बिळवसचे सातेरी देवीचे जलमंदिर (Sateri Temple surrounded by water at Bilwas-Konkan)

0
1052

कोकणात सातेरी देवीची मंदिरे अनेक, परंतु मालवण तालुक्यातील बिळवस सातेरी मंदिर हे अधिक प्रसिद्ध आहे, कारण कोकणात आढळणाऱ्या सातेरी देवींच्या मंदिरांपैकी ते एकमेव असे जलमंदिर आहे – त्या देवीचा आषाढ महिन्यात जत्रोत्सव होतो. ती मसुरे गावातील बारा वाड्यांची ग्रामदेवता आहे. श्री सातेरी देवीचे जलमंदिर सुमारे सातशे वर्षांपूर्वी उभारले आहे ! जैन घराण्यातील एका देवी भक्ताने ते बांधले असा समज आहे. सातेरी देवी ही नागकन्या असल्याने कोकणात सातेरी देवीच्या मंदिरात मोठी वारुळे आढळतात. मंदिरामधील वारूळ मंदिराचाच अविभाज्य भाग, म्हणजेच देवी आहे. देवीचे वास्तव्य त्या वारुळात आहे. कोकणात वारूळ आणि सातेरी देवस्थान असे समीकरण दिसून येते.

मंदिर पूर्वाभिमुख असून ते तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेले आहे. मंदिरात मोठा मंडप व सभामंडप आहे. पूर्वी गाभाऱ्यात मूर्ती नव्हती, तेव्हा तेथे एका उंच वारुळाची पूजा केली जाई. देवीचे वास्तव्य वारुळातच शेष रूपात आहे असा समज होता. काही भक्त देवीचे दर्शन शेष रूपात झाल्याचे सांगतातही.

मंदिराचा परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. मंदिराच्या उजवीकडे विहीरवजा कुंड आहे. कुंडाच्या तळाशी महादेवाची पिंड आहे. त्या कुंडातील पाणी कधीही आटत नाही. त्या तळीत भारताच्या पवित्र तीर्थक्षेत्रांच्या नद्यांचे पाणी आणून सोडलेले आहे अशी वदंता आहे.

मंदिराबाबत आख्यायिका अनेक आहेत. मंदिरासभोवतालच्या तलावात गाई-म्हशींना पाणी पाजले जात असे. एके दिवशी तलावातील वारुळातून रक्त येऊ लागले. त्यावेळी एका ग्रामस्थाच्या स्वप्नात देवीने दृष्टांत देऊन ‘माझे वास्तव्य या तलावातील वारुळात आहे. जनावरांपासून मला त्रास होत असल्याने या वारुळावर माझ्यासाठी देवालय बांध !’ असे सांगितले. ग्रामस्थांनी देवीच्या त्या दृष्टांतातील ‘आदेशा’नुसार त्या ठिकाणी देवालय बांधले.

देवीचा आषाढ महिन्यात यात्रोत्सव असतोच, परंतु गावातील धार्मिक पूजाअर्चा, विधी यांना देवदिवाळीपासून सुरुवात होते. त्यामध्ये गावपळण, देवीची पारध, होलिकोत्सव, दसरा, दहीकाला व गोंधळ हे उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि जल्लोषात साजरे केले जातात. गावचा आषाढ महिन्यातील यात्रोत्सव हा मात्र सर्वात मोठा असतो. त्यासाठी प्रमुख गावकरी मंडळी व ग्रामस्थ मंदिरात जमून जत्रेची तारीख ठरवतात. गावातील चाकरमानी, माहेरवाशिणी व देवीचे दूरवर पसरलेले भक्त त्या यात्रेदरम्यान देवीच्या रूपाचे दर्शन घेण्यासाठी न चुकता येतात. यात्रेच्या दिवशी सकाळी देवीला नीळ घालतात. नीळ एका भांड्यात पाणी घेऊन त्यात तेल व गवताची राख मिसळून बनवली जाते. नंतर देवीचा पेटारा वाजत-गाजत मानकरी मंडळींकडून मंदिरात आणला जातो. देवीला वस्त्रालंकार नेसवून, मुखवटा घातला जातो. त्यानंतर देवीच्या समोर मडक्यात भात ठेवतात व त्यात खोबऱ्याच्या वाटीत पेटता काकडा (दिवा) तेल ओतून पेटत ठेवतात. दुपारी देवीला गावातील प्रत्येक घरातून नैवेद्य आणला जातो. मानकरी मानाप्रमाणे धार्मिक विधीमध्ये सहभागी होतात; पूर्वरीतीनुसार गाऱ्हाणीही होतात. मग ओट्या भरण्यास प्रारंभ होतो. त्या वेळी देवीचे भक्त दर्शन घेतात. मंदिर परिसर भाविकांच्या गर्दीने फुलतो.

