मी गावकी हा शब्दच मूळात ऐकला तो 2014 साली. आम्ही रोहा रोडवरील गरूडपाडा गावात डिसेंबर 2014 ला राहण्यास आलो. पंचावन्न-साठ घरांचे चिमुकले गाव. तोपर्यंतचे सगळे आयुष्य शहरात गेले आणि त्यातील अर्ध्याहून अधिक महानगरात घालवले, त्यामुळे ‘खेड्यातील घरा’चे स्वप्न अनुभवणे बाकी होते. गावाचे गरूडपाडा हे नाव कसे पडले, कधीपासून गाव वसले असे प्रश्न मनात आले. खरे तर, शासन दरबारी गरूडपाडा गाव अस्तित्वात नाही. समोर काविर नावाचे गाव आहे त्याचाच उल्लेख सापडतो. काविरच्या रहिवाशांची शेते या गावात होती. ते त्यासाठी येथे येत आणि ‘पाड्यावर जातो’ असा उल्लेख करत...