नवचित्रकला (Modern Art)

सर्वसामान्यपणे नवचित्रकला ही अगम्य आहे, ती आपल्याकरता नाही अशी समजूत असते. ती समजत नाही असे गृहीत धरून तिच्याकडे दुर्लक्ष करणे किंवा तिची थोडी हेटाळणी करणे अशी दोन टोके दिसतात.  नवचित्रकला दुर्बोध आहे ही तक्रार काही अंशी खरीही असते पण थोडा अभ्यास केला तर ती अगदी दूरस्थ नाही. चित्र-साक्षरता ही अंतिमत: आपल्या जाणिवेच्या कक्षा रुंदावते, आणि त्यासाठी थोडे कष्ट घ्यायला सुजाण रसिकांची तयारी असते.

मुक्त पत्रकार आणि चित्रकलेचे अभ्यासक शशिकांत सावंत आपल्या आजच्या लेखात नवचित्रकलेच्या जागतिक प्रवाहाचा परिचय करून देत आहेत. त्यांच्या पुढच्या लेखात ते भारतातल्या नवचित्रकलेचा परिचय करून देतील.

‘मोगरा फुलला’ या दालनातील इतर लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

-सुनंदा भोसेकर

नवचित्रकलेबद्दल सामान्य माणसाची पहिली तक्रार असते की ही चित्रं कळत नाहीत. मग तो विचारतो की, या चित्रांचा अर्थ काय? त्याला वाटते की ही चित्रं कोणीही रेखाटेल, अगदी लहान मुल देखील. या तिन्ही मुद्द्यांपैकी तिसरा मुद्दा आधी घेऊ. पॉल क्ली हा जगप्रसिध्द चित्रकार होताच पण तो बाऊहाऊस (Bauhouse – German Art School) मध्ये शिक्षकही होता. त्याच्या चित्रांचे दहा खंड तर प्रसिध्द झाले आहेतच पण त्याहून महत्वाचे म्हणजे त्याने वर्गात शिकवलेल्या नोंदी याचे दोन मोठे खंड प्रसिध्द आहेत. त्याने आपली चित्रं ही प्रामुख्याने स्वतःच्या मुलाची चित्रं पाहून त्या दिशेने सुरु केली. नंतर त्याने सरळ रेषा, आडवी रेषा, सरळ आणि आडवी रेषा, तिरक्या रेषा आणि गुंताळा असं करत करत रेषांचे कितीतरी प्रकार कागदावर मांडले. मग रेषांच्या आणि रंगांच्या निखळ आकारातून आधुनिक चित्रकला होऊ शकते हे त्याने दाखवलं. त्यामुळे तिसऱ्या मुद्द्याचं उत्तर हे आहे.

आता आपण पहिल्या दोन मुद्द्यांचा विचार करू. कळत नाही म्हणजे काय? मुळात कळणं ही काय गोष्ट असते? उदा. तुम्ही शास्त्रीय संगीताचं शिक्षण घेतलं असेल तर तुम्हाला एखादा गायक गायला लागला की राग कळतो किंवा तुम्ही इंग्रजी किंवा मातृभाषे व्यतिरिक्त इतर  कोणत्या भाषेचे शिक्षण घेतले असेल तर तुम्हाला ती भाषा कळायला लागते. चित्रकलेची अशी भाषा नाही की ती कळू शकेल कारण तसे असते तर त्या भाषेची बाराखडी असती.  समजा, तुम्ही दुकानात गेलात. दुकानदार म्हणाला की, ‘एक किलो तांदूळ, ५० रुपये.’ तुम्ही म्हणता, ‘जरा पुन्हा बोला. कळलं नाही तुम्ही काय बोललात ते’. तर असे भाषा कळणे असते. गणितामध्ये कळणे आणि न कळणे असते. पण चित्रकलेत भाषाच नसेल तर ती कशी कळणार?

