ही गोष्ट आहे 1994 सालची. ‘गुटिका केशरंजना’ची धून आकाशवाणीवरून सकाळी सहा वाजता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गुंजू लागली आणि ‘आगोम’ हे नाव महाराष्ट्राच्या घराघरात पोचले ! ‘आगोम’चे गूढ त्याच्या नावापासून सुरू होते, पण लोक आकृष्ट झाले ते त्या गुटिकेमुळे, ‘डोक्याचे केस शाबूत राहतात’ या प्रभावाने.
‘आगोम’ हे औषधालय रत्नागिरी जिल्ह्यात समुद्रकिनारी एका छोट्याशा खेड्यात वसले आहे. दापोली तालुक्यातील कोळथरे हे ते गाव. ते सध्या कासव महोत्सवामुळेही गाजत आहे. ‘आगोम’ या शब्दाने व त्या कारखान्याच्या औषधाने एकदम त्या ठिकाणाचे नाव महाराष्ट्रात सर्वदूर पसरले. दिवसातून दोन वेळा येणारी एसटी बस एवढेच काय ते त्या गावाच्या बाहेर संपर्काचे माध्यम त्या काळी होते. पण आम्हा ‘आगोम’ कुटुंबीयांना ते दिवस आठवतात – पोस्टाची बॅग संध्याकाळच्या गाडीने येई. आम्ही कारखान्यातील मंडळी त्या पिशवीची आतुरतेने वाट पाहत असू ती पोस्टबॅगमधून ग्राहकांची पत्रे किती आली, मनीऑर्डरी किती आल्या, ड्राफ्ट किती आले आणि नवीन मागणी काय आहे अशा विविध विचारणांची ! कथा-कादंबरीत नोंदवावा असा तो काळ, पण कृष्णामामा महाजन यांनी तशा परिस्थितीत गावातील लोकांना रोजगार मिळावा म्हणून हट्टाने गावातच व्यवसाय सुरू केला होता. मामा उद्योगाचे नाव व औषधे सर्वदूर पसरावी म्हणून प्रयत्न करत होते. त्यातच एक होती रेडिओवरील जाहिरात. तिने मात्र किमया केली होती. ‘आगोम’बद्दलचे अवघ्या महाराष्ट्रात कुतूहल जागे झाले.
मामा म्हणजे श्रीकृष्ण गोपाळ महाजन. त्यांना रत्नागिरी जिल्ह्यात कृष्णामामा म्हणून ओळखले जाई. मामांची बहीण गावातच मनोहर यांच्याकडे दिलेली होती. तिचा मुलगा राजा हा त्यांना मामा म्हणत असे, म्हणून सारा गाव त्यांना मामा म्हणू लागला. कृष्णामामांना त्यांच्या वडिलांचे मुखही पाहण्यास मिळाले नाही. श्रीकृष्णमामा यांच्या जन्माच्या दोन महिने आधीच वडील गोपाळराव यांचे निधन झाले. आई – आनंदी महाजन यांनी कष्टात मोठ्या निगुतीने संसार करून, मुलांना उत्तम संस्कार देऊन वाढवले. मामा उच्च शिक्षणासाठी मुंबईला गेले आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संपर्कात आले. ते संघप्रचारक इंटर सायन्सला शिकत असताना, 1945 साली, ज्येष्ठांचा विरोध पत्करून झाले. संघावर बंदी महात्मा गांधी यांच्या निधनानंतर 1948 साली आली. म्हणून ते त्यांच्या कोळथरेला घरी परत आले. तेथे सुरू झाली त्यांच्या संघर्षमय झंझावाती जीवनाची कहाणी. मामा दापोली– जालगाव येथील दांडेकर यांची मुलगी शांता यांच्याशी लग्न करून प्रापंचिक झाले.
मामांची जीवनकहाणी संवेदनशील मन, समजाप्रती कणव, तीक्ष्ण बुद्धिमत्ता, दूरदृष्टी, सेवाभाव, अपरंपार राष्ट्रभक्ती यांतून घडत गेली. कोळथरे गावात डॉक्टर काय वैद्यही नव्हता. कृष्णामामांचे मामा हे वैद्यरत्न चूडामणि महादेवशास्त्री जोशी. कृष्णामामांना त्यांच्याकडून वैद्यकीचा वारसा जन्मजात मिळाला. त्यांनी गावातील रुग्णांची सेवा सुरू केली. त्यासाठी विविध औषधी पद्धतींचा अभ्यास केला. तशातच ज्येष्ठ संघप्रचारक कै. शिवराय तेलंग यांनी त्यांना ‘ड्रग्ज ऑफ हिंदुस्थान’ नावाचे पुस्तक वाचण्यास दिले. त्या सगळ्याचा परिणाम म्हणून जन्माला आली ‘आगम औषधोपचार’ पद्धत. वेदवाङ्मयास ‘आगम’ म्हणतात, म्हणून त्या पद्धतीचे नाव ‘आगम’ असे ठरले. मामांनी व्यवसायाचे नाव ‘आगोम’ (आनंदी गोपाळ महाजन) असे ठेवले. त्यांच्या आईच्या नावाची आद्याक्षरे घेऊन ‘आगम’ आणि ‘आगोम’ असा नामसाधर्म्याचा योग जुळून आला. आयुर्वेदिक औषधे सूक्ष्म करणे या पद्धतीला कृष्णामामांनी ‘आगोम’ असे नाव दिले.
