साताऱ्याचे नाना पाटील यांचे नाव ‘प्रति सरकार’ वा ‘पत्री सरकार’ या नावाशी जोडले जाते. म्हणून तर त्यांना क्रांतिसिंह म्हणतात. ते स्वातंत्र्य चळवळीतील थोर नेते होत. त्यांनी भूमिगत राहून ‘प्रतिसरकार’ उभारले. त्यांनी केवळ राजकीय स्वातंत्र्यासाठी नव्हे, तर सामाजिक समता, न्याय यांसाठी आणि आर्थिक शोषणांविरुद्ध लढा दिला. त्यांना जनतेने घडवले आणि उलट, त्यांनी जनतेला संघटित करून इतिहास घडवला ! महात्मा फुले, शाहू महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेतील त्यांच्या पुढील काळातील एक महत्त्वाची कडी म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. ते महाराष्ट्राच्या सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक जीवनावर 1928 ते 1976 या काळात प्रभाव टाकणारे महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते.
नाना पाटील यांचा जन्म 3 ऑगस्ट 1900 रोजी सांगली जिल्ह्याच्या वाळवा तालुक्यातील येडे मच्छिंद्र या खेड्यात झाला. ते तेथेच व्हर्नाक्युलर फायनल ही, त्या काळी असणारी मराठी सातवीची परीक्षा उत्तीर्ण झाले आणि त्यांनी तलाठ्याची नोकरी पत्करली. त्यांनी लहानपणापासून शेतीकाम व गुरे राखण्याचा अनुभव घेतला होता. त्यावेळी त्यांना जहागीरदारी, ब्राह्मण्यवादी भेदभाव आणि अस्पृश्यतेचे विदारक वास्तव अनुभवण्यास मिळाले. त्यांच्यावर वारकरी संप्रदायाच्या विचारांचा प्रभाव होता. नंतर ते सत्यशोधक चळवळीचे कार्यकर्ते बनले. त्यांनी नोकरी सांभाळत गावोगावी सभा घेऊन समविचारी तरुणांच्या संघटना बांधल्या. त्यांचे मन नोकरीत रमले नाही. त्याचवेळी, 1930 साली महात्मा गांधी यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी चालवलेल्या असहकाराच्या चळवळीने त्यांना कॉंग्रेसच्या झेंड्याखाली आणले. त्यांनी असहकाराच्या आंदोलनात महत्त्वपूर्ण कार्य केले. त्यामुळे महाराष्ट्र प्रांतिक कॉंग्रेस कमिटीमध्ये कार्यकर्ते म्हणून त्यांची निवड केली गेली.
नानांनी सविनय कायदेभंग चळवळीत सहभागी होत स्वातंत्र्य संग्रामात सक्रिय प्रवेश केला. त्यांची पत्नी तारुण्यात निधन पावली. नाना पाटील यांनी त्यांच्या घरादाराकडे पाठ फिरवली, ती कायमची. त्यांनी पुन्हा लग्न न करता देशाचा संसार हा स्वत:चा संसार मानला ! त्यांनी सरकारचे वॉरंट झुगारून दोन वर्षे पोलिसांच्या हाती न लागता गावोगावी प्रचारसभा घेतल्या. त्यांना प्रथम अटक 1932 साली होऊन सक्तमजुरीची शिक्षा झाली. त्यांना येरवडा तुरुंगात अनेक हालअपेष्टा त्यावेळी सहन कराव्या लागल्या.