सामान्य माणसांचा एक गैरसमज असा आहे की चित्रकलेची भाषा वैश्विक आहे. तिला शब्दांची गरज नाही. मग आम्हाला चित्र पाहिल्या क्षणीच कळले पाहिजे. हा आग्रह बरोबर आहे. पण त्यासाठी वर्षभरातून किती वेळा गॅलरीत जाता? किती चित्रकारांशी मैत्री करता? किती चित्रकारांना तुम्ही भेटला आहात किंवा बोलला आहात? एखादा चित्रकार म्हणतो की, मी कॅनव्हासवर काम सुरु करतो तेव्हा माझ्या डोक्यात काहीही नसते. तेच दुसरा चित्रकार म्हणतो की कॅनव्हासवर चित्र काढताना माझ्या डोक्यात पूर्ण चित्र मला माहीत असते.  मग मी त्याची छोटी छोटी रेखाटनं करतो. ज्याला स्टडीज म्हणतात. असं दोन्ही प्रकारे अनेक चित्रकार काम करतात. याचाच अर्थ प्रत्येक चित्रकाराची विशिष्ट भाषा, विशिष्ट शैली असते.  समजा तुम्हाला गणितातला गुणाकार, भागाकार येत नाही तर तो शिकता येतो कारण त्याची वेगळी भाषा आहे. इंटिग्रेशन आणि अलोगोरिथम सारख्या संज्ञा तुम्हाला पहिली- दुसरीत कळत नाहीत. तुम्ही नववी- दहावीत जाता मग तुम्हाला शिक्षक शिकवतात. समजले नाही तर तुम्ही शिक्षकांना परत विचारू शकता. कारण त्याची विशिष्ट भाषा आहे. अशी चित्रकलेची भाषा नाही. पण आता चित्रकला समजून घेणे काय असते ते कळण्यासाठी आपण कवितेचे उदाहरण घेऊ.

काही कविता चित्रांच्या भाषेत आहेत. उदा. चित्र पाहा: समुद्र आणि वाळू हे दोन जपानीतले शब्द घेऊन एका चित्रकाराने चित्र काढलं. त्याला तो कविता म्हणतो. इथे आपण गोंधळात पडतो पण थोडासा अर्थबोध होतो. कवितेत आपण अर्थ शोधायला जातो. त्यावर प्रसिद्ध कवी मॅकलेस्टरने म्हटलंय की ‘पोएम शुड नॉट से समथिंग बट बी’ कवितेने काही सांगायला जाऊ नये. कविता आणि चित्रकलेचा मोठा संबंध दिसतो. याचे कारण अनेक कवी चित्र काढत आणि अनेक चित्रकार कवी होते. प्रभाकर बरवे, प्रभाकर कोलते किंवा संभाजी कदम चित्रकार आहेत आणि ते कविता करतात. चित्रकार आणि कवितेचे बरेच कोलॅब्रेशन्स आहेत. पाब्लो पिकासो आणि मातीस  (Henri Matisse) यांनी अनेक कवितासंग्रहासाठी चित्रे काढली. आपण परत अर्थाकडे येऊ. तर चित्रांना वस्तूनिष्ठ असा काही अर्थ नसतो हे आधी लक्षात घेतले पाहिजे. मग चित्र समजून घ्यायचा मार्ग काय? तर समजून हा शब्द देखील चुकीचा आहे पण तो वापरु. तर चित्र समजून घेण्यासाठी तुम्ही नियमित गॅलरीत गेलं पाहिजे. जागतिक दर्जाच्या ८-१० चित्रकारांची चित्रं ज्याला ‘बॉडी ऑफ वर्क’ म्हणतात. नुसतं १-२ चित्र नव्हे तर त्याच्या कारकीर्दीत केलेली ३०-४० चित्रं पाहायला हवीत. पिकासो बघा, १९०१ ते १९०४ या काळात त्याने दुःखी माणसांची चित्रं केली आणि निळ्या काळ्या रंगात केली. त्याला ‘ब्ल्यु पिरियड’ म्हणतात. ‘रोझ पिरियड’, या काळात त्याला माद्रिद आणि बार्सिलोना ही गावे; जिथे तो मोठा झाला, वावरला त्या गावांची आठवण यायची. तिथले छोटे छोटे सर्कस करणारे, कसरत करणारे, जिप्सी यांची चित्रे त्याने या काळात केली. १९०७ साली त्याने क्युबिझमला हात घातला. ज्यात त्याने ‘दम्वाझेल अवांग्नॉन’ (अवांग्नॉनच्या बाया) हे चित्र केले. त्याने आणि ब्राक ( Georges Braque) दोघांनी मिळून खूप काम केले. अनेकदा त्यांच्या चित्रात एवढे साम्य आढळते की ती वेगवेगळी ओळखता यायची नाही.

