वातावरणातील ऋतुचक्र सूर्याच्या दक्षिणोत्तर गतीमुळे निर्माण होते. म्हणजे ऋतू सूर्यसंक्रांतीवर अवलंबून असतात. ती वस्तुस्थिती महाभारत काळातदेखील माहीत होती. असे असताना, दुर्गाबाईंनी चांद्रमासांवर आधारित ऋतुचक्र का लिहिले हा मला पडलेला प्रश्न आहे… ऋतुचक्राचा मेळ चैत्र, वैशाख वगैरे चांद्रमासांशी बसत नाही…
दुर्गा भागवत यांचे ‘ऋतुचक्र’ हे ललित लेखांचे पुस्तक 1956 मध्ये प्रसिद्ध झाले. त्यांनी त्या पुस्तकात त्यांच्या खास भावपूर्ण शैलीत भारतीय महिन्यांप्रमाणे (चैत्र, वैशाख या) बारा महिन्यांची छोटी-छोटी बारा प्रकरणे करून, त्यांना काव्यात्म शीर्षके देऊन, प्रत्येक महिन्यात निसर्गात कोणती मधुर परिवर्तने घडतात याचे मनोज्ञ दर्शन घडवले आहे. ते पुस्तक खूपच चर्चिले गेले. त्याच्या अनेक आवृत्ती प्रसिद्ध झाल्या. त्या पुस्तकाद्वारा लघुनिबंध या गुळमुळीत आणि तंत्रबद्ध झालेल्या वाङ्मयप्रकाराचे ललित-गद्य नावाच्या चैतन्यमय वाङ्मयप्रकारात होऊ पाहणारे परिवर्तन इतिहास घडवणारे ठरले ! दुर्गा भागवत यांच्या बरोबरीने गो.वि. करंदीकर, इरावती कर्वे, माधव आचवल, श्रीनिवास विनायक कुलकर्णी आदी त्या काळच्या नवलेखकांनी ती क्रांती पूर्णत्वाला नेली. ‘ऋतुचक्र’ हे पुस्तक ‘साहित्याचे मानदंड’ ठरले ! त्याच्याविरुद्ध ‘ब्र’ काढण्याची हिंमत कोणी केली नाही.
तशी हिंमत करण्याचा इरादा माझाही मुळीच नाही. पण जरा विचार करा- ते लेखन दुर्गा भागवत यांच्याकडून पासष्ट वर्षांपूर्वी, आजारी अवस्थेत तरीही झपाटल्यासारखे घडून गेलेले आहे. दुर्गाबाई याही (शेवटी) एक माणूस आहेत ! त्यांच्या निसर्गनिरीक्षणाला काही मर्यादा असू शकतात. ऋतू म्हणजे वर्षातून नियमित अनुक्रमाने येणारे आणि वेगवेगळ्या परंतु ठरावीक जलवायुमानाचे कालावधी. ऋतू हे भारतीय महिन्यांनुसार बदलत नाहीत, तर ते इंग्रजी (जानेवारी, फेब्रुवारी) महिन्यांनुसार बदलतात- ही मुख्य मर्यादा आहे. भारतासारख्या खंडप्राय देशात उत्तर भारतातील ऋतूंचे आगमन दक्षिण भारतातील ऋतूंपेक्षा एक ते दीड महिना उशिराने होते.
प्राचीन संस्कृत साहित्य बहुतांशी उत्तर भारतात लिहिले गेले आहे. कालिदासाची ‘मेघदूत’ आणि ‘ऋतुसंहार’ ही दोन काव्ये आणि त्यांत वर्णिलेली उत्तर भारतातील भौगोलिक परिस्थिती व तिकडचे हवामान दक्षिण भारतातील राज्यांपेक्षा खूपच भिन्न असल्याचे लक्षात येईल. नववधूला नेसवले जाणारे लाल रंगाचे वस्त्र हे जुन्या काळात पळसाच्या फुलांच्या रंगांमध्ये रंगवलेले असायचे. ज्या वेळी पळसाला फुले येतात तो काळ तिकडे लग्नसराईचा, म्हणजेच वसंत ऋतूचा असतो. वसंत ऋतू तिकडे म्हणजे उत्तर भारतात एप्रिलमध्ये येतो. तिकडचे आंबेदेखील दक्षिणेपेक्षा महिना-दोन महिने उशिरा बहरतात. झाडांना मोहोरच एप्रिलमध्ये येतो.