‘छोड़ो भारत’ या कॉंग्रेसच्या घोषणेनंतर देशभर उठाव झाला. 1942 च्या ‘चले जाव’ चळवळीत नाना पाटील यांनी भूमिगत होऊन सशस्त्र लढा दिला. भूमिगतांच्या 3 ऑगस्ट 1943 रोजी शिराळा येथे झालेल्या बैठकीत नाना पाटील यांना ‘प्रतिसरकार’चे प्रमुख म्हणून घोषित करण्यात आले. सातारा जिल्हा अठरा विभागांत विभागून नानांना गटप्रमुख म्हणून नेमले गेले. 1942 च्या 8 ऑगस्टच्या ‘करेंगे या मरेंगे’ या गांधीजींच्या आदेशानंतर नाना पाटील व त्यांचे सहकारी यांनी ‘आता पोलिसांच्या ताब्यात जायचे नाही’ असे ठरवले. इतर कालखंडांतील चळवळीपेक्षा अगदी वेगळ्या लढ्याचा, तंत्राचा, पुढारीपणाचा आणि विचारांचा आविष्कार त्यावेळी झाला होता. त्या क्रांतिकारक आविष्काराचे नवीन प्रतीक म्हणजे – पत्रीसरकार ! पत्रीसरकार हे समांतर सरकार म्हणून सातारा, सांगली, वाळवा या भागात शेतकरी गढ्यांमध्ये उभे राहिले. त्याचे प्रतीक होते नाना पाटील. त्यांनी महाराष्ट्र मनाची चांगलीच पकड घेतली. तशाच प्रकारचा प्रामुख्याने बंगालमध्ये मिदनापूर, बिहारमध्ये भागलपूर, ओरिसात बालासुर, आंध्रमध्ये भिमावरम येथे स्थापन झालेल्या प्रतीसरकारांचा उल्लेख करावा लागेल. ती प्रतिसरकारे फार काळ टिकू शकली नाहीत. परंतु नाना पाटील यांचे प्रतिसरकार मात्र विशेष गाजले. ते दीर्घकाळ अस्तित्वात असलेले व इंग्रजी सत्तेला शेवटपर्यंत दाद न लागू देणारे एकमेव असे प्रतिसरकार होते.

नाना पाटील यांच्या या ‘प्रतिसरकार’चे लष्करी व पोलिसी अंग म्हणजे ‘तुफान सेना’ हे होय. ब्रिटिशांच्या रेल्वे, पोस्ट यांसारख्या सेवांवर हल्ले करून त्यांना अडचणीत आणण्याचे तंत्र तुफान सेनेने यशस्वी रीत्या राबवले. सातारा व सांगली या दोन जिल्ह्यांतील सुमारे पंधराशे गावांमध्ये 1943 ते 1946 या काळात ‘प्रतिसरकार’ कार्यरत होते. जर्मनीच्या हिटलरची ‘स्टॉर्म ट्रूपर्स’ व नेताजी सुभाषचंद्र यांची ‘आझाद हिंद सेना’ हे लष्करी संघटनांचे आदर्श समोर ठेवून नाना पाटील व त्यांचे सहकारी जी.डी. लाड, अप्पासाहेब लाड, नागनाथ नायकवडी, राजुताई पाटील इत्यादींनी ‘तुफान सेने’ची निर्मिती (1943-44) केली होती. जी.डी. लाड हे ‘तुफान सेने’चे फिल्ड मार्शल होते. ‘तुफान सेने’च्या सैनिकांपुढे त्या काळच्या नामवंतांची व्याख्याने व बौद्धिके होत असत. अच्युतराव पटवर्धन व साने गुरुजी यांचेही मार्गदर्शन ‘तुफान सैनिकां’ना झालेले आहे अशी आठवण स्वातंत्र्यसेनानी भाई भगवानराव पाटील यांनी सांगितली आहे. भाई भगवानराव पाटील हे नानांचे जामात होत. त्यांचा विवाह नानांची कन्या हौसाबाई यांच्याशी झाला होता.
पत्री सरकारने सत्याग्रह, अहिंसा वगैरे गांधीवादी बंधने गुंडाळून बाजूला ठेवली. त्यांनी स्वत:ला ‘सरकार’ म्हणून जाहीर केले आणि ‘मावळ’ प्रांतातील गढ्यांतून ब्रिटिश राजवट संपली असा अंमल बसवला. स्वत:ला ‘सरकार’ म्हणून घोषित केल्यावर स्वत:ची स्वतंत्र अशी हत्यारी सेना असावी लागते, म्हणून पत्रीसरकारने तशी हत्यारबंद फौज उभी केली – हत्यारे म्हणजे भाले-बरच्या, लाठी-काठीपासून ते बंदुकीपर्यंत. ‘सरकार’ चालवायला पैसा लागतो. त्यासाठी इंग्रजांचे खजिने लुटले. उदाहरणार्थ, धुळ्याचा दरोडा. कुंडल येथे बँक लुटून लष्करी शस्त्रे हस्तगत केली. ‘प्रतिसरकार’तर्फे साडेपाच लाख रुपयांचा खजिना 14 एप्रिल 1944 रोजी आंबाडी येथे लुटण्यात आला. चरण येथे महसूल वसुलीसाठी आलेल्या पोलिस पाटलाला निःशस्त्र करून त्याची धिंड काढली. येळगाव येथे पस्तीस पोती धान्य लुटून गरिबांना वाटले. त्यामुळे त्यांना जनतेचा अधिक पाठिंबा मिळाला.
