बालशिक्षणाच्या प्रणेत्या : ताराबाई मोडक ! (Tarabai Modak : Pioneer of Child Education)

0
510

ताराबाई मोडक पद्मभूषण; त्यांच्या शिष्य अनुताई वाघ पद्मश्री- एकाच कार्यात गुंतलेल्या गुरुशिष्य जोडीला पद्म सन्मान मिळाल्याचे उदाहरण विरळा. त्या गुरूशिष्यांनी कोसबाड येथे बालशिक्षणविषयक अनेक प्रयोग 1956 सालापासून केले. त्यांनी त्यांच्या प्रयोगांमध्ये मॉण्टेसरी पद्धतीची शिक्षणविषयक मूलतत्त्वे घेऊन, त्यांच्या कार्यपद्धतीत फेरफार केले. शिक्षकांना व ग्रामीण कारागिरांना तयार करता येतील अशी शैक्षणिक साधने रचली. ‘कुरण शाळा’, ‘उद्योग शाळा’, ‘निसर्ग भ्रमण’, ‘लेखन-वाचन वर्ग’ असे उपक्रम योजले. त्यांनी तर ‘अंगणवाडी’ व ‘बालवाडी’ या संकल्पना समाजात रुजवल्या ! ताराबाईंनी सुरू केलेल्या ‘शिक्षण पत्रिका’ मासिकाला नव्वद वर्षे पूर्ण झाली आहेत…

ताराबाई मोडक यांचा जन्म एका मध्यम परिस्थिती असलेल्या सुसंस्कृत कुटुंबात 19 एप्रिल 1892 रोजी झाला. त्यांचे वडील सदाशिव राम केळकर हे प्रार्थना समाजाचे प्रचारक होते. ते आधुनिक विचारांचे व सुधारक वृत्तीचे होते. त्यांनी ताराबार्इंना बीएपर्यंतचे शिक्षण दिले. त्यावेळी मुलगी बीएपर्यंत शिकणे हीच अनोखी गोष्ट होती. ताराबाईंचा विवाह अमरावतीचे वकील के.वि. मोडक यांच्याशी 1915 साली झाला. त्यांना मुलगी 1920 च्या दरम्यान झाली, तिचे नाव प्रभा. पण के.वि. मोडक व्यसनाधीन झाले. परिणामी ताराबाई त्यांच्यापासून वेगळ्या झाल्या. प्रभाचाच त्यानंतर दु:खद अंत झाला. ताराबाईंनी अमरावती सोडली (1921).

त्यांची नेमणूक गुजरातमधील राजकोट येथे सरकारी मुलींच्या ट्रेनिंग कॉलेजमध्ये प्रिन्सिपलपदावर झाली. तो मान त्या ट्रेनिंग कॉलेजमध्ये भारतीय महिलेला प्रथमच मिळत होता ! त्यांनी तेथे प्राचार्य म्हणून दोनच वर्षे (1921 ते 23) काम केले. पण त्या अवधीत त्या गुजराती भाषा शिकल्या. त्याच दरम्यान ताराबाईंचे लक्ष गिजुबाई बधेका यांच्या बालशिक्षणाच्या प्रयोगांनी आकर्षून घेतले. त्या बधेका यांचे भावनगरचे बालमंदिर व त्यांचे प्रयत्न प्रत्यक्ष पाहून तर फारच प्रभावित झाल्या. त्यांनी बाल शिक्षण हे त्यांचे जीवनकार्य असा निर्धार तेथेच केला. त्यांनी राजकोट येथील चांगला पगार, गाडी, बंगला, मानसन्मान या सर्वांचा त्याग करून गिजुभार्इंच्या बालशिक्षणाच्या अनोख्या प्रयोगात सहभागी होण्याचे ठरवले.

गिजुभाई व ताराबाई यांनी मिळून बाल शिक्षण क्षेत्रात संशोधनपूरक काम 1923 ते 1932 या नऊ वर्षांच्या काळात केले. त्यांनी त्यांद्वारा भारतात पूर्वप्राथमिक शिक्षणाचा पाया घातला. त्या दोघांना अडीच ते सहा वर्षे वयापर्यंतच्या मुलांसाठी बालशाळा असणे आवश्यक आहे हे पटले. त्यांनी त्यासाठी कार्यपद्धतीचा शोध सुरू केला. ती कार्यपद्धत स्वदेशातील आर्थिक, सामाजिक, भौगोलिक व सांस्कृतिक परिस्थितीशी मिळतीजुळती असण्यास हवी असा त्यांचा कटाक्ष होता. त्यांनी मुलांसाठी गोष्टी, गाणी, बडबड गीते, अभिनय गीते, लोकगीते असे विविध प्रकारचे साहित्य लिहून ते प्रकाशित केले. तो बालसाहित्याचा प्रमाणित नमुनाच ठरला !