वातावरणातील ऋतुचक्र सूर्याच्या दक्षिणोत्तर गतीमुळे निर्माण होते. म्हणजे ऋतू सूर्यसंक्रांतीवर अवलंबून असतात. ती वस्तुस्थिती महाभारत काळातदेखील माहीत होती. असे असताना, दुर्गाबार्इंनी चांद्रमासांवर आधारित ऋतुचक्र का लिहिले हा मला पडलेला प्रश्न आहे… ऋतुचक्राचा मेळ चैत्र, वैशाख वगैरे चांद्रमासांशी बसत नाही. ऋतू सूर्यस्थितीवर अवलंबून असल्याने ऋतूंचे प्रारंभ व भारतीय तिथी यांचाही संबंध नसतो. नक्षत्रविचार या शास्त्राची माहिती मला फार नाही, तरी तो सूर्यानुसार केला जातो म्हणून तो जास्त ‘शास्त्रीय’ असावा. सूर्य ज्या नक्षत्रामध्ये प्रवेश करतो ते नक्षत्र त्या काळाचे मानतात. सूर्य मृग नक्षत्रात दर वर्षी 7 किंवा 8 जूनला प्रवेश करतो, म्हणून मृग नक्षत्र हे 7 जूनला लागते. संक्रांत ही 14 जानेवारीलाच येते. त्याचेही भूगोलविज्ञान काहीसे असेच आहे.
‘नक्षत्रवृक्ष’ या विषयावरील पुस्तकाचे लेखक सुभाष बडवे पुढील ऋतुचक्र मानतात: डिसेंबर व जानेवारी- शिशिर ऋतू, फेब्रुवारी व मार्च- वसंत ऋतू, एप्रिल व मे- ग्रीष्म ऋतू, जून व जुलै- वर्षा ऋतू, ऑगस्ट व सप्टेंबर- शरद ऋतू आणि ऑक्टोबर व नोव्हेंबर- हेमंत ऋतू. ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ श्री.द. महाजन त्यांत पंधरा दिवसांचा फरक करतात. म्हणजे त्यांच्या मते, वसंत ऋतू 15 फेब्रुवारी ते 15 एप्रिल असा असतो.
भारतीयांनी व्यवहारात इंग्रजी महिने स्वीकारले आहेत. व्यक्ती घराबाहेर त्या-त्या (इंग्रजी) महिन्यात पडली, की अंगणापासून परसापर्यंत आणि शेतापासून जंगलापर्यंत वनश्रीसृष्टीत कोणते चेतोहारी बदल पाहण्यास मिळतात याकडे मला लक्ष वेधायचे आहे- बस्स ! त्यातही माझे लक्ष आकाशापेक्षा जमिनीकडे जास्त आहे. मला जमिनीवर घडणारे ‘सहा ऋतूंचे सहा सोहळे बघुनी भान हरावे’ एवढेच अभिप्रेत आहे.
दुर्गाबाईंचे ‘ऋतुचक्र’ हे माझे आवडते पुस्तक आहे. ते मी शंभर वेळा तरी वाचले असेल; अजूनही वाचतो. त्याचे खंडन करण्याचा उद्धटपणा माझ्यात नाही. दुर्गाबार्इंचा वारसा पुढे व्यंकटेश माडगूळकर, मारुती चित्तमपल्ली, शरदिनी डहाणुकर आदी लेखकांनी समृद्धपणे आणि संपन्नतेने चालवला. मी मराठीतील निसर्गविषयक सगळे लेखन नुसते वाचले नाही, तर ते माझ्या संग्रही ठेवले आहे. पण अनेक लहान-थोरां(लेखकां)कडून निसर्गनिरीक्षणात कळत-नकळत चूक करायची आणि ती त्यांच्या पुस्तकात नोंदवूनही ठेवायची हा प्रकार होत आला आहे. महानांनी केलेल्या अशा काही छोट्या-छोट्या चुका दुरुस्त करणे हे कामही मला नम्रपणे मी लिहीत असलेल्या नव्या ‘ऋतुचक्रा’त करायचे आहे.
‘मधुमालती’ हे झाड ओळखण्यात चूक अजूनही सगळेच करतात. शरदिनी डहाणुकर यांनीदेखील ती केली असल्याने ‘फुलवा’ या पुस्तकातील त्यांचा सगळा लेख रद्द ठरतो. जिला सगळे मधुमालती म्हणतात, तिचे खरे नाव ‘बारमासी’ ऊर्फ ‘रंगूनचा वेल’ असे आहे. ‘बारमासी’ला तुरे लांबट फुलांचे येतात आणि ते बहुधा उलटे लोंबतात. ती फुले सुरुवातीला पांढरी असतात, नंतर ती गुलाबी, भगव्या आणि शेवटी लालचुटुक रंगांची होतात. नावाचे सोडा -फुले आणि तो वेल सुंदरच आहे, पण तो मधुमालती नाही. संस्कृत साहित्यात ज्याचे वर्णन आले आहे, तो वेल खऱ्या मधुमालतीचा आहे. त्याचे नाव माधवीलता असे आहे. कालिदासाने त्याला वसंतदूती असे म्हटले आहे. त्याचे शास्त्रीय नाव Hiptage benghalensis (L) असे आहे.
