Home व्यक्ती देगावच्या विवेकवादी समाजसेविका: स्मिता जोशी

देगावच्या विवेकवादी समाजसेविका: स्मिता जोशी

स्मिता जोशी या सर्वसामान्य शिक्षिकेने तळागाळातील वंचित आदिवासी समाजासाठी अठ्ठावीस वर्षे सातत्याने काम केले, ही त्यांची ओळख. स्मिता वसंत जोशी या पूर्वाश्रमीच्या कुसुम विद्याधर गोंधळेकर. त्यांचा जन्म 18 जून 1934 रोजी रत्नागिरी जिल्ह्याच्या दापोली तालुक्यातील देगाव या दुर्गम गावात झाला. स्मिता या देगावचे खोत व रेशन दुकानदार विद्याधर व इंदिरा गोंधळेकर या दांपत्याच्या सात अपत्यांपैकी दुसरे अपत्य.

कुसुम यांचे वडील सुधारक विचारांचे होते. ते स्वातंत्र्यसेनानी बाबा फाटक यांचे शिष्य. त्यांना कर्मठपणा, शिवाशीव, सोवळेओवळे, अस्पृश्यता हे सामाजिक विकार वाटत. कुसुमच्या आई इंदिरा गोंधळेकर यांचे घरातील वर्तन त्यांच्या विचारांशी मिळेलजुळेल असेच असे. त्या व्हर्नाक्युलर फायनलपर्यंत शिकल्या होत्या. त्यामुळे कुसुम यांच्यावर पुरोगामी विचारांचे संस्कार माहेरीच झाले.

कुसुम यांचे लग्न 27 मे 1956 रोजी झाले. त्यांचे नाव स्मिता वसंत जोशी असे बदलले. त्या सासरी भांडूपला (मुंबई) राहण्यास आल्या. त्या सासरी, सांसारिक जबाबदाऱ्या सांभाळून शिकल्या- डी एड झाल्या. त्यांनी बी ए ची पदवीही मिळवली. त्यांना मुंबई महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेत शिक्षिकेची नोकरी मिळाली. दरम्यान त्यांना विवेक व माधवी ही दोन मुले झाली. त्या काळात त्यांना दम्याच्या आजाराने सतावले. तेव्हा त्या योगाभ्यास शिकल्या. त्यांनी योगासनांच्या मदतीने दम्यावर नियंत्रण मिळवले. परंतु त्याच बरोबर त्यांनी त्यांचा योगासनांचा सखोल अभ्यास झाल्याने योगाभ्यास वर्ग घेणेही सुरू केले.

त्यांना शाळेची नोकरी व योगाभ्यास वर्ग यांतून आर्थिक स्थिरता आली. त्यांची योगाभ्यास वर्ग घेण्याच्या निमित्ताने रायगड, ठाणे व रत्नागिरी या जिल्ह्यांत भ्रमंती होऊ लागली. त्यांचा जनसंपर्क वाढला. त्या भ्रमंतीतून व जनसंपर्कातून त्यांनी 15 ऑगस्ट 1981 रोजी इतर सहकारी भगिनींसोबत कर्जतजवळील कोंदिवडे या गावी ‘बांधिलकी’ ही सेवाभावी संस्था स्थापन केली. त्यांनी कार्यक्षेत्र कोंदिवडे गावासह परिसरातील कोंढावणे, मुंढे, खरवंडी, सांगवी, सालपे व माहेरचे देगाव व आजूबाजूची गावे असे ठरवले.

          स्मिता यांनी ‘बांधिलकी’साठी ‘स्त्री’ केंद्रस्थानी ठेवली. स्त्रियांनी स्वतःमध्ये स्वातंत्र्य पेलण्याची क्षमता व वृत्ती निर्माण केली पाहिजे. स्त्रीला शौर्य, धैर्य, खंबीरता यांची वैचारिक झेप घेता आली पाहिजे असा सुस्पष्ट विचार त्यांच्या कामामागे होता. त्यांनी ‘बांधिलकी’चे काम स्त्रीला शिक्षित करणे, तिचे वैचारिक प्रबोधन करणे व तिला आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे या त्रिसूत्रीवर उभे केले, स्थिर केले व फुलवले.