नाना पाटील यांनी ‘प्रतिसरकार’ स्थापन करून इंग्रजांपुढे जबरदस्त आव्हान निर्माण केले. नाना पाटील यांची ब्रिटिशांवर सातारा, सांगली या परिसरात मोठी दहशद निर्माण झाली होती. त्यांना पकडण्याचे ब्रिटिशांनी अनेक प्रयत्न केले. ‘प्रतिसरकार’मध्ये विविध जातिधर्मांचे कार्यकर्ते होते. त्यांत स्त्रियांचा सहभागही लक्षणीय होता. राजमतीताई पाटील, इंदुताई निकम, लक्ष्मीबाई नायकवडी, मुक्ताबाई साठे यांसारख्या अनेक महिलांनी भूमिगत राहून त्यांचे योगदान दिले.
‘प्रतिसरकार’च्या माध्यमातून बाजारव्यवस्थेचे नियंत्रण, अन्नधान्य पुरवठ्याची व्यवस्था, भांडणतंट्यांचे निवारण करण्यासाठी लोकन्यायालयांची स्थापना, तसेच दरोडेखोर, पिळवणूक करणारे सावकार आणि अन्य अत्याचारी पाटील यांना कडक शिक्षा देण्यासारखी अनेक समाजोपयोगी कामे करण्यात आली. ‘प्रतिसरकार’ची न्यायदानाची पद्धत लोकप्रिय झाली. ‘प्रतिसरकार’ने गावसभेला न्यायपीठाचे स्थान दिले. दोन्ही बाजू त्यांचे त्यांचे म्हणणे गावसभेसमोर मांडत. सामुदायिक चर्चेनंतर न्यायदान मंडळ निर्णय देत असे. विशेष म्हणजे त्या निर्णयांची अंमलबजावणी तात्काळ, जागेवरच केली जात असे. दारूबंदीचा कार्यक्रमही यशस्वी ठरला. महिलांचा त्याला शंभर टक्के पाठिंबा होता.
या ‘सरकार’चा मुख्य पाया शेतकरी हा झाला होता. त्यामुळे शेतकरी विमोचनाचे काही प्रश्न ताबडतोब सोडवण्यात आले. सावकारी व मोठ्या जमीनधारकांची गुंडगिरी नष्ट केली गेली. गुंडांना शिक्षा देण्यात आल्या. शिक्षेचा एक प्रकार ‘पत्री मारणे’ हा होता. अनेकांना गोळ्या घालून देहदंडही केला गेला. त्यामुळे या ‘सरकार-सत्ते’ला खरा लढाऊ, विश्वासू ‘मास बेस’ लाभला. तेथूनच नानांना ‘क्रांतिसिंह’ हे बिरुद्ध चिकटले.
महात्मा गांधी यांनीच ‘करेंगे या मरेंगे’ या आदेशानंतर सांगितले होते, की जर राष्ट्रीय नेते तुरुंगात गेले तर प्रत्येक भारतीयाने स्वत:स स्वतंत्र समजून स्वत:च्या बुद्धीला पटेल त्यानुसार इंग्रजांना घालवून देण्याची चळवळ उभारावी. नाना पाटील यांनी 1944 मध्ये गांधीजींची पाचगणीस भेट घेतली. त्यांनी गांधीजींना ‘पत्रीसरकार’बद्दल सांगितले. त्यावर गांधीजी म्हणाले, की ‘नाना पाटील, तुमची चळवळ माझ्या तत्त्वात बसते न बसते यापेक्षा तुम्ही 1942 ची स्वातंत्र्य चळवळ जिवंत ठेवली आहे, साताऱ्याने या चळवळीचे नाव राखले हे महत्त्वाचे होय ! नाना, तुम्ही बहादूर आहात.’
