फलटण तालुक्यात असलेला एकमेव ऐतिहासिक किल्ला म्हणजे ताथवडे गावातील ‘ताथवडा ऊर्फ संतोषगड’. ताथवडा (17०57’ उत्तर, 74०20’ पूर्व) हा डोंगरी किल्ला दहीवडीच्या वायव्येस बत्तीस किलोमीटर, तर फलटणच्या नैऋत्येस एकोणीस किलोमीटरवर आहे. सह्याद्रीची मुख्य डोंगररांग प्रतापगडापासून तीन भागांमध्ये विभागली गेलेली आहे- शंभू महादेव रांग, बामणोली रांग आणि म्हसोबा रांग. त्यांपैकी महादेव डोंगररांगेतील कमी उंचीच्या एका टेकडीवर तो किल्ला उभा आहे. त्या विभागात संतोषगड, वारुगड, महिमानगड आणि वर्धनगड हे किल्ले आहेत.
शिवाजी महाराजांनी तो गड 1662 मध्ये बांधल्याचे सांगितले जाते. मात्र किल्ला फलटणचे अधिपती असलेल्या बजाजी नाईक निंबाळकर यांच्या ताब्यात 1665 मध्ये होता. तो गड मिर्झाराजे जयसिंह व शिवाजी महाराज यांच्यातील पुरंदरच्या तहानुसार मोगल व मराठे यांच्या संयुक्त फौजांनी 7 डिसेंबर 1665 रोजी जिंकून घेतला. नंतर किल्ला विजापूरकर आणि मोगल यांच्यामध्ये झालेल्या तहानुसार आदिलशाहीच्या ताब्यात गेला. किल्ला आणि त्या खालील मुलुख शिवाजी महाराजांनी आग्रा येथून सुटून आल्यावर 1673 मध्ये जिंकून, स्वराज्यात आणून किल्ल्याचे नामकरण ‘संतोषगड’ असे केले. तो मोगलांनी पुढे, 1689 मध्ये परत जिंकून घेतला. मात्र तो 1707 मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर पुन्हा मराठा फौजांनी जिंकून स्वराज्यात आणला. तो किल्ला नहिसदुर्ग सरकारमध्ये उपविभागाचे मुख्य ठाणे असल्याची नोंद आहे (इंग्रज कालखंडात तो परिसर नहिसदुर्ग व रायबाग सरकार या दोन्ही व्यवस्थापनांमध्ये समाविष्ट होता). त्यावेळी त्याचा महसूल एक हजार एकशेवीस रुपये होता. तशी नोंद 1790 च्या महसूल अहवालात आहे. तो किल्ला मराठ्यांच्या ताब्यात पुढे, 1818 पर्यंत होता. तो ब्रिटिशांनी प्रतिकाराशिवाय जिंकला. ब्रिटिशांविरूद्ध बंड करणारे उमाजी नाईक यांनी संतोषगडाचा आश्रय 1827 मध्ये घेतला होता.
संतोषगड गिरिदुर्ग या प्रकारात मोडतो. किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची दोन हजार नऊशे फूट आहे. त्याची चढाईची श्रेणी सोपी आहे. किल्ल्याचा आकार त्रिकोणी आहे. त्याच्या वायव्य, ईशान्य व आग्नेय बाजू एकसारख्या आहेत. किल्ल्यावर जाण्यासाठी दोन रस्ते आहेत. पैकी एक किल्ल्याच्या उत्तरेकडे असलेल्या मुख्य प्रवेशद्वाराकडे जातो. त्या वाटेवर मठ आहे. मठाच्या बाजूला गुहा आहे. त्या गुहेत थंड पाण्याचा साठा आहे. वाल्मिकी ऋषींची मूर्तीही तेथे आहे. दुसरा रस्ता माळरानाकडे जातो.
माथ्यावरील बालेकिल्ल्याचे क्षेत्रफळ 3.25 हेक्टर आहे. गडाची उंची सुमारे दोन हजार नऊशे फूट आहे. सर्वात वरच्या भागात छोटेसे पठार आहे. तेथून फलटण, माण, खटाव या तालुक्यांचे विहंगम दृश्य दिसते. पठारावर स्वच्छ, प्रदूषणमुक्त हवा आहे. तेथे मन प्रसन्न करणार्या वार्याचा वेगही भन्नाट आहे. बालेकिल्ल्याचे प्रवेशद्वार, तटबंदी हे भाग अर्धवट कोसळलेले आहेत. तथापि गडाच्या पहिल्या टप्प्यावर असलेल्या माचीची चहूबाजूंची संरक्षक तटबंदी, बुरुज हे चांगल्या स्थितीत आहेत. त्यांतील प्रवेशद्वार हे घडीव दगडाचे आहे. किल्ल्याच्या संरक्षणासाठी तीन तटभिंती असून सर्वात वरची भिंत पूर्ण टेकडीभोवती बांधलेली आहे. त्यामुळे किल्ल्यातच बालेकिल्ला तयार झाला आहे. किल्ल्याभोवती सरळ उभा 9.14 मीटर उंचीचा कडा आहे. त्यावर 1.82 मीटर उंचीची तटबंदी होती. तटबंदीची पडझड झालेली आहे. किल्ल्यावर संरक्षक बुरूज व सेनेच्या सुटकेसाठी गुप्त वाटा ठरावीक अंतरांवर आहेत. किल्ला चहूबाजूंनी मजबूत असून, बालेकिल्ल्याच्या 18.28 मीटर खाली – बाहेरून त्रिकोणी बांधकाम केलेले आहे. दोन लहान दरवाजे नैऋत्य व ईशान्य बाजूंकडील भिंतीतील बालेकिल्ल्यात जाण्यासाठी आहेत. त्यांची रुंदी एकसष्ट सेंटिमीटर आहे. किल्ल्याचे मुख्य प्रवेशद्वार ईशान्येकडे आहे. तटबंदी किल्ल्याच्या उत्तर बाजूला एकाखाली एक अशा दोन भिंतींची आहे. ती पूर्व-पश्चिम आहे. तटबंदीवर तीन बुरूज आहेत. तटबंदी प्रवेशद्वाराजवळ पडलेली आहे.

