रमेश बाळापुरे यांचा जन्म झाला तो मुळी बाविशी नाट्यमंदिरात, 9 डिसेंबर 1946 रोजी. त्यावेळी अचलपूरच्या बिलनपुऱ्यात नाटकाची सुपीकता असे. दोन नाट्यगृहे दिमाखदारपणे उभी होती. दोन्ही नाट्यगृहांत स्वतःची तर नाटके होतच, पण बाहेरच्या कंपन्याही तेथे येऊन नाटके करत असत. रमेश दोनतीन महिन्यांचा झाला असेल तेव्हापासून नाटकात एखाद्या लहान मुलाची आवश्यकता भासली, की त्याला पाळण्यातून काढून रंगभूमीवर घेऊन जात ! रमेशचे वडील लभ्याजी ऊर्फ नारायणराव बाळापुरे हेही कसलेले नट होते.
रमेशला त्याच्या तरुणपणीही बाविशीचे स्टेज अनायासे प्राप्त झाले ! रमेशचे मामा लगदेमास्तर हे नाटकात कामे करत. रमेशमध्ये नाटक असे अनुवंशिकतेने उतरले होते. रमेशला निसर्गानेसुद्धा मदतच केली. त्याला प्रमाणबद्ध उंची, मोठे आकर्षक डोळे, हसरा चेहरा अशी शारीरिक संपत्ती लाभली.
रमेशची आणि माझी भेट 1966 साली झाली, ती रमेशने अचलपूरच्या जगदंब महाविद्यालयात प्रवेश केला तेव्हा. त्या अगोदर त्याने प्री डीग्री ला साताऱ्याच्या महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. तेथील महाविद्यालयीन जीवनात त्याने आचार्य अत्रे यांच्या ‘घराबाहेर’ या नाटकात नायकाची भूमिका केली होती आणि आता जगदंब महाविद्यालयात आमची भेट झाली ती त्या वर्षीच्या बसवलेल्या आचार्य अत्रे लिखित ‘साष्टांग नमस्कार’ या नाटकात. रमेशची निवड ‘रावबहादूर’ या पात्रासाठी केली गेली ती त्याच्या पदरी असलेला ‘घराबाहेर’ या नाटकाचा अनुभव यावरून. ती निवड जगदंब महाविद्यालयाचे प्राचार्य वसंतराव रायपूरकर यांनी केली आणि त्याच नाटकातील ‘भद्रायू’ या कवी भूमिकेसाठी माझी निवड केली गेली होती. मी त्या नाटकाच्या तालमीत रमेशला जो ‘साष्टांग नमस्कार’ घातला, तो आजतागायत कायम आहे. आमच्या दोघांचे दुसरे नाटक म्हणजे ‘कवडी चुंबक’. त्यात रमेश पंपूशेठची भूमिका करायचा आणि मी चंदनची. त्या नाटकासाठी रमेश दिग्दर्शक होता. त्या नाटकाचे वेगवेगळ्या ठिकाणी चार प्रयोग झाले.
अशा प्रकारे, रमेश आणि मी नाटकातील जोडगोळी बनलो. रमेशने नाटक निवडावे- दिग्दर्शित करावे आणि मी त्यात विनोदी भूमिका करावी असा परिपाठ झाला. ‘अक्षांश रेखांश’ हे आमचे गाजलेले नाटक. त्याही नाटकाचे तीन प्रयोग झाले. रमेशचा हातखंडा नवीन कलाकार तयार करण्यात होता. तो त्यांना विशेष तालीम देई आणि प्रत्येक संवाद कसा म्हणावा हे प्रत्यक्षात करून दाखवत असे. नव्या कलाकारांना त्यामुळे फायदा होई. रमेशने कलाकारांच्या तशा दोन पिढ्या तयार केल्या. म्हणजे त्याने आम्हाला तर घडवलेच घडवले, पण आमच्या मुलांनाही घडवले ! त्यात प्रामुख्याने प्रकाश मुनशी आणि त्यांचा मुलगा ‘अनिकेत’, ‘मी’ आणि माझा मुलगा ‘जितेश’, रमेशचा मुलगा ‘राहुल’ आणि पत्नी ‘आशा बाळापुरे’… असे कितीतरी कलावंत त्याने तयार केले. आमच्या ‘बाविशी’च्या नाटकात ‘स्त्री’ पात्रासाठी नट्या बाहेरून बोलावल्या जात. त्याने अचलपूर-परतवाडा नगरीतील मुलीसुद्धा स्त्री पात्रांच्या भूमिकांसाठी तयार केल्या. त्यात अलका मुनशी, कस्तुरी माहेश्वरी, मदनकार, हुडीकर, शशी गिरीधर, विलासिनी देशमुख, हर्षा पनके, धनश्री जडे, पटीले या मुलींचा समावेश आहे. रमेशने नाटकासाठी तयार केलेल्या या मुलींनी त्यांच्या त्यांच्या भूमिकाही गाजवल्या.