त्यांनी ‘शिक्षण पत्रिका’ हे मासिक सुरू केले. समाजाचे बालसंगोपनाविषयी उद्बोधन केले. प्रदर्शने, पालक मेळावे, सभा, परिषदा, संमेलने आयोजित करून समाजामध्ये बालशिक्षणाबद्दल कुतूहल, जिज्ञासा व ममत्व निर्माण केले. त्यांनी ‘नूतन बाल शिक्षण संघ’ या बाल शिक्षण संस्थेची स्थापना 1926 साली केली. त्या संस्थेमार्फत बालशिक्षणाची चळवळ सबंध भारतात, विशेषतः गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, राजस्थान, सौराष्ट्र या राज्यांत रुजवून त्यांच्या नव्या संकल्पनेचा प्रचार व प्रसार केला.

ताराबाई महाराष्ट्रात 1936 साली परतल्या. त्यांनी त्यांच्या शिक्षण कार्यास मुंबई येथे सुरुवात केली. ताराबाईंनी ‘दादर भगिनी समाजा’च्या सहकार्याने त्यांच्याच हिंदू कॉलनीतील जागेत ‘शिशुविहार’ची स्थापना केली. संस्थेत मराठी व गुजराती या दोन्ही भाषांतील बालमंदिर सुरू केले. मुंबईसारख्या मोठ्या व प्रगत शहरातही पूर्वप्राथमिक शिक्षणाची गरज व महत्त्व पालकांना व समाजाला पटवून दिले. महाराष्ट्रात बालशिक्षणाचा प्रचार व प्रसार होऊ लागला. त्या ‘शिक्षण पत्रिके’तून बालवयातील मुलांच्या शारीरिक व मानसिक विकासासंबंधी उद्बोधक माहिती देऊन बालशिक्षणाची महती समाजापुढे सातत्याने मांडत होत्या. त्यासाठी ठिकठिकाणी व्याख्याने देत होत्या. संमेलने, परिषदा, परिसंवाद यांद्वारे पालकांमध्ये शिक्षणाबद्दल प्रेम, आस्था निर्माण करत होत्या.

ताराबाईंना एका प्रश्नाला सतत उत्तर द्यावे लागत असे. “हे महागडे शिक्षण (बालशिक्षण) आमच्या गरीब देशाला परवडणार आहे का? भारत मुख्यतः खेड्यांचा देश आहे. तेथपर्यंत हे शिक्षण कसे पोचवणार? खेडेगावातील लोकांना ते पेलवेल का? तुम्हाला खेड्यांत अशा बालशाळा चालवून त्या यशस्वी करून दाखवता येतील का?” तेव्हा ताराबाईंनी ठरवले, की मोर्चा आता खेड्यांकडे वळवला पाहिजे. ताराबाई पाचगणी येथे महात्मा गांधी यांना भेटल्या. त्यांनी त्यांचे बालशिक्षणविषयीचे कार्य व त्या संबंधीचे विचार गांधीजींसमोर मांडले. गांधीजींनी त्यांच्या कामाचे कौतुक केले. त्यांच्या कार्याला आशीर्वाद दिले आणि त्यांना सांगितले, “ताराबाई, तुमच्या बालशिक्षणाच्या पार्श्वभागी मॉण्टेसरी पद्धत व त्यांची साधने आहेत. ती साधने फार महाग असतात. तुम्ही बालशिक्षणाचे कार्य करत आहात, तेव्हा या शिक्षणासाठी भारतीय पार्श्वभूमी तयार करा. भारतातील सामाजिक, आर्थिक, भौगोलिक, सांस्कृतिक परिस्थितीशी मिळतीजुळती अशी बैठक तयार करा. शैक्षणिक साधने स्वस्त व स्थानिक कारागिरांना तयार करता येतील, शिक्षकांचा त्यात जास्तीत जास्त सहभाग असेल, असे पाहा. थोडक्यात काय तर इटालीतील मॅडम मॉण्टेसरीची तत्त्वे स्वीकारा; परंतु त्यांना भारतीय स्वरूप द्या. भारताची भारतासाठी अशी बालशिक्षण पद्धत निर्माण करा. तुमचे हे कार्य शिक्षणक्षेत्राला प्रेरणादायी ठरेल. स्वतंत्र भारतातील भावी पिढ्यांमध्ये सुसंस्कृत व आदर्श नागरिक तयार करण्याचे पायाभूत शिक्षण, म्हणून ही बालशिक्षण पद्धत उचित ठरेल.”

