शेवगावचे रमेश भारदे यांना शिक्षणसम्राट होणे सहज शक्य होते, तसे राजकीय संबंधही त्यांचे होते; पण ते शिक्षक झाले ! आणि नंतर सेवाभाव, ध्येयनिष्ठ असे शिक्षणसंस्था चालक बनले. त्यांच्या या कर्तबगारीचा केवळ शेवगाव नव्हे तर नगर जिल्ह्यावर एक वेगळा ठसा उमटला आहे. रमेश भारदे यांनी ज्ञानदानाचे व्रत अखंड जपले.
रमेश भारदे यांना नगर जिल्ह्याच्या शेवगावच्या भारदे घराण्याची विद्वता आणि बुद्धिमत्ता यांचा वारसा लाभला आहे. रमेश भारदे यांनी त्यांच्या प्रतिभेने आणि कर्तृत्वाने शेवगावच्या शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक व सांस्कृतिक क्षेत्राला राज्यभर नावलौकिक मिळवून दिला आहे !
रमेश यांच्या बालवयात त्यांच्यावर संस्कारही तसे होत गेले. ते जेथे राहत त्या त्यांच्या भारदे वाड्याच्या ओसरीवर अंमलदार या नाटकाच्या तालमी चालत असत, त्यांना त्या पाहून-ऐकून सर्वच्या सर्व नाटक आपोआप पाठ झाले. त्यांना नाटकातील एक पात्र एकदा आजारी पडल्याने ती भूमिकादेखील ऐनवेळी वठवावी लागली. त्यातून सुरू झाली त्यांची नाट्यसाधना. ही गोष्ट आहे 1954 सालची. त्यांनी अभिनयाची आवड जपली व ती ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी खुबीने वापरली. त्यांनी मोजकी साधने हाताशी असताना थेट पुण्या-मुंबईच्या शाळांशी स्पर्धा करत शेवगाव इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवर नेले !
ते भारदे साक्षरता प्रसारक मंडळाच्या (तेव्हाच्या) शेवगाव इंग्लिश स्कूलमध्ये सहशिक्षक म्हणून 12 जून 1963 रोजी रुजू झाले. त्यांचे वडील नानासाहेब भारदे. ते स्वातंत्र्य सैनिकांचे अग्रणी. तेच संस्थेचे संस्थापक विश्वस्त होते, परंतु रमेश यांनी चाळीस वर्षे नोकरी केली. त्यांनी वडिलांच्या पदाचा बडेजाव मिरवला नाही व गैरफायदा घेतला नाही. त्यांचे प्राविण्य मराठी आणि संस्कृत या दोन विषयांत आहे. त्यांची ख्याती ‘मराठी व्याकरणातील कोष’ अशी आहे. त्यांनी शिक्षकी पेशातील प्रगतीही उत्तम साधली. ते पर्यवेक्षक 1975 मध्ये, उपप्राचार्य 1986 मध्ये व प्राचार्य 1992 साली अशा पदांवर विराजमान झाले.
त्यांनी शिक्षक म्हणून अभिनव उपक्रम राबवले. त्यातून शाळेचे नाव महाराष्ट्रातील उपक्रमशील शाळा म्हणून राज्यभर झाले. दोन हजार विद्यार्थ्यांकडून एकाच वेळी अथर्वशीर्ष पठन, जिल्हा व राज्यस्तरीय शुद्धलेखन कार्यशाळेत मार्गदर्शन आणि गोफ-टिपरी व अपना उत्सव यासाठी थेट दिल्लीला धडक मारणाऱ्या ‘भारतीयम’च्या लेझीम पथकाचे संघटन असे त्यांचे पराक्रम त्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देतात. रमेश त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी लेखक, दिग्दर्शक, क्रीडाशिक्षक, पालक, समुपदेशक आणि मार्गदर्शक या भूमिका अक्षरशः जगले ! त्यांना ‘रमेशसर’ म्हणूनच सर्व शाळेने आजन्म आपलेपणाच्या भावनेने स्वीकारले.
