मी आजी सात वर्षांपूर्वी झाले आणि आजीपणाचा सांस्कृतिक वारसा नातीकडे पोचवण्याची जबाबदारी माझ्याकडे हळूहळू आली; ती म्हणजे गोष्ट सांगणे ! गोष्ट सांगणे, ही ‘गोष्ट’ वाटते तितकी सोपी नाही ! कोरोनाच्या काळात मुक्ता - माझी लेक - घरातून ‘ऑनलाईन’ काम करत असताना, माझ्याकडे नातीला गोष्ट सांगण्याची जबाबदारी अधूनमधून आली. साडेचार-पाच वर्षांच्या नातीला -अनाहिताला- व्हिडिओ कॉल करून गोष्ट ऐकण्यात गुंतवणे हे आव्हानच होते...