रेखा बागूल या कर्णबधिर मुलांच्या प्रशिक्षणाकडे अपघाताने वळल्या, पण हळूहळू त्यांच्या कामाचे महत्त्व इतके वाढत गेले, की त्यांचे काम फक्त कर्णबधिरांपर्यंत मर्यादित न राहता गतिमंद आणि त्याही पुढे जाऊन बहुविकलांग मुलांपर्यंत पोचले आहे. त्या सुरुवातीला डोंबिवलीत आणि, आता दापोलीत ‘गतिमंद आणि बहुविकलांग मुलांचे शिक्षण आणि पुनर्वसन केंद्र’ ही निवासी शाळा चालवत आहेत. ‘आनंद फाउंडेशन ही त्यांची मूळ संस्था आहे. त्यांचे काम अन्य संस्था व व्यक्ती यांच्या सहकार्याने वृद्ध निवासापर्यंत पोचले आहे.
त्या म्हणतात, की कर्णबधिर मुलांना शिकवणे म्हणजे सहनशीलतेची मोठी कसोटी असते. ती पार केली, की मग पुढील सर्व सामाजिक कार्याच्या वाटा दिसू लागतात. त्यांना आरंभीच्या काळात एका कर्णबधिर मुलाला ‘आई’ हा शब्द शिकवण्यास सहा महिने लागले, परंतु ज्या दिवशी त्याने तो शब्द उच्चारला तेव्हा रेखा यांच्या डोळ्यांत अश्रू तरळले ! ही संवेदना हाच त्यांच्या कामाचा आधार आहे. रेखा बागूल यांचे कर्णबधिर, गतिमंद व बहुविकलांग मुलांसाठी काम एकेचाळीस वर्षे चालू आहे.
रेखा या पूर्वाश्रमीच्या सुलभा लक्ष्मण भावे. त्यांचे माहेर पुण्यात. त्यांचे वडील असिस्टंट पोलिस कमिशनर होते. घरात आठ बहिणी. वडील कामासाठी सतत बाहेर. रेखा या खंबीर आणि शिस्तप्रिय आईच्या संस्कारात वाढल्या. त्यांनी अकरावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्याच वेळी उत्तम स्थळ चालून आले आणि सुलभा भावे या रेखा बागूल झाल्या. पतीचा आग्रह होता, की त्यांनी पुढील शिक्षण घ्यावे, मात्र ते तीन मुलांच्या जन्मानंतर अवघड होत गेले. तरीही रेखा यांनी घरी राहून समाजशास्त्र विषयात एम ए, बी एड असे शिक्षण घेतले; व त्याबरोबर, कार्योपयोगी म्हणून ‘डिप्लोमा इन डेफ एज्युकेशन’ हे कर्णबधिरांसाठी आवश्यक असे कौशल्य शिक्षण घेतले. दरम्यान, त्यांची ओळख कर्णबधिरांसाठी काम करणाऱ्या अंजली आगाशे यांच्याशी झाली. त्यातून त्यांच्या जीवनाने एक भले मोठे वळण घेतले.
त्यांनी स्वत:ची शाळा डोंबिवलीत कर्णबधिरांसाठी काढण्याचे ठरवले. रेखा त्यांच्या मैत्रिणींसह कर्णबधिर मुले हुडकण्यासाठी झोपडवस्तीत फिरू लागल्या. काही कर्णबधिर मुले आढळलीही, पण पालक म्हणायचे, ‘कशाला पाठवायची मुले शाळेत? ही मुले काय डॉक्टर, इंजिनीयर होणार आहेत, की काय?’ त्यांनी तीस मुलांच्या पालकांना राजी केले. रंजना गोगटे, सुलभा टोकेकर या त्यांच्या त्या कार्यात साथीदार होत्या. ‘कर्णबधिर ज्ञानप्रबोधिनी’ शाळा डोंबिवलीत 1982 मध्ये सुरू झाली. रेखा स्वत:च शाळा झाडणे, मुलांची शी-शू धुणे, त्यांना शिकवणे सारे करत.
सहा वर्षे वयाच्या आधी मुलाला शाळेत प्रवेश नाही, हा सरकारी नियम आहे, पण कर्णबधिर मुलांना दीड-दोन वर्षांपासून शिकवणे सुरू केले तर मोठा फायदा होतो, मुले कमी श्रमात लवकर बोलू लागतात. त्यांनी त्यांच्या डोंबिवलीच्या राहत्या घरी ‘नचिकेत वाचा श्रवण प्रशिक्षण केंद्र’ सुरू केले. तीसेक मुले शिकू लागली, बोलू लागली. पालक मुंब्रा, टिटवाळा, शहापूर, वाशिंद असे लांबून लांबून मुलांना घेऊन येत; वर्ग संपेपर्यंत तेथेच बसून राहण्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता. पण मुले दोनेक वर्षांत चांगले बोलण्याचे शिकून सर्वसामान्य मुलांच्या शाळेत शिकण्याला जात असत. त्यांतील एक मयुरी आपटे ही रसायनशास्त्र विषय घेऊन बी एससी झाली. तिने ‘फूड अँड ड्रग अॅनॅलिसिस’चा पदव्युत्तर डिप्लोमा केला. तिचा राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्या हस्ते सत्कारही झाला. रेखा यांना स्वत:चा सन्मान झाल्यासारखे वाटले. मयुरीचे लग्न कर्णबधिर तरुणाशीच झाले. त्यांना अपत्य झाले. ते बधिरच आहे व मयुरी सध्या त्याची पूर्णवेळ काळजी घेते.