त्यांचा विश्वास पारंपरिक, साचेबद्ध आणि चौकटीतील शिक्षणावर नव्हता. ते शिक्षकाला विद्यार्थ्यांच्या विकासासाठी अनेक भूमिका कराव्या लागतात असे फक्त सांगत नसत; तर त्यांनी तो आदर्श त्यांच्या सहकाऱ्यांपुढे स्व कृतीतून ठेवला. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी बालनाट्ये लिहिली-दिग्दर्शित केली. त्यातील कलाकारांना राज्य स्तरावरील पुरस्कार प्राप्त झाले. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण रक्षणाचे मूल्य रुजवताना कल्पकतेने उभारलेल्या, वृक्षराजीने नटलेल्या ‘आनंदवना’चे आणि हिरव्यागार वेलींच्या नैसर्गिक मांडवाचे मान्यवरांनी कौतुक केले आहे. रमेशसरांच्या मराठी व्याकरणातील ज्ञानाचा आणि व्यासंगाचा सन्मान व्याकरणतज्ज्ञ मो.रा.वाळिंबे, वासू देशपांडे यांनी केला आहे. रमेशसरांनी मुख्याध्यापक असताना जिल्ह्यात सर्वप्रथम माध्यमिक शाळेत सेमी इंग्रजी माध्यमाची सुरुवात केली. त्यांची शाळा पाचवीपासून संगणक प्रशिक्षण सुरू करणारी जिल्ह्यातील पहिली ठरली. त्यांनी दहावीच्या बोर्ड परीक्षेला बाहेरून होणारा उपद्रव रोखण्यासाठी व्हिडिओ चित्रिकरण करण्याचा धाडसी निर्णय घेतला. त्यांचे अनुकरण पुणे बोर्डाने केले. सरांच्या शाळेचे अनेक विद्यार्थी पुणे बोर्डाच्या गुणवत्ता यादीत झळकले. गणेश चेके यांच्या रूपाने मराठीतील सर्वाधिक गुणांसाठीचे राम गणेश गडकरी सुवर्ण पदक पुण्याबाहेरील शाळेने सर्वप्रथम खेचून आणले ! त्यात सरांच्या मार्गदर्शनाचा वाटा मोठा राहिला आहे. त्यांनी स्वातंत्र्याचा सुवर्णमहोत्सव 14 ऑगस्टच्या मध्यरात्री विद्यार्थ्यांसह मशाल यात्रा काढून अनोख्या पद्धतीने साजरा केला. नगर जिल्हा परिषदेने त्यांना आदर्श शिक्षक तर त्यांचे संस्कृत भाषेतील योगदान लक्षात घेऊन त्यांना जेष्ठ नागरिक संघाने ऋषितुल्य पुरस्कार यांनी सन्मानित केले आहे. ते सेवानिवृत्तीनंतरही त्याच उत्साहाने, तडफेने विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना मार्गदर्शन करत असतात. ते त्याबरोबर लेखन आणि अनुवाद असे मोलाचे कार्य करत आहेत. ते मराठी शाळेत संस्कार उपक्रम राबवत आहेत.
त्यांनी त्यांच्या शिक्षणसंस्थेचे अध्यक्षपद निवृत्तीनंतर भूषवले आहे. त्यांनी त्यांच्या जीवनाचा केंद्रबिंदू आयुष्यभर शाळा हाच मानला !
लेखन व अभ्यास हे त्यांच्या जीवनाचे वेगळेच अंग. त्यांनी बालकुमारांसाठी लेखन भरपूर केले. छोट्यांनो उठा मोठ्यांनो फुटा; नंगा राजा; हॅलो Blank call; तिमिरातून तेजाकडे ही राज्यस्तरीय पुरस्कारप्राप्त त्यांची बालनाट्ये; म्हणी- ज्ञानाच्या खाणी, भारूडातून व्याकरण, शुद्धलेखनाच्या सोप्या वाटा ही मराठी भाषाविषयक पुस्तके; कुटिल मती ही चाणक्याची, भातुकलीच्या खेळामधली ही तीन अंकी नाटके, भगवद् गीता, मेघदूत आणि दत्तलहरी या दलादन ऋषीकृत पुरातन संस्कृत साहित्याचा सुगम समश्लोकी मराठी अनुवाद अशी त्यांची विविध साहित्यसंपदा आहे. ती त्यांच्या सृजनशीलतेची व साहित्यिक प्रतिभेची साक्ष होय.