‘आगोम औषधालया’ची संकल्पना विकसित झाली, ती आजीबाईच्या बटव्याला समर्थ पर्याय म्हणून ! ती पद्धत ‘डॉक्टर नसेल तेथे’ प्रथमोपचारासाठी फार उपयुक्त ठरली. कोणाच्याही सल्ल्याशिवाय स्वतःला घेता यावीत म्हणून कोणताही दुष्परिणाम नसलेली, घेण्यास सुलभ, किंमतीत परवडणारी अशी आयुर्वेदिक सूक्ष्म औषधे. तशा औषधांच्या निर्मितीचा ध्यास मामांच्या कष्टामागे होता. तो ध्यास आणि कृष्णामामांचा आत्मविश्वास हे ‘आगोम’च्या जन्मास कारणीभूत ठरले. मूलद्रव्य आयुर्वेदिक ग्रंथोक्त पद्धतीने घेऊन, त्याचे ‘टिंक्चर’ अल्कोहोल वापरून तयार करण्याची ती अभिनव कल्पना होती.
म्हणजेच आयुर्वेदिक सूक्ष्म औषधे ! त्याचे फायदे अनेक आहेत. मूलद्रव्य घेतल्याने वनस्पतींची गरज अत्यल्प होते. निर्मिती प्रक्रिया साधीसोपी आहे. त्यामुळे उत्तम दर्ज्याची औषधे सातत्याने निर्माण करता येतात. निर्मिती खर्चच कमी आहे, त्यामुळे औषधे कमी किंमतीत मिळतात. कडू काढे गोड गोळ्यांच्या स्वरूपात आल्याने, लहान मुलेही ‘आगोम’ची औषधे मोठ्या आवडीने घेतात.
त्या ‘आयुर्वेदिक सूक्ष्म औषधी’च्या निर्मितीच्या परवान्याचा प्रवास हा 1964 साली सुरू झाला; आणि 2006 साली थांबला तो ‘होमिओपॅथिक औषधे’ असा शिक्का घेऊन ! नवीन प्रकारची उत्पादने निर्माण करून, ती बाजारात उपलब्ध करून, त्याची मागणी निर्माण करणे- स्वतःचा ग्राहकवर्ग तयार करून त्याला सातत्याने उत्तम दर्ज्याची उत्पादने उपलब्ध करून देणे हे उद्योग यशस्वी होण्यामागे गरजेचे असते. कृष्णामामांनी तीच किमया साधली. ‘आगोम उद्योग’ एकीकडे परवान्यासाठीचा लढा आणि दुसरीकडे बाजारातील आव्हाने या कसरतीतून स्थिरावत गेला, कारण त्यामागे वैचारिक ठाम अशी भूमिका होती. उत्तम दर्ज्याची उत्पादने रास्त दरात ग्राहकांना पुरवणे हे तत्त्व त्यामागे होते.
आणीबाणी 1975 साली जाहीर झाली. मामांवर वॉरंट बजावले गेले. ते भूमिगत होऊन मुंबईला गेले. त्यांना ती जणू संधीच प्राप्त झाली. कारण खऱ्या अर्थाने, ‘आगोम औषधां’च्या व्यवसायाला व प्रचाराला तेथे सुरुवात झाली. त्यांनी पहाटे चारला उठून, दिवसभर घरोघरी फिरून औषधांचा प्रचार सुरू केला. त्यांनी वयाच्या पंचावन्नाव्या वर्षी औषधविक्रीच्या व्यवसायाची सुरुवात केली ! अथक परिश्रमाला दूरदृष्टीची साथ देऊन ‘आगोम औषधालया’ची महती घराघरांत पोचवली. घरोघरी विकली जाणारी औषधे एका दुकानात ठेवण्यापासून सुरुवात झाली. व्यवसायवृद्धी मासिके, साप्ताहिके, दिवाळी अंक, वर्तमानपत्रे अशा जाहिरातींच्या विविध माध्यमांचा यशस्वी वापर करून सातत्याने चालू होती. अनेक औषधांच्या जाहिरातींचे प्रयोग झाल्यावर, ‘गुटिका केशरंजना’ची जाहिरात रेडिओवर सुरू झाली. तेथून ‘आगोम औषधालया’चा वारू तूफान वेगाने सुटला. ‘आगोम औषध व्यवसाया’ला सर्व जगाला बसला तसा मंदीचा फटका कोविडनंतर बसला. कारखान्याचा आकार आटोपशीर झाला पण ‘आगोम औषधालय प्रा. लि.’ हे नाव महाराष्ट्रामधील औषध व्यवसायात विश्वासाचे आणि उत्तम दर्ज्याचे प्रतीक बनले आहे.
‘आगोम’ची औषधे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात हजारो मेडिकल स्टोअर्समधून विक्रीला उपलब्ध आहेत. कृष्णामामांच्या सोबत काम करून व्यवसायात स्थिरावलेले त्यांचे मुलगे माधव, मी- दीपक आणि डॉ. रामदास हे ‘आगोम औषधालय प्रा. लि.’ या कंपनीची धुरा सांभाळत आहोत. माधव यांनी अर्थव्यवहारात शिक्षण घेतले, मी शास्त्रशाखा व व्यवसायविद्या यांत पदवीधर झालो आणि रामदास बी ए एम एस डॉक्टर झाला. औषधी निर्मिती बरोबरच, ‘आगोम निर्मिती प्रा.लि’ या नावाने फळप्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातूनही ‘आगोम’ची आमरस, आंबा आणि करवंदे यांचे सरबत ही उत्पादनेही ग्राहकांच्या सेवेत उपलब्ध आहेत. खेड्यात राहून, ग्राहकांची सेवा आणि गावचा विकास असा दुहेरी कार्यभाग सिद्ध होत आहे. आम्ही कृष्णामामांची मुले ‘आगोम’चा हा वसा यशस्वीपणे सांभाळत आहोत !
– दीपक महाजन 9370848797 deepak25mahajan@gmail.com
———————————————————————————————-