सुलभा सावंत ‘महाराष्ट्रातील पहिल्या संबळवादकम्हणून ओळखल्या जातात. पहिल्याच का, तर त्या एकमेव स्त्री संबळवादक आहेत. त्यामुळे ‘सुलभा सावंत आणि संबळहे समीकरणच होऊनच गेले आहे. त्यांचा स्वभाव लहानपणापासून धाडसी. त्यात त्या पोलिसखात्यात असलेल्या त्यांच्या वडिलांबरोबर खूप फिरल्यामुळे त्यांचे डॅशिंग व्यक्तिमत्त्व तयार झाले आहे. काहीतरी वेगळे जगायचे अशी त्यांची मानसिकता आहे. त्यांना गाण्याची आवड मातुल घराण्याकडून वारसा म्हणून मिळाली. ती आवड जपण्यासाठी त्या डोंबिवलीतील रागिणी भजन मंडळात सामील झाल्या. सुलभा त्या मंडळाच्या नलिनी जोशी ह्यांना आपल्या गुरू मानतात. भजनी मंडळात जोगवा वगैरे गाण्यासाठी संबळवादकाची गरज होती. गोंधळामध्ये गायली जाणारी गाणी संबळवादनाशिवाय अपुरी वाटतील, म्हणून नलिनी जोशी यांनी सुलभा यांना संबळवादन शिकण्यास सांगितले. सुलभा यांना ह्रिदम वाद्ये वाजवल्यामुळे वाद्याची समज होती, त्याही संबळ शिकण्यास तयार झाल्या.
संबळ
त्या संबळेच्या शोधात निघाल्या. ते साल 1986 होते आणि तेथेच त्यांच्या जीवनातील नवीन पर्वाचा उदय झाला. त्या परंपरागत संबळ-वादकांकडे संबळ बघण्यास गेल्या तेव्हा त्यांना असे सांगितले गेले, की संबळावर स्त्रीची सावलीदेखील पडू देत नाहीत! बाईला संबळ शिकवणे ही तर अशक्य गोष्ट आहे. पण सुलभा यांनी जिद्दीने संबळ मिळवले आणि एकलव्यासारखी साधना करत त्यात प्रावीण्य कमावले. रागिणी भजनी मंडळाचे ते मोठेच आकर्षण झाले. त्या मंडळाचे महाराष्ट्रात आणि भारतातही खूप ठिकाणी कार्यक्रम झाले.
पण गंमत अशी, की त्याच काळात संबळ हे वाद्य सुलभा यांच्या जीवनाचाही भाग बनून गेले आणि भजनी मंडळातील मर्यादित सहभागाबद्दल त्यांना अपुरेपण जाणवू लागले.
संबळ हे वाद्य कुलधर्म, कुलाचार, परंपराम्हणून उपयोगात येते. संबळ हे वाद्य गोंधळी गाताना तुणतुण्याबरोबर सोयीचे वाद्य म्हणून ते वापरतात. गोंधळ हा संबळेच्या तालावर आकार घेतो. संबळावर वाजवण्यासाठी आराटीच्या मुळीचा खास आकडा तयार केलेला असतो. त्यामुळे संबळाचा आवाज घुमून श्रोत्यांच्या शरीरात कंप पावत शिरतो.
संबळवादनात प्रावीण्य मिळाल्यावर, सुलभा यांचे लक्ष गोंधळाकडे गेले. पण गोंधळ घालणे शिकवणार कोण? त्या व्यवसायातील धर्मांध लोक विरूद्ध होते. त्यांच्यापैकी कोणालाही ही गोष्ट रूचणारी नव्हती. जातीबाहेरच्या स्त्रीने हे धाडस करू नये हाच विचार प्रबळ होता. पण सगळ्या अडथळ्यांवर मात करत, संघर्ष करून सुलभा संबळ गळ्यात अडकावून ‘गोंधळ’ घालण्यासाठी उभ्या राहिल्या आणि जिंकल्याही!
