नर्मदा परिक्रमेचा प्रचार – सुरेंद्र दामले शैलीने ! (Surendra Damle’s novel way to propogate Narmada River Walk)

2
129

सुरेश रामचंद्र दामले, वय वर्षे त्र्याहत्तर, इलेक्ट्रिक मोटर वाइंडिंगचा व्यवसाय. तो पिढीजात चालत आलेला. त्यांच्या पत्नी आशा दामले यांनी नर्मदा परिक्रमेवरील व्याख्यान ऐकले आणि त्या भारावून गेल्या. त्या परिक्रमेस निघाल्या. त्यांना सोडण्यास म्हणून गेलेले सुरेश दामले स्वत:ही परिक्रमेत सहभागी झाले ! परिक्रमा हा झपाटलेल्यांचा छंद आहे असे म्हणतात, पण दामले यांचे हे वाहून जाणे म्हणजे…

सुरेंद्र दामले

 

नर्मदेतील नर्म म्हणजे सुख व आनंद आणि दा म्हणजे देणारी. नर्मदा ही तपोभूमी आहे, परिक्रमा ही तपश्चर्या आहे. नर्मदेचा इतिहास पाच लाख वर्षांचा आहे. नर्मदा भूमीतील पाषाण प्रसिद्ध आहे. नर्मदेतील गोटा हा वाक्प्रचार मराठीतील रूढ आहे. नर्मदेच्या पाषाणांपासून बनवलेल्या मूर्ती भारतातील अधिकांश शिवमंदिरांत विराजमान आहेत. शिव स्वत: नि:संग व त्याची मंदिरेही तशीच दूर दूर डोंगर-खोऱ्यांत पसरलेली. नर्मदेच्या परिक्रमेत पुण्याचा भाव आहे आणि आध्यात्मिक अर्थ आहे. त्यामुळेच की काय, सुरेंद्र दामले हे परिक्रमा करून आले आणि भारावून गेले. ते तेथेच थांबले नाहीत. त्यांनी परिक्रमेचे महत्त्व सगळ्यांना कळावे यासाठी खटाटोप परिक्रमेहून परतल्यापासून सुरू केला आहे. त्यांनी त्या संदर्भातील शक्य ते सर्व ग्रंथ गोळा करून, पुण्याच्या कोथरूड भागातील कुमार चौक परिसर येथे पुस्तकाचे प्रदर्शन मांडणे सुरू केले. ते तेथे सकाळी सात ते नऊ या वेळेत परिक्रमेसंबंधी माहिती लोकांना देत असतात. ते वाचकांना पुस्तकेवाचण्यास घरीही देतात. डिपॉझिट नाही, कसलीही फी नाही, पुस्तक वाचून परत करायचे. सारा विश्वासाचा व्यवहार. पुस्तके वाचण्यासाठी नेणार्‍यांची संख्या वाढत आहे. त्यांच्याकडे साडेसातशे पुस्तके असून, अनेक जण त्यात भरही टाकत आहेत. ते लोकांच्या अंगवळणी पडले आहे. पुस्तके वाचून त्याबाबत चर्चा करणारी मंडळीदेखील चौकात जमू लागली आहेत. सुरेंद्र दामले यांची अशी अनोखी समाजसेवा अव्याहतपणे चालू आहे. पुस्तकांची देवाणघेवाण तेथे कसलाही मोबदला न घेता होते; संवादाचे आदान-प्रदान मात्र होत राहते.

दामले मास्कचे वाटपही विनामूल्य करतात; तसेच, त्यांनी वजन करण्याचे मशीन तेथे उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे एक अनोखे वाचनालय व अनुप संवादाचे ठिकाण कुमार परिसरात सुरू झाले आहेत. ते त्यांच्या वाहनाने येतात, स्टॉल लावतात, ते सगळी कामे कोणाचीही मदत न घेता सातत्याने करत आले आहेत. दामले यांच्याकडे पाहून असे वाटते, की संवादामुळे व्यक्तिमत्त्व ठीक राहते. अपेक्षा नसलेले संवाद व तसेच कार्य करणाऱ्यांना जीवनातील पोकळी जाणवत नाही. माणसे निर्व्याज प्रेम केल्याशिवाय उलट प्रेम करत नाहीत असा दामले यांचा अनुभव आहे.