नाना पाटील यांनी महाराष्ट्रभर प्रचार दौरे 1932 ते 1942 या काळात केले. त्यांच्या प्रभावी भाषणांमुळे त्यांना आठ वेळा तुरुंगवास भोगावा लागला. त्यांनी मुंबईतील एका सभेत दहा मिनिटांची वेळ मिळूनही दीड तास भाषण केले आणि प्रेक्षक मंत्रमुग्ध होऊन ऐकत राहिले ! ते लोकांच्या भाषेत बोलत, दैनंदिन उदाहरणे देत आणि विनोदी शैलीत त्यांचे मुद्दे मांडत. त्यांचे बोलणे ऐकणाऱ्याला वास्तवाचे भान राहत नसे. त्यांचे भाषण ऐकण्यास बायका-पुरुष, तरुण-तरुणी, मुले-मुली जवळपासच्या गावांतून येत. त्यांचे तीन-तीन तास चाललेले भाषण संपले तरी अजून ते चालूच राहवे अशी जनतेची इच्छा असे. एम.एन. रॉय यांनी साताऱ्यातील एका सभेत गांधीजींवर टीका केल्यावर, नाना पाटील स्टेजवर धावून गेले आणि त्यांनी माईकचा ताबा घेतला व गांधीजींच्या जयजयकाराने सभेला वेगळी दिशा दिली.
नाना पाटील भूमिगत अवस्थेत ज्या ज्या मंडळींकडे आश्रयाला असत तेव्हा ते त्यांना सांगत, की ‘माझ्या जिवाचे काही बरेवाईट झाले तर मला लगेच पुरून टाका. फक्त सुरेशबाबूंस सांगा. चळवळीतील इतर कोणासही ते कळता कामा नये. चळवळ जिंवत राहिली पाहिजे’. सुरेशबाबू म्हणजे नाथाजी लाड. ते क्रांतिसिंहांचे चिटणीस होते. तसेच 1942च्या लढ्यातील भूमिगत नेतेही होते. त्यांचे भूमिगत अवस्थेतील सुरेशबाबू हे टोपणनाव.
नानांवर सत्यशोधक समाज आणि गांधीजी यांच्या विचारांचा प्रभाव होता. त्यांनी मंदिर प्रवेश आणि अस्पृश्यांसोबत सहभोजन असे कार्यक्रम घेतले. त्यांनी सुरू केलेल्या विवाह पद्धतीत वाजंत्री, ब्राह्मण, हुंडा यांना फाटा देऊन भारतमातेच्या नावाने मंगलाष्टके म्हणण्यात येत आणि सूताच्या माळांची देवाणघेवाण होत असे.
ब्रिटिश संसदेतसुद्धा नानांच्या कार्याची चर्चा झाली. तरीही नाना ब्रिटिश सरकारच्या हाती लागले नाहीत. अखेर, ब्रिटिश सरकारने भूमिगत कार्यकर्त्यांची वॉरंटे 1946 मध्ये मागे घेतल्यानंतर नाना जनतेत खुलेपणाने आले. त्यांचा भव्य सत्कार 26 मे 1946 रोजी साताऱ्यात करण्यात आला.