गोंधळ काय असतो? तर घरी मुंज, लग्न असे काही शुभकार्य पार पडले की कुलाचार म्हणून देवीची स्तुतिपूजा आणि त्याचबरोबर मनोरंजन, श्रमपरिहार होईल असा कार्यक्रम. त्यात आख्यान, गायन–वादन आणि जागरण असते. गोंधळाचा विशेष प्रभाव मराठवाडा, विदर्भआणिपश्चिम महाराष्ट्र ह्या भागात आहे. कुलाचाराबराबेर कथागीत, विधिगीत, उपासनानृत्य, विधिनाट्य आणि लोकधर्मी नाट्य यांचा सुंदर मिलाफ कार्यक्रमात असतो. म्हणजे ‘गोंधळ’ घालणे हाच परंपरेने, पिढ्यानुपिढ्या व्यवसाय करणारे कलावंत हे गोंधळी ही जात लावतात. त्यांच्यात पोटजाती आहेत, घराणी आहेत. तुळजाभवानी आणि रेणुकाआई ह्या त्यांच्या स्तुतिदेवता. गोंधळी त्यांची स्तुती करत गावोगावी, घरोघरी हिंडत असतात. त्यांची वर्षांनुवर्षे गायली जाणारी गाणी सिनेसंगीतातील देवादिकांच्या गाण्यांचे मूळ स्रोत आहेत. काही लोकप्रिय गाणी गोंधळातून जशीच्या तशी उचलली गेली आहेत.
सुलभा यांनी संबळवादन स्वत: आत्मसात केले, पण गोंधळ कसा शिकणार हा प्रश्न होता. प्रकाश खांडगे ह्यांचा पाठिंबा, लोकगीत, लोककथा, लोककलाआणि लोकउपासक यांच्याशी बालपणापासूनचे ऋणानुबंध आणि ज्या संस्कृतीत जन्म झाला त्या लोकसंस्कृतीच्या आभाळातील चंद्र-चांदण्या शोधणारे गणेश हाके ह्यांचा स्नेह व त्यांचे पुस्तक त्यांच्या मदतीला आले. त्यांना ‘गोंधळ’ अर्थात ‘जांभूळ आख्यान एक शोध’ ह्या पुस्तकाने खूप काही शिकवले. त्यांनी अभ्यासाने आणि परिश्रमाने गोंधळ घालण्याची कला, क्षमता आणि पध्दत मिळवली.
वजनदार संबळाची जोडी गळ्यात अडकावून लय, ताल आणि तोल सांभाळून, तडफदार गायन करत दोन-तीन तास खूप आत्मविश्वासाने आपली कला सादर करण्याचे आव्हान सुलभा यांनी यशस्वीपणे पेलले आहे; समाजाला त्यांची कदर करण्यास लावले आहे.
त्यामुळेच ज्या समाजाने त्यांना संबळशिकवणे नाकारले होते त्या समाजाकडून त्यांना कार्यक्रमांची सन्मानपूर्वक आमंत्रणे येऊ लागली. अखिल भारतीय गोंधळी समाजाचे अधिवेशन 1988 साली पुण्यामध्येभरले होते. त्यात सुलभा यांचा पहिली स्त्री संबळवादक म्हणून सत्कार झाला. पार्श्वभूमी नसताना एका बाईमाणसाने ह्या क्षेत्रात एवढे पुढे जाणे हे कौतुकास्पदच! कदाचित कोठल्याही पुरूष गोंधळ्यालाही आजवर मिळाले नसतील एवढे सन्मान आणि पुरस्कार त्यांना लाभले. दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीकडून 2005 साली लाभलेला ‘हिरकणी पुरस्कार‘ हा त्यांना सर्वोच्च गौरवाचा वाटतो. त्यांना खेडोपाडी आणि घरीदारी मिळणारे प्रेम, कौतुक आणि आपुलकी मोलाची वाटते.
आकाशवाणीवर एका कार्यक्रमात
सुलभा सावंत त्यांच्या ग्रूपसोबत
काळाच्या ओघात ‘गोंधळा‘चे स्वरूप बदलत आहे. आख्यान, कथा वगैरेला फाटा देऊन फक्त पूजा आणि गाणी एवढे मर्यादित स्वरूप त्याला प्राप्त होऊ लागले आहे. शहरात कोणतीही गोष्ट आता सेलिब्रेशन म्हणून होते. लग्नानंतर गोंधळाचे सेलिब्रेशन एक तास चालते. सुलभा यांचे म्हणणे असे, की गोंधळ कोणीही त्यांच्या कुलदैवताची स्तुती करण्यासाठी घालू शकतो. गोंधळाचे स्वरूप गेल्या दोन-तीन दशकांत खूप बदलले आहे. बदललेल्या गोंधळाचे छान आयोजन त्या ‘भक्तिरंग’ ह्या त्यांच्या संस्थेकडून करतात. तबला, ढोलक, नृत्यनिपुण कलाकार, पेटी, झांज आणि त्यांचे संबळ ह्या सर्वांचा एकत्रित प्रयोग छान सजतो. त्यांनी घातलेले गोंधळ आणि भक्तिरंगाचे कार्यक्रम ह्यांची संख्या पाच हजाराच्या पुढे गेली आहे!
त्यांनी संबळवादन शिकवण्यासाठी वर्ग काढले, पण त्यातून उल्लेखनीय शिष्य तयार झाले नाहीत ही त्यांची खंत आहे. तसेच, तबल्या-डग्ग्याचे महत्त्व संबळेच्या जोडीला नाही ह्याचाही त्यांना विषाद वाटतो. त्या कलाप्रकारात फार आस्था राहिलेली नाही असा त्यांचा अनुभव आहे.
वैयक्तिक पातळीवर, त्या स्त्रियांच्या सन्मानासाठी, अन्यायग्रस्त महिलांना मदत करण्यासाठी नेहमी सजग असतात. कोणीही माझी मदत रात्री-अपरात्री मागावी असे त्या जाहीरपणे सांगतात. गोंधळात किंवा ‘भक्तिरंगा’च्या कार्यक्रमात, देवासमोर जसे दानपात्र असते तशी एक ‘परडी‘ असते, त्यात सढळ हस्ते दान करण्याचे आवाहन त्या जनतेला करतात. जनताही त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद देते. त्या दानाचा ‘विनियोग‘ त्या विधवा, परित्यक्ता आणि त्यांची मुले ह्यांच्यासाठी करतात. कोठेही दुर्लक्षल्या जाणा-या विधवा, परित्यक्ता किंवा काही कारणाने भेदभाव वाट्याला आलेल्या स्त्रियांना त्या आवर्जून पूजा करण्यास बोलावतात. हळदकुंकू न करता तिळगूळ समारंभ करा, मला आणि ह्या सगळ्यांना बोलावा असा त्यांचा आग्रह असतो. शं.ना. नवरे सुलभा यांना गोंधळीण म्हणायचे.
पुरुषांच्या क्षेत्रात पाय घट्ट उभारून राहिलेल्या, त्यांची पुरोगामी धाडसी मते आग्रहाने सांगणा-या सुलभा सावंत परखड, त्वेषाने बोलणा-या, जोशात गाणा-या आहेत! त्यांच्या गाण्याने आणि संबळवादनाने श्रोते आनंदी, उत्साही आणि चकितही होतात. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातून आणि संबळातून प्रवर्तित होणारे चैतन्य सभोवतालचे वातावरण भारून टाकते.
– ज्योती शेट्ये9820737301
jyotishalaka@gmail.com
ज्योती शेट्ये या डोंबिवलीच्या राहणा-या. त्यांनी कौटुंबिक जबाबदाऱ्यांसाठी मुंबई पोर्ट ट्रस्टमधील नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर त्या ‘वनवासी कल्याणाश्रम‘ या संस्थेत काम करू लागल्या. ईशान्य भारतातील वनवासी समाजात जाऊन राहणे, त्यांच्यासाठी काम करणे, तेथील मुलांना शिकवणे हा त्यांच्या आयुष्याचा भाग होऊन गेला आहे. त्यांनी ईशान्य भारतातील अनुभवांवर आधारित ‘ओढ ईशान्येची‘ हे पुस्तक लिहिले आहे. त्या सध्या अंदमानात कार्य करत आहेत.
ज्योती शेट्ये या डोंबिवलीच्या राहणा-या. त्यांनी कौटुंबिक जबाबदाऱ्यांसाठी मुंबई पोर्ट ट्रस्टमधील नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानंतर त्या ‘वनवासी कल्याणाश्रम‘ या संस्थेत काम करू लागल्या. ईशान्य भारतातील वनवासी समाजात जाऊन राहणे, त्यांच्यासाठी काम करणे, तेथील मुलांना शिकवणे हा त्यांच्या आयुष्याचा भाग होऊन गेला आहे. त्यांनी ईशान्य भारतातील अनुभवांवर आधारित ‘ओढ ईशान्येची‘ हे पुस्तक लिहिले आहे. त्या सध्या अंदमानात कार्य करत आहेत.
कलेचा ध्यास म्हणजे काय असतो ह्याचे मूर्तिमंत उदाहरण !