच्या जन्माचे कारण ! बँकांमध्ये स्वेच्छानिवृत्तीची योजना 2001 मध्ये आली आणि अचानकपणे आयुष्यात आलेल्या मोकळ्या वेळाचा सदुपयोग म्हणून आम्ही मैत्रिणींनी ‘कट्ट्या‘चा प्रयोग करून बघण्याचे ठरवले. ‘कट्टा’ संकल्पना भारतात प्रथम आणणारे ‘पार्ले कट्ट्या’चे चंद्रसेन टिळेकर यांचे मार्गदर्शन त्यासाठी लाभले. नौपाड्यातील भास्कर कॉलनीतील ‘जिजाऊ उद्यान’ ही जागा ठरली. ती जागा निवडण्यापासून वेळोवेळी येणाऱ्या विविध अडचणींमधून मार्ग काढण्यासाठी आमच्या मागे समाजसेवक विलास ठुसे हे उभे राहिले. सर्वांना सोयीस्कर असा बुधवारचा दिवस ठरला, वेळ अर्थातच संध्याकाळची. कट्टा एप्रिल 2001 मध्ये सुरू झाला. कट्ट्यावरील साप्ताहिक कार्यक्रमाची आखणी पहिला अर्धा तास कट्टेकऱ्यांसाठी आणि नंतर एक तास एखाद्या मान्यवरासाठी अशी झाली.
आनंद दिघे यांच्या हस्ते कट्ट्याचा आरंभ 8 मे 2001 रोजी झाला. सुरुवातीला, चार-पाच कार्यकर्त्यांनी वर्गणी काढून सतरंज्या, दोन खुर्च्या, टेबल इत्यादी वस्तू आणल्या. पण पाहुण्यांना मानधन कोठून देणार… हा प्रश्न होता. परंतु केवळ तुळशीच्या रोपांवर आमच्याकडे अनेक नामवंत येऊन गेले. काही नावे सांगायची तर… डॉ. स्नेहलता देशमुख, डॉ. तात्याराव लहाने, नरेंद्र जाधव, डॉ. संजय ओक, रमेश देव-सीमा देव, विश्वास पाटील, शरद पोंक्षे, परदेशस्थ उद्योगपती विजय ढवळे, अनंत लाभसेटवार, डॉ. मीना प्रभू अशा मान्यवरांनी कट्टा समृद्ध केला आहे. तृतीयपंथी गौरी सावंत यांनीही त्यांच्या समाजाच्या व्यथा कट्टयावर मांडल्या आहेत. कट्ट्याला पहिला आवाज (माईक) चतुरस्र कलाकार मोहिनी निमकर यांनी दिला. त्या कार्यक्रम सादर करण्यासाठी म्हणून कट्टयावर आल्या आणि मोठेपणा बाजूला ठेवून ‘कट्ट्याच्या आई’ बनल्या.
समाजसेविका सिंधुताई सपकाळ आल्या, त्या दिवशी त्यांना बघण्यासाठी, भेटण्यासाठी प्रचंड गर्दी जमली होती. तोच त्यांचा निरोप आला, की त्या कोठेतरी अडकल्यामुळे त्यांना येण्यास दोन तास उशीर होणार आहे म्हणून ! तशी सूचना देऊनही कोणी हलेना. मग मीच ठेवणीतील किस्से, कविता, अनुभव ऐकवत वेळ तारून नेली. त्या अनुभवातून मला माझ्यातील वक्ता सापडला ! त्यानंतर मी चार-पाच विषयांची तयारी करून ठेवली. त्यातून स्वतंत्रपणे माझे व्याख्यानांचे अडीचशेच्या वर कार्यक्रमही झाले ! सिंधुताई दोन तासांनंतर आल्या, बोलल्या आणि जिंकल्या. त्या दिवशी त्यांची झोळी कट्टेकऱ्यांनी भरून टाकली.
तसेच, चटका लावून गेलेले अनेक प्रसंगही डोळ्यांसमोर आहेत. जवळच्या एका वस्तीतील ज्या गरिबांची घरे 26 जुलै 2005 च्या अतिवृष्टीमुळे धुऊन निघाली होती, त्यांना स्टेट बँकेच्या मदतीने किराणा, चादर आणि खाद्यपदार्थ यांचे वाटप करण्यात आले. त्या वेळी त्या बांधवांच्या कहाण्या ऐकताना सर्व उपस्थितांचे डोळे पाणावले.
