साताऱ्याचे नाना पाटील यांचे नाव ‘प्रति सरकार’ वा ‘पत्री सरकार’ या नावाशी जोडले जाते. म्हणून तर त्यांना क्रांतिसिंह म्हणतात. ते स्वातंत्र्य चळवळीतील थोर नेते होत. त्यांनी भूमिगत राहून ‘प्रतिसरकार’ उभारले. त्यांनी केवळ राजकीय स्वातंत्र्यासाठी नव्हे, तर सामाजिक समता, न्याय यांसाठी आणि आर्थिक शोषणांविरुद्ध लढा दिला. त्यांना जनतेने घडवले आणि उलट, त्यांनी जनतेला संघटित करून इतिहास घडवला ! महात्मा फुले, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेतील त्यांच्या पुढील काळातील एक महत्त्वाची कडी म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. ते महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक जीवनावर 1928 ते 1976 या काळात प्रभाव टाकणारे महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते...