दत्तात्रेय रामचंद्र बेंद्रे यांची मातृभाषा मराठी, पण त्यांनी ‘ज्ञानपीठ’ हा साहित्यातील अत्युच्य सन्मान कन्नड भाषेत लेखन करून मिळवला ! ते कवी होते. द.रा. बेंद्रे यांना ‘ज्ञानपीठ’ हा पुरस्कार मिळून पन्नास वर्षे पूर्ण झाली. बेंद्रे यांना हा पुरस्कार विभागून मिळाला होता. त्यांच्या बरोबरीने गोपीनाथ मोहंती या उडिया साहित्यिकाला तो पुरस्कार प्राप्त झाला होता.
द.रा. बेंद्रे यांचा जन्म धारवाड येथील एका ब्राह्मण कुटुंबात 13 जानेवारी 1896 रोजी झाला. त्यांचे मूळ घराणे रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील केळशीचे. बेंद्रे कुटुंब तासगाव, शिरहट्टी असे स्थलांतर करत शेवटी धारवाड येथे स्थायिक झाले. बेंद्रे यांना आईवडिलांकडून उत्तराधिकारी म्हणून फक्त दोन तऱ्हांची संपत्ती मिळाली – संस्कार आणि विद्यानुराग. द.रा. बेंद्रे यांचे आजोबा मर्मी वेदज्ञ होते. त्यांच्या वडिलांना गंडमाळेचा विकार होता. पण त्यांनी पूर्वजांकडून आलेले ज्ञान मुलांना सोपवता यावे म्हणून स्वतःला जिवंत ठेवले होते ! वडिलांचे छत्र बेंद्रे बारा वर्षांचे असताना हरवले. मग आईने त्यांच्या कवी प्रतिभेला योग्य दिशा दिली. त्यांची आई मराठी भाषिक होती. ती मराठी संत साहित्याची भोक्ती होती. पण आईदेखील मुलांना केवळ प्रेम देऊ शकली, त्या प्रेमातून बेंद्रे यांच्या मनांत प्राणिमात्रांविषयी आणि सृष्टीच्या निर्मात्याविषयी आस्था निर्माण झाली.
बेंद्रे यांचे शालेय शिक्षण धारवाड येथे झाले. ते बी ए पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून झाले. त्यांनी एम ए ही पदवी मुंबई विद्यापीठातून प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी शिक्षक म्हणून नोकरी 1932 पर्यंत धारवाड, गदग, हुबळी येथे केली. त्यांना त्यांच्या ‘नरबळी’ या कवितेमुळे 1932 साली तुरुंगवास आणि अज्ञातवास भोगावा लागला होता. त्यांच्या जीवनात 1943 सालापर्यंत स्थिरता नव्हती. नंतर ते पुण्यातील कॉमर्स कॉलेजमध्ये कन्नड भाषा साहित्याचे प्राध्यापक झाले. त्यांनी सोलापूर येथील डी ए व्ही कॉलेजमध्ये कन्नडचे प्राध्यापक म्हणून 1947 ते 56 पर्यंत काम केले. त्यांनी धारवाड आकाशवाणी केंद्राचे सल्लागार म्हणून काम 1956 ते 66 पर्यंत पाहिले.
बेंद्रे यांना पंच्याऐंशी वर्षांचे आयुष्य लाभले. त्यात त्यांनी सव्वीस कवितासंग्रह, दोन नाटके, एक कथासंग्रह, समीक्षेची नऊ पुस्तके असे साहित्य कन्नड भाषेत निर्माण केले. त्यांनी विविध साहित्यप्रकारांत लेखन केलेले असले तरी त्यांची खरी ओळख कविश्रेष्ठ अशीच राहिलेली आहे. त्यांनी मराठीतदेखील साहित्य लिहिलेले आहे. त्यांचे मराठी लेखन कन्नडमध्ये नेले आनंद झुंझुरवाड यांनी. त्यांना कन्नड साहित्यातील ‘वरकवी’ ही पदवी प्रदान करण्यात आली होती. त्यांनी अंगभूत अशा अलोट प्रतिभाशक्तीने अत्यंत रोमांचक, अध्यात्मप्रवण, भाषिक दृष्ट्या अद्भुत असे काव्यवैभव कन्नडमध्ये निर्माण केले. त्यांच्या कवितांमधून सौंदर्यवादी निसर्गप्रतिमा, स्त्री-पुरुष नात्यातील आनंदोत्सव, त्यांची कुटुंबवत्सलता यांबरोबरच राष्ट्रीय उलथापालथीचेही भान प्रकटते.
त्यांनी ‘बालकांड’ या कवितेत त्यांच्या बालपणीच्या दिवसांतील काही प्रसंगांचे वर्णन केलेले आहे. त्या काळी एकूण समाजातच गरिबी होती. तरीदेखील सगळीकडे जिवंतपणा होता. गाण्याशिवाय कोणतेही सामाजिक अथवा कौटुंबिक कार्य होत नसे. भक्त आणि भिकारी, नर्तक आणि सोंग काढणारे, फेरीवाले हे देखील त्यांची गाणी गात येत. त्या गीतांची भाषा, त्यांच्यातील विविधता ह्यांचा बेंद्रे यांच्या बालमनावर प्रभाव पडला. त्यातून झालेले संस्कार त्यांच्या काव्यशक्तीचा मूळ स्रोत बनले ! त्या समाजाच्या नियतीशी बेंद्रे भावनेच्या स्तरावर जोडले गेले होते. त्यांचा पहिला कवितासंग्रह प्रसिद्ध 1932 मध्ये झाला. पण त्यापूर्वीच त्यांना जनतेने ‘लोककवी’ म्हणून स्वीकारले होते !
त्यांना कन्नड, संस्कृत आणि मराठी या विविध भाषिक संस्कृतीमध्ये वावरता आले. त्यांनी त्यांच्या त्याच वैशिष्टयपूर्ण वावरामुळे विठ्ठल हा कन्नड आणि मराठी भाषा-संस्कृतीतील समन्वय आहे हे वास्तव अधोरेखित करून ठेवले. एकूणच, मानवी अस्तित्वातील समन्वय त्यांच्या चिंतनकक्षेत केंद्रवर्ती आहे.
त्यांनी कविता 1916 च्या आधीपासून मराठी, कानडी, इंग्रजी आणि संस्कृत भाषांमध्ये केल्याचे दिसते. त्यांनी गुरु गोविंदसिंह, कबीर रचनावली, रवींद्रनाथ टागोर यांच्या कवितांचे कन्नड अनुवादही केले आहेत. त्यांनी संत साहित्याचादेखील पद्यानुवाद केला. बेंद्रे हे इतर आधुनिक कवींप्रमाणे आत्म्याच्या आवाजाला ओ देणारे कवी आहेत, पण त्यांची आत्मजाणीव इतरांपेक्षा वेगळी होती. आधुनिक कवींच्या बाबतीत त्यांचा अहंकार आत्मजाणिवेत अधिकतर असतो. बेंद्रे यांची आत्मजाणीव ही त्यांच्या कवी असण्याच्या अनुभूतीच्या उच्च विचारांची देणगी आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर समस्या लोकांच्या भावनेशी, बौद्धिक आणि आध्यात्मिक अनुभूतीचा ताळमेळ कोणत्या प्रकारे बसवावा ही सुरुवातीपासूनच उभी राहिली. त्यांनी ते कार्य किती सफलतापूर्वक केले त्याचे प्रमाण त्यांच्या काव्यातून मिळते. अशा प्रकारे बेंद्रे यांनी चिंतन आणि भावानुभुती, वस्तुपर आणि आत्मपर विषय या दोन्हींचेही समायोजन त्यांच्या काव्यात केल्यामुळे त्यांच्या काव्याला काही टीकाकारांनी ‘बौद्धिक’ काव्य असे म्हटले आहे. त्यांच्या कितीतरी कविता बौद्धिक असल्या तरी त्यांच्या इतर कविता आध्यात्मिक आणि रहस्यवादी आहेत. पण ज्या कवीने मानवी जीवन आणि त्यातील अनुभूती यांना चिंतनाचा आणि अभिव्यक्तीचा विषय बनवले. त्यांच्या कवितेत एकरूपतेची अपेक्षा करणे कितपत योग्य आहे? त्यांची बहुचर्चित एक कविता आहे, त्यात उडत्या पक्ष्याची प्रतिमा वापरण्यात आली आहे. त्या द्वारे काळाच्या वेगाचे सूचन करण्यात आलेले आहे. पण ते सूचन काळाचे केवळ नेहमीच्या अर्थाने नाही तर मानवी जीवन आणि जगाच्या इतिहासाच्या संदर्भात आहे. तेच त्या कवितेचे वैशिष्ट्य आहे. काळ म्हणजे ठरवून दिलेला कालावधी या भावनेने तो तेथे घेतलेला आहे आणि तो अर्थ कवितेच्या मर्यादांचे उल्लंघन न करता प्रकट केलेला आहे.
हे खरेच आहे, की बेंद्रे यांच्या काव्यातील रहस्यवाद आणि त्यांची तात्त्विक बाजू ही वेगळ्या प्रकारची आहे. त्यात परमेश्वराविषयी स्थिर श्रद्धाही आहे. ते विश्वाला मायारूप नव्हे तर वास्तविक मानतात. त्यांनी त्या श्रद्धेच्या प्रकाशातच मानवी स्वातंत्र्य आणि कर्तव्यभावना या संबंधीचे नाना प्रश्न निरखले. ते सगळे प्रश्न दैवी इच्छेच्या अधीन असतात हे त्यांच्या लक्षात आले. अर्थात ती दैवी शक्ती निरंकुश असत नाही. ती तर करुणा आणि प्रेम यांचे भांडार असते ! परमेश्वर आईच्या भावनेने माणसानेच निर्माण केलेल्या सृष्टीची देखरेख करतो. त्याने आईप्रमाणेच त्याच्या लेकरांना स्वातंत्र्यही दिलेले आहे. मातृभावातील ते दिव्यत्व बेंद्रे यांच्या कवितेच्या केंद्रस्थानी आहे. नितांत अस्ताव्यस्त आणि उद्विग्न अशा या जगात जी काही व्यवस्था आहे ती त्या आईमुळे आहे. आईच्या कृपेमुळेच तेथे सभ्यतेचा आणि संस्कृतीचा विकास झालेला आहे. बेंद्रे यांच्या दृष्टीने स्त्री हा अत्यंत विलक्षण आणि जिज्ञासेचा विषय आहे. स्त्रीच्या शक्ती-सामर्थ्याचे आणि महत्तेचे वर्णन करताना त्यांची लेखणी कधी थकत नाही.
त्यांच्या ज्या कवितासंग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त झाला आणि ज्याला पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत त्या कवितासंग्रहाचे शीर्षक आहे ‘नाकुतन्ती’. त्यात चव्वेचाळीस कवितांचा समावेश आहे. त्यांतील सहा कविता समकालीन लेखकांच्या नातेसंबंधांवर आणि लोकशाहीसंबंधीच्या वास्तविक अभिप्रायावर आधारलेल्या आहेत. बाकीच्या कवितांतून विचार, चिंतन आणि भावना यांची विलक्षण संगती बघण्यास मिळते.
चार या अंकाची धारणा कवी बेंद्रे यांच्या अंतरात्म्यात बसली आहे, ती त्यांच्या सगळ्या कवितांच्या ढाच्याचे मूलतत्त्व आहे. त्यामुळेच त्यात भावसंगतीदेखील येऊ शकली. शीर्षक कविता ‘नाकुतन्ती’मध्ये कवीच्या व्यक्तित्वाच्या चार बाजूंचे – मी, तू, तो आणि कल्पनाशील आत्मसत्ता यांचे – वर्णन आलेले आहे. कवितेच्या सृजन प्रक्रियेविषयीच्या सहा सॉनेट्समध्ये बेंद्रे यांनी कवितेच्या चार मूलतत्त्वांची गणना केलेली आहे. ती तत्त्वे आहेत – शब्द, अर्थ, लय आणि सहृदय. कवीने संग्रहातील एका अन्य कवितेत अशा प्रकारेच वाक्शक्तीच्या चार रूपांचे – परा, पश्यन्ती, मध्यमा आणि वैखरी यांचे – वर्णन केले आहे. बेंद्रे यांच्या सौंदर्यविषयक कल्पनेच्याही चार बाजू आहेत – इंद्रियगत, कल्पनागत, बुद्धिगत आणि आदर्श. या सगळ्या बाजू त्यांच्या कवितेत कोठे ना कोठे योग्य जागी आलेल्या आहेत. अनुभूतींची नवनवीन क्षेत्रे शोधून काढणे आणि ती वाचकांसमोर आणणे इतकाच ‘नाकुतन्ती’मधील कवितांचा उद्देश नाही. परिचित झालेल्या अनुभूतींना नवा दृष्टिकोन देणे आणि जगाशी असलेले भावसंबंध कवितेच्या माध्यमातून समजून घेणे असाही कवीचा प्रयत्न आहे. तसेच, ‘स्व’ मध्ये राहून, विश्वाची संपूर्ण व्यवस्था ज्याच्या अधीन राहून चालते, ती नियमतत्त्वे समजून घेऊन सगळ्यांसमोर ठेवावीत असाही प्रयत्न आहे.
बेंद्रे यांना ‘ज्ञानपीठ’ पुरस्काराच्या वेळी जे प्रशस्तिपत्र देण्यात आले त्यात लिहिले आहे, की “पुरस्कारपात्र ‘नाकुतन्ती’ या कन्नड काव्यसंग्रहातून वर्तमानाचे उपहासात्मक रूप, सांस्कृतिक भूतकाळाचा आणि भविष्यकाळाचा सशक्त प्रतीकांद्वारे निष्कर्ष; तसेच, स्थायी व समग्रात्मक मूल्यांचे समर्थन प्रस्तुत केले गेले आहे. बेंद्रे यांच्या काव्यात एखाद्या गोष्टीचे प्रकटीकरण व रूपांतरण करण्याची क्षमता आहे. त्यात व्यक्तीपासून समष्टीपर्यंतच्या सर्व गोष्टींचा समावेश आहे.”
बेंद्रे यांच्या नंतरच्या वर्षीचा 1974 चा पुरस्कार मराठी भाषेतील लेखक वि.स. खांडेकर यांना मिळालेला आहे. तो पुरस्कार 26 फेब्रुवारी 1976 ला वितरीत करण्यात आला.
– चंद्रकांत भोंजाळ 9757061772 bhonjalck@gmail.com