भारतात हवाई छायाचित्रणाची मुहूर्तमेढ रोवणारे प्रसिद्ध छायाचित्रकार गोपाळ बोधे कट्ट्यावर आले होते, तो दिवसही अविस्मरणीय. हेलिकॉप्टर मार्गे आकाशात गरुडभरारी घेऊन टिपलेल्या महाराष्ट्रातील अनेक स्थळांची छायाचित्रे मोठ्या पडद्यावर बघताना सर्वांचा ‘आऽ’ वासलेलाच राहिला. भारताची किनारपट्टी, दीपगृहे, गड-किल्ले यांबरोबर तेव्हाची (1960) शांत-शांत मुंबई… सगळेच विलोभनीय ! गेट वे ऑफ इंडिया परिसरात ट्राम्स, घोडागाड्या; इतकेच नव्हे तर बैलगाड्यासुद्धा आरामात फिरत होत्या हे पाहून ‘आपण स्वप्नात तर नाही ना?’ असा प्रश्न पडला. तासभर चाललेल्या त्या मूक चलतचित्रांना साथ होती, ती फक्त सतारीच्या सुरांची आणि प्रेक्षकांच्या आश्चर्योद्गारांची !
अशा हटके कार्यक्रमांबरोबर, कट्टयावर महिलादिन, ज्येष्ठ नागरिकदिन, कोजागिरी, मराठी भाषादिन असे काही दिवस आम्ही वेगळेपणाने साजरे करतो. उदाहरणार्थ एका महिलादिनाला आम्ही ‘कष्टकरी महिलांचे एक दिवसाचे माहेरपण’ असा आगळावेगळा उपक्रम केला. त्यात धुणीभांडी, स्वयंपाक करणाऱ्या चाळीस बायका सहभागी झाल्या. त्या अभिनव कार्यक्रमाला वृत्तपत्रे आणि वाहिन्या यांनी भरपूर प्रसिद्धी दिली. तसेच, प्रत्येक वर्षी गिर्यारोहण, पोलिसदल, ट्रेनचालक, कचरावेचक अशा विविध क्षेत्रांतील महिलांना कट्टयावर सन्मानाने आमंत्रित करून बोलते करण्यात आले. ज्येष्ठ नागरिक दिनालाही हास्यकविता, विस्मृतीत गेलेल्या कविता, विडंबनगीते अशा विविध स्पर्धांना उदंड प्रतिसाद मिळतो.
चार डझनांहून अधिक पुस्तकांचे प्रकाशन कट्टयावर करण्यात आले आहे. शिरीष पै यांच्या ‘हायकू’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन हे त्यांपैकी एक ! ठाण्यातील यच्चयावत दिग्गजांनी त्यांच्या विचारांनी कट्टा समृद्ध केला आहे. मुख्यमंत्री (तेव्हाचे ठाण्याचे पालकमंत्री) एकनाथ शिंदे व खासदार राजन विचारे यांनी कट्ट्याचे स्वरूप पालटले. गोलाकार दगडी कट्टे आणि अर्धवर्तुळाकार व्यासपीठ, डोक्यावर छत, हॅलोजनचे दिवे- पंखे यांमुळे कट्टा दिमाखदार झाला. पितांबरी उद्योगसमूह, स्टेट बँक आणि आशिदा इलेक्ट्रॉनिक्सच्या आशा कुलकर्णी यांची सोबत कट्टा रांगत असल्यापासून लाभली आहे.
कट्ट्याशी अलिकडे जोडले गेलेले मोठे नाव म्हणजे सारस्वत इन्फोटेक कंपनीचे सीईओ देवदत्त चंदगडकर. त्यांच्या प्रेरणेने व आर्थिक सहाय्याने कट्टयावर दर वर्षी चार सामाजिक संस्थांचा गौरव करून त्यांना मदत देण्याचा उपक्रम 2018 पासून सुरू झाला आहे. देवदत्त यांचा अमेरिका-स्थित पुत्र ओंकार हादेखील या उपक्रमात सहभागी आहे. दर वर्षी एक लाख रुपये देणारे आणखी चार प्रायोजक मिळाले. अत्रे कट्ट्याच्या ‘कृतज्ञता पुरस्कारा’ला मे 2022 पासून प्रारंभ झाला. दर दोन महिन्यांनी संपन्न होणाऱ्या या पुरस्काराचे स्वरूप म्हणजे, एक लाख रुपयांचा धनादेश आणि सन्मानचिन्ह. दर दोन महिन्यांनी दोन सेवाभावी संस्थांना गौरवण्यात येते.
