मी माझा धाकटा मुलगा रघुराज याच्याकडे सिडनीला आलो आहे. मुलाची बायको – बीॲट्रिस ही मलेशियन-चायनीज-ऑस्ट्रेलियन आहे. म्हणजे तिचा जन्म मलेशियात झाला. ती दहा वर्षांची असताना लिंम कुटुंब, मुलांना चांगले शिक्षण मिळावे म्हणून ऑस्ट्रेलियात 1980 च्या सुमारास आले. बीॲट्रिसचे वडील रिचर्ड लिंम. त्यांचा जन्म व शिक्षण मलेशियात झाले, म्हणून ते स्वतःला मलेशियन चायनीज असे म्हणवून घेतात. रिचर्डचे आजोबा 1948 च्या सुमारास कम्युनिस्टांचा जोर चीनमध्ये वाढत आहे हे बघून चीन सोडून लाओसला आले. पुढे, रिचर्डचे वडील मलेशियात येऊन स्थिरावले. रिचर्डचे बालपण गरिबीत गेले. रिचर्डने मला असे सांगितले, की आम्हाला चांगले शिक्षण मिळावे म्हणून आमच्या कुटुंबाने ख्रिश्चन धर्म स्वीकारला. रिचर्ड व त्याची मुले हे सर्व नावाला ख्रिश्चन आहेत. रिचर्ड म्हणतो, की मी चर्चमध्ये क्वचितच जातो, कारण चर्चमधील फादर हे खूप भ्रष्टाचार करतात. ते मला जराही आवडत नाही. त्याला कम्युनिस्टांविषयीपण खूप राग आहे. तो म्हणतो, जोपर्यंत चीनमध्ये कम्युनिस्ट राजवट आहे तोपर्यंत मी मेन लँड चायनाच्या भूमीवर पाय ठेवणार नाही.

स्थलांतरित लोकांना स्वतःचा देश- स्वतःची संस्कृती यांविषयी काही वाटेनासे होते, असे मला सिडनीला आल्यापासून अनुभवाला येत आहे. मुस्लिम मात्र त्याला अपवाद आहेत. असे दिसून येते, की देश व संस्कृती ही भावना स्थलांतरितांच्या पहिल्या पिढीपर्यंत जागृत असते, तीही थोडीशीच. माझ्या सुनेला- (बीॲट्रिस) मी विचारले, की “तुला चायनाबद्दल काय वाटते?” तर ती म्हणाली, “नथिंग.” तेही बरोबरच आहे, कारण तिने चीन कधी पाहिलेला/अनुभवलेला नाही. परंतु मला आश्चर्याचा धक्का बसला, तो मी हा प्रश्न जेव्हा विजय चितळे या माझ्या चुलत मेव्हण्याचा मेव्हणा समीर टिळक याला विचारला तेव्हा. समीर टिळक यांनी माझ्या प्रश्नाला खांदे उडवून इंग्रजीत ‘नथिंग’ असे उत्तर दिले. मी चकित झालो. समीर टिळक याचा जन्म व शिक्षण जरी अमेरिकेत झाले असले तरी त्याची सख्खी बहीण भारतात राहते. शिवाय, समीर व त्याचे आईवडील दर दोन-तीन वर्षांनी भारतात येत असतात. घरात बऱ्यापैकी भारतीय किंवा महाराष्ट्रीयन वातावरण आहे.
हल्ली बऱ्याचशा मध्यमवर्गीय कुटुंबातील प्रत्येकी एक तरी मुलगा किंवा मुलगी परदेशात स्थायिक झालेले आहेत. त्यांतील काही जणांनी परदेशी मुलींशी लग्ने केली आहेत. तेव्हा भाषा टिकवायची कशी? हा मोठा प्रश्न आहेच. ज्ञानकोशकार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांची परदेशी पत्नी व प्रसिद्ध गणिती डॉ. श्रीराम शंकर अभ्यंकर यांची परदेशी पत्नी यांना मराठी शिकवले गेले व त्या शिकल्या (ही कौतुक करण्यासारखी गोष्ट). पण तो जमाना वेगळा होता. दोघांच्याही बायकांना त्यांचे नवरे विशेष आहेत हे मनोमन पटले असल्यामुळे ते शक्य झाले असावे. परंतु भारतीय संस्कृती व ती ज्या पायावर उभी आहे ते भारतीय तत्त्वज्ञान यांची चांगली जाण असेल तर भाषा बदलली तरी हरकत नाही. याचे उदाहरण म्हणजे रिपब्लिकन पक्षाने निवडलेला उपाध्यक्षाचा उमेदवार- जे.डी. व्हान्स. त्याची बायको उषा चिलुकुरी ही भारतीय हिंदू आहे. व्हान्स यांनी जाहीर विधान केले, की तिच्या भारतीय परंपरेच्या विचारांचा मला खूप फायदा झाला आहे. This may be a political statement to get the support of the Indians. परंतु त्याला काहीतरी वेगळेपण जाणवले असावे.