मातीसचं जगणे, पॉल क्लीचे जगणे याविषयांवरची पुस्तके घ्यायला पैसे नसतील तर पुस्तकांच्या दुकानात जाऊन तुम्ही ती चाळू शकता. असे पुस्तक १५-२० मिनिटात चाळून होतं. त्यात तुम्ही १०० कलाकृती बघू शकता. यासाठी मार्ग खूप आहेत फक्त इच्छा असली पाहिजे. वासिली कँडीस्की आणि मेलविचने नवचित्रकलेची सुरुवातीची चित्र केली. पिकासो, मातीस, पॉल क्ली, मेलविच आणि वासिली कँडिस्की हे पाच चित्रकार अभ्यासा. यांची ५० चित्रं पाहा किंवा कमीत कमी १० चित्र पाहा. पिकासोचे ग्वेर्निका (Guernica) हे चित्र सगळ्यांना माहीत असते पण त्याचा अर्थ आपण विचारतो. स्पॅनिश यादवी युद्धात फ्रँकोने केलेले अत्याचार ही ग्वेर्निकाची पार्श्वभूमी अशी आहे त्यामुळे याच्यात आपल्याला बैल दिसतो. आता बैल का? तर बैल हा अत्याचाराचे प्रतीक आहे.

चित्रकलेची भाषा वैश्विक का नसते तर त्याचा मुद्दा असा की, आपल्याकडे गाय, बैल यांची पूजा होते पण स्पेनमध्ये मुंडकं उडवलं जातं. बैल हा तिथे पौरुषाचं प्रतिक आहे. निळा रंग आपल्याकडे पवित्र, भव्यता असा मानला जातो. अमेरिकेत तो दुःखी मानला जातो. ब्ल्यूज या नावाने जे गाणी प्रसिद्ध आहेत ती दुःखद आहेत. थोडक्यात रंग, आकार यांना वेगवेगळ्या संस्कृतीत वेगवेगळे अर्थ, विशेषणे आहेत. जे स्वस्तिक आपल्या संस्कृतीत पवित्र मानलं जातं तेच फेसबुकवर टाकलं तर फेसबुक तुम्हाला ब्लॉक करू शकते कारण स्वस्तिक हे नाझी विचारांचे प्रतीक होते.

मॉडर्न आर्टचा पाया कसा घातला गेला आणि तिथपासून आजपर्यंत आणि त्याची प्रगती कशी झाली हा एवढा मोठा इतिहास हजार पानात अर्नासनसारख्या[1] लेखकाने लिहिला आहे. साहजिकच तो २००० शब्दांच्या लेखात मांडणे कठीण आहे. म्हणून आपण त्यातल्या टप्प्यांचा विचार करु. पहिला टप्पा हा होता की १८४०मध्ये छायाचित्रणाला सुरुवात झाल्यानंतर हुबेहूब चित्र काढण्याची जी कला होती ती बाद झाली. तिचे महत्त्व संपले. तोपर्यंत चित्रकला म्हणजे काय? स्टुडिओत कोणाचे तरी बसून पोर्ट्रेट करणे किंवा बाहेर जाऊन  लॅन्डस्केप करणे. बाहेर जाऊन काम करायचं तर खूप तयारी करावी लागायची. नंतर ट्यूब झाल्या, पेस्टल झाल्या, त्याच्यातून चित्रकलेचा तंत्र बदलले. यामुळे अनेक चित्रकारांना मोकळीक मिळाली.  कुठेही जाऊन कधीही कागद घेऊन चित्र करा इझेल लावा, लाइटिंग करा, मॉडेलला बसवा हे सगळे बाद झाले.