भारत स्वतंत्र झाल्यानंतर, नानांनी शेतकरी कामगार पक्ष, त्यानंतर कम्युनिस्ट पक्ष यांत प्रवेश केला. त्यांना निवडणुकीत 1952 मध्ये पराभव पत्करावा लागला. मात्र त्यांनी 1955 च्या ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळी’त सक्रिय भाग घेतला. त्यांनी ‘संयुक्त महाराष्ट्र चळवळी’चे नेतृत्व केले. ते सातारा मतदारसंघातून खासदार म्हणून 1957 मध्ये निवडून आले. नाना पाटील सत्यशोधक चळवळ, स्वातंत्र्यलढा, संयुक्त महाराष्ट्र आंदोलन अशा चळवळींमध्ये अखेरपर्यंत कार्यरत राहिले. त्यांनी दादासाहेब गायकवाड यांच्या मैत्रीतून दलित व सवर्ण भूमिहीनांसाठी लढा सुरू केला. त्या 1964 सालातील साठ दिवस चाललेल्या लढ्या-सत्याग्रहात दोन लाखांहून अधिक लोक सहभागी झाले होते. त्याचा परिणाम राज्य सरकारला भूमिहीनांना जमीन द्यावी लागली. नाना ‘अखिल भारतीय शेतमजूर युनियन’चे 1968 मध्ये पहिले अध्यक्ष झाले.
नाना पाटील यांनी त्यांचे कार्य वृद्धापकाळ आणि मधुमेहामुळे पाय गमावूनही थांबवले नाही. त्यांचे निधन 6 डिसेंबर 1976 रोजी मिरज येथे झाले.
– गिरीश घाटे 9820146432 ghategp@gmail.
(क्रांतिसिंह नाना पाटील (खंड एक व दोन) संपादक : जयसिंगराव भाऊसाहेब पवार, रिया पब्लिकेशन, कोल्हापूर आणि महाराष्ट्र वार्षिकी 2011)
नाना पाटील यांच्या आठवणींचा जागर
नाना पाटील बीड जिल्ह्यात 1967 मध्ये खासदार झाले होते. सातारा येथील किरण माने यांनी सांगितले, की “1967 ला अण्णांना (नाना पाटील) सातारा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी भरायची होती, पण त्यांच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाने त्यांना बीड मतदारसंघातून उभे राहण्याचा आदेश दिला. नाना पाटील बीडला निवडणूक लढवायला निघाले, तेव्हा त्यांच्याजवळ एसटीच्या तिकिटाला पैसे नव्हते ! माझे वडील (संपत मोरे) कॉम्रेड नारायण माने यांनी त्यांचे तिकिट काढले होते. ते त्यांच्या सोबत होते. बीडला गेल्यावर तेथील कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत केले. नानांनी स्वत:च्या आर्थिक अडचणीबाबत त्यांना सांगितले, तेव्हा तेथील लोकांनी वर्गणी काढून त्यांची अनामत रक्कम भरली. बाहेरून आलेल्या, पण हैदराबाद मुक्ती संग्रामात मोलाची कामगिरी बजावलेल्या नाना पाटील यांना रात्रीचा दिवस करून निवडून आणले. निवडणुकीत विजयी झाल्यानंतर नाना पाटील तेथील जनतेला म्हणाले, ‘मी आता पाच वर्षे माझ्या गावाकडे जाणार नाही, तुमच्यासोबतच राहणार !’ त्यांनी लोकांना दिलेला शब्द पाळण्यासाठी पाटोदा येथील ग्रामपंचायतीत मुक्काम ठोकला. तेथून ते लोकांचे प्रश्न सोडवू लागले. एक पत्र्याची पेटी, त्यात आईचा फोटो, दोन अंगरखे, दोन धोतरे आणि पांघरायला एक घोंगडे, एवढेच साहित्य त्या वेळी त्यांच्यासोबत होते. पाटोदा या गावातील त्यांचे सहकारी त्यांना दोन वेळचे जेवण देत. जेवण म्हणजे काय, तर दोन वेळच्या जेवणासाठी पाच भाकरी, त्यासोबत भाजी किंवा चटणी मिळाली तर त्यांना चालायची. एवढ्या जेवणावर ते खूश असायचे. त्यांच्या पाटोदा मुक्कामातील आठवणी इकबाल पेंटर यांनी व्यवस्थित नोंदवून ठेवल्या आहेत.
