‘गोट्या‘ नावाची मालिका मुंबई दूरदर्शनवर सुमारे तीस वर्षांपूर्वी गाजून गेली. ती मालिका पाहताना त्या काळातील लहान मुलेच नव्हे तर मोठी माणसेही एका वेगळ्याच विश्वात दंग होऊन जात ! ती मालिका प्रख्यात बालसाहित्यकार ना.धो.(नारायण धोंडो) ताम्हनकर यांनी लिहिलेल्या ‘गोट्या’नावाच्या मराठी कादंबरीवर आधारित होती. मालिकेचे दिग्दर्शन राजदत्त यांनी केले होते. त्या मालिकेने त्या वेळच्या बालप्रेक्षकांना आपलेसे केले होते. ‘गोट्या’ मालिकेचे शीर्षकगीत, अर्थपूर्ण होते!
“बीज अंकुरे अंकुरे, ओल्या मातीच्या कुशीत
कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात
बीजा हवी निगराणी, हवी मायेची पाखर
लख्ख प्रकाश निर्मळ, त्यात कष्टाचा पाझर
हवी अंधारल्या राती, चंद्रकिरणांची साथ
कसे रुजावे बियाणे माळरानी खडकात”
‘गोट्या’ मालिकेचे शीर्षकगीत मधुकर आरकडे यांनी लिहिले आहे. ते अरुण इंगळे यांच्या स्वरात आहे. ते अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केले आहे. त्याचे चित्रिकरण उद्बोधक व गंमतीदार आहे. ‘गोट्या’ हा मुलगा त्याच्या आजी आणि काकांकडे राहण्यास जात आहे, तो प्रवास त्यात चित्रित केला आहे. त्या मुलाच्या आयुष्यावरच ती मालिका रंगत जाते. जॉय घाणेकर याने ‘गोट्या’ची भूमिका केली होती.
शीर्षकगीतात कवितेतील एकच कडवे वापरले आहे, मुळात ती कविता तीन कडव्यांची असून ती सातवीच्या मराठीच्या पाठयपुस्तकात मुलांना अभ्यासाला होती. ‘गोट्या’ या मालिकेच्या शीर्षकगीतापासून मालिकांच्या जगात शीर्षकगीत हा गीतप्रकार लोकप्रिय होत गेला.

ताम्हनकर यांचा त्या लेखनामागील हेतू स्पष्ट आहे. ‘खेळगडी’मासिकातील ‘गोट्या’ ही कथामाला पुस्तक रूपाने तीन भागांत प्रकाशित झाली. ताम्हनकर यांनी पुस्तकाच्या दुसऱ्या भागाच्या प्रस्तावनेत त्यांचा हेतू उघड केला आहे. ‘बालजनांशी हसून खेळून त्यांच्या मनोविकासाला मदत करणारा एखादा सवंगडीत्यांना मिळवून द्यावा, ही मनातील इच्छा गोट्याच्या रूपाने मूर्त स्वरूपास गेली…’

काय करतो हा गोट्या नेमके? तो शाळेत एक हुशार विद्यार्थी म्हणून गणला तर जात असतोच, पण त्याच वेळी तो गुरूजनांना अडचणीत आणणाऱ्या शिक्षकवर्गाला त्रास देणाऱ्या विद्यार्थ्यांची खोड जिरवण्याचे कामही मोठ्या कौशल्याने करत असतो. ते करताना तो लहानपणी शाळेत मुले ज्या युक्त्या-प्रयुक्त्या योजतात, त्याच योजत जातो. प्रसंगी तो धांगडधिंगाही घालतो, पण त्याचा ते सारे करतानाचा हेतू स्पष्ट असतो. त्याच वेळी तो घरातील सुमावर म्हणजे त्याच्या बहिणीवर मनापासून माया करत असतो. सुमा आणि तिच्या मैत्रिणी यांची कोणी छेड काढत असेल तर तो त्या मवाल्यांना चांगला इंगा दाखवतो. दिवाळीत तो आकाशकंदिल तर करणारच, पण त्याच वेळी सुट्टीत थोडेफार काम करून मिळणारा अल्पस्वल्प मोबदलाही गरीब विद्यार्थ्यांच्या कामी लावणार! मग असा हा सत्शील गोट्या आमजनांच्या संस्कारशील मनांवर गारूड घालून न गेला तरच नवल…
जॉय घाणेकर हा चित्रपट दिग्दर्शक गिरीश घाणेकर यांचा धाकटा मुलगा. तो सॅन फ्रान्सिस्कोला स्थायिक आहे. तेथील Talech या कंपनीचा तो प्रॉडक्ट हेड आहे.
– नितेश शिंदे info@thinkmaharashtra.com
|
|
|
———————————————————————————————-——————————————————-
छान.जुन्या आठवणी जाग्या झाल्या अनुराधा म्हात्रे. पुणे
बालपणी पाहिलेला गोट्या अजुनही तसाच आठवतो.
चांगला लेख.एक गोष्ट खटकली.शीर्षक गीताचे शब्द दिलेत,संगीतकार, गायक,मालिका दिग्दर्शक….सगळ्यांचे श्रेय नावासह नमूद केले गेले. नेमके कवी-गीतकार,(कै) मधुकर आरकडेंचा उल्लेख नाही! शब्द आधी लिहिलेले होते,चालीवर नाहीत.अत्यंत प्रासादिक अर्थवाही शब्द ही त्या गीताची मूळ ताकद आहे.अर्थात संगीतकार व गायकाचे श्रैय मान्य आहेच.पण नेमका गीतकारच उपेक्षिला जातो.गीतकाराचे नाव नेटवर सहज मिळाले असते.माझा मधुकर आरकडेंशी परिचय होता,त्यामुळे मला अधिक दुःख झाले.sadananddabir
Khup sundar malika hoti.
वाह!
होय. आवडती मालिका. यातील मानसी मागीकरांनी साकारलेली आईची भूमिका किती लोभस.
आवडती मालिका.
बाल मालिका फार कमी झाल्यात. गोट्या बालकांना केंद्रस्थानी ठेवून त्यावर केलेली अप्रतिम मालिका.पायाभूत कथानक उत्तम, आज ही कमतरता दिसते. जशी हिंदीतील मोगली, गुलजार सरांच्या,चड्डी पेहेनके फुल खिला हे…आजही आठवते. शब्दांचे सामर्थ्य अफाट असते.
ह्या मालिकेने आमचे बालपण जोजवले.
मुलांनी अवश्य वाचावी.
यात मनोरमा वागळे यांनी केलेली भूमिका मला अतिशय आवडली..👌👌
यात मनोरमा वागळे यांनी केलेली भूमिका मला अतिशय आवडली..👌👌