५० च्या आसपास फ्रान्समध्ये बॉदेलियर, मलार्म, रॅम्बो यांनी नवी कविता लिहायला सुरू केली. जी पारंपारिक कवितेला छेद देणारी होती. एकसंध वाक्य, त्यातून अर्थ, ‘प्रिय तू कुठे आहेस? मला तुझा विरह सहन होत नाही’ या प्रकारच्या व्याकुळ कविता शेक्सपिअरच्या सॉनेटपासून वगैरे पूर्वी खूप लिहिल्या जायच्या. नव्या कवींनी ही परंपरा मोडून काढली. ही सगळी मंडळी चित्रकारांची मॉने, मने, सेरॉ यांचे मित्र होते. साहजिकच या विचारसरणीचा परिणाम चित्रकलेवर झाला. मनेसारख्या चित्रकाराने ‘इम्प्रेशन’ नावाचे चित्र आणि काही इतर चित्रं काढली.  ती चित्रं तेव्हाच्या गॅलरीने  नाकारली. मग या लोकांनी एकत्र प्रदर्शन केले. त्यावर समीक्षक म्हणाले, ही काय चित्र हे तर केवळ इम्प्रेशन्स आहेत. त्यामुळे या सगळ्या गटाला इम्प्रेशनिस्ट म्हटले जाऊ लागले. त्यात मॉने, पिसारो, मने,  देगा होता. त्यानंतर सेझान अवतरला. सेझानने काय केलं की नाइफ आणि ब्रशचे स्ट्रोक तसेच ठेवले. जवळ जाऊन ब्रशचे स्ट्रोक दिसत आणि दुरून चित्र दिसत. याच्यात लाईफच्या चौकटी चौकटीच्या आकारातून चित्र तयार होत असे.  त्याच्यातून पुढे पिकासोने प्रेरणा घेऊन क्युबिझमची निर्मिती केली. पण सेझानला आणखी सहकारी होते. उदा., व्हॅन गॉग, हा झपाटलेला माणूस होता. दिसेल त्या माणसाचं, दिसेल त्या दृष्याचं चित्रण करायचा. त्याचं आयुष्य खूप हलाखीचं होतं. मात्र त्याने कान कापून दिला वगैरे दंतकथा खोट्या आहेत. त्याबद्दल नंतर कधीतरी तपशिलाने लिहिता येईल.

आताचा मुद्दा हा आहे की सेझान आणि व्हॅन गॉगने एकोणिसाव्या शतकाच्या  ८० आणि ९०च्या दशकात पोस्ट इम्प्रेशनिझम नावाचा जुन्या चित्रांचा ढाचा बदलला. त्याचा फायदा पिकासोला, मातीसला मिळाला. मात्र १९०० ते १९१० या काळात पिकासो व मातीस, सेझान अशा सर्वांनी मिळून चित्रकलेचा खरा पाया उभा केला. ज्याचं परिवर्तन क्युबिझममध्ये झालं. ही कला पिकासो, मेलविच, पॉल क्ली आणि कॅन्डीस्कीने निर्माण केली. पुढे १९२१ साली जर्मनीत तो ब्ल्यु राईडर ग्रुप होता. मानवी आकृत्या काढणं चालू होतं की ज्याच्यातून समजणारी चित्रकला होती. अचानकमध्ये बाऊहाऊसमध्ये वॉल्टर ग्रोपियससारखा अभिजात आर्किटेक्ट, पॉल क्ली, कॅन्डीस्कीसारखा चित्रकार आणि अनेक लेखक, कवी, चित्रकार गोळा झाले. त्यात शिल्पकार होते, वस्तू बनवणारे लोक होते. बाऊहाऊस स्कूलचं ध्येय हे डिझाइनिंग शिकवायचं आणि डिझाइन करता करता माणूस एनलाईटन होतो किंवा एक्झायटेड होतो आणि मग तो चित्रकार होतो. त्यामुळेच साधी चहाची भांडी असतील किंवा बुद्धीबळाचा पट असेल, कपड्यावरचे प्रिंट असेल, नाटकातलं नेपथ्य किंवा कॉस्ट्यूम असेल तर सगळ्या गाणी, नाटक सिनेमा सगळं कोळून प्यायलेले लोक होते. सगळ्यांचा प्रभाव रिचवून एकूण  १९२१ ते १९३३ या काळात बाऊहाऊस स्कूल (Bauhouse -German Art school) अस्तित्वात आले. ज्याच्यात नाटककाम, सिरॅमिक्स, चित्रकला-शिल्पकला हे नुसते शिकवले जात नव्हते तर त्याच्या रोजच्या नोंदी लिहिल्या जात होत्या. पॉल क्ली आपलं चित्र आणायचा आणि म्हणायचा की हे बघा याचे इंटरप्रेटेशन कसे कराल किंवा विद्यार्थ्यांना तो काहीतरी करायला सांगायचा. मग त्याच्यावर बोलायचा. याप्रकारे अत्यंत बुद्धिमान मंडळींची ही चित्रशाळा १४ वर्षे चालली. नंतर हिटलर आला आणि बाऊहाऊस बंद झाले पण त्याचा फायदा असा झाला की मोहिली नेगीसारखा फोटोग्राफर असेल, की वॉल्टर ग्रोपियससारखा आर्किटेक्ट असेल; ते इंग्लंड, अमेरिकेत   गेले. पॉल क्ली स्विझरलँडमध्ये गेला. ग्रोपियस स्वतः अमेरिकेत जाऊन शिकवू लागला. त्यामुळे बाऊहाऊसने केलेली क्रांतीने जगभरच्या चित्रकलेत फरक पडला. सगळी मंडळी रंग आणि आकाराचा मुक्त खेळ म्हणजे चित्रकला असे मानू लागली. त्यातले काही यशस्वी ठरले आणि काही अपयशी. अमेरिकेत समृद्धी होते चित्रकला नव्हती. एडवर्ड हॉपरसारखा चित्रकार पॅरिसमध्ये आला आणि प्रभावित झाला. मेरी कसाट ही अमेरिकन चित्रकार इम्प्रेशनिस्ट मानली जाते. इतरही अनेक चित्रकार होते. जे हुबेहूब चित्र काढत. एडवर्ड हॉपरने तशीच चित्रं काढली पण छाया प्रकाशाचा विलक्षण खेळ त्याने वापरला इतका की गॉड फादरपासून ते इतर अनेक सिनेमॅटोग्राफरवर त्याचा प्रभाव पडला.