कट्ट्याने आम्हा कार्यकर्त्यांना काय दिले? कट्ट्याने आम्हाला नवी ओळख दिली. आमचे म्हातारपण लांब ठेवले. कधीही विभक्त न होणारे, सुखदुःखात साथ देणारे असे आमचे एक कुटुंब तयार झाले. त्याबरोबर काही कट्टेकऱ्यांना कट्ट्याने जगण्यासाठी प्रेरणा दिली. मुलीच्या अकाली निधनाने खचलेल्या पद्मा खांबेटे कट्ट्यामुळे पुन्हा उभ्या राहिल्या आणि त्यांच्याजवळ असलेला घरगुती औषधांचा खजिना सर्वांसाठी खुला झाला. कट्ट्याच्या कार्यकर्त्यांतून लेखक, वक्ते घडले.
कोरोना-काळात आम्ही आमचे काही खंदे कार्यकर्ते गमावले. तो सल मनात कायम राहील. आम्हीही सत्तरीच्या उंबरठ्याजवळ पोचलो आहोत. तरीही उरलेल्यांना सोबत घेऊन खिंड लढवत आहोत. मात्र कोरोनाच्या संकटातही कट्टा बंद पडला नाही. ऑनलाइन तंत्रज्ञानाने हा संस्कृती-दीप उजळत राहिला !
कट्ट्याने साडेबाराशे कार्यक्रमांचा टप्पा ओलांडला आहे. जिजाऊ उद्यानाची ‘गर्दुल्यांची बाग’ ही ओळख केव्हाच पुसली गेली आहे. ती भूमी ‘सांस्कृतिक पंढरी’ म्हणून मान्यता पावली आहे !
– संपदा वागळे 9930687512 waglesampada@gmail.com
—————————————————————————————————————
छान लेख.विधायक ऊपक्रम, कार्यक्रम याद्वारे ठाणेकरांना सांस्कृतिक संपन्न करणार्या कट्ट्याची माहिती दूरवरच्या वाचकांपर्यत पोचवलीत संपदा ताई .
खरेच अभिनंदनीय उपक्रम ठाणे, पुणे, मुंबई शहरे जवळ असल्याने वक्त्यांची मांदियाळी आहे. तुमच्या कट्ट्यांमुळे अनेकांना ऐकण्याची संधी मिळते. हा उपक्रम अनेक वर्षे असाच सुरू राहावे ही शुभकामना
खूप सुंदर आणि आगळीवेगळी कल्पना!! खरंतर कट्ट्याचं स्वरूप नुसतं चार जणांनी जमून गप्पा मारणे एवढेच आपल्यासमोर आहे. परंतु या कट्ट्याचं असं वेगळ्या रूपात दर्शन हे तुमच्यामुळेच घडलं, तुमच्या या उपक्रमाला मनापासून खूप खूप शुभेच्छा!!
आचार्य अत्रे सांस्कृतिक कट्टा हा लेख आणि माहिती आवडली. अशाच उपक्रमातून सांस्कृतिक श्रीमंती समाजात येईल. संपदा वागळे यांना खूप खूप शुभेच्छा!
खुप छान लेख वाचावयास मिळाला. सेवानिवृत्ती नंतरचे आयुष्य कसे आनंदात आणि विधायक कामात घालवता येते याचा बोध मिळाला. चांगल्या कामाची सुरुवात करणारा कुणीतरी हवा असतो. सहकार्य करणारे अनेक हात नंतर पुढे येतात. असेच समृद्ध कट्टे जागोजागी होवोत.
खूप छान !
केवढे छान कार्यक्रम / उपक्रम राबवलेत तुम्ही.
ह्या कट्ट्यामुळे अनेकांना एकटेपणातुन बाहेर यायलाही मदत होते.