त्याने मुलांमध्येसुद्धा अनेक कलाकारांना दिग्दर्शन देऊन मंचसज्ज केले. त्या कलाकारांना त्यांच्या विविध क्षेत्रांत त्यांच्या करिअरमध्ये रमेशच्या मार्गदर्शनाचा लाभ होत आहे. रत्नाकर हंतोडकर, भैय्या पांडे, प्रमोद चतुर, बिजवे, दंडवते हे अचलपूर आणि परतवाडा येथील कलाकार त्याच्या दिग्दर्शनाखाली तयार झाले. त्याने मनोज छापानी, विठ्ठल गिरी, किरण इंगोले, सुधाकर कुळकर्णी, सचिन करडे, प्रकाश कुकडे, राजा धर्माधिकारी असे अनेक कलाकार म्हणून गौरवान्वित केले.
रमेश स्वत: मात्र इतके कलाकार घडवून देखील प्रसिद्धीपासून दूर आहे. नाटकाचा ग्रूप चालवणे 2005 नंतर कठीण होऊन बसले. मीही मुंबईला निघून गेलो आणि तेथे माझे एकपात्री करण्यात दंग झालो. माझे ‘वाचाल तर वाचाल’ या संहितेचे पाचशे प्रयोग झाल्यानंतर रमेशनेसुद्धा एकपात्रीकडे वळण्याचे ठरवले. त्याने त्यासाठी निवडले ‘कर्मयोगी गाडगेबाबा’. रमेशने गाडगेबाबांचे एकपात्री प्रयोग सुरू केले आणि योगायोग असा, की त्याचे गुडघे दुखू लागले ! रमेश स्वत: अचलपूरच्या नगरपालिकेत नोकरी करत असे. रमेशच्या पत्नी आशा यांचे निधन काही वर्षांपूर्वी झाले. त्याला दोन मुलगे- एक पुण्याला असतो, दुसरा राहुल त्याच्याबरोबर अचलपूरला.
रमेशचे आणखी एक कार्य अचलपूरची जनता विसरू शकणार नाही, ते म्हणजे तात्यासाहेब देशपांडे यांच्या वाड्यातील नृसिंह जयंतीचे विधिनाट्य. त्यात रमेश ‘हिरण्यकश्यपू’ हे पात्र बेमालूमपणे रंगवत असे. ती गादी रमेशला त्याचे वडील लभ्याजी ऊर्फ नारायणराव बाळापुरे यांच्याकडून मिळाली होती आणि ती त्याने थोडीथोडकी नव्हे तर अठ्ठेचाळीस वर्षे आनंदाने पार पाडली. रमेशने पंच्याहत्तर वर्षे पूर्ण करून शहात्तराव्या वर्षात पदार्पण केले आहे. त्याची जिद्द व मर्दुमकी त्याच्या शरीरप्रकृतीने जिरवण्याचे ठरवले असले तरी त्याने ते बळ हरवलेले नाही. नियती कधी कोणावर कसा घाला घालील हे सांगता येत नाही. तिने लहानपणापासून वयाच्या पंच्याहत्तरी पर्यंत रंगभूमीची सेवा करणाऱ्या रमेशवर वयाच्या शहत्तराव्या वर्षी, अचानक घाला घातला. रंगभूमीवरून प्रेक्षकांना हसवणारे आणि रडवणारे रमेशचे डोळे एकदम अंधारात गडप झाले ! त्याला काही दिसेनासे झाले. सर्व प्रयत्न झाले, त्याच्या डोळ्यांतील अंधार जाईना, पण पठ्ठ्याची हिंमत बघा, तशा अवस्थेत त्याने रंगमंचावर ‘एकपात्री’तील गाडगेबाबा उभा केला ! बाबांच्याच जयंतीला छ.मु. कढी महाविद्यालयाने त्याचा तो कार्यक्रम सादर केला. एका लांब टेबलासमोर उभा राहून, हालचाली मर्यादित त्याने गाडगेबाबांची आर्तता आणि आर्जव साकार केले. महाविद्यालयातील मुले खिळून बसली होती. संपूर्ण एक तासभर मी त्याच्या बाजूला उभा होतो. त्याचे डोळे गरगर फिरत नव्हते, परंतु सुंदर अभिनय आणि वाक्यांची अचूक फेक. ‘शोधावा गोपाला – देवकीनंदन गोपाला’ ही त्याची आर्त हाक तरुण मुलांच्या हृदयापर्यंत नेमकी पोचली !
राहुल बाळापुरे 8329680137
– अशोक बोंडे 9619246124
———————————————————————————————————