पुष्पा भारती यांच्या ‘पुष्पभारती’ नावाच्या ग्रंथाचा अनुवाद मराठीत झाला असून त्याला जयंतराव टिळक यांची प्रस्तावना आहे. त्यात त्यांनी पर्जन्य (रेन ट्री) यालाच शिरीष मानण्याची चूक केली आहे आणि धड माहिती नसणारे बहुतेक जण ती चूक करतात. शिरीष हे सुंदर, सुगंधी, कोमलतेची उपमा असणारे खास भारतीय झाड असून ‘पर्जन्य’ हा वृक्ष मात्र दीडशे वर्षांपूर्वी दक्षिण अमेरिकेतून भारतात आला. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिराच्या मागे, नदीकाठी सगळी ‘पर्जन्या’चीच झाडे आहेत. ‘पर्जन्या’ला सुगंध नसतो. ते एक घाणेरडे झाड कसे आहे हे वर्णन माझ्या ‘ऋतुचक्रा’त आले आहे. झाडाला ओळखण्यात, नावे देण्यात अज्ञानातून खूप चुका केल्या जातात. उदाहरणार्थ, वॉटरलिलीच्या फुलाला कमळ समजून ती देवळाबाहेर विकण्यास ठेवलेली असतात. कमळाला नावे खूप आहेत, त्यांचे तितकेच प्रकार आहेत; पण वॉटरलिली हे काहीही झाले तरी ‘कमळ’ होऊ शकत नाही. दसऱ्याला सोने म्हणून जी पाने विकतात, ती आपट्याची नाहीत तर ‘कांचन’ या वृक्षाची असतात. दसरा आला, की बिचाऱ्या कांचनाला अकाली घाम फुटतो; कारण शहरी माणसे त्याला ओरबाडण्यासाठी आठही दिशांनी येतात !
पुष्कळ गैरसमज मजेशीर आहेत. बदाम या नावाने ओळखले जाणारे झाड खोट्या बदामाचे आहे. आपण खातो ते (खुराक म्हणून वगैरे) बदाम भारत देशात पिकत नाहीत. खोट्या बदामाचे इंग्रजी नाव ‘ईस्ट इंडियन आल्मंड’ असे असून, त्याच्या फळांचा आकार बदामासारखा बराचसा असतो. तो मुळीच खाऊ नये ! खरा बदाम इराण आणि उत्तर अमेरिका येथून आयात होतो. त्याचे बी दुकानावर जाऊन विकत घ्यावे आणि खावे. खोट्या बदामाला रस्त्यावरच पडू द्यावे. ज्याला अशोक म्हणतात आणि बागेत, कंपाउंड वॉलजवळ लावतात ते उंच-सरळसोट वाढणारे अशोक हे खोटे अशोक आहेत. खऱ्या अशोकाला सीताअशोक म्हणतात. तो खास भारतीय वृक्ष असून, त्याचे वनस्पतीशास्त्रीय नाव सराका अशोका किंवा सराका इंडिका असे आहे. त्या उलट सर्वांना माहीत असणारा, मोठ्या प्रमाणात दिसणारा ‘आसुपालव’ हा वृक्ष म्हणजे खोटा अशोक किंवा मास्ट ट्री असून दुर्गा भागवत यांनी ‘ऋतुचक्र’ पुस्तकात त्याही अशोकाचा घोटाळा असाच केला असल्याचे श्री.द. महाजन यांनीदेखील मान्य केले आहे (विदेशी वृक्ष, पृष्ठ 173). ‘कर्णिकार’ हे झाड नक्की कोणते यांचा मचळा (घोटाळा) मराठीतील प्रत्येक निसर्गलेखकाने केला आहे.
