राशीन गावचा तरुण विजय भोसले आदिवासी पारधी समाज विकास संस्थेच्या वतीने ‘संकल्प वसतिगृह’ चालवत आहे. त्यास आठ-नऊ वर्षे झाली. तो प्रकल्प अहमदनगर जिल्ह्याच्या कर्जत तालुक्यात येतो. कर्जत तालुका व त्याला लागून असलेले बीड-नगर जिल्ह्यांतील प्रदेश दुष्काळी व मागास आहेत. त्या प्रदेशांत फासेपारधी, भिल्ल, भटके, वीटभट्टी कामगार, ऊसतोड कामगार यांची संख्या बरीच आहे. विजय भोसले याचा जन्म त्याच प्रदेशातील राशीन (कर्जत तालुका) गावातील उघड्या माळरानावरील पालामध्ये झाला. त्यामुळे तेथील उघडेवाघडे जीवन त्याने अनुभवले आहे. त्याच्या जन्मानंतरची गोष्ट नाट्यपूर्ण आहे. त्यामुळे भोसले कुटुंबाच्या जीवनाला वेगळे नवीन वळण लागले. विजय जन्माला येऊन चार दिवस होत नाहीत, तोच त्यांच्या पालावर पोलिसांची धाड पडली. पोलिस विजयचे वडील अरुण भोसले यांना पोलिस चौकीत घेऊन गेले. कारण कोठेतरी चोरीचा गुन्हा घडला होता. गावात चोरी झाली तर प्रथम पारधी समाजातील पुरुषांना पोलिस चौकीत नेण्याची पद्धतच पडून गेलेली होती, कारण ब्रिटिशांनी पारधी ही जमातच गुन्हा प्रवृत्तीची ठरवली होती.
विजयची आई भावी भोसले विजयला चार दिवसांचा असताना त्याला झोळीत टाकून तशीच पोलिस चौकीत गेली. तिने पोलिसांना विचारले, “माझा मालक कोठे आहे?” तेव्हा पोलिस म्हणाले, “तुझा मालक पळून गेला !” पण तिचा विश्वास बसेना, कारण तिला तेथे विजयच्या वडिलांच्या चपला दिसल्या. तिने आरडाओरड केली. पोलिसांवर आरोप करू लागली, की “तुम्ही माझ्या मालकाला मारून टाकलं आणि मला सांगताय की, तो पळून गेलाय…!” तेव्हा पोलिस तिला म्हणाले, “काळजी करू नकोस, तो एक-दोन दिवसांत घरी येईल. तो घाबरून पळून गेला आहे.” ती परतली. दोन दिवसांनी, खरोखरीच, एका माणसाकडून निरोप आला, की राशीन गावानजीक कुरणाची वाडी येथे तिचे यजमान आहेत. तेथे राहणारे देविदास महाराज मोढळे यांनी त्यांना आसरा दिला आहे व त्याच्यावर कामही सोपवले आहे. काम होते वाडीची राखण करण्याचे. विजयच्या वडिलांना नवा उद्योग मिळाला !
विजयचे वडील रात्री पालावर आले. त्यांनी पालावर असलेली त्यांची भांडीकुंडी, फाटकेतुटके कपडे, चार मुले, गाय व पत्नी यांच्यासह विजयला झोळीत टाकून, ते कुरणाच्या वाडीत राहण्यास गेले. त्यांनी तेथे स्वत:चे पाल उभारले. त्यांच्या नवीन संसाराला तेथेच सुरुवात झाली ! देविदास महाराजांनी त्यांना पानटपरी काढून दिली व बजावले की, “यापुढे तुम्ही गावोगावी भटकणे बंद करा व एका ठिकाणी राहून काम करा !” देविदास महाराजांचे ऐकून त्यांनी त्यांचे पुढचे आयुष्य जगण्याचे ठरवले.
विजयचे वडील मोलमजुरी करत, तर आई त्याला झोळीत टाकून शेतकामावर जाई. त्यांना पाच मुले. ती शाळेत जाऊ लागली. पैकी इतर भावंडे फार शिकली नाहीत. पण विजय शाळेत जात राहिला. मात्र विजय पारधी समाजातील असल्यामुळे त्याला शाळेत एकटे एकटे वाटे. त्याच्या अंगावर धड कपडे, पायात चपला नसत. त्यामुळे त्याला मित्र नव्हते. त्याच्या मनात गरिबीचा गंड तयार झाला होता. पण विजय त्याही परिस्थितीत शिकत कॉलेजपर्यंत पोचला. तेथेही त्याला तसाच अनुभव आला. तो सगळ्या प्रतिकूलतेवर मात करून बी ए झाला. शिकत असताना तो पानाच्या टपरीवरही बसत असे. त्या पैशांतून घराला मदत होई. त्याने श्रीगोंदा येथे बी एड केले. मात्र त्याने शिक्षकाची नोकरी स्वीकारली नाही.
