शिवदीन केसरी नाथसंप्रदायाची भूमिका (Shivdin Kesari : Spokesman of Nathsect)

पैठणचे शिवदीन केसरी हे, संत ज्ञानेश्वर यांच्या योगपरंपरेतील सिद्धयोगी श्रीशिवदीननाथ! शिवदीन केसरी यांच्या व्यक्तिमत्त्वात योग व भक्‍ती यांचा सुंदर मिलाफ आहे. शिवदीन केसरी यांच्या वाङ्मयातून नाथसंप्रदायाचे मर्म व्यक्‍त झाले आहे. ते योगमार्ग व भक्तिमार्ग ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असे सांगतात. शिवदीन केसरी यांनी त्यांचे आध्यात्मिक अनुभव त्यांच्या वाङ्मयातून, त्यांच्या तत्त्वज्ञानातून उलगडून सांगितले आहेत. गुरुभाव, निष्ठा, गुरुआदेश यांसाठी आत्मसमर्पण म्हणजेच नाथ तत्त्वज्ञान. शिवदीन केसरी यांचे वाङ्मय म्हणजे त्यांची स्वत:ची आध्यात्मिक अनुभूती व नाथतत्त्वज्ञान यांचा मिलाफ आहे. ते विविध भाषांतून प्रकट होऊ शकले; मराठी भाषेचे मर्मही त्यातून उलगडले.

 ‘विंचू चावलाहे शिवदीन केसरी यांचे भारूड. त्यातून त्यांनी दाखवून दिले, की चराचर सृष्टीला उरलेले आत्मतत्त्व अहम्‌ तत्त्वमाससर्व शक्तिमान परमात्म्याची योग्य उपासना करणे. अहम्‌ ब्रह्मास्मि सर्व चराचरसृष्टी ब्रह्मरूप आहे याची पूर्ण जाणीव म्हणजे पूर्णज्ञान, प्रज्ञान ब्रह्म! या वाक्याची जीवनाशी जवळीक व त्यांचा समन्वय साधणारी पदे शिवदीन केसरी यांच्या वाङ्मयातून जाणवतात.

पैठण हे शिवदीन केसरीयांचा जन्म, कार्य व कर्मभूमी या तिन्हींचे स्थान आहे. शिवदीन केसरी यांचा जन्म शके 1620 (सन – 1698) मध्ये झाला. ते हरिकृष्ण यादव जोशी आणि त्यांची पत्नी सरस्वतीबाई या दांपत्याच्या पोटी सदाशिव या नावाने जन्मास आले. त्यांच्या बालपणीची एक कथा प्रसिद्ध आहे. सदाशिव फारसा कोणाशी बोलायचा नाही. त्याला एकदा खेळताना लहान मुलांनी खड्ड्यात पाडले. सदाशिव संध्याकाळ झाली तरी घरी आला नाही. आईवडिलांना काळजी वाटू लागली. तेव्हा समोरून एक संन्यासी जात होता. त्याच्याकडे विचारणा केली असता, त्यांनी समोरच्या वाळूच्या ढिगात सदाशिव असल्याचे सांगितले. त्या संन्याशाने पुढे असेही सांगितले, की ‘‘हा सदाशिव फार मोठा नाथपंथी योगी होऊन ज्ञानाचा, पंथाचा प्रसार करेल.’’ तो संन्यासी म्हणजे संत ज्ञानेश्वर यांच्या योग परंपरेतील संत श्री केसरीनाथ. त्यांची समाधी आळंदी येथे ज्ञानेश्वर यांच्या समाधीजवळ आहे. सदाशिव त्या केसरीनाथ यांच्याकडे राहिला. सदाशिव यांना प्राप्त झालेले आईवडिलांचे ध्यात्मिक संस्कार, श्रवणपठणचिंतन यांमुळे त्यांची विचारांची, नैतिकतेची व आत्मानंदाची बैठक निर्माण झाली. सदाशिव यांचे उपनयन झाल्यावर त्यांच्या आईवडिलांनी त्यांना श्री केसरीनाथ यांच्या स्वाधीन केले.

अधुना भाग्य उदया आहे ।
आता बालक तुमचे झाले। मज याची काय चिंता
ज्ञानमार्गेहातवटी । ईक्षणमात्रे लाधेल ।। (ज्ञा.कै. 09.30, 31)

सदाशिव यांचे शिवदीन केसरी या अभिधानात रूपांतर श्री केसरीनाथ यांची सेवा ज्ञान ग्रहण करता करता झाले. केसरीनाथ यांना त्यांचा वारसा पुढे नेण्यास शिवदीन केसरी समर्थ असल्याचे जाणवले. त्यांनी संत ज्ञानेश्वर यांची योगपरंपरा व नाथपंथी ज्ञानाची धुरा आणि स्वत:जवळील सर्व शक्ती शिवदीन केसरी यांच्यात संक्रमित केली. शिवदीन केसरी यांचे मराठी, संस्कृत, प्राकृत भाषांवर प्रभुत्व होते. त्यांनी संप्रदायाचे केलेले भाष्य हे सर्वसामान्यांसाठी होते. शिवदीन केसरी यांनी समाजाची बावरलेली, भेदरलेली, गांगरलेली दिशाहीन अवस्था पाहिली आणि त्यांनी समाजास मार्गदर्शन करण्याचे कार्य हाती घेतले. त्यांनी गुरूआदेशाप्रमाणे नाथकार्य व वाङ्मयलेखन केले. कीर्तनातून समाजप्रबोधन केले. उत्सवप्रिय शिवदीन केसरी सिद्धयोगी होतेच. त्याबरोबर उत्तम संघटकही होते.