देशी वृक्ष कोणते आणि विदेशी वृक्ष कोणते, हे केवळ नावांवरून कळू शकत नाहीत. त्याने फरकही फार काही पडत नाही ! पण सुंदर भारतीय नावे असणारी कैलासपती, बूच (आकाशमोगरा), गोरखचिंच, अनंत, गुलमोहोर, शंकासुर, हादगा, नीलमोहर, उर्वशी, भेंडीगुलाब, भद्राक्ष, गिरिपुष्प, कवठी चाफा, पांढरा चाफा, पर्जन्य, मोरपंखी ही झाडे भारतीय नसून त्यांचे मूळ विदेशी आहे ! श्री.द. महाजन विदेशी झाडांची लागवड भारतामध्ये मोठ्या प्रमाणात करण्याच्या विरूद्ध आहेत. त्यांच्या मते, परकीय वनस्पतींमुळे भारतीय पर्यावरणीय समतोल बिघडू शकतो. भारतातील जैवविविधता (बायोडायव्हर्सिटी) कमी होऊ शकते. गाजर गवत, निलगिरी, कुबाभूळ किंवा वेडी बाभूळ या उपद्रवी वनस्पती आहेत आणि त्यांची भरमसाट वाढ ही काळजी करण्यासारखी गोष्ट आहे. परंतु मी सगळ्या विदेशी झाडांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करू शकत नाही. माझे प्रेम अनंत, चाफ्याचे सगळे प्रकार, गुलमोहोर, महोगनी, बूच, हादगा या विदेशी मित्रांवर देशी बांधवांपेक्षा काकणभर अधिक आहे. त्यांत काही झाडे दोनशे-अडीचशे वर्षांपूर्वी आलेली आहेत. ती भारतीय मातीत वाढतात ना? भारतीय कीटक आणि पक्षी त्यांचे परागसिंचन करून देतात ना? त्यांच्या कित्येक पिढ्या येथे जन्मल्या, वाढल्या. त्यांना विदेशी तरी कोणत्या तोंडाने आणि का म्हणावे?
मी मराठवाड्याच्या रखरखीत पठारावर जन्मलो. अठ्ठावन्न वर्षे तिकडेच काढली. पुण्याला आलो तो येथील झाडांच्या ओढीने. पुणे हे सर्वाधिक वृक्षविविधता असलेले, अतिशय वृक्षसमृद्ध असे शहर आहे हे मला वाचून माहीत होते. येथे सह्याद्री आहे. चार नद्या आणि सात धरणे आहेत. कदंब, अर्जुन, कांचन, चंदन, पांढरा शिरीष, सोनसावर ही मंडळी पुण्याची खासीयत. जगभरातून आणलेली अनेक झाडे येथे लावली गेली आहेत. त्यात महोगनी, उर्वशी, सोनसावर यांसारखी माझी अत्यंत आवडती झाडे आहेत. पुण्यात श्री.द. महाजन आहेत. वा.द. वर्तक, व्ही.जी. गोगटे होऊन गेले. येथे एम्प्रेस गार्डन आहे, अनेक वनस्पती उद्याने आहेत. ‘पुणे तिथे काय उणे’ हे वृक्षविविधतेच्या संदर्भात फारच लागू पडणारे आहे. मी पुण्यात या झाडांच्या संगतीने राहतो. पण माझे कोकणाचे आकर्षण काही कमी होत नाही. नागचाफा किंवा नागकेशर हे सर्वांत सुंदर फूल कोकणातच असते ना ! गोवा म्हणजे कोकणच आणि म्हणून पुष्पपरायण असणारा मी राहतो पुण्यात, पण माझा एक पाय असतो कोकणात !
– विश्वास वसेकर 9922522668 vishwasvaseka52@gmail.com
————————————————————————————————————————————
माहितीपूर्ण छान लेख. वनस्पतींचा मेळ माणसांनी निर्माण केलेल्या चांद्रमास,सौर मास बारा महिन्याच्या कोणत्याही कॅलेंडरशी तंतोतंत जुळत नाही . बहरण्यामागे पर्यावरणातले अनेक घटक असल्याने दरवर्षी काही दिवसांचा फरक पडतो.
वसेकरजी, ‘ऋतू बरवा’ अप्रतिमच जमलायं. मला स्थानिय इतिहासात नि झाडाफुलात विशेष रुची असल्याने, मजकूर विशेष भावला… असं मनात आलं की, हा मजकूर इंग्रजीत गेला पाहिजे ! याच्या विशेष अभ्यासासाठी लेखकाला एशियाटिक सोसायटीची फेलोशिप् मिळायला हवी– जशी माझ्या ‘चुनाभट्टीचा इतिहास नि आगरी समाज’ या पुस्तकासाठी मिळाली होती. ते पुस्तक प्रिन्स ऑफ वेल्सने (छ. शिवाजी महाराज) तर माझ्याकडून इंग्रजीत लिहवून घेतलं नि माझ्या विशेष भाषणासह गतवर्षी समारंभपूर्वक प्रकाशितही केलं. मराठी पुस्तकाची पहिली आवृत्ती केव्हाच संपलीयं; आता सुधारित आवृत्ती काढायची आहे. आपल्या मातृभाषेचा सन्मान आपणच वाढवायला हवा ना ! शुभेच्छा: नीला उपाध्ये.