त्याला त्याच्या समाजातील आजूबाजूला उपेक्षित जीवन जगणारी, भीक मागून खाणारी मुले दिसत होती. मुलींची लग्ने लहानपणीच होत होती. थोडी मोठी मुले ऊसतोडणीला व वीटभट्टीवर कामाला जात होती. त्यामुळे तो अस्वस्थ होई. विजयने निराधार-निराश्रित तीन-चार मुलांना स्वत:च्या घरी ठेवून त्यांचे शिक्षण करण्याचे ठरवले. अशिक्षित आई-वडिलांनी विजयला साथ देण्याचे मान्य केले. तेथूनच विजयच्या सामाजिक कामाला सुरुवात झाली. पुढे, त्याने एका दालनात आठ-नऊ मुलांना ठेवले व त्यांना शाळेत घातले. गावातील डॉक्टर पंकज जाधव यांनी त्यांच्या दवाखान्याच्या बाजूचा तो हॉल मुलांच्या अभ्यासाकरता व राहण्यासाठी दिला. गावातील दानशूर मंडळींनी त्याला धान्य व पैशांची मदत देणे सुरू केले. त्याच दरम्यान त्याचे लग्न झाले. पत्नी प्रणिता हीसुद्धा त्याच्या कामात त्याला मदत करू लागली. मुलांना जेवू घालण्याची जबाबदारी तिची होती. गेली नऊ वर्षे ती दोघे मिळून हे काम करत आहेत.
विजयने आई-वडिलांच्या छोट्याशा जमिनीवर स्वतःचे छोटेसे घर उभारले आहे, माळरानच ते. तेथेच बाजूला एकेचाळीस मुलांची राहण्याची सोय केली आहे. त्या मुलांच्या शिक्षणाचा व जेवणखाण्याचा खर्च लोकसहभागातून केला जातो. विजयने मुलांसाठी संगणक कक्ष उघडला आहे. तेथे मुलांना संगणकाची ओळख व त्यासंबंधीचे प्राथमिक शिक्षण दिले जाते. ‘संकल्प’ वसतिगृहातील मुले-मुली वेगवेगळ्या खेळांमध्ये चमकत आहेत. त्या मुलांपैकी आदिवासी समाजातील गरीब घरातील दहा वर्षांच्या जानकी मापरी या चौथीत शिकणाऱ्या मुलीने केंद्रस्तरीय स्पर्धेत धावण्यात व उंच उडीत प्रथम क्रमांक पटकावून प्राथमिक गटात बाजी मारली.
विजय आरक्षणाबाबतचा सावळागोंधळ, त्यासाठी संप-उपोषण-धरणे आदी प्रकार व नोकऱ्या-रोजगारांची अनुपलब्धता यांमुळे गोंधळून गेला होता. त्याला वाटे, या मुलांचे ती मोठी झाल्यावर होणार कसे? पण त्याचे त्यानेच त्यावर उत्तर शोधले. त्याने मुलांना शेतीकाम, ऊसाच्या कारखान्यात नेऊन तेथे चालणारी कामे; तसेच, दूध डेअरीतील कामे व इतर उद्योगधंदे असे व्यावसायिक शिक्षण लहान वयातच देणे सुरू केले आहे. विजयचा उद्देश आहे, की तशा प्रकारचे शिक्षण मुलांना मिळाले तर त्यांना व्यवसायांची आवड निर्माण होईल व पुढे मोठे झाल्यावर शिकूनही नोकऱ्या मिळतीलच याची शाश्वती नसल्याने त्यांना अशा कामांतून दिलासा लाभेल व त्यांचा चरितार्थही भागेल. पुण्याच्या वीणा गोखले यांच्या ‘देणे समाजाचे’ या संस्थेच्या उपक्रमातून विजयच्या ‘संकल्प’ वसतिगृहाला बरीच मदत मिळाली आहे. विजय-प्रणिता भोसले दाम्पत्याला ‘बाबा आमटे सेवा गौरव’, ‘राज्यस्तरीय कृतज्ञता’, ‘समाजरत्न गौरव’, ‘अमर ऊर्जा’ अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. विजयची धडपड मुलांना राहण्यासाठी आधुनिक सोयींनी युक्त पक्की इमारत असावी, यासाठी सुरू आहे.
विजय भोसले (संकल्प वसतिगृह, राशीन) :संपर्क क्रमांक : +919890411240, +919325991822
वेबसाईट : https://www.apsvsrashin.com
– सुरेश चव्हाण 9867492406 sureshkchavan@gmail.com
विजय भोसले यांची समाजाविषयी व गरीब विद्यार्थ्यान विषयी असलेली तळमळ खूपच प्रंसंशिय आहे, समाजाला विजय भोसले सारख्या लोकांची गरज आहे.
लेखकाने लेखात थोडक्यात पण छान माहिती दिली आहे,
आपल्या आसपास अजून असे अनेक समाज आहेत जे समाजातील मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे आणि ते काम विजयने सुरू केले आहे . आणि त्याचे काम इतरान पर्यंत पोहचवण्याचे काम लेखकांनी केले आहे, या साठी त्यांचे आभार मानले पाहीजेत.
खूप छान काम, विजय..उत्तरोत्तर हे कार्य वृध्दींगत होवो ही सदिच्छा!