ताराबाईंचा उत्साह गांधीजींच्या या प्रेरणादायी व प्रोत्साहनपूर्ण आशीर्वादाने द्विगुणित झाला. त्यांनी ते आव्हान स्वीकारले. त्यांचे लक्ष खेड्यांकडे वळवले. त्यांनी त्यांचे सहकारी शेष नामले व सरला देवधर यांच्यावर शिशुविहार शिक्षण केंद्राची जबाबदारी सोपवली; त्यांनी ‘अनुताई वाघ’ या सहकार्यकर्तीला सोबत घेऊन ठाणे (आता पालघर) जिल्ह्यातील बोर्डी या गावी प्रस्थान ठेवले. ताराबाईंनी बोर्डी येथे ‘नूतन बालशिक्षण संघा’च्या वतीने ‘ग्राम बाल शिक्षा केंद्र’ या नव्या संस्थेची स्थापना 24 डिसेंबर 1945 रोजी केली. उद्घाटनाला मुख्यमंत्री बाळासाहेब खेर हे आले होते. ताराबाई व अनुताई यांनी बालशिक्षणविषयक पुष्कळ प्रयोग 1945 ते 1956 या एक तपाच्या काळात केले. अध्यापन मंदिराची स्थापना केली.

त्यांनी बालमंदिरांच्या शिक्षकांसाठी अभ्यासक्रम तयार केला. बोर्डी येथील अध्यापन मंदिर हे बहुभाषीय व बहुप्रांतीय अध्यापन मंदिर होते. गुजरात, केरळ, बंगाल, पंजाब, मध्य प्रदेश, काश्मीर या प्रांतांतून (राज्यांतून) बालमंदिरे निघत होती. तेथील शिक्षक या अध्यापन मंदिरात प्रशिक्षणासाठी येत होते. ताराबाईंनी प्रशिक्षण घेऊन पुन्हा एक तपाच्या प्रदीर्घ परिश्रमांतून ‘नूतन बाल शिक्षण पद्धती’ प्रस्थापित केली व त्यातून ग्रामीण बालशिक्षणाची मजबूत बैठक तयार झाली. ‘बालवाडी’, ‘अंगणवाडी’ या शब्दांची उत्पत्ती बोर्डीतच झाली. गुजरातमधील शिक्षणतज्ज्ञ जुगतरामभाई दवे हे बोर्डीला ताराबाईंचे काम पाहण्यास नेहमी येत असत. त्यांनी एकदा ताराबाईंना म्हटले, “बोर्डीला चिकूच्या ‘वाड्या’ आहेत. तुमच्या या बालमंदिराला जर ‘बालवाडी’ म्हटले तर कसे वाटेल?” ताराबाईंना तो शब्द आवडला. त्यांनी बालमंदिरांचे नामांतर ‘बालवाडी’त केले. लहान मुलांची शाळा सुरुवातीच्या काळात आदिवासी घराच्या अंगणात भरत असे. त्यालाही ‘अंगणवाडी’ असे नाव पडले.

त्यांनी शिक्षकांना व ग्रामीण कारागिरांना तयार करता येतील अशी शैक्षणिक साधने तयार केली. ती बालमंदिरात वापरून त्यांच्या कसोट्या घेतल्या. टाकाऊ वस्तूंतून कल्पकतेने साधने तयार केली. चित्रचिठ्ठ्या, वस्तुचिठ्ठ्या, आवाज डब्या, परिचय तक्ते, चित्रकाम, मातीकाम, रंगकाम, घडी काम, कातर काम, सुशोभन असे अनेकविध विषय घेऊन त्यासाठी साधन निर्मिती केली व बाल अध्यापन मंदिर चालवून ग्रामीण भागात बालमंदिरे चालवण्यासाठी शिक्षक तयार केले.