द रिडरसारख्या चित्रातली फ्रेम ही हुबेहूब एडवर्ड हॉपरच्या चित्रात जशी आहे तशी आहे. तरी अमेरिकन चित्रकला पुढे सरकत नव्हती. अमेरिकन चित्रकारांना दर आठवड्याला सात आठ डॉलर दिले जातील म्हणजे महिन्याला ३२ असे जाहीर झाले. आणि मग चित्रकारांच्या रांगा लागल्या. त्यातून जॅक्सन पोलॉक, अर्शिल गॉर्की जो रोमनियातून आला होता; ख्रिस्तो तसंच डी कुनिंग या सगळ्या चित्रकारांना पैसे मिळू लागले. अग्नेस मार्टिन ही चित्रकार नवीन प्रयोग करू लागली. या सगळ्या चित्रकारांच्या चित्रांनी गॅलरी भरून जाऊ लागल्या. हळुहळू यांच्या किंमती वाढू लागल्या. मग एक दिवस जॅक्सन पोलॉकसारख्या चित्रकारावर चक्क लाईफने चार पानाची स्टोरी केली. त्याला ‘जॅक द ड्रीपर’ म्हणायला लागले कारण ‘जॅक द रीपर’ नावाचा एक खूनी होता. तो खून करायचा आणि अवयव काढून घ्यायचा. हा चित्र काढत होता. ही सगळी  मंडळी झपाटलेली होती. ड्रग्स घ्यायची, नवीन संगीत ऐकायची. बॉब डीलन हा संगीतकार एका खेड्यातून न्यूयॉर्कमध्ये आला. होता.  अनेक कवी नव्या कविता लिहीत होते. विसाव्या शतकाचे ५०चे हे दशक यात बेटनिक चळवळ सुरू झाली. ज्याच्यात ॲलेन गिझबर्ग, कुर्सो इत्यादींनी खऱ्या अर्थाने मुक्त कविता सुरू केली. ही मंडळी ४०-५०मध्ये हळुहळू प्रस्थापित व्हायला लागली. यांच्या चित्रांना हजारो डॉलर्स मिळायला लागले. मग ६०च्या दशकात चित्रकार, लेखक, हेरॉल्ड रोझनबर्ग समीक्षक, बॉब डीलन किंवा ॲबा किंवा अनेक कलाकार ह्यांची वैचारिक घुसळण सुरू झाली. बीटलच्या सगळ्या गाण्यांवर काही चित्रकारांनी चित्र काढली. त्याचा अल्बम प्रसिद्ध झाला. शिवाय बिटल्सवाले फिल्म बनवत होते. नंतर अवतरला अँडी वॉरहोल ज्याने चित्र काढणं सोडा पण मर्लिन मर्नोपासून ते माओपर्यंत सगळ्यांची रंगीत छायाचित्रे सिल्क कापडावर  झेरॉक्स पद्धतीने केली. आणि हीच माझी कला असं तो म्हणू लागला. यात कला कुठे आहे हा प्रश्न जेव्हा आधुनिक चित्रकलेबद्दल होता तो पुन्हा लेखक विचारू लागले. कारण त्या काळात झेरॉक्स मशीन नव्हता पण फोटोज स्टॅगची सोय होती. कुणीही त्या पद्धतीने माओ किंवा मर्लिन मर्नो काढू शकतो. मग अँडी वॉरहोलचं वैशिष्ट्य काय? अँडी वॉरहॉलचं वैशिष्ट्य हे होतं की त्याने हे शोधून काढलं. ५२ पद्धतीची सॉस रेडीमेड कॅम्बेलमधून मिळायची. त्या कॅम्बेल सॉसची जाहिरात त्याने चित्र म्हणून काढली. मुळात जाहिरातदारांना कोणी चित्रकार मानत नव्हतं. अशा परिस्थितीत जाहिरातीच्या प्रतिमा पेंटिंग म्हणून घ्यायचे मोठे धाडस होतं. पण हे अँडी वॉरहोलने केलं. ७०पर्यंत त्यानंतर एकच धमासान सुरू झाली. ज्याच्यात सगळेच अवतरले.