ऑस्ट्रेलिया हे दक्षिण गोलार्धातील मेल्टिंग पॉट आहे असे वाटते. तेथील मुक्कामात माझा मुलगा (रघुराज) व सून (बीॲट्रिस) ही दोघे आम्हाला व्हिएटनामी, थाई, पर्शियन, इजिप्शीयन अशा विविध हॉटेलांमध्ये जेवण्यास घेऊन गेली. मी व माझी बायको (मंजुश्री) शाकाहारी असल्यामुळे मेनू कार्डवर खूप शोधाशोध करावी लागत असे. पण मला जाणवलेली एक गोष्ट म्हणजे युरोपीयन, चायनीज, कोरियन, लेबनीज किंवा इंडियनसुद्धा असे सर्व प्रकारचे लोक या सर्व हॉटेलांमध्ये दिसले. काही युरोपीयन्स चॉपस्टिक वापरून जेवत होते. त्यामुळे एका वेगळ्या तऱ्हेने विविधतेत एकता दिसली. परंतु सर्व पदार्थ खाऊन मला व मंजुश्रीला मसाला डोसा व मेदुवडा खाण्याची ओढ लागली होती. दोन दिवसांपूर्वी उडपी स्टाईल मसाला डोसा खाल्ला. तेव्हा आत्मा शांत झाला ! त्याच्या आधी येथील मुरुग्गनच्या देवळात प्रसाद म्हणून मसाला डोसा खाल्ला होता, पण त्याची जातकुळी तमिळ असल्यामुळे खरे समाधान मिळाले नव्हते. जिभेला चोचले फार हेच खरे. लिंम कुटुंबाचे एक वैशिष्ट्य असे आहे, की त्यांना सर्व तऱ्हेचे जेवण आवडते. रिचर्ड मलेशियाच्या ज्या भागात राहत असे तेथे आजूबाजूला बरेच तमिळ व पंजाबी लोक राहत होते. त्यामुळे तो लहानपणापासून इंडियन फूड खात आला आहे. त्याच्या शेजारी राहणारा एक पंजाबी त्याला बऱ्याच वेळा नान व डाळ खाण्यास बोलावत असे.
स्थलांतरित लोकांच्या सर्व गोष्टी इंटरनॅशनल होऊन जातात. रिचर्डला तीन जावई आहेत- एक इंडियन, रघुराज – माझा मुलगा. दुसरा अमेरिकन-इटालियन. तो थायलंडमध्ये असतो. तिसरा ऑस्ट्रेलियन-इटालियन तो सिडनीतच असतो. रिचर्डच्या भावाचा एक जावई आहे. त्याचे नाव याप. तो चायनीज आहे, पण तो धर्माने बुद्धिस्ट आहे. परंतु त्याची बायको म्हणजे रिचर्डची पुतणी ही ख्रिश्चन असल्याने, त्याच्या मुलाचे नाव ब्रायन असे आहे. तो मलेशियात असतो. त्याला सर्व चिनी भाषा म्हणजे मेंडेरिन, हॅक्निज, कॅण्टनीज या व मले भाषा येतात. रिचर्डला मेंडेरिन कळते, पण त्याची प्रॅक्टिस नसल्याने चांगले बोलता येत नाही.