सुरेंद्र म्हणाले, की माझा स्वत:चा व्यवसाय आहे आणि माझे दोन्ही मुलगे व माझ्या दोन्ही सुना आयटीत असल्याने त्यांचेही उत्पन्न उत्तम आहे. त्यामुळे माझे हे सर्व कार्य विनामूल्य उपलब्ध आहे. मी चौकात मांडलेले मास्क सहसा गरीब लोक उचलतात, तरुण मंडळी वजनाच्या काट्याचा लाभ घेतात आणि प्रौढ मंडळी पुस्तके वाचण्यास नेतात – एक नेले तर पाच वेगळी आणून देतात ! गो.नी. दांडेकर यांचे कोणा एकाची भ्रमणगाथा हे सर्वाधिक वाचले जाणारे पुस्तक आहे.

दामले स्वत:च्या गाडीत पुस्तके व अन्य सामान आणि टेबल-खुर्ची टाकून कुमार चौकात रोज सकाळी पोचतात, दोन तासांनी तेथून परत निघतात. दामले म्हणाले, नर्मदा परिक्रमेत व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेचा कस पुरेपूर लागतो. परिक्रमा करताना नर्मदे हरगजर करणारी, आपुलकीने बोलावून जेवू-खाऊ घालणारी खूप माणसे भेटतात.

नर्मदा परिक्रमा म्हणजे नर्मदा नदीला घातलेली प्रदक्षिणा. उजव्या हाताला नदी ठेवून, तिच्या उगमापासून प्रारंभ करून परत त्याच ठिकाणी येणे याला प्रदक्षिणा किंवा परिक्रमा असे म्हणतात. नर्मदा परिक्रमा ही पायी सुमारे तीन हजार दोनशे किलोमीटर अंतराची आहे. नर्मदा मैयाचे पात्र कोठेही ओलांडायचे नाही ही त्या परिक्रमेची मुख्य अट. परिक्रमा स्नान करून आणि कन्यापूजन यथासांग करून सुरू करण्याचा परिपाठ आहे. पुरुषांनी पांढरा शर्ट, धोतर किंवा लुंगी आणि स्त्रियांनी पांढरी साडी किंवा पांढरा पंजाबी ड्रेस, हातात दंड, काठी, पाठीवर सुमारे सात-आठ किलो सामान असलेली सॅक घेऊन पायी चालण्यास सुरुवात करायची असते.

तरुण दररोज पस्तीस ते पंचेचाळीस किलोमीटर चालून, चार महिन्यांत परिक्रमा पूर्ण करू शकतात. मध्यमवयीन ते ज्येष्ठ नागरिक ती दररोज सुमारे वीस ते तीस किलोमीटर चालून, पाच-सहा महिन्यांत पूर्ण करू शकतात. शास्त्रोक्त परिक्रमा दररोज सुमारे पाच किलोमीटर चालून, चातुर्मासात चार महिने एका ठिकाणी थांबून, एकंदर तीन वर्षे तीन महिने आणि तेरा दिवस एवढ्या काळात पूर्ण करायची असते, परंतु ते सर्वांना शक्य होत नाही, त्यामुळे बहुतेक जण चार-पाच महिन्यांच्या परिक्रमा करतात.

