विलास रबडे सत्याहत्तर वर्षांचा झाला, पण त्याचा दिवस चोवीस तासांपेक्षा आणि आठवडा सात दिवसांपेक्षा मोठा आहे ! तो इतक्या गोष्टी करत असतो, की ईश्वराने या माणसाला अतिरिक्त ‘काल’ देऊन या जगात पाठवले आहे की काय असे वाटावे ! मात्र तो अतिरिक्त बहुतेक वेळ समाजासाठी खर्च करतो. त्याची नोकरी पुण्यातील लोणी येथे फिलिप्समध्ये मेंटेनन्स विभागात होती. तेथे देखील त्याला कामामध्ये परमानंद वाटे ! त्याने ती नोकरी कंपनीतील सर्व मशीन्स उत्तम स्थितीत ठेवून कंपनीचे प्रॉडक्शन वाढावे, कंपनीचा नफा वाढून कामगारांना त्याचा योग्य वाटा मिळावा या उदात्त हेतूने शेवटपर्यंत केली ! वेगवेगळी मशीन्स दुरुस्त करणे, त्यांचे कार्य समजून घेणे, वेळ पडेल तेव्हा त्यात आवश्यक तो बदल घडवून आणून ते अधिक कार्यक्षम कसे होईल हे बघणे हीच त्याची आवड.
विलासला लहानपणापासूनच तांत्रिक करामती करण्याचा छंद. मशीनला लागणारे स्पेअर्स मिळाले नाही की ते मशीन सुरू करण्याचे चॅलेंज घेणे हा त्याचा आवडता उद्योग. मग न मिळणाऱ्या स्पेअरला पर्याय शोधणे; नव्या पर्यायाच्या अनुषंगाने मशीनमध्ये आवश्यक ते बदल करणे ही जिकिरीची कामे तो आनंदाने पार पाडे. मशीन दुरुस्त होऊन त्याचे कार्य सुरू झाले की विलासच्या चेहऱ्यावर समाधान व आनंद पसरे.
तो मराठा चेंबरच्या इलेक्ट्रॉनिक कमिटीत कार्यरत होता. पुण्यात इलेक्ट्रॉनिक्स उद्योगांची वाढ व्हावी हा त्या कमिटीचा प्रयास असे. हवामानाचेदेखील शास्त्र असते आणि त्यातून हवामानाचे अचूक अंदाज वर्तवता येतात याची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी काही करावे असे त्याच्या डोक्यात आले. त्याने हवामानाचे मोजमाप करणारी यंत्रे पन्नास शाळांत मोफत बसवण्याचा उपक्रम जाहीर केला. त्या क्षेत्रातील मित्रांना त्या कामात गुंतवले.
विलास म्हणाला, “माझी विज्ञान-तंत्रज्ञानाची आवड शाळेपासून सुरू झाली. डेक्कन भावे स्कूलमध्ये पी.वाय. जोशी नावाचे शिक्षक फिजिक्स शिकवत. त्यांच्यामुळे मला विज्ञान विषयात रस निर्माण झाला. मी शाळकरी वयात ‘मराठी विज्ञान परिषदे’चे छात्र सभासदत्व घेतले होते. नाशिक येथे झालेल्या विज्ञान संमेलनात चांद्रयानाची प्रतिकृती बनवून सादर केली. त्याचे कौतुक खुद्द शंतनुराव किर्लोस्कर यांनी केले.” विलासला त्याच काळात ‘विज्ञानछंद’ मासिकात येणारे प्रयोग करून बघण्याचा छंद जडला. त्याने शाळेच्या विज्ञानविषयक स्पर्धेमध्ये वाफेपासून टर्बाईन बनवून त्यापासून ट्राफिक सिग्नल बनवला, त्याला पहिले बक्षीस मिळाले ! त्याला एका लेखातून हॅम रेडिओची ओळख झाली. त्याने वयाच्या बाविसाव्या वर्षी, 1972 साली हॅम रेडिओची परीक्षा पास होऊन त्याचे लायसन्स मिळवले.