गावकर मंडळी सायंकाळी देवीसमोर ठेवलेले मडके घेऊन वाजतगाजत गांगोची राय येथे नेतात. (गांगो ही वन-राज्यावर (देवराईत) देखरेख करणारी सामर्थ्यशाली देवता होय. ती मसुरे गावातच आहे. देवराई नावाचा अर्थ देवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजले जाणारे वन. तो जंगलाचा समृद्ध असा भाग किंवा वेगळे जंगल होय. देवराई ही परिपूर्ण परिसंस्था असते असे मानण्यास काही अडचण नाही) मग त्या ठिकाणी वाडी करून गाऱ्हाणे घालतात. श्री देवी सातेरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील मसुरे गावाच्या बारा वाड्यांची ग्रामदेवता. बिळवस या गावातही एकूण बारा वाड्या आहेत. त्या बाऱ्या वाड्यांवरून नैवेद्य गोळा केला जातो आणि तो देवीला समर्पित केला जातो व त्यानंतर गावकरी गाऱ्हाणे घालतात, त्याला वाडी वरून गाऱ्हाणे म्हणतात. भात-खोबऱ्याच्या वाटीत पेटता काकडा (दिवा) असलेले देवीच्या समोरील ते मडके घेऊन पुन्हा मंदिराकडे येतात. ग्रामस्थांनी देवीसमोर ठेवलेल्या नैवेद्याचे दोन भाग करून ते पुन्हा देवीसमोर मांडले जातात. त्यानंतर गाऱ्हाणे घालून एक भाग मानकरी कुळकर यांना देतात तर दुसरा भाग जमलेल्या भाविकांना प्रसाद म्हणून देण्यात येतो. त्यानंतर देवीच्या मूर्तीवरील वस्त्रे, दागिने उतरवून, देवीच्या पेटाऱ्यात ठेवून तो पेटारा वाजत-गाजत नेऊन पुन्हा मानकऱ्यांकडे पोचवला जातो. यात्रेदिवशी रात्री मंदिरात कोणीही थांबत नाही. त्यावेळी देवळाभोवती जी सर्व दुकाने लावलेली असतात तीसुद्धा रात्र झाली, की सर्व दुकानदार त्यांची त्यांची दुकाने झाकून (बंद करून) घरी परततात आणि मग दुसऱ्या दिवशी देवळासमोर हजर होतात. ती फार वर्षांपूर्वीची प्रथा आहे. इतर ठिकाणीही; तसेच, कोकणात देवीची जत्रा (यात्रा) असते त्या जत्रांमध्ये दुकाने रात्रभर चालू असतात, पण बिळवस मात्र त्याला अपवाद आहे.

खर्च वजा जाता उरलेले उत्पन्न न्यासात जमा केले जाते. दुपारी वाडी भरून गाऱ्हाणे घातले जाते. मसुरेहून आलेल्या चाकऱ्याने तोडावळ केल्यावर ती वाडी माळगाव येथे नेली जाते व अशा रीतीने यात्रेची सांगता होते. तोडावळ करणे म्हणजे इच्छेप्रमाणे होईनासे झालेले कार्य इच्छेप्रमाणे होण्याकरता काढलेली युक्ती होय. मसुरे या गावातील मडवळ समाजाचे बांधव म्हणजे लेकरु एका विशिष्ट जागेवर जत्रेच्या दुसऱ्या दिवशी नैवद्य वाहून इच्छाआकांक्षा पूर्ण होण्याकरता विधी करतात आणि तेथूनच ते घरी परततात. त्याला तोडावळ करणे असे म्हटले जाते.

सतीश पाटणकर 8551810999 sypatankar@gmail.com

————————————————————————————————

About Post Author

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here