त्यांचे संघटन कौशल्य स्वयंसिद्ध आहे. ते शेवगावच्या महात्मा सार्वजनिक वाचनालयाचे विश्वस्त आणि अध्यक्ष म्हणून 1972 पासून कार्यरत आहेत. त्यांनी वाचनालयाला वाचन चळवळीच्या क्षेत्रातील सर्वच्या सर्व पुरस्कार मिळवून दिले आहेत. वाचनालयाने शतकोत्तर रौप्यमहोत्सव साजरा केला आहे. त्यांनी मराठी रंगभूमीवर गाजत असलेल्या नाटकांचे प्रयोग शेवगावच्या कलाकारांना बरोबर घेऊन केले. त्यांत दुरितांचे तिमीर जावो, लेकुरे उदंड जाहली, भ्रमाचा भोपळा, उधार उसनवार अशा पंचवीसपेक्षा जास्त नाटकांचा समावेश आहे. शेवगावचे पहिले सिनेस्टार गोकुलप्रसाद दुबे, जीवन रसाळ, मधुकर देवणे असे अभिनेते त्यांच्या सोबत तयार झाले. ‘तो मी नव्हेच’ या नाटकाचा फिरत्या रंगमंचावरील प्रयोग राज्यभर गाजला. त्यांनी त्या नाटकाच्या तिकिट विक्रीतून जमा झालेल्या रकमेचा उपयोग शेवगावमधील मंदिरे व विविध शाळा यांच्या बांधकामास देणगी म्हणून केला. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत तरुण तुर्क म्हातारे अर्क मधील प्रा. बारटक्के ही भूमिका मधुकर तोरडमल यांच्या इतक्याच ताकदीने साकारली. त्या नाटकाला 1983 चे सांघिक पारितोषिक तर गोकुलप्रसाद दुबे यांना अभिनयाचे प्रमाणपत्र मिळाले. ‘कुटिल मती चाणक्याची’ व ‘भातुकलीच्या खेळामधली…’ या रमेशसर यांनी लिहिलेल्या आणि दिग्दर्शित केलेल्या नाटकांना राज्य शासनाचे पुरस्कार मिळाले. ते ‘कुटिल मती’मधील चाणक्याच्या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनयाचे रौप्यपदक मिळवणारे तालुक्यातील पहिले रंगकर्मी आहेत. त्या काळात शेवगावसारख्या ग्रामीण भागात स्त्री भूमिका करण्यास महिला तयार होत नसत, तेव्हा रमेशसरांनी कुटुंबातील बहिणी आणि नंतर पत्नी सौ. रागिणी भारदे यांना त्या भूमिका करण्यास प्रोत्साहन दिले.
ते जनमंगल पतसंस्थेचे संस्थापक संचालक आहेत. सरांना आचार्य अत्रे, सानेगुरुजी, रावसाहेब व अच्युतराव पटवर्धन, विनोबा भावे, लक्ष्मणशास्त्री जोशी, द.वा. पोतदार, शिक्षण संचालक वि.वि. चिपळूणकर यांच्यासह राजयोगी भगवानबाबा यांचा प्रत्यक्ष सहवास लाभला आहे. त्यांच्या माजी विद्यार्थ्यांत आय ए एस पुरुषोत्तम भापकर, जिल्हा परिषदेचे सीइओ उत्तमराव करपे, आय पी एस तेजस्वी सातपुते, आकाशवाणी प्रमुख सुनीता पोंक्षे यांचा समावेश आहे. त्यांचे पुत्र रविंद्र हे आणि स्नुषा शुभांगी या उपजिल्हाधिकारी पदावर तर कन्या मृदुला देशपांडे या मंत्रालयात उपसचिव पदांवर विराजमान आहेत. ते ‘विदुरनीती’चे मराठी भाषांतर करत आहेत.
– उमेश घेवरीकर 8855927001 umesh.ghevarikar@gmail.com
———————————————————————————————————————-