त्याने हॅम रेडिओ सेट मिळवून पुण्यात प्रदीप दळवी आणि अरविंद आठवले यांच्याबरोबर हॅम क्लब सुरू केला. पुण्यातील तसा तो पहिला क्लब. जगभरच्या इतर क्लबशी संपर्क साधणे सुरू झाले. त्याने एकदा अरुण नित्सुरेला जॉर्डनचे राजे हुसेन यांच्याशी संपर्क साधून दाखवला -त्यांच्याशी गप्पा मारल्या. ‘हॅम क्लब’मध्ये प्रत्येकाशी एकेरी संबोधण्याची पद्धत आहे. राजे हुसेनशी विलास ‘हाय हुसेन’ असे एकेरीत बोलतो याचे मित्रांना आश्चर्य वाटले ! राजीव गांधीदेखील हॅम होते. त्यांनादेखील विलासने ‘हाय राजीव’ असे म्हटले.

कोठेही नैसर्गिक आपत्ती आली की हॅम मंडळी ती बातमी जगाच्या कानाकोपऱ्यांत पोचवत. तांबड्या समुद्रात एक यॉट जगप्रवासाला निघाली होती. त्यात नवरा-बायको -त्यांचे तान्हे मूल आणि एक मित्र होते. तांबड्या समुद्रात अचानक यॉटच्या खालच्या बाजूने पाणी आत येऊ लागले. तिघांपैकी प्रत्येक जण आळीपाळीने पाणी उपसू लागले. त्यात त्यांची दमणूक झाली. त्यात प्रचंड मोठ्या वादळाची चाहूल लागली. त्यांनी यॉटवरून ‘हॅम’शी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. विलासला तो सिग्नल मिळाला. विलासने त्यांची कहाणी ऐकली आणि त्या भागातील जहाजांना हॅम रेडिओमार्फत पुण्यातून संपर्क केला. एक जपानी तेलवाहू जहाज त्यांच्यापासून काही किलोमीटर अतंरावर होते, पण ते विरुद्ध दिशेने जात होते. जहाजाच्या कप्तानाने जहाज वळवता येणार नाही, कारण तसे केले तर आंतरराष्ट्रीय नियमाचा भंग होईल असे जाणले होते. शिवाय, इतके प्रचंड जहाज 180 अंश कोनात वळवणे अवघड होते. विलासने आंतरराष्ट्रीय दळणवळण संस्थेकडून त्यासाठी परवानगी मिळवली. परवानगी मिळाल्यामुळे कप्तानाने ते एवढे मोठे जहाजाचे धूड वळवले. ते पाच-सहा तासांनी यॉटच्या जवळ आले. दूर नांगर करून त्यातून लाईफ बोटीतून काही लोक यॉटच्या जवळ गेले. यॉट खेचून बोटीजवळ आणली, मग यारीने उचलून संपूर्ण यॉट जहाजावर घेतली. पण तोपर्यंत आतले नवरा-बायको अतिश्रमाने बेशुद्ध पडले होते. बाळ आणि मित्र जागे होते. त्या दोघांना प्राथमिक मदत दिली. नवरा-बायको शुद्धीवर आल्यावर त्यांनी दोन दिवस जहाजावर मुक्काम केला. मधल्या काळात जेथून पाणी आत येत होते ती दुरुस्ती करून यॉट परत समुद्रात सोडून सर्वांना अलविदा करून जपानी जहाज त्यांच्या दिशेला निघून गेले !

विलासने हॅमच्या माध्यमातून वादळ, भूकंप, त्सुनामी, पूर वा अपघात अशा प्रसंगी किती वेळा मदत केली याला गणती नाही. कित्येक वेळा अशा आपत्तीत टेलिफोनसारखी सेवा प्रथम बंद पडते आणि हॅम रेडिओच उपयुक्त ठरतो. रोज संध्याकाळी साडेसात वाजता जगभर संपर्क करणे ही विलासची सवय होऊन गेली आहे. हॅममुळे विलासने अनेक वेळा हिमालयीन रॅलीबरोबर सफर केली आहे. विलास भारताच्या दक्षिण ध्रुव मोहिमेतील सहभाग घेणाऱ्यांचा त्यांच्या घरच्यांशी संपर्क साधून देत असे. अदिती पंत त्या मोहिमेत होत्या. अदिती यांचे वडील अप्पासाहेब पंत त्यांच्याशी विलासच्या हॅम रेडिओच्या माध्यमातून संपर्क साधत. विलास त्यांच्या घरचे होऊन गेले. जगभरची हॅम मंडळी त्यांच्या माध्यमातून लोकोत्तर समाजकार्य करत असतात. सगळे मुकाट, कोठेही गाजावाजा न करता. विलासने नैसर्गिक आपत्तींमध्ये संकटमोचनाचे काम मोठ्या प्रमाणात केले आहे, त्याला गणती नाही.
