वर्धा येथे 1969 साली झालेल्या अठ्ठेचाळिसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते कवी प्रा. पुरुषोत्तम शिवराम रेगे. ते नवकवितेत स्वतःचा वेगळा प्रवाह जपणारे तरल कवी, अल्पाक्षराच्या वाटेने जाणारे कादंबरीकार आणि समीक्षक-संपादक म्हणून प्रसिद्ध आहेत. रेगे यांनी ‘सुहृद चम्पा’ आणि ‘रूपकथ्थक’ या टोपणनावांनीही लिखाण केले आहे. रेगे हे मूलतः सर्जनशील कलावंत होते. त्यांनी त्यांच्या लेखनाला ‘बालमित्र’ नावाच्या हस्तलिखित मासिकातून सुरुवात केली...