स्मिता यांच्या कामाचा पाया विवेकवाद व वैज्ञानिक दृष्टिकोन हा होता. त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्या नास्तिक होत्या. त्यांनी उपक्रमही डोळसपणे निवडले. त्यांनी ‘हळदी-कुंकू’ समारंभ कधी राबवला नाही. कारण त्यात सधवा व विधवा असा भेदाभेद होतो. त्यांनी सर्वांना सामावून घेणारा तिळगूळ समारंभ राबवला, ‘बहीणबीज’ हा कार्यक्रम केला- त्यात भाऊ बहिणीला ओवाळत असे ! बहीण भावाला छोट्या वस्तू भेट देत असे. त्यांनी गावातील विधवा स्त्रीची ओटी सधवा स्त्रीने भरण्याचा उपक्रमही राबवला. त्यासाठी त्यांनी प्रबोधन केले. त्यांनी त्या समारंभांचा ‘प्रबोधनाचे व्यासपीठ’ म्हणून वापर केला. स्मिता यांनी ‘स्त्री-पुरूष समानता’, ‘पाणी वाचवा’, ‘प्रदूषण टाळा’, ‘कुटुंब नियोजन’, ‘लोकसंख्यावाढीचा भस्मासूर’, ‘अंधश्रद्धा निर्मूलन’ अशा अनेक विषयांवर पथनाट्ये, एकपात्री, नाट्यछटा, गाणी लिहिली. ती मुली व स्त्रिया यांच्याकडून बसवून घेतली व ती समारंभांत सादर केली.

स्मिता जोशी यांनी मुली शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून अनेक उपक्रम राबवले. त्यांनी संस्थेमार्फत मुलांसाठी बालवाड्या अनेक गावांत व वाड्यांवर सुरू केल्या. कालांतराने, सरकारने सर्व गावांत अंगणवाड्या व प्राथमिक शाळा सुरू केल्या, तेव्हा संस्थेचे ते काम थांबले. समाजात मुलींना त्या चौथीपर्यंत शिकल्या की शाळा सोडून घरी बसवले जायचे. त्यांना त्यांच्या लहान भावंडांची देखभाल करावी लागे. तेव्हा प्रौढ मंडळी मजुरीला जात. मुलींचे शिक्षण थांबत असे. ते चालू राहवे म्हणून स्मिता यांच्या संस्थेने पाळणाघरे चालू केली व शाळा सोडलेल्या मुलींचे शिक्षण पुन्हा सुरू केले. दत्तक-पालक योजना सुरू केली. त्यातून मुलींना शैक्षणिक साहित्याचे वाटप करणे, उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत करणे हे काम सुरू केले. महिलांचे बचतगट त्यांना रोजगार मिळावा म्हणून तयार केले. सर्वसामान्य महिलांचे त्या माध्यमातून शिवणकाम, भरतकाम, हळद-तिखट-लोणची- पापड बनवणे, औषधी वनस्पतींची लागवड करणे, चपला शिवणे असे उद्योग सुरू झाले. त्यांची आई इंदिराबाई गोंधळेकर यांच्या जन्मदिनानिमित्त ‘श्रमप्रतिष्ठा पुरस्कार’ 30 नोव्हेंबर 2001 पासून सुरू केला. तो पुरस्कार खेड्यातील महिलेला दिला जातो. त्या पुरस्कारासाठी ती महिला व तिचे कुटुंब गावातच राहून चरितार्थ करणारे असावे, घरातील सर्वजण निर्व्यसनी हवेत. सर्व मुलांना शिकवलेले असावे अशा अटी आहेत.

स्मिता यांनी नोकरी सांभाळून ‘बांधिलकी’चे काम 1981 ते 1987 ही आठ वर्षे केले. त्यांनी नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती 1988 साली घेतली. त्यानंतर त्यांनी ‘बांधिलकी’चे अक्षरशः स्वत:ला झोकून देऊन काम पूर्णवेळ केले. त्या कामाला त्यांनी एक विधायक आकार दिला. त्यांना त्या कामात प्रतिभा चितळे, स्मिता शिदोरे, विमल ताम्हणे, कुसुम जोशी, लीना तुळपुळे, डॅा. शकुंतला जोशी, प्रभा देशमुख, शिल्पा बक्षी, शैलजा फडके व इतर सहकारी भगिनींनी सहकार्य केले. त्यांनी वयाची पंचाहत्तरी पूर्ण केल्यावर, 2009 साली ‘बांधिलकी’ संस्थेच्या प्रत्यक्ष कामातून निवृत्ती घेतली व त्या माहेरच्या गावी देगाव येथे येऊन स्थायिक झाल्या. त्यांच्या पतीचे निधन 19 आक्टोबर 2003 रोजी झाले. स्मिता जोशी वयाच्या नव्वदाव्या वर्षी मुलीकडे दापोलीत निवृत्त आयुष्य आनंदाने जगत आहेत.

विद्यालंकार घारपुरे 9420850360 vidyalankargharpure@gmail.com
——————————————————————————————————————–

About Post Author

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version