ताराबार्इंचा संपर्क आजूबाजूच्या आदिवासी परिवारांशी येई. ते लोक दैन्य, दारिद्र्य, अज्ञान, अंधश्रद्धा यांत गुरफटलेले होते. त्या समाजाला ज्ञानाचा प्रकाश देण्याकरता बोर्डीच्या परिसरात आठ-दहा ठिकाणी अंगणवाड्या सुरू केल्या. संस्थेचे कार्यकर्ते व प्रशिक्षणार्थी रोज अडीच-तीन तास वस्त्यांवर जात. तेथे साफसफाई करणे, परिसर स्वच्छ करणे, वस्तीतील मुलांना एकत्र करणे, खेळ, गाणी, गोष्टी, बडबड गीते अशा प्रकारे काम सुरू झाले. आदिवासी मुलांना प्राथमिक धडेही देण्यास सुरुवात झाली.

त्या परिश्रमाचे दृश्य परिणाम दिसू लागले. वस्तीतील आवारे नियमित स्वच्छ होऊ लागली. पालक मुलांना स्वच्छ ठेवू लागले. नवीन खेळ, गाणी, गोष्टी यांत मुले रमू लागली. वस्तीचे वातावरण बदलू लागले. बोर्डीचे ताराबाईंचे बालशिक्षणाचे कार्य, तेथे चालू असलेले शिक्षणविषयक प्रयोग पाहण्यासाठी शिक्षणतज्ज्ञ व शिक्षणक्षेत्राशी संबंधित कार्यकर्ते येत. ते फार प्रभावित होत. त्यांनी ताराबाईंना सुचवले, “तुमचा हा अंगणवाडीचा प्रयोग अनोखा व अभिनव असा आहे. आपण तो मोठ्या प्रमाणात करावा. देशात फार मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज आहे. त्यांच्या जीवनात तुमच्या या प्रयोगांतून एक नवा प्रकाशकिरण निर्माण होईल.”

ताराबाईंच्या मनातही तो प्रयोग मोठ्या प्रमाणात व शास्त्रशुद्ध रीत्या वस्तीवस्तीत जाऊन करावा असे होते. त्यांनी सविस्तर योजना तयार केली व ती महाराष्ट्र शासनामार्फत भारत सरकारकडे मंजुरीसाठी 1956 साली पाठवली. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण व त्यांचे सहकारी वसंतराव नाईक, बाळासाहेब देसाई यांना ताराबाईंच्या कार्याबद्दल आदर होता. त्यांनी त्या योजनेचा पाठपुरावा केला व भारत सरकारकडून ती मंजूर करून घेण्यासाठी ताराबाईंना सक्रिय सहकार्य केले, तीच ‘विकासवाडी योजना’. भारत सरकारने त्या योजनेस 1957 साली मंजुरी दिली. ताराबाईंनी बोर्डीची संस्था ‘कोसबाड’ येथे आदिवासींच्या वस्तीत स्थलांतरित केली. आचार्य भिसे त्यावेळी आदिवासी समाजामध्ये शैक्षणिक व सामाजिक सुधारणेचे कार्य करत होते. ते ग्राम बाल शिक्षा केंद्र समितीचे अध्यक्ष होते. ताराबाईंनी कोसबाड येथे विकासवाडी योजनेचे काम सुरू केले. पुढे, अंगणवाडी-बालवाडी या संकल्पना सर्वत्र पसरल्या, मात्र विकासवाडी नावाचे प्रकल्प फार कोठे आढळत नाहीत. त्यातील छोट्या छोट्या कल्पना राबवल्या जातात.

आदिवासी मुले शाळेत येत नाहीत, कारण त्यांना गुरे चारण्यास कुरणात जावे लागते. ताराबाईंनी त्यांची शाळाच जेथे मुले असतील तेथे नेली ! शिक्षक कुरणात जाऊ लागले. तेथेच गुरे चारण्याच्या कामाबरोबर शाळाही भरू लागली. तीच ‘कुरण शाळा’. ताराबाईंनी शाळेला जोडून उद्योगवर्ग सुरू केले. मुले अर्धवेळ काम करत आणि अर्धवेळ शिक्षण. त्यातून ‘उद्योग शाळे’चा जन्म झाला ! अशा प्रकारे ‘कुरण शाळा’, ‘रात्र शाळा’, ‘प्रौढ शिक्षण वर्ग’, ‘बालगोपाळ मंडळे’, ‘क्रीडा केंद्रे’, ‘छंद वर्ग’, ‘निसर्गभ्रमण’, ‘रंजन कार्यक्रम’, ‘लेखन-वाचन वर्ग’ असे अनेक उपक्रम सुरू झाले. ताराबाईंना अनुताई वाघ, सिंधुताई अंबिके व इतर सहकारी यांची मोलाची साथ होती. त्यांच्या प्रयत्नांमागचा उद्देश मुलांच्या व विशेषतः पालकांच्या मनात शिक्षणाबद्दल आस्था निर्माण व्हावी हा होता.