विलास म्हणतो, “जगात नोबेल पारितोषिके भारतीयांना का मिळत नाही याचे उत्तर भारतीय शिक्षण पद्धतीत आहे. घोकंपट्टी, पुस्तकी शिक्षण देणारी शिक्षणपद्धत विद्यार्थ्याला परीक्षार्थी बनवते. त्याची सर्जनशीलता मारून टाकते. विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात भारताला काही करायचे असेल तर मुलांच्या सर्जनशीलता वाढीसाठी प्रथम काम करण्यास हवे. त्यासाठी क्रमिक पुस्तके बाजूला ठेवून मुलांना वेगवेगळे अनुभव देणे जरुरीचे आहे. मी त्यासाठी रिपेअर कॅफे ही संकल्पना आणली आहे.”
विलासच्या कॅफेत घरातील नादुरुस्त वस्तू आणावी आणि ती दुरुस्त करूनच घरी न्यावी अशी कल्पना आहे. कॅफेत प्लंबर, इलेक्ट्रिशियन, नाक्यावरचे उपकरणे दुरुस्ती करणारे व्यवसायिक-दुकानदार हे मुलांना मार्गदर्शन करत असतात. मुलांची विज्ञान उत्सुकता वाढवण्यासाठी कॅफेचा उपयोग होतो. काही मुलांची उपजीविकाही त्या रिपेअर कॅफेतून निर्माण होऊ शकते.

‘प्रयोगातून विज्ञान’ ही विलासची तशीच संकल्पना आहे. ‘विज्ञान भारती’च्या माध्यमातून पुण्याच्या विमलाबाई गरवारे शाळेत विज्ञानाची आवड असणाऱ्या तीस मुलामुलींचा ग्रूप केला आहे. त्यांना या उपक्रमातून विज्ञान शिक्षण दिले जाते. ते विद्यार्थी विज्ञानविषयक स्पर्धेत पारितोषिके मिळवत आहेत. विमलाबाई गरवारे प्रशालेत ‘सुबोधवाणी’ हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी वाहिलेले पहिले वेब रेडिओ स्टेशन सुरू केले आहे. ते केंद्र शिक्षक व विद्यार्थी चालवतात. सुबोधवाणी गेले चार वर्षे कार्यरत आहे. विद्यार्थी व शिक्षक यांनी पाचशेपेक्षा जास्त शैक्षणिक कार्यक्रम निर्माण केले आहेत. त्या कार्यक्रमांचे ध्वनिमुद्रण हा अमुल्य ठेवा आहे. ते सर्व कार्यक्रम लुप्त पद्धतीने दररोज 24 x 7 प्रसारित केले जातात.
लिंक – https://app.box.com/s/0r29ztdb8xia9gvwt5eowy0dgvll05dy

विलासचा आणखी एक उपक्रम म्हणजे ‘टेक फोरम’. तांत्रिक ज्ञान असणारे शास्त्रज्ञ व त्याची जरुरी असणारे उद्योजक यांना ही संस्था एकत्र आणते आणि यशस्वी उद्योजक निर्माण करते. विलासचा उत्साह दुर्दम्य आहे. विज्ञान-तंत्रज्ञानच मानवी प्रश्न सोडवेल ही त्याची ठाम धारणा आहे
विलास रबडे 9822502078 rabde.vilas@gmail.com
– श्रीकांत कुलकर्णी 9850035037 shrikantkulkarni5557@gmail.com