गडावर दोन मोठ्या कोरीव गुहा आहेत. तो नैसर्गिक चमत्कारच म्हणायचा ! किल्यावर शिवकालीन सदर (किल्लेदाराचे कार्यालय), धान्याची कोठारे, शस्त्रागार, खजिनाघर यांच्या भग्न वास्तू आहेत. त्याच्या दक्षिणेस पाण्याचे टाके आहे. ते खडकात 21.34 मीटर खोल खोदलेले आहे. त्याच्या कडा काळजीपूर्वक तासलेल्या आहेत. दुसरे टाके (9.14 x 9.14 चौरस मीटर) असून त्यास पायऱ्या आहेत. ताथवडा ग्रामपंचायतीने त्या टाक्यांतील पाणी नळाद्वारे गावात पिण्यासाठी आणले होते. त्याचा वापर 1993 पर्यंत होत होता. त्यानंतर ते बंद केले. टाक्यांच्या बाजूला असलेल्या गुहेच्या बाहेरील बाजूस मठ आहे. तेथे विजेची व्यवस्था आहे. त्या मठापासून खाली तीस मीटरवर दुसरी गुहा आहे. किल्ल्याच्या पूर्व बाजूस आणखी एक गुहा आहे. लक्ष्मीचे पडके देऊळ तिच्या पूर्व बाजूस आहे. पाण्याच्या टाक्याच्या पाठीमागे कोरीव कमान आहे. अर्ध्या पायऱ्या उतरून गेल्यावर तातोबा महादेवाचे मंदिर लागते. त्यावरून किल्ल्यास ताथवडा हे नाव पडले आहे.

बालेकिल्ल्यावर इमारतींचे अवशेष आढळून येत नाहीत. किल्ल्यावर मशीद व मारूतीची एक मूर्ती आहे. पहिल्या प्रवेशद्वाराजवळ हत्तीखाना होता. दक्षिणेकडील बाजूस मुख्य टेकडी व त्या पलीकडील टेकडीच्या मधील खोलगट भागात इमारतीचे अवशेष आढळून येतात. ती जागा किल्ल्यापासून 182.88 मीटर अंतरावर आहे. किल्ल्याच्या पहिल्या प्रवेशद्वारासमोर एका गुहेत गोड्या पाण्याचे टाके होते. ते बुजलेले आहे. त्याशिवाय पाण्याची टाकी गडावर आणखी चार होती. ती सर्व बुजलेली आहेत.

गिर्यारोहकांना आकर्षण म्हणजे गडाच्या डाव्या बाजूस (पूर्व दिशा) असलेले उंच काळ्याभोर कातळाचे उभे कडे. ते मानवी शौर्याला व धीरगंभीरतेला खुणावतात. तेथे काही गिर्यारोहण पथके नियमित येतात. ती सहसा हडपसर, पिंपरी-चिंचवड, भोर, सातारा येथील असतात. मात्र गडावर पायाभूत सुविधा काहीही नाहीत. नवे गिर्यारोहक तिकडे फिरकतही नाहीत. किल्ला पर्यटनाच्या दृष्टीने उदास समजला जातो.
ताथवडा गावात मंदिरे बरीच आहेत. त्यांमध्ये बालसिद्धाचे मंदिर प्रेक्षणीय आहे. मंदिराचा नगारखाना पंधरा मीटर उंच आहे. प्राकारही प्रशस्त आहे. शिखर विटांचे आहे. ते वगळले तर मंदिराचे बांधकाम घडीव दगडांचे आहे. एक शिलालेख सभामंडपाच्या पायरीवर आहे. तो पुढीलप्रमाणे :
चेरणी सादर विसाजी शामराज देशपांडे मो फलटण देहे सावंधरा शिव कसबे ताथवडा शके 1684 भानु नाव संवत्सर x x वद्य नवमी (विसाजी शामराव देशपांडे यांनी या प्राचीन मंदिराचा जीर्णोद्धार 1762 साली केला.)
– रवींद्र बेडकिहाळ 9422400321 wewkly_lokjagar@gmail.com
—————————————————————————————————————