लिंम कुटुंब आपापसात इंग्रजीत बोलतात. मला एका मॉलमध्ये फिजीचा भारतीय माणूस भेटला होता. मी त्याच्याशी इंग्रजीत बोलत असताना, त्याने मला विचारले, की “तुम्हाला हिंदी येते का?” मी म्हणालो “हो !” मग मी त्याला विचारले, की “तुम्हाला हिंदी येते का?” तेव्हा तो म्हणाला, “होय, मलाही हिंदी येते.” मी विचारले, की “तुम्ही फिजीला केव्हा गेलात?” तो म्हणाला, “शंभर वर्षांपूर्वी !” मी चकित झालो. तो म्हणाला, “फिजीमधील भारतीय लोक हिंदी चांगले बोलतात. बऱ्याच वेळा, ते हिंदीतच बोलतात.” मी त्याला विचारले, की “तुम्ही फिजीला का व कसे गेलात?” तो म्हणाला, “आम्ही तमिळ ब्राह्मण आहोत.” (दुसरा धक्का बसला – तमिळ असून हिंदी बोलत आहे). तो म्हणाला, की “माझे आजोबा पुजारी म्हणून फिजीत आले व आम्ही येथेच राहिलो. आम्ही मुलीच्या कॉलेजच्या शिक्षणासाठी ऑस्ट्रेलियात ‘मायग्रेट’ झालो आहोत.” त्याची बायको केरळी ब्राह्मण आहे. मी असाच एक प्रसंग टीव्हीवर लाईव्ह पाहिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ॲमस्टरडॅमला भारतीय डायसपोरा (बृहन् भारतीय जनसमुदाय) समोर भाषण केले. श्रोत्यांमध्ये सूरिनाममधील भारतीय मोठ्या प्रमाणात होते. मोदी यांनी हिंदीतून भाषणाला सुरुवात केली, तेव्हा टाळ्या पडल्या. ते पाहून मोदी म्हणाले, की “तुम्ही शंभर वर्षांपूर्वी भारत सोडला, तरी हिंदी भाषा टिकवून ठेवली आहे याचा मला अभिमान वाटतो.” हे वाक्य ऐकल्यावर श्रोत्यांनी जो जल्लोष केला, तो पाहून माझ्या डोळ्यांत पाणी आले. सांगण्याचा मुद्दा असा, की भाषा टिकली तर संस्कृती टिकण्याचे प्रमाण वाढते असे मला वाटते. भाषेमुळे माणसाचे मूळ जिवंत राहते.
भाषा आणि समाज यांचे नाते दाखवणारा एक किस्सा – मराठी भाषिक ज्यू इस्रायलला स्थलांतरित झाले असले तरी ते मराठी भाषा टिकवण्याची खटपट करत असतात. त्यांना मराठी समाजाबद्दल आपुलकी आहे. इस्रायलमध्ये राहणाऱ्या एका मराठी ज्यूच्या वाचनात असे आले, की पेरू किंवा मेक्सिको येथील काही जमिनी अशा आहेत, की त्यांची सुपीकता शेकडो वर्षे टिकून राहते. जेव्हा त्या जमिनीचा अभ्यास केला गेला तेव्हा त्याचा निष्कर्ष असा निघाला, की त्या जमिनीत कधी काळी मोठ्या प्रमाणावर लाकडी कोळसा मिसळलेला आहे. लाकडी कोळसा सच्छिद्र असल्यामुळे या छिद्रात पिकाला उपयुक्त असणारे जिवाणू वर्षानुवर्षे जिवंत राहतात. त्यामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते. त्या ज्यू माणसाने स्वतः काही प्रयोग केले. ते प्रयोग यशस्वी झाल्यावर मराठी शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळावा म्हणून ‘बळीराजा’ या शेतीविषयक मासिकात त्या प्रयोगाची माहिती देणारे दोन लेख त्याने इस्रायलवरून पाठवून दिले. ते लेख मी जेव्हा वाचले तेव्हा मला त्या माणसाचे कौतुक वाटले.
तेव्हा संस्कृती व समाज टिकवण्यासाठी दुरभिमानरहित स्वभाषा टिकवली पाहिजे असे माझे मत आहे.
– सुधीर दांडेकर 9823133768 dandekar.rg@gmail.com
© www.thinkmaharashtra.com 2024. सदर लेख अथवा लेखातील कोठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. पुनर्मुद्रण करायचे झाल्यास ऋणनिर्देश करावा. उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.