          शिवदीन केसरी यांचा वाडा व समाधी पैठण येथे आहे. त्यांनी वयाच्या बहात्तराव्या वर्षी ज्ञानप्रदीप हा ग्रंथ लिहिला. त्याशिवाय त्यांनी विवेकदर्पणभक्तिरहस्य हे दोन ग्रंथही लिहिले. त्यांचे पुत्र चिंतामणीनाथ यांनी त्यांचे चरित्र सांगणारे पद्यकाव्य रचले आहे. ते म्हणजेच ज्ञानकैवल्यहा ग्रंथ. तोही त्यांनी पैठण येथे लिहिला. त्यांनी हिंदी व मराठी पदे लिहिली. त्यांनी नाथपंथी तत्त्वज्ञान सुलभ मराठी भाषेत लोकांसमोर आणले. शिवदीन केसरी यांचा काळ शके 1620 ते शके 1696 (सन 1698 ते सन 1774) असा असून त्यांनी गुरू केसरीनाथ यांच्या आज्ञेनुसार पैठण येथे समाधी घेतली.

त्यांनी नाथसंप्रदायाची सकारात्मक भूमिका स्पष्ट केली. ती पुढीलप्रमाणे – 1. नाथसंप्रदायात वर्णभेद, जातिभेद मानण्यात येत नाहीत. कोणत्याही जातीच्या माणसाचा नाथपंथात प्रवेश होतो. उदाहरणार्थ, ज्ञानेश्वर हे ब्राह्मण होते. उपनयनादी संस्कार न झालेले, संन्याशाची पोरे म्हणून हेटाळणी झालेले. त्यांनी वाङ्मयास नाथपरंपरेचे (योगपरंपरेचे) वरदान दिले. 2. नाथसंप्रदायाचे तत्त्वज्ञान गोरक्ष-अमर संवादातून मराठी भाषेला लाभले. 3. साधक होऊन नाथपंथाची साधना करणे अवघड नाही. मनात भीती न बाळगता साधनेचा अभ्यास केल्यास, अधिकारी व्यक्तीकडून समजून घेतल्यास, ज्ञानाच्या साहाय्याने हठयोगच समाजाला तारू शकतो. 4. नवनारायणांनी कोणत्या ना कोणत्या कारणाने पृथ्वीवर अवतार घेतले, ते संतांची उच्च परंपरा निर्माण करण्यासाठीच. संतांचे वास्तव्य महाराष्ट्रातील भूमीत होते. 5. नाथपंथीयांनी स्वतः विलासी जीवनाकडे पाठ फिरवलीच, पण संत परंपरेची टिंगलटवाळी करणाऱ्या राजेलोकांना, संसारात संपन्न असणाऱ्या लोकांना योग्य तो उपदेश करून शाश्वत व अशाश्वत यांची ओळख करून दिली. (पाखंडपर पदे – शिवदीन केसरी) 6. परमेश्वरालासुद्धा त्याचे भांडार त्या तपस्व्याच्या झोळीत निःस्वार्थ वृत्तीने ओतावे लागते. 7. नाथपंथाने तांत्रिक साधनेचे शुद्धीकरण केले. श्रीनिवृत्ती व ज्ञाननाथ यांनी आध्यात्मिक, सामाजिक जीवनातील विकृतीची लाट तेराव्या शतकात थोपवून धरली. त्यामुळेच भागवतधर्माने राष्ट्रीय व सामाजिक अभ्युदयाचा पाया पुढील काळात रचला. (शिवदीन केसरी, परंपरा- ज्ञा.प्र. 910 ते 912)

पूर्वजन्मि मुक्ताईस | गोरक्षकृपेचा सौरस ||

पुन्हा ज्ञान जन्मि सरस | सोपानदेवास कृपा तिची ||10||

ऐसा शिष्यसंप्रदाय | मुक्‍त मुक्ताई पर्याय ||

8. नाथपंथी मराठी वाङ्मय अल्प आहे. शिवदीन केसरी यांच्या मराठी-हिंदी वाङ्मयातून नाथपंथाचे स्वरूप, परंपरा, तत्त्वज्ञान स्पष्ट झाले आहे. 9. शिवदीन केसरी यांनी मांडले, की नाथपंथ हा गुरुनिष्ठ आहे. गुरुशिष्याचे नाते पूर्वजन्म सुकृताने जोडलेले असते. शिष्याच्या दासोऽहं भावातूनच शिष्य गुरुकृपेने सोऽहम अवस्थेपर्यंत जातो. सर्व नाथभक्तांनी नाथसेवा कार्यामध्ये निष्काम भावाने कार्यरत राहून दासोऽहं म्हणून सेवा करावी. साधना लययोग, हठयोग व राजयोग यांतून सातत्याने करून, सामरस्य सिद्धी प्राप्त करून घेऊन चराचरामध्ये चैतन्य व ब्रह्मसाक्षात्कार यांचा अनुभव घ्यावा. (कल्याण मूळ अवधिकरणी || शिवाय, रमणि गुरवे नमः ||) 10. गुरूचे स्थान हृदयात असते. अंतरंगातील भक्‍ती, हृदयातील भक्‍ती हीच फार मोठी शक्ती असते. हे तत्त्वज्ञान शिवदीन केसरी यांनी त्यांच्या (सातवारांच्या) पदांतून सांगितले.

राधिका पारसनीस-गुप्ते 75065 50492 drradhikagupte99@gmail.com
———————————————————————————————————————————-

About Post Author

3 COMMENTS

  1. कृष्ण दयारणाव व शिवादीन केसरी, सोईरादादा आंबीये या नाथ प्रभावळीस सादर नमन। शिवदिन केसरी यांचे ग्रंथ उपलब्ध आहेत काय

Leave a Reply to Anonymous Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here