रेखा यांच्या निवृत्त पतीने शेती करण्यासाठी म्हणून दापोलीत स्थायिक होण्याचा निर्णय 2007 मध्ये घेतला. रेखा यांना त्याच्या कामात डोंबिवलीत उभे केलेले विश्व सोडून नव्या जागी रुजायचे होते. त्या थोड्या अस्वस्थ झाल्या, पण दापोलीत तशा कामाची गरज जास्त आहे हे रेखा यांना तेथे जाताच जाणवले. त्या तेथे रमल्या. त्यांचे पती रवींद्र गंगाधर बागूल हे डोंबिवलीत वनस्पतीशास्त्राचे प्राध्यापक म्हणून नोकरी करत होते. त्यांना दापोलीत जमीन बऱ्या भावात मिळाली, त्यामुळे त्यांनी तिकडे जाण्याचे ठरवले. त्यांची जमीन तीन एकर आहे. त्यात काजू-आंब्याची बाग आहे. त्याखेरीज हळद, नाचणी अशी नवी पिके लावण्याचे त्यांचे प्रयोग चालू असतात. ते संगीतवेडे असल्याने त्यांच्या त्या रचनाही प्रसिद्ध होत असतात.
रेखा यांनी कर्णबधिर मुलांना शिक्षणाचे काम दापोलीत नव्याने सुरू केले. त्यांनी आरंभी, दहा वर्षे तेथील ‘इंदिराबाई बडे मूकबधिर विद्यालया’त अध्यापनाचे काम केले. तेथील मुलांना त्या ‘सतरा क्रमांकाचा फॉर्म’ भरून दहावीला बसवत. ते काम सुरूच आहे. तेथे तीस मुले शिकत आहेत. त्या संस्थेत रेखा यांनी ‘ऑनररी’ काम केले. त्या सध्या शाळेत सचिव म्हणून तेथे काम पाहत आहेत. रेखा यांना खंत आहे, की पालक त्यांचे मूल विशेष आहे हे मान्य करण्यास सहज तयार होत नाहीत. त्यांची समजूत घालणे हे मोठे आव्हानात्मक ठरते असे त्या म्हणाल्या. समाजातील विकलांग मुलांची वाढती संख्या आणि त्यांना असलेली मदतीची गरज हाही त्यांना छळणारा प्रश्न आहे. म्हणूनच रेखा यांनी वयाच्या सत्तरीत ‘आनंद फाउंडेशन संचालित गतिमंद आणि बहुविकलांग मुलांचे शिक्षण व पुनर्वसन केंद्र’ जालगाव येथे15 ऑगस्ट 2021 पासून सुरू केले आहे. रेखा म्हणाल्या, की मोबाईलने सगळी समाजव्यवस्थाच बिघडवून टाकली आहे. नातवंडांच्या हाती मोबाईल देऊन आजी-आजोबा स्वत:च मोबाईलमध्ये रमून जातात. त्यातून अनेक तऱ्हेच्या विकृती वाढत आहेत. मुलांमधील स्वमग्नता (ऑटिस्टिक वृत्ती) बळावत आहे. त्यांचे वेडेविकृत विभ्रम पाहणे आम्हा सराइतांनाही असह्य होते. त्यांच्या केंद्रात एकोणीस अनिवासी, तर अकरा मुले निवासी पद्धतीने राहतात. कौटुंबिक हिंसाचारग्रस्त स्त्रियांना मदत करणे, पीडित, दिव्यांगांना न्याय मिळवून देणे हेही रेखा यांचे काम चालू आहे.
रेखा बागूल अधिकतर दापोलीच्या समाज कार्यकर्त्या शुभांगी गांधी यांच्याबरोबर सामाजिक काम करतात. त्या दोघींनी अन्य मंडळींच्या सहकार्याने वृद्धाश्रम सुरू केला आहे. आम्ही पंचवीस लोकांनी प्रत्येकी पंचवीस हजार रुपये काढून हा वेगळा प्रयोग चालवत आहोत असे रेखा म्हणाल्या.
रेखा रवींद्र बागूल 9422443914 rekhabagool@gmail.com
आदित्य, 929 विष्णूनगर, जालगाव, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी 415712
– विनायक बाळ 9423296082 vinayak.bal62@gmail.com
———————————————————————————————-