होळ येथील विश्वनाथ शिंदे हे नाना पाटील यांचे सहकारी, त्यांनीही एक प्रसंग सांगितला. खासदार नाना पाटील सायंकाळी सातच्या सुमारास होळला आले. शिंदे यांना भेटून म्हणाले, ‘मी आज राहणार हाय.’ “मग घरी चला की अण्णा.” “न्हाय मी देवळात राहतू. मला दोन-तीन भाकरी आणि कायतरी कोरड्यास आणून दे. गावातल्या समद्या लोकांना सांग मी आलुय म्हणून.” त्या दिवशी त्या गावातील महादेवाच्या मंदिरात त्यांची सभा झाली. लोक त्यांना घरी या, म्हणून आग्रह करत होते; पण त्यांनी रात्री देवळातच मुक्काम केला आणि ते सकाळी लवकर उठून निघून गेले. विशेष म्हणजे, ते होळला सायकलवरून आले होते !
नाना पाटील यांचे नातू सुभाष पाटील यांनी सांगितले, ‘मी पाचवीला ताकारीच्या शाळेत शिकत होतो. अण्णा तेव्हा खासदार होते. त्यांची देवराष्ट्र गावात सभा होती. ते त्या सभेसाठी मुंबईवरून रेल्वेने ताकारीपर्यंत आले होते. मग ते मला भेटण्यास शाळेत आले. ते मला घेऊन निघाले. त्यांना नेण्यास देवराष्ट्र गावातील कार्यकर्ते बैलगाडी घेऊन आले. मी त्यांच्यासोबत बैलगाडीने प्रवास केला. तो प्रसंग माझ्या डोळ्यांसमोर आहे. माझ्या आजोबांनी शेकडो मैल प्रवास केला. कधी ते पायी जात, कधी सायकल, तर अनेकदा बैलगाडी. ते दूरच्या गावाचा प्रवास एसटीने करत. ते खासदार झाले, तरी त्यांनी जीपगाडी घेतली नव्हती. मी त्यांच्यासोबत सायकलीवरून डब्बलशीट फिरलो आहे. मी त्यांचा लाडका होतो. ते मला सायकलीवर बसवून घेऊन जायचे. नाना पाटील 1957 ला सातारा येथून आणि 1967 ला बीड येथून असे दोन वेळा खासदार झाले. त्यांच्या साधेपणाच्या कथा ऐकून कोणीही थक्क होईल !
कवी सुरेश मोहिते हेसुद्धा नानांच्या आठवणी सांगतात: “एकदा अण्णा आमच्या गावात एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यांना सोडायला आमची बैलगाडी गेली होती. अण्णांना आमची कौतुक आणि निशाण ही बैलजोडी खूपच आवडली. पुन्हा ते कधीही भेटले, तर कौतुक-निशाणची चौकशी करायचे.
अण्णा त्यांच्या मुलीच्या सासरी हनमंतवडवे या गावाला एसटीने येत होते. त्यांच्या सोबत त्यांची कायम सोबत करणारी पत्र्याची पेटी होती. हनमंतवडवेला आल्यावर पेटी घेऊन उतरताना अण्णांना थोडा उशीर झाला, म्हणून एसटीचा वाहक त्यांच्यावर खेकसला, “म्हाताऱ्या, गाव जवळ आल्यावर पुढे यायला येत न्हाय का?” त्या तरुण वाहकाने त्यांना ओळखले नव्हते. इंग्रजी सत्तेच्या उरात धडकी बसवणारा, संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईत स्वत:च्या अमोघ आणि गावरान वक्तृत्वाने राज्यातील जनतेला लढाईला सज्ज करणारा, माजी खासदार असलेला हा लोकनेता त्या वाहकाला काहीही बोलला नाही. त्याने फक्त स्मित केले.
सुभाष पाटील यांनी सांगितलेला हा प्रसंग. स्वत:च्या मानापमानाची पर्वा न करणारे नाना लोकांच्या प्रश्नावर मात्र रान उठवायचे. आक्रमक व्हायचे. त्यांची भाषणशैली संवादशास्त्राच्या अभ्यासकांना खुणावत असते. लोकांचे प्रश्न मांडताना राज्यकर्त्यांवर टीकेच्या तोफा डागणारे नाना व्यक्तिगत जीवनात हळवे आणि मायाळू होते.
(संपत मोरे यांच्या ‘युगांतर’मधील लेखनातून उद्धृत)