ताराबाई अशा निष्कर्षाप्रत आल्या, की समाजात मुलांचे शिक्षण व्हायचे असेल तर त्यांच्या कुटुंबातील सर्व वयोगटांतील मुलांना एकत्र आणता येईल अशी शाळा हवी. ती त्यांनी तयार केली. तिला ‘विकासवाडी’ हे नाव दिले. त्यात सहा महिन्यांच्या मुलांसाठी पाळणाघरांपासून ते दहा वर्षांपर्यंतच्या सर्व मुलांना त्यांच्या वयोगटांप्रमाणे एकत्र शिक्षण मिळत असे. त्या संकल्पनेत पाळणाघर पूर्वप्राथमिक शिक्षणाचा समावेश होतो. त्यांचा आदिवासींच्या शिक्षणाचा हा आगळावेगळा प्रयोग महाराष्ट्राचे भूतपूर्व शिक्षण सल्लागार जे.पी. नाईक, शिक्षणतज्ज्ञ आचार्य भिसे, ल.नि. छापेकर, वि.द. घाटे, सी.डी. देशमुख, गो.रा. परांजपे, काकासाहेब कालेलकर, जुगतरामभाई दवे, नानाभाई भट, डॉ. खेर वगैरे शिक्षणतज्ज्ञांनी कोसबाडला येऊन प्रत्यक्ष पाहिला. त्यांचा अभिप्राय ताराबाईंचे आदिवासी भागातील शिक्षणविषयक प्रयोग दीपस्तंभासारखे मार्गदर्शक होतील असा होता !

त्यांना ‘पद्मभूषण’ हा सन्माननीय किताब 1962 साली मिळाला. त्यांचा गौरव राष्ट्रीय पातळीवर झाला. मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी त्यांच्या सत्तराव्या वाढदिवशी एक लाख रुपयांची थैली महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने त्याच वर्षी त्यांना अर्पण केली, त्यांचा जाहीर सत्कार केला. भारत सरकारने त्यांच्या ‘कुरण शाळे’च्या अनोख्या प्रयोगाचे पुस्तक प्रकाशित करून त्यांच्या कार्याला भारतभर प्रसिद्धी दिली. स.ह. देशपांडे यांनी त्यांच्या कार्यावर संशोधनात्मक निबंध लिहिला आहे. शिक्षणशास्त्रज्ञ चित्रा नाईक यांनी ‘युनिसेफ’साठी ‘ग्रोइंग ॲट कोसबाड हिल’ या नावाचे पुस्तक 1978 साली प्रसिद्ध केले. तो (स.ह. देशपांडे यांचा ताराबाई यांच्या कार्यावरील संशोधनात्मक निबंध) अमेरिकास्थित ‘इंडियन कौन्सिल फॉर एज्युकेशनल डेव्हलपमेंट’ या आंतरराष्ट्रीय संघटनेने पुस्तक रूपाने 1979 साली प्रसिद्ध केला. त्यामुळे ताराबाईंचे शैक्षणिक कार्य जगासमोर आले. ताराबाईंच्या कोसबाड येथील शिक्षणकार्याला भारतीय व जागतिक स्तरावर मान्यता मिळाली. त्यांचे निधन 1973 साली झाले. त्यानंतर त्यांच्या कार्याची धुरा, त्यांच्या बोर्डीपासूनच्या सहकारी व शिष्य अनुताई वाघ यांनी सांभाळली. त्यांनी ताराबाईंचे कार्य जोमाने पुढे नेले. भारत सरकारने त्यांना ‘पद्मश्री’ हा किताब बहाल केला.

ताराबाई म्हणायच्या की, “मुलांना बोन्साय करू नका. त्यांना वटवृक्षासारखं वाढू द्या.” ते लक्षात ठेवण्यासारखे आहे.

– सुरेश चव्हाण 9867492406 sureshkchavan@gmail.com

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here