पृथ्वी सूर्याला प्रदक्षिणा घालते त्यावेळी सूर्यापासून मिळणारी ऊर्जा पृथ्वीला लाभते. त्याद्वारे प्राणी, वनस्पती यांचे जीवन आणि एकूणच सजीव सृष्टीचे चक्र व्यवस्थित सुरू राहते. काही जण झाडाला प्रदक्षिणा घालतात, त्यापाठी त्या झाडाची ऊर्जा मिळावी हाच उद्देश असतो. मनुष्य नर्मदा परिक्रमा पायी चालताना, अफाट समृद्ध निसर्गाच्या सान्निध्यात येतो, तेव्हा त्याला मिळणारी ऊर्जा किती प्रचंड असेल ! रोज नवा रस्ता असतो. कधी शेतातील चिखलातून अंतर पार करावे लागते. परिक्रमेमध्ये जंगलातून जाताना, सुरुवातीला थोडी भीती वाटते. पण माणूस सरावाने खंबीर होत जातो. नर्मदे हर गजर करणारी, आपुलकीने बोलावून खाऊ घालणारी खूप माणसे परिक्रमा करताना भेटतात. कधी, कडाक्याच्या थंडीत रात्र काढावी लागते, तर कधी पाऊस झेलावा लागतो. परिक्रमेच्या शेवटच्या काही दिवसांत तीव्र उन्हाच्या झळाही लागतात.

नर्मदा परिक्रमा संपन्न झाल्यावर

 

रोजच्या जीवनात प्रत्येक टप्प्यावर पैसा लागतो. परंतु परिक्रमेमध्ये गरजा कमी असल्याने ती काटकसरीने होऊ शकते. त्या चार-पाच महिन्यांत हजार-दोन हजार रुपये खर्च होतात. कुटीमध्ये, शाळेत, आश्रमात, उघड्यावर झोपायचे. सकाळी उठल्यावर संध्याकाळपर्यंत चालत राहायचे; तोच दिनक्रम असतो. गावकऱ्यांकडून माताजी, प्रसादी खाऊन जा असे आपुलकीचे बोलावणे बऱ्याच वेळा येते. भाजी किंवा आमटी-भात याला प्रसादी म्हटले जाते. त्या सर्व ठिकाणी पैसे द्यावे लागत नाहीत. उलट, काही ठिकाणी परिक्रमावासींना दक्षिणा दिली जाते ! काही दुखलेखुपले तर डॉक्टरकडून मलमपट्टीची व्यवस्था होते. औषधेही दिली जातात. नर्मदा नदीची लांबी चौदाशे किलोमीटर इतकी प्रचंड आहे. ती अन्य नद्यांच्या तुलनेत खूपच स्वच्छ व सुंदर आहे, अर्थात त्यासाठी परिसरातील गावकरी आवर्जून काळजी घेतात.

जीवनाचे रहाटगाडगे सतत सुरू असते. पण माणसाने तेच ते छापील आयुष्य जगण्यापेक्षा थोडे धाडस दाखवून आयुष्य कधी तरी वेगळे, साहसपूर्ण, सौंदर्यपूर्ण जगण्यास हवे. अज्ञात शक्ती त्याच्या पाठीशी आहे याची प्रचीती थोड्या फार फरकाने नक्की अनुभवास येते. महत्त्वाचे म्हणजे मोबाईलला रेंज नद्या, डोंगर, दऱ्या ओलांडताना बऱ्याच भागांत मिळत नाही, त्यामुळे विनाकारण फोनवर बोलण्यात वेळ वाया जात नाही. कोणतेही प्रापंचिक व्यवधान परिक्रमेच्या कालावधीत नसल्यामुळे व्यक्ती तिच्याच मस्तीत चालत राहते. तसे निरामय आयुष्य जगण्याची संधी परिक्रमेच्या निमित्ताने मिळत असते. मन तेवढे स्वच्छंद तरी असावे वा भाविक तरी !

सुरेंद्र दामले9511735349 कोथरूड, पुणे.

अनिल कुलकर्णी 9403805153 anilkulkarni666@gmai.com

डॉ. अनिल कुलकर्णी हे जालना येथील वसंतराव नाईक अध्यापक महाविद्यालयात प्राचार्य होते. ते औरंगाबादच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठात विभागीय संचालक आणि महाराष्ट्र राज्य प्रौढशिक्षण संस्था साधन केंद्र येथे संचालक होते. ते शिक्षण क्षेत्रातील कल्पक व्यक्तीमत्त्वांचा शोध घेऊन त्यांविषयी लेखन करतात. त्यांचे लेखन विविध नियतकालिकांत प्रसिद्ध झाले आहे. ते पुणे येथे राहतात.

 

About Post Author

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here