ताराबेन मश्रुवाला या नाजुक-किरकोळ प्रकृतीच्या, व्रतस्थ ब्रह्मचारी स्त्रीने त्यांचे पूर्ण आयुष्य लोककल्याणासाठी खर्ची घातले. त्यांनी विदर्भातील अमरावती जिल्ह्यात आडमार्गावर असलेल्या माधान या लहानशा खेड्याचा कायापालट केला. तेथे त्या आधी कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा नव्हत्या. ताराबेन यांनी महात्मा गांधी यांचे ग्रामसुधारणेचे स्वप्न तेथे प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला. माधान हे सातपुडा डोंगर पायथ्याशी वसलेले ओसाड असे खेडेगाव आहे. ते महाराष्ट्रात ‘आदर्श ग्राम’ रूपात आणि सामाजिक कार्याच्या रूपात नावाजले गेले...