आईनस्टाईन यांनी लिहिलेले एक सुपरिचित वाक्य आहे ‘जर तुमची मुले बुद्धिमान व्हावीत, असे तुम्हाला वाटत असेल तर त्यांना परीकथा वाचायला द्या… जर तुम्हाला ती आणखी बुद्धिमान व्हावीत असे वाटत असेल, तर त्यांना आणखी परीकथा वाचायला द्या’. त्यामुळे छोट्या मुलांचे अवकाश वाढीला लागते, कल्पनाशक्ती विकसित होते, अनुभव घेण्याची उर्मी वाढते. संगीता बर्वे यांनी लिहिलेल्या ‘पियूच्या वही’ने छोट्यांच्या विश्वात असाच अवचित प्रवेश केला आहे. त्यातल्या छोट्या पियूने जे जे केले ते ते करायला उत्सुक असणारी मुले. गोष्टी छोट्या पण आशयघन बदल घडवू शकणारे छोट्यांचे सगळे अनुभव. त्यातून त्यांच्या स्वतंत्र वह्या निर्माण झाल्या. असे सकस वाचन वाऱ्याच्या वेगाने फैलावले तर मोबाईल आणि इंटरनेटमध्ये अडकून कोसळणारे लहानांचे बाल्य सावरायला नक्की मदत होईल...