‘अस्सल कच्चा चिवडा’ हा विस्मृतीत चाललेला खास विदर्भी पदार्थ आहे. त्यासाठी जाडे किंवा पातळ असे, कसलेही पोहे घ्यावे. त्यात कच्चे तेल, कच्चे शेंगदाणे, कच्चा कांदा, हाताने तोडलेली कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीचे तुकडे घालून जरासे मीठ टाकावे की कच्चा चिवडा तयार होतो ! त्या चिवड्यात मेथी व गूळ घालून केलेला कैरीच्या ताज्या लोणच्याचा खारपण जातो. त्या पोह्यात चुलीवरच्या निखाऱ्यात भाजून घेतलेली मिरची कालवली तर एकदमच सुपर-डुपर कच्चा चिवडा बनतो. त्या कच्च्या चिवड्याला विशेष महत्त्व मार्च महिन्यात असायचे, कारण दुपारच्या वेळी परीक्षेची तयारी करताना झोप यायची, अशा वेळी वाडगाभर कच्चा चिवडा रिचवला की अभ्यासासाठी तरतरी येई...