भारत देशात अशी काही गावे आहेत जी ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या नावावरून ओळखली जातात. त्या गावांशी निगडित कथा तितक्याच सुरस व रंजक आहेत. ‘ग्लासफर्ड’ हा मूळ स्कॉटिश शब्द आहे. त्याचा अर्थ ‘ग्रीन फॉरेस्ट’ असा होतो. ते गाव प्राणहिता नदीच्या तीरावरील घनदाट जंगलात आहे. इंग्रजी सत्तेच्या काळात ज्या ब्रिटिश अधिकाऱ्याने हे गाव वसवले त्याच्या नावावरून त्या गावास नवे नाव मिळाले. त्या अधिकाऱ्याचे पूर्ण नाव होते - चार्ल्स लॅमन्ट रॉबर्टसन ग्लासफर्ड. त्याने नागपूरजवळ काही शिलावर्तुळे शोधून काढल्याचा उल्लेख आढळतो. त्यामुळे ग्लासफर्डचे नाव विदर्भातील बृहदश्म किंवा महापाषाणयुगीन संस्कृती यांच्या आद्य अभ्यासकांमध्ये घेतले जाते...