लिचेस्टाइनसारखा माणूस, त्याने जाहिरात क्षेत्रात काम केलं होतं. तो जाहिरातीप्रमाणे हुबेहूब चित्र मोठ्या पडद्यावर रंगवू लागला. कोणीतरी शिल्पकार छोटे छोटे आकार मग तो बर्गर असेल किंवा बायका कपडे अडकवतात ते क्लिप असेल.ती मोठी करून लावू लागला. सेरॉसारखा शिल्पकार असं म्हणायचा की, शिल्प वगैरे खड्ड्यात गेली, हा पत्रा जो मी आडवा लावला आहे तोच माझं शिल्प आहे.

मॉडर्न आर्ट ६० आणि ७०च्या दशकात एका नव्या फेजमध्ये अवतरली. सिंडी शेर्मन वेगवेगळया चित्रपटातील बायकांच्या भूमिकेची वेशभूषा करून स्वतःचे फोटो काढू लागले. ही माझी आर्ट म्हणू लागले. त्यालाही हजारो डॉलर्स मिळू लागले. जास्पर जोन्सने बियरचे दोन कॅन्सची शिल्प केली. एके ठिकाणी फक्त चष्म्याच्या मागे डोळे काढले. मोमासारखी गॅलरी त्याचा संग्रह करू लागली. तर ६० आणि ७० च्या दशकात जास्पर जोन्स, लिचेस्टाइन, रॉबर्ट रॉशनबर्ग त्याची कोलाज या सगळ्यातून नवचित्रकलेचा उच्चांक गाठला गेला आणि त्यानंतर सुरू झाली उत्तराधुनिक कला. त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू.

तर नवचित्रकला समजून घेण्यासाठी थोडा तिच्या इतिहासाचा अभ्यास करणे आवश्यक आहे. गॅलरीत जाणे, अनेक प्रदर्शनं बघणे, शक्य झाल्यास चित्रकाराशी संवाद साधणे, वेगवेगळ्या शैलीतील वेगवेगळ्या चित्रकारांची चित्रे पाहणे गुगलमुळे खूपच सोप्पं झालं आहे. याची सुरुवात सोप्या चित्रापासून म्हणजे डेव्हिड हॉकनी, मातीस किंवा पिकासो त्या  नंतर जेम्स स्टरेलचं इन्स्टॉलेशन किंवा व्हिडिओ आर्ट आणि ज्याला अर्थ आर्ट म्हणतात म्हणजे जे जमिनीवर मोठ्या आकारात एखादं विवर उभारणं असं करत आधुनिक चित्रकलेच्या विविध प्रवाहांचा आपल्याला मागोवा घेता येईल. यासाठी अर्थात कुतूहल आणि मेहनत हवी. ते असल्यास नवचित्रकलेची वाट जितकी वाटते तितकी कठीण नाही.

-शशिकांत सावंत
9821785618

Shashibooks@gmail.com

1 History of Modern Art – Arnason H. H.

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here