करगणीचे श्रीराम मंदिर हेमाडपंथी असून ते मूळ महादेव मंदिर आहे. आख्यायिकेनुसार, ‘श्रीरामांनी वनवासातील भ्रमंतीदरम्यान त्याठिकाणी वास्तव्य केले होते. श्रीशंकरांनी लक्ष्मणाला खड्ग आणि आत्मलिंग जिथे दिले, त्या जागी त्याने आत्मलिंगाची स्थापना केली, ते हे मंदिर.’ ग्रामस्थांच्या वतीने त्या देवस्थानाचा जीर्णोद्धार 1975 साली करण्यात आला. त्या वेळी गर्भगृहात श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांच्या मूर्ती बसवण्यात आल्या…
करगणी हे गाव सांगली जिल्ह्याच्या पूर्वेस आटपाडी तालुक्यात आहे. तेथील पुरातन श्रीराम मंदिर हे प्रसिद्ध आहे. मंदिर वास्तुशास्त्रदृष्ट्या व्यवस्थित बांधलेले आहे. सभामंडप, त्यानंतर गर्भगृह, गर्भगृहात श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांच्या मूर्ती संगमरवरी दगडात असून, त्या दिसण्यास आकर्षक आहेत. शिल्पे ही मंदिराच्या भिंतींवर, सभामंडपातील खांबांवर पौराणिक प्रसंगांची कोरलेली आढळतात. त्या काळी अशी शिल्पे कोरण्याची पद्धत दिसते. मंदिरात नक्षीकामदेखील कुशलतेने केलेले दिसते. सभामंडपात मोकळी जागा आहे. मंदिराचे बांधकाम पुरातन असले तरी मंदिराच्या कळसाचे नुतनीकरण अलिकडे झाले आहे. मंदिराचा रंगवलेला कळस आकर्षक दिसतो. मंदिराभोवती मोकळी जागा आहे आणि त्याभोवती तट आहे. कमानीचे प्रवेशद्वार मंदिराच्या समोरील बाजूस आहे. प्रवेशद्वाराच्या समोर दोन मोठी वृंदावने आहेत. त्यांना टेकवून तीन-चार वीरगळ ठेवलेल्या आहेत. त्या वीरगळांची पूजा काही प्रसंगी केली जात असावी. ते कोळे-तळेवाडी रस्त्याच्या कडेला येतात. मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी आहे. मंदिराच्या गर्भगृहात श्रीरामाची मूर्ती थोड्या उंचावर, पाठीमागील भिंतीस टेकून आहे. सभामंडपात साधू-संतांचे फोटो लावलेले आहेत.
ते राम मंदिर शंकराचे म्हणूनही ओळखले जाते. मंदिरात खाली फरशीवर महादेवाची पिंड आहे. पाय दुमडून बसलेला नंदी सभामंडपात, महादेवाच्या मंदिरात असतो, त्याप्रमाणे पाहण्यास मिळतो. त्या संदर्भात पुराणकथा जोडली जाते, की मंदिराची स्थापना श्रीराम आणि लक्ष्मण यांनी केली. शंकराने लक्ष्मणाला एक खड्ग आणि आत्मलिंग त्याच ठिकाणी दिले. लक्ष्मणाने आत्मलिंगाची स्थापना केलेल्या जागी मंदिर आहे. मंदिराचे अवलोकन करताना आणि त्या संदर्भातील लोककथा ऐकताना एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते, की ते मंदिर मूळ शिवाचे असावे. तेथे मूळ गाभाऱ्यात शिवलिंग असून, सभामंडपात नंदी आहे. आणखी शक्यता अशी, की वीरगळ गावाबाहेर असलेल्या शिवमंदिरात प्रदक्षिणेच्या मार्गावर मांडल्या जात. दोन-अडीच फूट रुंद व तीन-साडेतीन फूट उंच अशा कमानी पद्धतीने घडवलेल्या दगडांवर तीन किंवा चार भागांत त्या वीरगळांचे वैशिष्ट्य कोरून नमूद केले जात असे. तशा वीरगळ गावाबाहेरच्या शिवमंदिराजवळ मांडल्या जात. वीरगळ काही ठिकाणी चौकोनी दगडांवरदेखील कोरलेल्या आढळल्या आहेत.
जुन्या मंदिराभोवती तट भिंत आहे. पूर्वेकडील उंच कमानी दरवाज्यातून आत, समोरच मंदिर आहे. मंदिराचे बांधकाम दोन भागांत झालेले दिसते. जमिनीपासूनचे पुरातन बांधकाम काळ्या दगडातील असून छतावरील शिखर आणि तेथील बांधकाम अलिकडचे म्हणजे 1975 नंतरचे दिसते. ते रंगांनी रंगवलेले आहे. मात्र, जुने मंदिर आणि नवे मंदिर अशी मूळ मंदिरात विभागणी करता येईल असे दिसत नाही. फक्त छतावरील भाग नवा आहे. दोन वृंदावने कमानी प्रवेशद्वाराच्या समोर, मंदिरासमोर, आवाराच्या बाहेर आहेत. त्यावर नक्षीदार कोरीव काम केलेले आढळते. कदाचित, ती दोन वृंदावने म्हणजे स्मृतिस्तंभ वगैरे असा वेगळाच प्रकार असावीत.
करगणीभोवती पश्चिमेला खानापूर, पूर्वेस सांगोला, दक्षिणेस कवठेमहांकाळ आणि तासगाव असे तालुके आहेत. त्या भागाचा समावेश पश्चिम महाराष्ट्रात होतो. करगणी-आटपाडी यांचा भाग सोळाव्या शतकात आदिलशाही सत्तेखाली होता. ते पेशवाईनंतर औंध संस्थानातील महाल बनले आणि आता ते सांगली जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. करगणीचे जुने नाव ‘खडगणी’ असे सांगितले जाते.
– प्रल्हाद कुलकर्णी 8830072503 drpakull@yahoo.com